पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर यांच्या ‘जनसंपर्काचे अंतरंग’ या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच (दि. १४ नोव्हेंबर २०२१ रोजी) सोलापूर येथे झाले. जनसंपर्क क्षेत्राविषयी एक अत्यंत महत्त्वाचे पुस्तक या निमित्ताने मराठीत निर्माण झाले आहे. या पुस्तकाविषयी…
अलोक जत्राटकर
डॉ. रवींद्र चिंचोलकर जनसंपर्काच्या संदर्भात पुस्तक लिहीत आहेत, याची माहिती होती. त्यामुळे पुस्तक पूर्ण कधी होते, याची अत्यंत उत्कंठा लागून राहिलेली होती. त्याचा कळसाध्याय म्हणजे ‘जनसंपर्काचे अंतरंग’ या पुस्तकाचे प्रकाशन होय.
यापूर्वी डॉ. सुरेश पुरी यांनी सन १९८४मध्ये ‘जनसंपर्क: संकल्पना आणि सिद्धांत’ हे जनसंपर्काविषयी मराठीतले पहिले पुस्तक लिहीले. तेच आजवर पत्रकारिता व जनसंपर्काचे शिक्षण-प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पिढ्यांनी संदर्भासाठी वापरले. मराठीत डॉ. पुरी यांच्या या पुस्तकानंतर सुमारे ३६ वर्षांनी जनसंपर्काविषयी आलेले सकस आणि दर्जेदार पुस्तक म्हणजे डॉ. चिंचोलकर यांचे ‘जनसंपर्काचं अंतरंग’ होय. ही दोन पुस्तके म्हणजे मराठीतली जनसंपर्क या विषयामधील मैलाचा दगड ठरावीत, अशी आहेत.
या पुस्तकाच्या निमित्ताने एक फार महत्त्वाचा योगायोग घडून आला आहे. पुरी यांच्या पुस्तकाला त्यांचे गुरू डॉ. सुधाकर पवार यांची प्रस्तावना लाभलेली आहे. तर, चिंचोलकर यांच्या या पुस्तकाला त्यांचे गुरू डॉ. सुरेश पुरी यांची प्रस्तावना प्राप्त झाली आहे. आधुनिक काळात गुरू-शिष्य परंपरा जोपासनेचे यापेक्षा अधिक सकारात्मक उदाहरण दुसरे कोणते बरे असेल?
एक बाब आपण लक्षात घ्यायला हवी की, पत्रकारिता अगर जनसंपर्क ही क्षेत्रे अनुभवाधिष्ठित आहेत. पत्रकारांच्या, प्रॅक्टीशनर्सच्या अनुभवातून या ज्ञानक्षेत्रांचा विस्तार झाला आहे. डॉ. चिंचोलकर यांच्या या पुस्तकालाही त्यांच्या अनुभवाचा भरभक्कम पाया लाभल्याने त्याची मांडणी अतिशय संवादी झालेली आहे. पुरी यांनी त्यांच्या प्रस्तावनेमध्ये, चिंचोलकर यांनी ज्या संघर्षमय परिस्थितीतून शिक्षण पूर्ण केले, त्याचा उल्लेख केलेला आहे. चिंचोलकर यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात दहा वर्षे वार्ताहर, आवृत्ती प्रमुख आदी जबाबदाऱ्या यशस्वीपणे पेलल्या. त्यानंतर जळगावच्या बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे पहिले जनसंपर्क अधिकारी म्हणून बारा वर्षांहून अधिक काळ काम केले. ऑक्टोबर २००८पासून ते सोलापूर विद्यापीठात वृत्तपत्रविद्या विभागाचे प्रमुख म्हणून रुजू झाले. त्यांच्या या समग्र वाटचालीतील अनुभवाचा अर्क त्यांच्या पुस्तकामध्ये उतरल्याचे आपल्याला दिसते.
पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना सैद्धांतिक ज्ञान आवश्यक आहेच; मात्र फिल्ड वर्क आणि पत्रकारिता, जनसंपर्क क्षेत्रातील प्रत्यक्ष कामाचा अनुभव त्याहूनही अधिक महत्त्वाचा असतो. बातमी लेखनापासून ते संपादनाच्या विविध प्रक्रिया, उत्तम जनसंपर्कासाठी आत्मसात करावयाच्या नेमक्या बाबी, आपत्कालीन स्वरुपाच्या परिस्थितीत घ्यावयाचे निर्णय अशा अनेक बाबी क्रमिक पुस्तकांतून वाचून शिकणे आणि प्रत्यक्ष फिल्ड वर्क केलेल्या व्यक्तीच्या तोंडून समजावून घेणे यात फरक आहे. सदर कामातील खाचाखोचा, अचानक उद्भवणाऱ्या अडचणी, त्यावर मात करण्यासाठी करावयाचे प्रयत्न आदी बाबींची माहिती सर्वांगीण अनुभवसिद्ध शिक्षक उत्तम प्रकारे देऊ शकतो. डॉ. चिंचोलकर यांनी त्या अनुभवाचा पुरेपूर वापर करून सदर पुस्तकाचे लेखन केलेले आहे.
अगदी मुखपृष्ठापासूनच त्याची सुरवात झालेली आहे. सर्व माध्यमे- अगदी उपग्रहापर्यंतची अत्याधुनिक साधने भोवतीने आहेत. मात्र, त्यांच्या केंद्रस्थानी माणूसच आहे. सारी माध्यमे, समस्त जनसंपर्क यांचा आटापिटा कशासाठी ? तर, मानवाची संवादाची भूक भागविण्यासाठी. संवाद नसेल, तर माणूस वेडा होऊन जातो. लॉकडाऊनच्या काळात सर्वांनीच त्याचा अनुभव घेतला आहे. ऑनलाईन, व्हर्चुअल माध्यमांद्वारे कितीही संवाद साधा; प्रत्यक्ष संवादाची उत्कटता त्याला कधीही लाभणार नाही. पूर्वी आपण म्हणायचो, पारंपरिक शिक्षणाचे भवितव्य ऑनलाईन शिक्षण आहे. मात्र, आपले विधान अर्धसत्य असल्याचे या काळात सिद्ध झाले. पारंपरिक शिक्षणाला ही माध्यमे पूरक म्हणूनच उत्तम काम करतील, असे आता चित्र आहे. अशा प्रकारे मानवाचे संवाद प्रक्रियेतील मध्यवर्तीपण अधोरेखित करीतच डॉ. चिंचोलकर त्यांच्या जनसंपर्काच्या अंतरंगाची मांडणी करताना दिसताहेत.
जनसंपर्काची प्रक्रिया आणि स्वरुप या बाबी अतिव्यापक आहेत. केवळ बोलणे, संवाद साधणे अगर माहिती देणे असा जनसंपर्क व्यवसायाचा संकुचित अर्थ आजही काढला जातो. स्वाभाविकपणे जनसंपर्काचा अर्थ तेथे मर्यादित राहतो. त्याचप्रमाणे जाहिरात, विक्री, विपणन, उत्पादन वृद्धी, प्रेस एजंट्री अगर प्रसिद्धी या संकल्पनाही जनसंपर्कसदृश समजल्या जातात. मात्र, जनसंपर्काची संकल्पना ही त्याहून वेगळी आणि या सर्वच बाबींना कमीअधिक प्रमाणात सामावून घेणारी आहे. उपरोक्त सर्व बाबींचा अंतर्गत आणि बाह्य घटकांमध्ये सुसंवाद प्रस्थापित करण्यासाठी वापर करून अंतिमतः संस्थेच्या हितास्तव व्यापक सामाजिक स्तरावर दूरगामी सदिच्छा प्रस्थापना करणे, यासाठी जे सकारात्मक वस्तुनिष्ठ प्रयत्न केले जातात, त्या बाबींचा जनसंपर्काच्या कक्षेत समावेश होतो. जनसंपर्काचे क्षेत्र हे तुलनेत आधुनिक आहे. गेल्या शतकभरामध्ये त्याचा संकल्पनात्मक, सैद्धांतिक आणि क्षेत्रीय विकास आणि विस्तार झाला आहे. शासकीय विभागांसह खासगी उद्योग-व्यवसायांनी जनसंपर्काचा अंगिकार करून आपली प्रगती साधलेली असल्याचे आपल्याला दिसते.
