November 21, 2024
Blue Mormon seen in Khet ratnagiri article by Dheeraj watekar
Home » ‘ब्लू मॉरमॉन’ आले हो अंगणी
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

‘ब्लू मॉरमॉन’ आले हो अंगणी

सह्याद्रीतील जंगल वाटा आणि झऱ्यांवर आम्ही याला अनेकदा पाहिलेले आहे. शहरातील बागांमध्ये, मुंबई, पुणे, बेंगलोर अशा शहरांत अगदी वाहतुकीच्या गर्दीत हे फुलपाखरू आढळून आल्याच्या नोंदी आहेत. या पार्श्वभूमीवर आपल्या अंगणी त्याला आल्याचं पाहून मिळालेलं समाधान केवळ अवर्णनीय !

धीरज वाटेकर
राज्य सचिव, निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ.

भारतात ‘सदर्न बर्डविंग’ या फुलपाखरानंतर सर्वात मोठे फुलपाखरु असल्याचा मान मिळालेले, महाराष्ट्राचे ‘राज्य फुलपाखरू’ ‘ब्लू मॉरमॉन’ आज चिपळूणातील आमच्या खेड निवासस्थानी अंगणी बागडताना पाहून सध्याच्या उन्हाच्या तीव्र कडाक्यातही परसदारी नैसर्गिक शांतता अनुभवायला मिळाली. कोकणाची सांस्कृतिक राजधानी असलेल्या शहरात वर्षभर सामान्यपणे आढळणारे हे फुलपाखरू श्रीरामनवमी दिनी प्रत्यक्ष आपल्या परसदारी अनुभवण्याचा आजचा आनंद केवळ शब्दातीत होता. पावसाळा आणि त्यानंतरच्या काळात हे फुलपाखरू अधिक ठिकाणी आढळून येत असताना सध्याच्या दिवसात त्याने सहज दर्शन दिल्याने निसर्गाबद्दलची आमची अनामिक ओढ अधिक तीव्र होण्यास मदत झाली.

फुलपाखरू ‘ब्ल्यू मॉरमॉन’प्रमाणे प्राणी शेकरू, पक्षी हरियाल, वृक्ष आंबा, फूल जारुळ ही आपल्या राज्याची मानचिन्हे आहेत. हे फुलपाखरू भारतील भारतातील पश्चिम घाट, दक्षिण भारत, पूर्व किनाऱ्यासह श्रीलंकेतही आढळते. शास्त्रीयदृष्ट्या ब्लू मॉरमॉन (राणी पाकोळी ; Papilio polymnestor) च्या पंखांचा विस्तार १२०ते १५० मिमी असतो. मखमली काळ्या रंगाच्या ब्लू मॉरमॉनच्या पंखावर निळ्या रंगाच्या चमकदार खुणा असतात. चार आकर्षक पंख, अंगावर संवेदना असणारी लव ही याची अधिकची वैशिष्ट्ये आहेत. याच्या पंखाच्या खालची बाजू काळी असते. शरीराकडील एका बाजूवर काही लाल ठिपकेही असतात. लिंबू, संत्रे, बेल या ह्या फुलपाखराच्या आवडत्या वनस्पती आहेत, असं कुठेतरी वाचलेलं आठवतं. कदाचित परसदारच्या बेलाच्या झाडाने त्याच्या सध्याच्या चैत्रपालवीने तर याला आकर्षित केले नसेल ना? फुलपाखराचं अस्तित्व असणं हा जैवविविधतेच्या समृद्धतेचा पुरावा असल्याने आणि आपल्या परसदारी हे शक्य असल्याने समाजाने निसर्गाकडे अधिक सजगतेने पाहायला हवे आहे.

जास्त पाऊस असलेल्या सदाहरित जंगलासह पानगळीच्या जंगलातही हे फुलपाखरू आढळते. त्याचं एका दिशेने वेगात उडणं आणि उडताना सतत मार्ग बदलणं, वर-खाली उडणं सारं माहिती असल्याने छायाचित्र घेता येईल का? असाही प्रश्न असतो. पण आमच्या अंगणी त्याला विशेष कोणताही अडथळा येईतोपर्यंत अगदी वाऱ्याच्या हलक्या झुळूकीतही पान हलूनही ते पानावरून हललेले नव्हते. एखाद्या पानावर बसून ते क्षार शोषायला लागले की ते सहसा विचलित होत नसल्याचा हा परिणाम असावा. किंवा दुपारच्या उन्हाच्या कडाक्यात ते आपले पंख उघडे ठेवून विश्रांती घेत असल्यानं आम्हाला सोबतचा फोटो चक्क मोबाईलवर टिपण्याची लॉटरी लागली असावी. कारण आम्ही त्याच्या अगदी जवळ गेलो तरी त्याला काही फरक पडलेला नव्हता. सह्याद्रीतील जंगल वाटा आणि झऱ्यांवर आम्ही याला अनेकदा पाहिलेले आहे. शहरातील बागांमध्ये, मुंबई, पुणे, बेंगलोर अशा शहरांत अगदी वाहतुकीच्या गर्दीत हे फुलपाखरू आढळून आल्याच्या नोंदी आहेत. या पार्श्वभूमीवर आपल्या अंगणी त्याला आल्याचं पाहून मिळालेलं समाधान केवळ अवर्णनीय !


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading