October 26, 2025
आजीच्या रानभाजींच्या पोतडीतली बहुऔषधी 'भारंगी' – ताप, सर्दी, दमा, पोटदुखीवर उपयुक्त; चविष्ट आणि औषधी भाजीचे पारंपरिक प्रकार.
Home » आजीची भाजी रानभाजी – बहुऔषधी भारंगी..
फोटो फिचर वेब स्टोरी शेती पर्यावरण ग्रामीण विकास

आजीची भाजी रानभाजी – बहुऔषधी भारंगी..

विशिष्ट निगा अथवा खास शेती न करता उगवलेल्या भाज्यांना ‘रानभाज्या’ म्हणतात. जंगलात, शेताच्या बांधावर, माळरानात, लागवड न करता निसर्गतः या वाढत असतात. या वनस्पतींमध्ये खनिजे, महत्त्वाची मूलद्रव्ये, अत्यंत उपयोगी रसायने, अनेक औषधी गुणधर्म असतात. ऋतूनुसार या भाज्या सहज उपलब्ध होत असतात. जंगलालगतचे आदिवासी आजही त्यांचे पारंपरिक अन्न म्हणून या रानभाज्यांचा आहारात वापर करतात.

प्रशांत कुसुम आनंदराव सातपुते,
जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी

आजी आणि तिची रानभाजी ही सध्याच्या जीवनापासून दूरदूर जाताना दिसत आहे. अनुभवाची गोष्ट सांगून नातवांचे जीवन समृध्द करणारी घरातली आजी, तिचा औषधी गुणकारी बटवा आणि मानवी आरोग्य समृध्द करणारी तिची रानभाजी या नव्या पिढीपासून काळाच्या ओघात हरवत जात आहे. अशा रानभाज्यांची ओळख करुन देणारी आजीची भाजी रानभाजी ही महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा रत्नागिरी यांच्या सौजन्याने जिल्हा माहिती कार्यालयामार्फत सुरु केलेल्या या मालिकेत आजची रानभाजी आहे भारंगी अर्थात भारंग…

विविध भाषेतील नावे –

English: Rotheca serrata (syn. Clerodendrum serratum, Volkameria serrata )- Blbeetle killer, blue-flowered glory tree, blue fountain bush • Hindi: भारंगी bharangi • Konkani: भारंगी bharangi • Manipuri: মোইরাংগ খানম moirang khanam • Marathi: भारंग bharang, भारंगी bharangi • Nepalese: अनढिकि andikhi • Sanskrit: भार्गी bhaargi, भारङ्गी bharangi, ब्राह्मणयष्टिका brahmanayashtika, पद्म padma, फञ्जी phanji • Tamil: சிறுதேக்கு

ताप किंवा कफ असलेल्या रोगामध्ये भारंगीचे मूळ गुणकारी आहे. कफ जास्त वाढल्याने होणाऱ्या दमा, खोकला या विकारात भारंगमूळ प्रामुख्याने वापरले जाते. सर्दी व घशातील दोषांवर सुंठ अथवा वेखंडाबरोबर भारंगमूळ दिले जाते. दम्यावर भारंग मूळ, ज्येष्ठमध, बेहडा व अडुळसाची पाने यांचा काढा करुन देतात. दमा होऊ नये म्हणून आजही कोकणात भारंगीच्या पानांची भाजी वापरतात. कोवळ्या पानांची भाजी चवीला रुचकर असते. सर्दी, खोकला, ताप, छाती भरणे या विकारात ही भाजी गुणकारी ठरते.

पोटात कृमी झाल्यास पाने शिजवून त्यातील पानी गाळून प्यावे. पोट साफ होण्यासाठीही ही भाजी उपयुक्त आहे. भारंगीच्या फुलांचीही भाजी करतात.

अशी करा भारंगीची भाजी –

देठ काढून टाकून भारंगीची कोवळी पाने घ्यावीत. कढईत तेल टाकून त्यावर मोहरी तडतडू द्यावी. त्यावर अर्धी वाटी चिरलेला कांदा परतून घ्यावा. यात लसणाच्या 4, 5 पाकळ्याही ठेचून घालाव्यात. त्यावर चिरलेली भारंगीची पाने घालावीत. झाकण ठेवून वाफ काढावी. पाण्याचा थोडा त्यावर हबका मारावा. तिखट, मीठ, हळद, थोडा गुळ, व हिंग घालून शिजवून उतरावी. भारंगीची भाजी कडू असल्याने बऱ्याच वेळा पाणी काढूनही ती केली जाते.

अशी करा भारंगीच्या फुलांची भाजी –

कडवटपणा काढून टाकण्यासाठी भारंगीची फुले 2, 3 वेळा पाण्यातून पिळून घ्यावीत. त्यानंतर ती चिरुन घ्यावीत. तेलाच्या फोडणीत मोहरीसह एक वाटी चिरलेला कांदा परतून घ्यावा. मूग डाळ धुवून घालावी. त्यानंतर चिरलेली फुले घालावीत. परतून तिखट घालावे. मंद आचेवर ही भाजी परतावी. चवीनुसार मीठ, गुळ घालून भाजी पुन्हा परतून घ्यावी. भाजलेले डाळीचे कुट, भाजलेल्या तिळाची पुड, खसखस, खिसलेले खोबरे घालूनही भाजी अधिक चविष्ट बनविता येते.

तोंडाची चव गुळचट असणे, पोट जड असणे, तोंडात चिकटा जाणवणे, सकाळी उठल्यावर डोळ्यांभोवती किंचित सूज जाणवले. अनुत्साह, हवेच्या बदलाने सर्दी होणे, कफ घट्ट होणे अशा वेळी भारंगीच्या पानांची भाजी व लसणाची फोडणी देऊन बाजरीच्या भाकरीबरोबर ती खावी.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading