प्रा. संतोष फटे यांनी ‘अंगारमाती’ व ‘इडा पीडा टळो’ या कथासंग्रहांचा गंभीरपणे केलेला अभ्यास, त्यांचा आशय व अभिव्यक्तीचे केलेले विश्लेषण, त्यामधील साम्यभेद, सामर्थ्य मर्यादांची केलेली चर्चा, वाचकांना या कलाकृतीच्या अभ्यासाची व आकलनाची एक व्यापक प्रगल्भ दृष्टी देते. या कथाकारांचे व कथासंग्रहांचे मूल्यनिर्णयन करण्याचे एक मूल्यात्मक भान येते.
डॉ. अरुण शिंदे
प्राध्यापक व मराठी विभाग प्रमुख नाईट कॉलेज कोल्हापूर
प्रा. संतोष फटे हे मराठी साहित्याचे अभ्यासक व वक्ते आहेत. ग्रामीण जीवन व ग्रामीण साहित्य हा त्यांच्या आस्थेचा विषय आहे. ते स्वतः फटेवाडीसारख्या छोट्या गावातून व कष्टकरी शेतकरी कुटुंबातून आलेले असल्याने त्यांना शेतकऱ्यांचे कष्टमय जीवन, दुःख, दारिद्र्य, शोषण, संघर्ष, वेदना, उपेक्षा, समस्या वगैरेंचा जन्मजात अनुभव आहे. त्यामुळे प्रत्यक्ष जगण्याला वाङ्मयीन पातळीवर तपासताना त्यांची आत्मानुभूतीची धार अधिक सूक्ष्म व तीक्ष्ण होते. ‘काळ्या मातीत खपून मोती पिकवणाऱ्या आणि गाव पांढरीशी इमान राखणाऱ्या आई-वडिलांना’ त्यांनी आपले पुस्तक अर्पण केले आहे. यावरून आई-वडिलांबरोबरच माती माणसांशी असणारी त्यांची जैविक बांधिलकी दिसून येते.
प्रा. फटे यांनी एम. फिल. पदवीसाठी ‘अंगारमाती’ (भास्कर चंदनशिव) आणि ‘इडा पीडा टळो’ (आसाराम लोमटे ) या मराठीतील दोन महत्त्वाच्या कथासंग्रहावर संशोधन केले होते. हे कथासंग्रह महाराष्ट्राच्या विविध विद्यापीठात अभ्यासले जात असल्याने, विद्यार्थी शिक्षकांना त्याचे सर्वांगीण आकलन व परिशीलन व्हावे या उद्देशाने प्रा. फटे यांनी शोधप्रबंध पुस्तक रूपाने प्रकाशित केला आहे. या पुस्तकातून या कथासंग्रहाचे आशय व अभिव्यक्तीच्या पातळीवरील विशेष व वेगळेपण ठळकपणे अधोरेखित करण्याचे काम प्रा. फटे यांनी केले आहे.
प्रस्तुत पुस्तक सहा प्रकरणांमध्ये विभागलेले आहे. पहिल्या प्रकरणांमध्ये ग्रामीण कथेचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये यांचा आढावा घेतला आहे. ग्रामीण साहित्याची संकल्पना, गावगाड्याचे स्वरूप, स्वातंत्र्योत्तर काळातील ग्रामजीवनातील बदल, ग्रामीण साहित्याची संकल्पना व स्वरूप, ग्रामीण कथेची प्रेरणा व वैशिष्ट्ये, ग्रामीण कथेची वाटचाल इत्यादींचा परामर्श घेतला आहे. ‘घाट, आशय, अभिव्यक्ती, कलात्मकता, भाषा, विशेष अशा विविध अंगाने ग्रामीण कथेचा प्रवाह विकसित होत गेला आहे’, असे निरीक्षण त्यांनी नोंदविले आहे.
‘अंगारमाती’ या कथासंग्रहाची समीक्षा दुसऱ्या प्रकरणामध्ये केलेली आहे. हासेगाव (ता. कळंब) सारख्या दुष्काळी खेड्यात जन्मलेल्या भास्कर चंदनशिव यांचे अभावग्रस्त बालपण, शिक्षण, छंद, महाविद्यालयीन जीवनात क्रांतिसिंह नाना पाटलांच्या भाषणाचा प्रभाव, वाङ्मयीन-वैचारिक जडणघडण, शरद जोशी व शेतकरी संघटनेचा प्रभाव वगैरेंची नेमकी मांडणी करून एखाद्या लेखकाचे वाङ्मयीन व्यक्तिमत्त्व कसे आकाराला येत असते, हे प्रा. फटे यांनी उलगडले आहे. चंदनशिव यांच्या कथालेखनाच्या प्रेरणांचाही नेमका शोध प्रा. फटे यांनी घेतला आहे. ‘अंगारमाती’ (१९९१) मधील कथांचे आशयकेंद्रित वर्गीकरण व त्यांचे विश्लेषण प्रा. फटे यांनी केले आहे. शेतकऱ्यांचे शोषण (हिशोब, तोडणी, इस्कुटा, कोळसं इत्यादी) शेतीमालाच्या बाजारभावाचा प्रश्न (लाल चिखल, सडणी इत्यादी) शेतकऱ्यांचे आंदोलन (नवी हत्यारं, मेखमारो) ग्रामीण राजकारण, (पोस्टर, लाल अंधार), दुष्काळ दारिद्र्य (आताडी, एक कथा चोराची), • व्यक्तिचित्रण (विळखा, लढत, मला काय त्येचं) कौटुंबिक संघर्ष (खोडा, तिढा) इत्यादी आशय सूत्रांमधून ग्रामीण जीवनाचा अंतःस्तर, अंतः संघर्ष यांचे मोठे भेदक व कलात्मक चित्रण भास्कर चंदनशिव यांनी केले आहे. स्वातंत्र्योत्तर काळातील ग्रामीण भागातील बदलांचा उभा आडवा छेद त्यांनी घेतला आहे. प्रा. फटे यांनी असे आशयसूत्रानुरूप प्रत्येक कथेची चिकित्सा केलेली आहे. चंदनशिव यांच्या कथेचे विषय आशय असे हे समकालीन ज्वलंत सामाजिक समस्यांचे कलात्मक आविष्करण कसे असते, यावर प्रा. फटे यांनी प्रकाश टाकला आहे. चंदनशिव यांच्या कथांचे वेगळेपण अधोरेखित करताना प्रा. फटे यांनी पुढील निरीक्षणे नोंदवली आहेत. ‘अंगारमाती’ कथासंग्रहाचे शीर्षक शेतीक्रांतीचा उद्घोष करणारे आहे. मातीत मळणाऱ्या माणसांच्या अनुभवातून ही कथा जन्माला येते. शेतकऱ्यांच्या शोषण व्यवस्थेची विविध रूपे उलगडते, अस्सल मराठवाडी बोली, पारंपरिकतेची मांडणी झुगारून कथांची स्वतंत्रतेने मांडणी, ग्रामीण व्यक्तीचित्रे, मनोविश्लेषण, परिणामकारक व मनाला चटका लावणारे शेवट इत्यादी वैशिष्ट्यांमुळे या कथासंग्रहाचे वेगळेपण नजरेत भरते.
‘अंगारमाती’च्या आशयाबरोबरच अभिव्यक्तीचीही सखोल समीक्षा प्रा. फटे यांनी केली आहे. कथा मांडणी, व्यक्तिरेखा, वातावरण, प्रसंग चित्रण, संवाद, निवेदन शैली, मनोविश्लेषण, प्रयोगशीलता, चित्रमयता, प्रतिमा- प्रतीके वगैरेंचा सूक्ष्म आढावा प्रा. फटे यांनी घेतला आहे. भास्कर चंदनशिव यांच्या भाषाशैलीचा सविस्तर परामर्श घेऊन पुराव्यांसह निरीक्षणे नोंदविली आहेत. अल्पाक्षरी शीर्षके, मराठवाडी बोलीची रूपे, जोडशब्द, विचारप्रवर्तक विधाने, वाक्प्रचार, घोषणा, नादानुकारी शब्द, उदाहरणे, दाखले, म्हणी इत्यादींची अनेक उदाहरणे देत चंदनशिव यांच्या अस्सल देशी समृद्ध भाषावैभवाचे थक्क करणारे दर्शन घडविले आहे. भास्कर चंदनशिव यांची वैचारिक व वाड्मयीन पाळेमुळे आपल्या मातीत आणि माणसांमध्ये खोलवर रुजलेली असल्याने त्यांची कथा वास्तवामागील वास्तवाचा कलात्मक वेध घेते व अस्सल शब्दकळेने त्या सबंध पर्यावरणाचे एक जिवंत, उत्कट शब्दचित्र वाचकांसमोर उभी करते. हे एक श्रेष्ठ कथाकार म्हणून त्यांचे वेगळेपण व असाधारण वैशिष्ट्य आहे.
आसाराम लोमटे हे आजच्या काळातील एक संवेदनशील व विचारगर्भलेखन करणारे कथाकार, कादंबरीकार व पत्रकार आहेत. परभणी जिल्ह्यातील धामणगाव येथे एका शेतकरी कुटुंबात जन्म झालेल्या आसाराम लोमटे यांच्या जगण्याचे प्रवासाचे दाहक वास्तव प्रा. फटे यांनी मांडले आहे. ‘वयाची सोळा वर्षे पूर्ण होईपर्यंत वृत्तपत्रही न पाहिलेला मुलगा’ आज एक प्रथितयश पत्रकार होतो, ही घटना मोठी क्रांतिकारक आहे. महाविद्यालयीन शिक्षणकाळात पत्रकारिता व साहित्याची रुची, गंभीर आणि वास्तवदर्शी वाचनाकडे ओढा, शोषित-श्रमिक, कष्टकऱ्यांच्याविषयी आस्था, शोषकाची स्पष्ट जाणीव, ठाम वैचारिक भूमिका, ग्रामजीवनातील अंत:स्तर व बदल नेमकेपणाने टिपणारी सूक्ष्म संवेदनदृष्टी ही लोमटे यांची काही वैशिष्ट्ये सांगता येतील. त्यांच्या कथालेखनाच्या प्रेरणांचा मागोवा प्रा. फटे यांनी घेतला आहे. लोमटे यांच्या लेखनाची प्रेरणा नीटपणे समजून घेतली म्हणजे त्यांच्या लेखनाचे आकलन व मूल्यमापन यथार्थपणे करता येते. बदलत्या ग्रामवास्तवाचा शोध, ग्रामीण सत्ताकारण, सरंजामी मानसिकतेचा शोध, सत्तास्पर्धा व त्यामध्ये सामान्य माणसांची ससेहोलपट, खेड्यांचे उद्ध्वस्तीकरण व त्यास जबाबदार घटक, शोषण व्यवस्था व नवशोषक वर्ग अशा अनेक बाबींचा शोध घेत वर्तमान ग्रामीण समाजवास्तवाचे तळामुळासकट वास्तव शब्दबद्ध करणे, ही लोमटे यांची प्रेरणा आहे.
‘इडा पीडा टळो’ (२००६) हा दीर्घकथांचा संग्रह आहे. त्यांची प्रत्येक कथा समस्याकेंद्रित आहेत. आशयसूत्रांच्या साम्यानुसार त्यांचे पुढीलप्रमाणे वर्गीकरण केले आहे. शेती व शेतकऱ्यांच्या वाताहतीचे चित्रण (चरक, इडा पीडा टळो), राजकारण ( बेईमान, निचरा), कामगार वर्गाचे प्रश्न (जिनगानीचा जाळ), दलित-सवर्ण संघर्ष ( होरपळ ) इ. कथांचा आशय, प्रश्नांचे टोकदार चित्रण, व्यापक जनसमूहाच्या व्यथा वेदनांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या व्यक्तिरेखा, भाषा व निवेदन शैलीवर विलक्षण पकड, घटना-प्रसंग वाचकांच्या मनःचक्षूत, जीवंत, साक्षात उभी करणारी शैली, प्रयोगशीलता, संघर्ष वगैरे लोमटे यांच्या कथांची बलस्थाने आहेत. या सर्वांची व्यापक चर्चा प्रा. फटे यांनी केली आहे.
लोमटे यांच्या कथांविषयी प्रा. फटे लिहितात, ‘आसाराम लोमटे यांचा कथासंग्रह आशय अभिव्यक्तीच्या दृष्टीने इतर ग्रामीण कथालेखकांपेक्षा एक पाऊल पुढे टाकतो. लोमटे यांच्या कथा आजच्या उद्ध्वस्त होत चाललेल्या ग्रामसमाजातील कोसळणीच्या कथा आहेत. त्यांची प्रत्येक कथा आशय- विषयांसह स्वत:चे वेगळेपण सिद्ध करते आणि ग्रामीण कथेला बदलती दृष्टी प्राप्त करून देते.’ लोमटे यांच्यासारख्या सध्याच्या काळातील महत्त्वाच्या कथाकाराच्या लेखनाची वस्तुनिष्ठ व चिकित्सक समीक्षा करण्याचा प्रयत्न प्रा. फटे यांनी केला आहे.
चौथ्या प्रकरणामध्ये ‘अंगारमाती’ व ‘इडा पीडा टळो’ कथासंग्रहामधील ग्रामजीवनाचे वास्तव मांडले आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आदी क्षेत्रांचे दोन्ही कथा संग्रहांमध्ये कसे चित्रण झाले आहे, याचा तौलनिक अभ्यास प्रस्तुत प्रकरणामध्ये केलेला आहे. या दोन्ही कथासंग्रहांच्या सामर्थ्य व मर्यादांची चर्चा पाचव्या प्रकरणामध्ये केलेली आहे. शेवटच्या प्रकरणामध्ये निरीक्षणे व निष्कर्ष नोंदविले आहेत. चंदनशिव व लोमटे हे दोघेही मराठवाड्यातील आहेत. शेतकरी, कष्टकरी कुटुंबातून त्यांचा जन्म झालेला असल्याने शेतकऱ्यांच्या वेदनांचा, शोषणाचा त्यांना जन्मसिद्ध अनुभव आहे. संघर्ष हा त्यांच्या कथांचा स्थायीभाव आहे. शेतकरी संघटनेचा काहीएक वैचारिक प्रभाव त्यांच्यावर जाणवतो. लोमटे यांच्या कथांमध्ये जागतिकीकरणाचा प्रभाव दिसून येतो. बदलत्या ग्रामजीवनाचा वेध दोन्ही कथासंग्रहांमध्ये आढळतो. या कथा वाचकांच्या मनात अस्वस्थता निर्माण करतात, वाचकास अंतर्मुख करतात, त्यास विचार करण्यास भाग पाडतात, कळत-नकळत परिवर्तनाची प्रेरणा देतात, हेच या कथांचे श्रेष्ठत्व आहे.
एकंदरीत पाहता प्रा. संतोष फटे यांनी ‘अंगारमाती’ व ‘इडा पीडा टळो’ या कथासंग्रहांचा गंभीरपणे केलेला अभ्यास, त्यांचा आशय व अभिव्यक्तीचे केलेले विश्लेषण, त्यामधील साम्यभेद, सामर्थ्य मर्यादांची केलेली चर्चा, वाचकांना या कलाकृतीच्या अभ्यासाची व आकलनाची एक व्यापक प्रगल्भ दृष्टी देते. या कथाकारांचे व कथासंग्रहांचे मूल्यनिर्णयन करण्याचे एक मूल्यात्मक भान येते. विद्यार्थी, शिक्षक, वाचक, समीक्षक यांच्याबरोबरच मराठी समीक्षा व्यवहारामध्येही या संदर्भ ग्रंथाने मौलिक भर टाकली आहे, हे नि:संशय !
पुस्तकाचे नाव – ‘अंगारमाती’ व ‘इडा पीडा टळो’च्या समग्र आकलनाचा संदर्भग्रंथ
लेखक – प्रा. संतोष फटे
प्रकाशक – शब्द शिवार प्रकाशन,
किंमत – २८० रुपये
पुस्तकासाठी संपर्क – 8275025100 किंवा 976565118
प्रा. संतोष फटे यांनी या ग्रंथात भास्कर चंदनशिव आणि आसाराम लोमटे यांच्या एकेका कथासंग्रहाच्या अनुषंगाने ग्रामीण साहित्याची चिकित्सा केलेली असली तरी ती मूलगामी आहे. ग्रामीण साहित्याचा इतिहास, लेखकाच्या घडणीसह त्यांच्या समग्र लेखनाचा आढावा, कथेच्या निर्मितीची कथा यांचा मागोवा या ग्रंथात आलेला आहे. त्यामुळे लेखकाच्या निवडीपासून विश्लेषणापर्यंत संतोष फटे यांच्या अभ्यासपूर्ण दृष्टीचा प्रत्यय हा ग्रंथ देतो. महात्मा फुले, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शरद जोशी यांच्या वैचारिक मुशीतून घडलेल्या या कथाकारांनी मराठी साहित्याच्या कक्षा रुंदावून कथेला एक उंची प्राप्त करून दिली आहे. अशा या कथेची चिकित्सा करताना फटे यांनी आशय, आविष्कार, भाषा, बोलीचे सामर्थ्य या पातळ्यांवर घेतलेला शोध अभ्यासपूर्ण आहे. दोन्ही कथाकारांच्या लेखनाची भूमी मराठवाडा आणि कृषी परंपरा ही राहिली आहे. त्यांच्या पिढीत अंतर असल्याने मराठी कथा कशी विस्तारत आली आहे, याचा प्रत्यय या ग्रंथातील विवेचनात येतो. या कथा क्रांतीची, समग्र समतेची भाषा बोलतात. शोषणाची चिकित्सा करताना वर्तमान राजकारणावर भाष्य करून लोकशाही बळकट करण्याची धारणा बाळगतात. संघर्षासह आशावाद व्यक्त करणारी ही कथा मराठीला नव्या दिशा देते. इंडियातील भारताचे प्रतिनिधित्व करणारी ही कथा परिवर्तनाची आस बाळगून आहे. भास्कर चंदनशिव यांची कथा दलित- ग्रामीण साहित्याच्या सीमारेषा पुसून टाकते. आसाराम लोमटे हे पत्रकार असून कथेचा रिपोर्ट होऊ देत नाहीत. या ग्रंथातील अभ्यासकाची ही निरीक्षणे फार महत्त्वाची आहेत. असे असले तरी कथेच्या केवळ वाड्.मयीन गौरवीकरणावर भर न देता प्रा. संतोष फटे यांनी त्यांच्या आकलनानुसार कथेच्या मर्यादाही स्पष्ट केल्या असल्याने, हा ग्रंथ मराठी कथेच्या समीक्षेसाठी उपयुक्त ठरणारा आहे.
डॉ. महेंद्र कदम, लेखक, समीक्षक
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.