जनसंपर्काच्या विविध पैलूंचा साकल्याने वेध घेण्याचे काम ‘जनसंपर्काचे अंतरंग’ या पुस्तकाद्वारे डॉ. चिंचोलकर यांनी केले आहे. अत्यंत मुद्देसूद आणि तपशीलवार मांडणी, त्याच्या जोडीला समजावून सांगण्याची संवादी, प्रवाही शैली आणि त्याला पूरक छायाचित्रे, रेखाचित्रे यांचा सुरेख मेळ घालत त्यांनी हे पुस्तक साकारले आहे. या पुस्तकात एकूण ४४४ पृष्ठांमध्ये नऊ प्रकरणांची मांडणी करण्यात आली आहे. जनसंपर्काचा उदय आणि विकास, जनसंपर्क: संकल्पना आणि सिद्धांत, जनसंपर्क आराखडा, जनसंपर्काची माध्यमे, जनसंपर्काची साधने आणि लेखन तंत्रे, जनसंपर्काच्या व्यावसायिक संस्था आणि आचारसंहिता, जनसंपर्काची विविध क्षेत्रे, कॉर्पोरेट संवाद आणि जनसंपर्क संशोधन अशी ही अगदी क्रमवार प्रकरणे आहेत. जनसंपर्काच्या प्रारंभापासून ते समकाळातील जनसंपर्क क्षेत्राच्या डिजीटल विस्तारापर्यंत सर्वंकष वेध लेखकाने घेतला आहे. पारंपरिक, प्रस्थापित माध्यमांबरोबरच नवमाध्यमांच्या आधारे जनसंपर्क कसा साधावा, याचे दिग्दर्शनही यात त्यांनी केले आहे. विद्या बुक पब्लिशर्सचे प्रकाशक शशिकांत पिंपळापुरे यांनी निर्मितीमूल्यांच्या बाबतीत कोठेही तडजोड केलेली नाही, याचाही उल्लेख करणे आवश्यक आहे.
जागतिक स्तरावरील पी.टी. बार्नम यांच्यापासून ते आयव्ही लेड बेटर ली, वॉल्टर लिपमन, जॉर्ज क्रील, एडवर्ड बार्नेस यांच्या योगदानाचा साद्यंत आढावा तर या पुस्तकात घेण्यात आला आहेच; शिवाय, भारतीय परिप्रेक्ष्यात सम्राट अशोक यांनी शिलालेख, स्तंभ या माध्यमातून तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांची राजमुद्रा, विविध हुकूमनामे यांद्वारे प्रस्थापित केलेल्या जनसंपर्काचाही गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला आहे.
भारतीय जनसंपर्काचे जनक म्हणून महात्मा गांधी यांचा सार्थ गौरव करीत असतानाच भारतीय चित्रपटांचे जनक दादासाहेब फाळके आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचीही जनसंपर्काच्या अंगाने त्यांनी केलेली मांडणी मुळातूनच वाचण्यासारखी आहे. फाळके यांनी चित्रपट माध्यमाच्या प्रसारासाठी जनसंपर्काच्या वापरलेल्या विविध क्लृप्त्यांचा वेध यात घेतला आहे. विशेषतः डॉ. आंबेडकर यांच्या संदर्भातील मांडणी अतिशय लक्षणीय स्वरुपाची आहे.
कोणत्याही ज्ञानशाखेची वृद्धी आणि विस्तार या बाबी त्या क्षेत्राशी निगडित उपलब्ध असणारे संदर्भ साहित्य आणि त्या क्षेत्रात सुरू असणारे संशोधन यावर अवलंबून असतात. पत्रकारिता आणि जनसंपर्काचे क्षेत्रही त्याला अपवाद नाही. तथापि, मराठीमध्ये या संशोधन सिद्धांतांचा गांभीर्यपूर्वक साद्यंत मांडणीचा मोठा अभाव होता. ही उणीव सदर पुस्तकामध्ये चिंचोलकर सरांनी भरून काढली आहे. जनसंपर्क आराखडा, संशोधन, सर्वेक्षण प्रकार, जनसंपर्क मोहीम, उपक्रम मूल्यमापन, आशय विश्लेषण अशा सर्व संशोधकीय बाबींचा परिचय पुस्तकात सविस्तर करून देण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे शासकीय, कॉर्पोरेट, वित्तीय, शैक्षणिक, स्वयंसेवी संस्था, आरोग्य, संरक्षण, स्थानिक स्वराज्य संस्था आणि राजकीय अशा सर्व क्षेत्रांमधील जनसंपर्काचा वेधही सरांनी घेतलेला आहे. हा वेध घेत असताना त्या त्या क्षेत्रातील अनेकविध समकालीन उदाहरणे देऊन स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यातील क्लिष्टता जाऊन विषय समजावून घेणे सोपे झाले आहे. शैक्षणिक जनसंपर्काच्या संदर्भात शिवाजी विद्यापीठाच्या महापूर काळातील सामाजिक कार्याचाही पुस्तकात गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला आहे.
