July 2, 2025
A traditional boharin with a bundle of clothes and shiny utensils, symbolizing trust, simplicity, and human connection in rural India.
Home » भांडी sss यो sss…!
मुक्त संवाद

भांडी sss यो sss…!

जुन्या कपड्यांचा हा नवा-पुराना व्यवसाय तिथेच मोडला. गावकुसाबाहेरुन, दूरच्या आडवाटेवरुन येणारी ती ग्रामीण जीवनाच्या साधेपणाचं, काटकसरीचं जुन्या मुल्यांचं, भावनेचं एक प्रतीक होती. तिचं येणं केवळ वस्तू विनिमयाचा व्यवहार नव्हता, तर माणुसकीचा नात्यांचा विश्वासाचा आणि गरजेतून निर्माण झालेल्या सोयीचा ओलावा होता.

प्रशांत कुसुम आनंदराव सातपुते

दररोज संध्याकाळी जीम वरुन परतताना एक मावशी डबे घेवून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या फळवाल्याकडे ठेवून जायची. त्याच्याकडील रिकामे डबे घेवून माघारी परतायची. एकदा फळे घेताना तिची मुद्दाम चौकशी त्याच्याकडे केली. ती जेवणाचे डबे पुरविते, असे समजले. एके दिवशी तिच्याशी बोलल्यावर दररोजच्या डब्यांसह पार्टीच्या विशेष जेवणाची ऑर्डरही ती घेते, हे समजले. लगेचच कार्यालयातील सर्वांसाठी जेवण ठेवले आणि तिला त्याची ऑर्डर दिली. बडा खाना. त्यानंतर एके दिवशी ती कसल्यातरी दाखल्यासाठी आलेली. ‘नेहमीसारखे आता संध्याकाळी दिसत नाही तुम्ही..’ असे मी विचारताच, ‘एका हाॕटेलवर कामाला जातेय’, म्हणाली. ‘डबेही पहिल्यासारखे नाहीत आता..पोटाला तीन मुलीच आहेत साहेब..’ अशी तिने आपल्या परिस्थितीची कैफीयत मांडली. जाताना, ‘मॅडमचे काही जुने ड्रेस असतील, तर देण्याची’ तिने विनंती केली.

‘सौ इंदौरला असते. मी गेलो की घेवून येईन..आठवणीने,’ असे तिला आश्वासन दिले. मला माझे बालपण आठवले. माझ्याही घरी चौघींच्यानंतर आई-अण्णांना मी झालेलो. तिच्या परिस्थितीची मला जाणीव झाली.

तोंडावर दिवाळी आलेली. कार्यालयात एक दाक्षिणात्य कपडेवाला गाठोडं घेवून दररोज ठिय्या मांडून होता. तो सर्व कार्यालयांच्या गळी पडून, खरेदी करण्यासाठी आर्जव करी. ते पाहून एके दिवशी कार्यालयातील सर्वांसाठीच खरेदी केली. जाणीवपूर्वक मावशीच्या मुलींसाठीही ड्रेस मटेरियल जाणीवपूर्वक खरेदी केले आणि तिच्याकडे पाठवून दिले.

दिवाळीला मी इंदौरला गेलो होतो. येताना आठवणीने सौ शी बोलून मी तिच्याकडे जुने ड्रेस, साड्या मागितल्या. तिनेही अगदी ढिगभर काढून दिल्या. ते एकावेळी सोबत घेवून जाणे मला अशक्य वाटल्याने, केवळ दोन बॅगेत मावतील इतके घेवून मी माघारी परतलो. शिवाय ‘जुन्या कपड्यांसह नवीनही घेवून दे तिला’ असे सांगायलाही सौ अजिबात विसरली नाही. तसे मी अगोदरच केल्याचे तिला सांगितले.

कुठे फिरायला जायचे म्हणजे कपड्यांची वेगळी खरेदी हमखास आलीच ! दररोजचे कपडे वेगळे. सहजच एखाद्या कपड्याचा ‘पिसारा’ आवडला की, तो आपण विकत घेतो. मग, अल्पावधितच त्याचाही ‘पसारा’ होवून जातो. बरे त्यातही आपण विसरुन जातो. अनेकदा त्याचा वापर होत नाही. तो कुठेतरी तळाशी लपून बसलेला असतो.

