April 19, 2024
Demand of Sperate Konkan University article by Gourav Shelar
Home » स्वतंत्र कोकण विद्यापीठ विकासासाठी गरजेचे
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

स्वतंत्र कोकण विद्यापीठ विकासासाठी गरजेचे

विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण हे महाराष्ट्राचे पाच प्रादेशिक विभाग आहेत. कोकणसोडून प्रत्येक विभागात विद्यापीठे आहेत. परंतु कोकण विभागात एकही विद्यापीठ नाही, ही कोकणासाठी एक खंत आहे. हा राजकारण्यांनी मिळून कोकणावर केलेला अन्याय आहे.

गौरव देवेंद्र शेलार

कोकण विभाग प्रमुख
महाराष्ट्र स्टुडंटस् युनियन

महाराष्ट्र स्टुडंटस् युनियन (मासु) अराजकीय  विद्यार्थी संघटना महाराष्ट्रभर  विद्यार्थ्यांच्या हक्क आणि अधिकारांच्या पुर्ततेसाठी न्यायिक स्वरुपाचा लढा देत आहे. आता कोकणसाठी स्वतंत्र विद्यापीठाची मागणी संघटनेच्यावतीने करण्यात येत आहे. कोकणातील लोकप्रतिनिधींनी कोकण विद्यापीठाचा मुद्दा निवडणूक घेतला होता. पण निवडणुकानंतर हा विषय पुन्हा चर्चेलाच आला नाही. कोकणची निवडणूक लोकप्रतिनिधींनी ज्या मुद्दावर लढवली आणि ती जिंकली देखील तो म्हणजे कोकणी नागरिकाच्या सर्वात जास्त जिव्हाळ्याचा प्रश्न “कोकण विद्यापीठ” फक्त निवडणुकीसाठी वापरलेला जुमला होता हे आता स्पष्ट झाले आहे.

कोकणातील राजकर्ते जी आश्वासने देऊन निवडून आले ती आश्वासने पुर्ण कधी करणार आहेत? या राजकिय मंडळींना कोकण विद्यापीठ हवे आहे की नाही ? जर हवे असेल तर मग आजपर्यंत  कोकण विद्यापीठ न होण्यामागची कारणे कोणती ? कोकण विद्यापीठासाठी या लोकप्रतिनिधींनी केव्हा आणि कुणाला पत्रव्यवहार केला आहे का ?  कुठल्या विधानसभेत किंवा संसदेत कधी आणि केव्हा प्रश्न उपस्थित केला आहे का ? हे आता स्पष्टपणे जनतेला सांगण्याची गरज आहे. जर कोकण विद्यापीठासाठी राजकर्त्यांनी प्रयत्न केलाच नसेल, तर तुम्ही निवडणुकीवेळी कोकण विद्यापीठ स्थापन करू असे खोटे आश्वासन कोंकण वासियांना का दिले ? याचे उत्तर देण्याचे नैतिक कर्तव्य आता या लोकप्रतिनिधींनी करणे आवश्यक आहे. तुम्ही कोकणातील सर्व स्थानिक राजकीय नेते आहात खरं तर राज्य स्तरावर कोकणची छाप पाडण्यात तुम्ही सर्व स्थानिक राजकीय नेते नेहमीच अपयशी पडल्याचे दिसून येत आहे.

स्वतंत्र कोकण विद्यापीठ व्हावे यासाठी लोकप्रतिनिधींनी आजपर्यंत अनेक आश्वासने दिली आहेत. परंतु हा प्रश्न अजूनही मार्गी लागलेला नाही किंवा यावर अजूनही कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. कारण या राजकिय मंडळींना यामध्ये फक्त आणि फक्त राजकारणच करायचे आहे का ? अशा या विचारसरणीमुळेच कोकणचा अजूनही शैक्षणिकदृष्ट्या विकास झालेला नाही. कोकणी माणसाची सहनशीलता आणि राजकीयदृष्ट्या सातत्याने होत असलेले दुर्लक्ष यामुळे कोकणचा विकास होत नसल्याचे दिसून येत आहे.

विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण हे महाराष्ट्राचे पाच प्रादेशिक विभाग आहेत. कोकणसोडून प्रत्येक विभागात विद्यापीठे आहेत. परंतु कोकण विभागात एकही विद्यापीठ नाही, ही कोकणासाठी एक खंत आहे. हा राजकारण्यांनी मिळून कोकणावर केलेला अन्याय आहे.

कोकणामध्ये नव्यानं स्थापन झालेल्या कोकण बोर्डातील दहावी व बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी सलगपणे सात वर्षे महाराष्ट्रात अव्वल स्थान पटकावले आहे. कोकणातील विद्यार्थी हुशार, प्रामाणिक, कष्टाळू आहे. मुंबई विद्यापीठात देशभरातील अनेक विद्यार्थी येत असल्याने त्या ठिकाणी कोकणातील गरीब होतकरु आणि बुद्धिवान विद्यार्थी स्पर्धेत कसा टिकेल याचा तज्ज्ञांनी आणि राजकिय पुढाऱ्यांनी विचार करण्याची गरज आहे.

सोलापूर या एका जिल्ह्यासाठी एक स्वतंत्र विद्यापीठ आहे. तसेच गोंडवाना, स्वामी रामानंदतीर्थ अशी छोटी विद्यापीठे सक्षम झाली. मग कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठ झाले तर याचा खुपच फायदा स्थानिकांना होईल. लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कोकणात विद्यार्थ्यांना स्वतः चे असे हक्काचे शैक्षणिक व्यासपीठ उपलब्ध नाही. याची जराशीही खंत या राजकारण्यांना नाही. कोकण खूप मोठ्या प्रमाणात बदलतोय. मोठमोठे उद्योग प्रकल्प येत आहेत. महामार्ग रुंदीकरण सुरू झाल्यामुळेही कोकणात बदल होत आहेत. अशावेळी शिक्षण क्षेत्रातही बदल होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी कोकणाला स्वतंत्र विद्यापीठ मिळावे, ही मागणी गेली अनेक वर्षे विद्यार्थी व पालकांकडून केली जात आहे.

कोकणातील रत्नागिरीमधील ४५ , सिधुदुर्गामधील ३८  अशी मिळून ८३ महाविद्यालयांकरीता स्वतंत्र विद्यापीठ स्थापण करणे ही आता काळाची गरज आहे. कोकण विद्यापीठ झाले तर याचा फायदा रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना होणार आहे.

हे होतील कोकण विद्यापीठाचे फायदे :-

  • कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठ झाल्यास कोकणातील स्थानिक गरजेप्रमाणे सुसंगत रोजगारक्षम अभ्यासक्रम तयार करता येतील.
  • समुद्रविज्ञान, नारळ संशोधन विज्ञान, प्रकिया उदयोग, पर्यटन, मेरिटाईम, मत्स्यउत्पादन, तसेच रेल्वे तंत्रज्ञानासंबंधी अनेक अभ्यासक्रम स्वतंत्रपणे सुरू करता येणे शक्य आहे.
  • कोकण विद्यापीठ झाल्यास विद्यार्थ्यांना स्वतःचे हक्काचे शैक्षणिक व्यासपीठ उपलब्ध होईल.
  • स्थानिक प्राध्यापकांना नवी संधी उपलब्ध होईल.
  • संशोधनाला विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये वाव मिळेल.
  • विद्यार्थ्यांना लागणारा प्रवास, वेळ व खर्च कमी होईल.
  • विद्यापीठामुळे एक नवीन शैक्षणिक संस्कृती तयार होईल. शिक्षणाचा दर्जा सुधारेल.

Related posts

देशी अन् विदेशी गायीच्या दुधातील फरक

मृत्युंजय प्रतिष्ठानतर्फे अरविंद गोखले, विद्याधर निमकर यांना पुरस्कार

प्रेमाच्या पेटीनेच गाठता येतो मोक्षाचा तीर  

Leave a Comment