हे पुस्तक पत्रकारिता आणि संवादशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी प्रचंड उपयुक्त ठरणारे आहेच; मात्र, त्याचबरोबर विविध शासकीय, खासगी आस्थापना, संस्था, उद्योग-व्यवसाय यांनाही आदर्श जनसंपर्क कशा प्रकारे असावा, याबाबत मार्गदर्शन करणारे आहे. आजच्या माध्यमांनी घेरलेल्या काळात उत्तम जनसंपर्काची आवश्यकता प्रत्येकालाच वाटू लागली आहे. संस्थाच नव्हे, तर सेलिब्रिटी नसलेल्या सर्वसामान्य व्यक्तीला सुद्धा व्यक्तीगत पातळीवर आपला जनसंपर्क वृद्धिंगत करण्याची, आपली स्वतंत्र ओळख, छबी निर्माण करण्याची आस लागलेली आहे. या पुस्तकाच्या आधारे ही बाब सहजसाध्य आहे. खरे तर, या पुस्तकाला केवळ क्रमिक पुस्तक म्हणणे, त्याच्यावर अन्याय करणारे ठरेल. कारण जनसंपर्क ही पुस्तकात कमी आणि व्यवहारात अधिक अंमलात आणावयाची संकल्पना आहे. जनसंपर्क जितका प्रभावी, तितकी उत्तम प्रतिमा निर्मिती असे थेट समीकरण आहे. म्हणूनच माध्यमकर्मी, जनसंपर्क व्यावसायिक, जनसंपर्काचे शिक्षक, विद्यार्थी यांच्यासह जनसंपर्काची आस असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या हाती हे पुस्तक असलेच पाहिजे, असे त्याचे स्वरुप आहे.
या पुस्तकाचे गुणवैशिष्ट्य अगदी एका शब्दात सांगायचे तर ‘समग्रता’ हाच शब्द त्याला लागू पडेल. जनसंपर्काचे सर्व घटक, सर्व बाजू यांचा साकल्याने वेध त्यात आहे. पण, त्या समग्रतेला पृष्ठसंख्येच्या मर्यादा पडल्यामुळे अनेक संकल्पनांना धावता स्पर्श करावा लागलेला आहे. यातील जवळपास प्रत्येक संकल्पनेवर एकेक पुस्तक होईल, अशी त्यांची व्याप्ती आहे. इंग्रजीत तशी ती आहेतही. मराठीत मात्र आता तशा प्रकारची पुस्तके निर्माण होण्याची निकड या पुस्तकामुळे नव्याने अधोरेखित झालेली आहे.
एकूणच, जनसंपर्काविषयी मराठीमध्ये एक अत्यंत महत्त्वाचे पुस्तक ‘जनसंपर्काचे अंतरंग’ या पुस्तकाच्या रुपाने दाखल होते आहे. येथून पुढील काळात महाराष्ट्रातील सर्व पत्रकार, शिक्षण संस्था, विद्यापीठे, विद्यार्थी यांना या पुस्तकाचा अभ्यास केल्याखेरीज पुढे जाता येणार नाही. जनसंपर्क व्यावसायिक, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यासाठी तर एक महत्त्वाचा दस्तावेज मातृभाषेत उपलब्ध होतो आहे. हे सर्वच घटक चिंचोलकर यांच्या या पुस्तकाचे स्वागत केल्याखेरीज राहणार नाहीत, याची खात्री आहे.
पुस्तकाचे नाव: जनसंपर्काचे अंतरंग
लेखक: डॉ. रवींद्र चिंचोलकर
प्रकाशन: विद्या बुक्स पब्लिशर्स, औरंगपुरा, औरंगाबाद
पृष्ठसंख्या: ४४४
किंमत: रु. ५००/-
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.