‘आपण स्वत:हून ‘फीट’ राहिलो नाही, तर कपडे स्वत:हून ‘फिट’ होतात’. यातून ‘कपाट तटतटून फुगलेलं’. गलेलठ्ठ बोक्याप्रमाणे लठ्ठ बनत राहिलेलं. ढेरी वरच्या ताणलेल्या बटनांमुळे विस्फारलेल्या शर्टासारखी कपाटाची कवाडं किलकिली राहिलेली.

लहानपणी परिस्थितीमुळे कपड्यांची वानवा असायची. नवे कपडे तसे दिवाळीलाच मिळायचे. तेही आजी, कधी मामांकडून मिळत. शिवाय जीर्ण होईपर्यंत ते वापरले जात. त्यानंतर त्या कपड्यांची वाकळेत, गोधडीत स्मारके होत वा अगदीच नव्या भांड्यांच्या बदल्यात ती ‘बोहारणी’च्या गाठोड्यात निद्रिस्त होत.

बोहारीण.!’ मला आजही आठवते ‘भांडीsss योsss..’ अशी आरोळी दुपारच्यावेळी यायची. सकाळची जेवणं आवरुन, भांडी घासून समस्त महिला वर्ग दुपारी आडवा झालेला असायचा. याचवेळी ही आरोळी आडव्यांना उभे करुन जायची. उंबऱ्यातून बाहेर आल्यावर समजायचे आरोळी देणारा वा देणारी, अजून पलिकडच्या गल्लीतच आहे. आपल्या गल्लीत यायची आहे. नव्या चकचकीत भांड्यांच्या अभिलाषेने घरातील जुन्या कपड्यांवर नजर नुसती भिरभिरायची. जुन्या कपड्यांवर पडलेल्या नजरेला यावेळी ते कपडे मात्र, पुन्हा नवे वाटायचे. ‘देवू की नको’ या द्विधा मन:स्थितीत अडकलेल्या नजरेला बऱ्याचदा आठवणींच्या भावनिकतेचीही जोड असायची.

‘ताई काय जुन्या साड्या..दादांची शर्ट-पँट-इजारी हायेत का?’, अशी विचारणा करत एव्हाना गोऱ्या वर्णाची कमल बोहारीण दारात उभी असायची. काखेतील कपड्यांचे गाठोडे जमिनीवर ठेवायची. डोक्यावरची भांड्यांची पाटी उतरायला हात लावायला सांगायची. डोक्यावरील चुंबळ उतरुन ठेवतानाच पदराने ती घाम टिपत, दम खात खाली अघळ-पघळ बसायची. कधी कधी घामाने वितळलेला तिचा कुंकू तिच्या चेहऱ्याला लालसर छटा देवून जायचा. त्यावेळी तिचे हिरवे गोंदण लक्ष वेधून घेई. पण, मेणात रुतवलेला ‘तो’ गोंदणावरील मोठाला बंदा रुपया बहुधा आपली जागा सोडत नसे. बसकण मांडून असायचा.

‘पाणी द्या जरा..’ म्हणून पाण्याचा तांब्या ती जवळ करायची. वरुनच घशात पाण्याची धार सोडायची. घोट घोट गळ्यातून उतरताना घाटीची वर-खाली होणारी हालचाल उगीचच मस्तानीची आठवण करुन देई. गोऱ्या गळ्यावरील काळ्या मण्यांत गाठवलेली सोनेरी शिंपल्याची पोत सौभाग्यवती असल्याचा ठसा उमटवायची. तिच्या हातातील रांध्याच्या सोनेरी बांगड्या ती डोंगराला जावून आल्याचे सांगत. नेटक्या कपड्यातील बोलकी कमल अधिक खुलून दिसायची. तिच्या हसण्याने, शुभ्र रांगेतील दातांमुळे ती मोहक दिसायची.

पदराला तोंड पुसून ती सलगीने घरची चौकशी करत थेट चर्चेत घुसायची. समोर आलेली साडी, कपडे हाताने चाचपून, ‘हे पार जुनेर झालय. यात काय राम नाही बघा..’ असे अनिच्छेने सर्व कपडे जवळ करायची. ‘हे मोठं भाडं पायजेल तर अजून काय तरी कापडं द्या..बघा की अजून काय हायेत..’ अशी चेहऱ्यावर अजिजी आणून भरीला घालायची. एव्हाना गल्लीतल्या इतर बायका पोरंही जमा झालेली असत.

घरातली कर्ती महिला आणि तिच्यात चांगली चर्चा म्हणजेच घासाघीस झालेली असायची. त्यातून दोघींचेही समाधान होईल, असा तोडगा निघायचा आणि घरमालकीण नवी भांडी घेवून समाधान पावायची. तर, बोहारीण मिळालेल्या साड्या, जुनी कपडे गाठोड्यात बांधून निघण्याची तयारी करायची. पुन्हा एकदा अर्धा राहिलेला पाण्याचा तांब्या घशाखाली रिता करुन, सलगीने ‘च्या तरी पाजा की..’ अशी लाघवी मागणी करायची. नव्या भांड्याच्या आनंदात ‘त्याची घडी मोडून’ ती तिच्यासाठी चहा ठेवायची. इथे व्यापारी आणि ग्राहक हे नातं कधीच नसायचं. विश्वासाचं, सखीचं, आपुलकीचं असायचं.

इतरही बायकांनी आपापल्या परीने कपडे आणून नव्या भांड्याचा व्यवहार पूर्ण केलेला असायचा. यात हक्कानं एखादा कपडा ती स्वतःसाठी, पोरा-बाळांसाठीही मागायची. डोक्यावरची भांड्यांची पाटी रिकामी व्हायची, तसे तिच्या काखेतील मिळालेल्या कपड्यांचे गाठोडेही वाढत जायचे. डोक्यावरील एक ओझे उतरले तरी, दुसरे वाढलेले ओझे तिच्यासाठी आनंद देवून जायचे.

मिळालेल्या कपड्यातील चांगले कपडे ती स्वच्छ धुवायची. काही कपड्याःची शोभेल अशी डागडुजी करायची. नगरपालिकेजवळील बोळात रविवारी बाजारच्या दिवशी त्याची विक्री करायाची. रया गेलेली कपडे एमआयडीसीत मशिन पुसण्यासाठी वा चिंध्या म्हणून विकायची. त्यावर तिचा प्रपंच चालायचा.

माझ्या लहानपणी गल्लीत येणारी ही कमल केवळ बोहारीण नव्हती. तिच्या येण्याने गावा-शिवारातल्या माहितीची देवाण-घेवाण व्हायची. समस्‍त महिला वर्गाची ती मैत्रीण असायची. दसऱ्याच्या आणि दिवाळीच्या आधी तिचा वावर हमखास गल्लीत असायचा. गल्लीतल्या प्रत्येक घराशी तिचा जणू घरोबा निर्माण झालेला.

त्यावेळी तसे फारसे पैसे नसतानाही हा व्यवहार आनंदाने व्हायचा. खेड्या-पाड्यातील मातीच्या घरातील दारात, अंगणात तिची पावले उमटलेली असायचीत. ही कमल काळाच्या गर्तेत खोलवर गायब झाली. तरीही मनात रुतून बसलेली. मावशीच्या रुपाने का होईना ती मनातील तिचे रुतने आज निघाले होते. तिची पुढची पिढी नक्कीच यात पडलेली नसणार.

जुन्या कपड्यांचा हा नवा-पुराना व्यवसाय तिथेच मोडला. गावकुसाबाहेरुन, दूरच्या आडवाटेवरुन येणारी ती ग्रामीण जीवनाच्या साधेपणाचं, काटकसरीचं जुन्या मुल्यांचं, भावनेचं एक प्रतीक होती. तिचं येणं केवळ वस्तू विनिमयाचा व्यवहार नव्हता, तर माणुसकीचा नात्यांचा विश्वासाचा आणि गरजेतून निर्माण झालेल्या सोयीचा ओलावा होता.

तिच्या जाण्याने ग्रामीण जीवनशैलीचा मायेचा हळवा कोपरा कायमचा हरवला आहे. भटक्या विमुक्त जमातींमधले, समाजातील हे कमल नावाचे पात्र कुठे बहरलं अन् कुठे विसावलं हा संशोधनाचा विषय आहे.

डबेवाली मावशीला बोलावून तिच्यासाठी आणलेल्या कपड्यांची बॕग तिला दिली. तशी ती जाम हरखून गेली. अगदी कमलच्या डोक्यावरील पाटी रिकामी होवून काखेतील कपड्यांचे गाठोडे भरल्यासारखे..


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading