December 1, 2023
Demand of Marathi has the status of an elite language
Home » ‘मराठी’ला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी
काय चाललयं अवतीभवती

‘मराठी’ला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी

  • मराठी भाषा गौरवदिनी ‘मराठी’ला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा
  • मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांची मागणी
  • केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांचा सकारात्मक प्रतिसाद

नवी दिल्ली : महाराष्ट्रामध्ये कुसुमाग्रज यांची जयंती ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरी केली जाते. याच दिवशी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, अशी मागणी राज्याचे मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी किशन रेड्डी यांना भेटून केली.

येथील परिवहन भवनमध्ये श्री.देसाई यांनी श्री.रेड्डी यांची भेट घेतली. यावेळी मराठी भाषा विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

मराठी भाषा मंत्री देसाई यांनी मराठी भाषा ही अभिजात असल्यासंदर्भातील सविस्तर माहिती दिली. यासोबतच मराठी भाषेबद्दल सुलभ संदर्भ म्हणून आतापर्यंत झालेल्या वाटचालीची पुस्तिका, आणि निवेदन केंद्रीय मंत्री रेड्डी यांना दिले. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्याबाबतचे निकष, अटींची पूर्तता होत असल्याचे केंद्रीय मंत्री रेड्डी यांनी सांगितले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचाही याबाबत सकारात्मक दृष्टीकोन असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. केंद्र सरकार यावर शक्य तितक्या लवकर निर्णय घेणार असल्याचे श्री. रेड्डी यांनी यावेळी सांगितले.

श्री.देसाई यांनी केंद्रीय मंत्री रेड्डी यांना कुसुमाग्रज जयंती निमित्त साजरा केला जाणाऱ्या ‘मराठी भाषा गौरव दिना’ला मुंबईत येण्याचे निमंत्रण दिले. याचदिवशी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याबाबतची घोषणा करण्याचीही मागणी केली. यामुळे महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेला आणि सर्वच मराठी प्रेमींना आनंद होईल, असेही श्री. देसाई यावेळी म्हणाले.

महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी आता जनअभियानाचे रूप प्राप्त झाले असल्याचे श्री. देसाई यांनी सांगितले. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी राष्ट्रपतींना निवेदन दिले असल्याची माहितीही श्री.रेड्डी यांना श्री.देसाई यांनी दिली.

यासह राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना हजारो पोस्ट कार्डसच्या माध्यमातूनही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, अशी मागणी करणारी पत्रे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पाठविली असल्याची माहिती श्री. देसाई यांनी दिली.

Related posts

आगळा वेगळा बोटॅनिकल फॅशन शो..

शेणाला सुद्धा आता सोन्याचा भाव

शेतकऱ्याची आर्थिक स्थिती सुधारणे हाच आत्महत्या रोखण्यावरील उपाय

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More