“लाईट,कॅमेरा आणि अॅक्शन” असे शब्द कानावर पडले कि,आपल्या डोळ्यासमोर सिनेमाचा मोठा कॅमेरा किंवा शूटिंगची छायाचित्रे येतात. सिनेमाचे आकर्षण लहानांपासून- मोठ्यांपर्यंत सर्वांना असते. पण प्रत्यक्षात दोन ते अडीच तासात रसिकांचे मनोरंजन करणारा हा सिनेमा कसा असतो ?त्यातून मनोरंजनाबरोबर नेमके काय सांगायचे असते ? व एकूणच सिनेमाच्या अंतरंगातील अनेक बारीकसारीक गोष्टी व त्याचे विवेचन हे या पुस्तकात अनुभवता येणार आहे. मराठी, हिंदी व इंग्रजी बरोबरच अनेक भाषांमधील साठ पुरस्कारप्राप्त कलाकृतींची समीक्षणात्मक माहिती युवालेखक आशिष निनगुरकर यांच्या ‘सिनेमा डॉट कॉम’ या पुस्तकातून भेटीला येणार आहे.
आशिषने आतापर्यंत काही चित्रपट व मालिकांमध्ये अभिनयाची चुणूक दाखविली असून त्याबरोबरच पटकथालेखन, चरित्रलेखन व गीतलेखन अशा क्षेत्रात तो मुशाफिरी करत आहे. आशिषची आत्तापर्यंत ‘स्ट्रगलर’,’ हरवलेल्या नात्यांचं गाव’, ‘न भेटलेली तू’,’ अग्निदिव्य’,’ कुलूपबंद’, उजेडाच्या वाटा’ व ‘चित्रकर्मी’ आदी पुस्तके प्रकाशित झाली आहेत. आशिषच्या निर्मिती केलेल्या अनेक लघुपट व माहितीपट यांना विविध पुरस्कार मिळाले आहेत. या पुस्तकातून सिनेमाच्या नेमकी गोष्ट, सिनेमातून मांडलेले प्रसंग व त्याचे एकूणच सूक्ष्म चित्रण ‘सिनेमा डॉट कॉम’ या पुस्तकात वाचायला मिळेल. सिनेमाची एकंदरीत गोष्ट व त्या सिनेमाचा पूर्ण प्रवास आता पुस्तकरूपाने आपल्या भेटीला येणार असून येत्या मंगळवारी २३ जुलै रोजी मान्यवरांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. या पुस्तकाचे लेखन येथील हरहुन्नरी कलावंत आशिष निनगुरकर यांनी केले आहे. तेजश्री प्रकाशनातर्फे प्रकाशित होत असलेल्या ‘सिनेमा डॉट कॉम’ या पुस्तकाला ज्येष्ठ फिल्म समीक्षक अशोक उजलंबकर यांनी प्रस्तावना लिहिली आहे. तसेच ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्तजी यांनी पुस्तकावर भाष्य केले आहे. हे पुस्तक वाचतांना आपल्या डोळ्यासमोर संपूर्ण सिनेमा उभा राहतो.
“सिनेमावेड असणाऱ्या प्रत्येक रसिकमनास…” अशा अर्पणपत्रिकेने सुरुवात असलेल्या या पुस्तकात सिनेमाचे तंत्र-मंत्र आणि शुटिंगचे वास्तव अनुभव व काही मजेदार किस्से पण सांगितले आहेत. ‘कॅमेराचा वापर, प्रकाशयोजना , वेशभूषा तसेच कलाकार व तंत्रज्ञ आदींची सर्व माहिती विस्तृतवार वाचायला मिळणार आहेत. ‘नवे काहीतरी करण्याची उर्मी’ व ‘त्यासाठी संघर्षाची मानसिकता असेल तर कलाक्षेत्र आपणास स्वीकारते’, असे हक्काने सांगणारा आशिष या इंडस्ट्रीमध्ये येऊ पाहणाऱ्या अनेक तरुण-तरुणींना या पुस्तकातून चंदेरी दुनियेचा ‘सिनेमामार्ग कसा आहे?’, असा संदेश देऊ पाहतो. नव्या उभरत्या सिताऱ्यांना, तंत्रज्ञांना व सिनेमाप्रेमींना हे पुस्तक मार्गदर्शक ठरू शकेल असे वाटते.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.