बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यात भारताचे योगदान सर्वात मोठे होते, पण आज ५३ वर्षांनंतर इस्लामिक कट्टरतावाद्यांच्या हिट लिस्टवर भारताचा क्रमांक पहिला आहे. जनतेतील प्रक्षोभ आणि बेलगाम हिंसाचारानंतर तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांना स्वत:लाच देशातून पलायन करावे लागले आणि त्यानंतर बांगलादेशमध्ये भारत द्वेष आणि हिंदू विरोध उफाळून आला आहे.
डॉ. सुकृत खांडेकर
बांगलादेशातील उद्रेकाने शेख हसीना सरकार उलथवल्यानंतर तेथे इस्लामिक कट्टरतावाद्यांना हिंसाचार व रक्तपात घडवायला रान मोकळे मिळाले आहे. पाकिस्तान समर्थित कट्टरतावाद्यांनी देशातील अल्पसंख्य असलेल्या हिंदूंना हल्ल्याचे टार्गेट बनवले आहे. हिंदूंना घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे, अनेक मंदिरांवर हल्ले करून तेथील देवदेवतांच्या मूर्तींची तोडफोड करण्यात आली आहे. इस्कॉन मंदिराला आग लावण्यात आली. बांगलादेशातील हिंदूंकडे देशाचे शत्रू म्हणून बघितले जात आहे. बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यात भारताचे योगदान सर्वात मोठे होते, पण आज ५३ वर्षांनंतर इस्लामिक कट्टरतावाद्यांच्या हिट लिस्टवर भारताचा क्रमांक पहिला आहे. जनतेतील प्रक्षोभ आणि बेलगाम हिंसाचारानंतर तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांना स्वत:लाच देशातून पलायन करावे लागले आणि त्यानंतर बांगलादेशमध्ये भारत द्वेष आणि हिंदू विरोध उफाळून आला आहे.
हिंदूंवर हल्ले होत असताना युनूस सरकार हल्लेखोरांना रोखण्यासाठी कोणतीही ठोस कारवाई करताना दिसत नाही. पोलीस बघ्याची भूमिका घेत आहेत. प्रशासन हल्लेखोरांपुढे हतबल झाले आहेत. बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यांच्या निषेधार्थ भारतात देशभर हिंदू संघटनांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली. महाराष्ट्रातही अनेक शहरात हिंदू संघटनांनी शक्तिप्रदर्शन घडवून बांगलादेशातील हिंदूंच्या पाठीशी भारतीय जनता खंबीरपणे उभी असल्याचे दाखवून दिले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात निलेश राणे, नितेश राणे या आमदार बंधूंनी विराट मोर्चा काढून हिंदूंची संघटित ताकद रस्त्यावर उतरवली. बांगलादेशात हिंदूंच्या विरोधात होत असलेल्या हिंसाचाराबद्दल जागतिक स्तरावर अनेक देशांनी चिंता प्रकट केली. ब्रिटनच्या संसदेतही हा मुद्दा मांडला गेला. अमेरिकेच्या व्हाइट हाऊसनेही हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराची गंभीर नोंद घेतली. बांगलादेशमध्ये नोबेल पारितोषिक विजेत्या मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली हंगामी सरकार असले तरी ते त्यांचा भारत विरोधी अजेंडा सोडायला मुळीच तयार नाहीत.
काश्मीरच्या खोऱ्यात १९९० च्या दशकात पंडितांवर हल्ले होत होते, पंडितांना घरात घुसून ठार मारले जात होते, पंडितांना त्यांच्या परिवारासह अंगावरच्या वस्त्रानिशी खोऱ्याबाहेर पळून जाण्यास भाग पाडले जात होते, हिंदू महिलांवर अत्याचार व बलात्कार झाले. आता त्याच घटना बांगलादेशात घडत आहेत. बांगलादेशातील हिंदूंना तिथे जिणे मुश्कील केले जात आहे. काश्मीरच्या खोऱ्यात हिंदूंवर अत्याचार करणारे इस्लामिक कट्टरतावादी होते आणि बांगलादेशातही तेच आहेत. त्यांच्या पाठीशी पाकिस्तान प्रेरित कट्टरतावादी संघटना व गुप्तचर संघटना आहेत.
पाकिस्तानातून या देशात शस्त्रास्त्रे येत आहेत. हसीना शेख यांच्या कट्टर राजकीय विरोधक बेगम खलिदा झिया व पाकिस्तानी अधिकारी यांच्यात संवाद होत असल्याच्याही बातम्या आहेत. शेख हसीना यांना सत्तेवरून पदच्युत केल्यानंतर बांगलादेशच्या माध्यमातून पाकिस्तानी गुप्तचर संघटना भारताला व हिंदूंना टार्गेट करीत आहेत. पाकिस्तानची पहिली शिकार ही बांगलादेशातील हिंदू आहेत, त्यांच्यावर अत्याचार व हल्ले होत आहेत. बांगलादेशात सैन्याच्या मदतीने भारताच्या विरोधात मोहीम सुरू करणे हा पाकिस्तानच्या रणनितीचा दुसरा भाग असू शकतो आणि तिसरा भाग म्हणजे भारतीय बनावटीच्या वस्तूंवर व साधनसामग्रीवर बांगलादेशात बहिष्कार पुकारणे, त्यातून भारताची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न करणे.
देशात हिंदू विरोधी हिंसाचाराच्या घटना वाढल्यावर बांगलादेशाने कोलकता व त्रिपुरा येथून आपले दूतावासातील अधिकाऱ्यांना विचारविनिमय करण्यासाठी बोलावून घेतले. एवढेच नव्हे तर बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबूर रहमान यांचे बांगलादेशच्या चलनी नोटांवरून फोटो काढून टाकण्याचे फर्मान निघाले. मोहम्मद युनूस सरकारने भारताबरोबर झालेला मोबाईल इंटरनेट कनेक्टिव्हीटी समझोता रद्द केला आहे.
भारताच्या ईशान्येकडील राज्यांना त्याचा फटका बसणार आहे. हा समझोता शेख हसीना सरकारने केला होता. भारताच्या ईशान्येकडील राज्यात मोबाइल इंटरनेट कनेक्टिव्हीटी चांगली नाही. रिजनल डिजिटल हबच्या माध्यमातून बांगलादेश सीमेवर इंटरनेट सर्किट स्थापन करण्यात येणार होते. त्यातून ईशान्येकडील राज्यांना डेटा ट्रान्समिशन सुविधा उपलब्ध होणार होती. हे काम भारती एअरटेलने समीट कम्युनिकेशन या बांगलादेशी कंपनीच्या मदतीने पूर्ण करायचे होते. बांगलादेश टेलिकम्युनिकेशन रेग्युलेटरी कमिशनने त्याला मंजुरीही दिली होती. पण युनूस सरकारने या कराराचा बांगलादेशला काहीही आर्थिक लाभ नाही, असे कारण देऊन करार रद्द करून टाकला. समीट कम्युनिकेशनचे चेअरमन मोहम्मद फरिद हे शेख हसीना यांच्या अवामी लीगच्या खासदारांचे धाकटे भाऊ आहेत.
दोन देशांतील संबंध सुरळीत व्हावेत यासाठी भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी मोहम्मद युनूस यांची ढाक्यात जाऊन भेट घेतली. शेख हसीना सत्तेवरून पायउतार झाल्यावर भारत-बांगलादेशातला हा पहिलाच संवाद होता. दि. ५ ऑगस्ट २०२४ला हसीना यांच्याविरोधात मोठा उठाव झाला व त्यांना भारतात आश्रय घेणे भाग पडले. बांगलादेशात निदर्शकांनी लुटालूट-जाळपोळ व सरकारी मालमत्तांचे मोठे नुकसान केले. जनक्षोभापुढे पोलीस व सुरक्षा दलांनी शस्त्रे खाली टाकली. आज या देशात इस्लामिक कट्टरतावाद्यांकडून हिंदूंवर अत्याचार होत असताना, हिंदूंची मंदिरे व मालमत्ता यांना आगी लावल्या जात असताना पोलीस बघ्याची भूमिका घेत आहेत.
हसीना व अवामी लिगचे नेते हे निदर्शकांचे टार्गेट आहे. राजकारणी, कलावंत, नोकरशहा, पत्रकार, बुद्धिमंत, सामाजिक नेते असे शेकडो जण स्वत:चा जीव वाचविण्यासाठी आर्मी कॅन्टोन्मेंटमध्ये आश्रयाला आहेत. बांगलादेशातील हिंदू हे अवामी लिग व शेख हसीनाचे समर्थक म्हणून ओळखले जातात म्हणून हसीना विरोधकांचे व कट्टरतावाद्यांचे सॉफ्ट टार्गेट हिंदू बनले आहेत. बांगलादेशच्या बांगला व इंग्रजी वृत्तपत्रांतूनही हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यांची आकडेवारी प्रसिद्ध झाली आहे.
भारताने चिंता व्यक्त केली, तर तो आमचा अंतर्गत मुद्दा आहे असे उत्तर युनूस सरकारने दिले आहे. हसीना यांनी भारतात पलायन केल्यावर अवामी लिगच्या हजारो नेते, पदाधिकारी यांनी देशाबाहेर जाण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना सीमेवर रोखण्यात आले. हसीना सरकारमधील अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप ठेवण्यात आले आहेत. कट्टरतावाद्यांच्या विरोधात लिहिणाऱ्या पत्रकारांनाही अटक करण्यात आली आहे. भारतीय माध्यमांनीच बांगलादेशमधील चित्र भडकपणे रंगवले असा आरोप युनूस सरकारकडून केला जात आहे.
भारतात आश्रयाला असलेल्या हसीना सतत युनूस सरकारच्या विरोधात भाष्य करून बांगलादेशातील वातावरण प्रक्षोभक बनवतात, असाही आरोप केला जात आहे. कोलकत्ता, त्रिपुरा या दोन शहरांशी बांगलादेशवासीयांचा दैनंदिन संबंध आहे. दोन्ही देशांत परस्परांचे नातेसंबंध आहेत. रोटी-बेटी व्यवहार आहेत. व्यापार-उद्योगासाठी दोन्हींकडून ये-जा मोठ्या संख्येने आहे. पण आता वातावरण बिघडले आहे. सीमेवर दोन्ही देशांची सुरक्षा दले आहेत. बांगलादेशने तर पाकिस्तानी नागरिकांना व्हिसाची गरज नाही असे जाहीर करून पाकिस्तानला ये-जा करण्याचा मुक्त परवाना दिला आहे.
आम्ही एकवेळ तुरुंगात राहू पण बांगलादेशात परतणार नाही, असे त्रिपुरामधील बांगलादेशी हिंदूंनी म्हटले आहे. त्रिपुरात बांगलादेशविरोधात मोठी निदर्शने झाली. बांगलादेशात उच्चायुक्तांच्या कार्यालयाची मोडतोड झाली. त्रिपुराला तर बांगलादेशने तीनही बाजूंनी वेढलेले आहे. पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम ही राज्ये बांगलादेश सरहद्दीजवळ आहेत. कोलकत्ता नि आगरतळा येथून ढाका येथे नियमित बस सेवा आहे. व्यापार, उद्योग, औषधोपचार, नातेसंबंध यासाठी हजारो बांगलादेशी भारतात नियमित ये-जा करीत असतात. दोन देशांत आयात-निर्यातही मोठी आहे. बांगलादेशाने भारतावर निर्बंध लादून आता पाकिस्तानशी सलोखा निर्माण केला आहे. कराची ते चटगाव जहाज वाहतूक सुरू झाली आहे. ढाकामध्ये भारतीय उत्पादनावर बहिष्कार घालण्यात आला आहे. भारतीय वस्तूंची होळी केली जात आहे.
मोहम्मद युनूस हे देशात शांततेसाठी प्रयत्न करतील व नवे सरकार स्थापनेसाठी वातावरण निर्माण करतील अशी अपेक्षा होती. पण ते कट्टरपंथीयांच्या आहारी जाऊन काम करीत आहेत की काय अशी शंका वाटू लागली आहे. बांगलादेशाच्या निर्मितीसाठी लाखो बांगलादेशींनी बलिदान दिले होते, त्याची आठवणही कोणाला राहिलेली नाही. उलट कट्टरपंथी बांगलादेशी पाकिस्तानलाच आपला रहनुमा मानू लागले आहेत. इस्लामिक कट्टरवाद्यांचा भारत द्वेष व पाकिस्तान प्रेम उफाळून येत आहे. पाकिस्तानने काही वर्षांपूर्वी अस्थिर झालेल्या अफगाणिस्तानात तालिबान उभे केले व त्यात त्या देशाची कशी वाताहत झाली हे सर्व जगाने बघितले आहे. बांगलादेशातही पाकिस्तानचा हाच प्रयोग सुरू झाला, तर बांगलादेश दुसरा अफगाणिस्तान होण्याच्या दिशेने जाईल…
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.