ओळख औषधी वनस्पतींची यामध्ये अश्वगंधा वनस्पतीबद्दल माहिती…
– सतिश कानवडे
संस्थापक,
औषधी वनस्पती व आरोग्य पर्यटन केंद्र,
सावरचोळ, ता. संगमनेर, जि. नगर
मोबाईल 9850139011, 9834884804
वनस्पतीचे नाव- अश्वगंधा
हिंदी नाव– असगंध
संस्कृत नाव– अश्वगंधा
शास्रीय नाव- Withania somnifera dunal
ही वनस्पती भारतभर सर्वत्र आढळते. झुडूपवर्गीय वनस्पती असून तिची रोपे वांग्याच्या रोपासारखी दिसतात. फांद्यावर तांबूस लव असते. उंची ३० ते १०० सेटीमीटर असते. मुळे मांसल, पांढरट, तपकिरी, सरळ, मजबूत असतात. पाने साधे दातेरी ५ ते १० सेटीमीटर लांब असतात. फुले लहान हिरवट पिवळी १ सेटीमीटर लांब असतात. शक्यतो ५ पुढे एकमीन आढळतात. बिया पिवळ्या रंगाच्या असतात. फुले सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये येतात. हिरव्या पाल्याला व मुळांना घोड्याचे लेन्डीसारखा वास येतो म्हणून या वनस्पतीला अश्वगंधा असे म्हणतात.
हवामान व जमीन–
ही वनस्पती मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात, पाकिस्तान आणि श्रीलंका या भागात पहावयास मिळते. कोरड्या कमी पाऊस व थंड हवामानात चांगली वाढ होते. निचरा होणारी जमीन असावी.
बियाणे लागवड–
मुळाचे अधिक उत्पादन मिळण्यासाठी सुधारित वाणांची लागवड करावी. मध्यप्रदेशातील कृषी संशोधन केंद्र मंदसौर यांनी जवाहर अस्कंद २० आणि जवाहर अस्कंद १३४ हे वान प्रसारित केले आहे. ऑगस्टमध्ये पावसाळ्यात बियाणांची पेरणी करावी. बियांना डायथेन ४५ चोळावे. पेरणीपूर्वी बियाणे थंड पाण्यात भिजत ठेवावे व हलके बियाणे काढून टाकून गादी वाफ्यावर रोपे तयार करावीत.
औषधी उपयोग–
या वनस्पतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची आठ अल्कराइडस आढळून येतात. ज्यापैकी विथेनीन, विथेफेरीन आणि सोमनीफेरीन हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यांची मुळे, पाने, हिरवी फळे, बिया औषधांसाठी महत्वाची आहेत. ही वनस्पती शरीराला पुष्टी देणारी, वात, क्षय दमा, खोकला, कृमी यांचा नाश करणारी आहे. याच्या मुळाची भुकटी दररोज दुधाबरोबर घेतल्यास घोड्यासारखी ताकद येते. संधिवात व सूज यावर सुद्धा प्रभावी आहे. याचा मुळाच्या भूकटीचा उपयोग शक्तिवर्धक, कमजोरी कमी करण्यासाठी, संधीवातासाठी, धातुविकारासाठी, वीर्यवृद्धीसाठी, चर्मरोग व अपचनासाठी केला जातो.त्वचा रोग, किडनी विकार, मुळव्याध, उचकी, उच्च रक्तदाब, शिवाय शांत झोप येण्यासाठी उपयोगी आहे. अश्वगंधाचा उपयोग केलेल्या निरनिराळे १०० औषधे आज बाजारात आहेत.
काढणी–
साधारणपणे मुळाची काढणी लागवडी नंतर १४ ते २० महिन्यानंतर करावी असा प्रधान आहे. परंतु नवीन सुधारित लवकर येणाऱ्या वाणांचा उपयोग करून लागवडी नंतर सहा ते सात महिन्यांनी काढणी करता येते. झाडाची पाने पिवळी होणे व मुळांचा रंग तांबडा पडू लागला की पिक काढणीस तयार झाले असे समजावे. अश्वगंधाची झाडे जमिनीपासून ८ ते १० इंच किंवा बैलांनी शेत नांगरून झाडाची खोडे मुळासकट गोळा करावीत. मुळ्या कापून स्वच्छ पाण्याने धुवून वाळवण्यात मुळ्या ओल्या राहिल्यास बुरशी लागण्याची किंवा कुजण्याची शक्यता असते.
सुधारित जाती –
असगंध 20, जवाहर असगंध 134, राजविजय असगंध 100