July 27, 2024
Home » माणसाला लाजवेल अशी अप्रतिम कादंबरी : कांडा
काय चाललयं अवतीभवती

माणसाला लाजवेल अशी अप्रतिम कादंबरी : कांडा

वातावरणाचा समतोल ढासळला. मानवाला त्याची फिकीर नाही. तो स्वतःच्या स्वार्थासाठी हवे तेच करत राहिला. निसर्गाने मात्र आपला धर्म सोडला नाही. पशूपक्षांनी आपले वर्तन बदलले नाही. मला प्राण्यांविषयी वाचायला आवडते. असेच हत्तीविषयी वाचतांना त्यातील एक वाक्य अगदी हृदयावर कोरले गेले. त्याची मानवता माणसालाही लाजवणारी होती. तो हत्ती माझ्या काळजात घर करुन राहिला आणि या कादंबरीची निर्मिती झाली.

प्रा. रामदास केदार उदगीर

माणसाला लाजवेल अशी प्राणी आणि मानवी समूहावर आधारलेली सुनिताराजे पवार यांची कांडा ही अप्रतिम कादंबरी आहे. एक वेगळा विषय कादंबरी लेखिकेने हाताळलेला आहे. कांडा म्हणजे नेमके काय असेल हे पुस्तक हातात घेतल्यावर वाचण्याअगोदर प्रत्येकालाच वाटते. वाचल्यानंतर ही कादंबरी त्यातील लेखन कधीच विसरू शकणार नाही.

आफ्रिकेतील जंगलात हरवलेल्या एका हत्तीचे पाडस आणि त्याचे संपूर्ण आयुष्य पोरका असलेल्या कृष्णासोबत कसे घडत गेले याचे सुंदर वर्णन या कादंबरीत वाचावयास मिळते. सुनिताराजे पवार आपल्या मनोगतात लिहितात की, आपल्या आसुरी अभिलाषेने ही सुंदर सृष्टी त्याने विद्रूप केली. घनदाट जंगले तोडली. सजीवांच्या अनेक प्रजाती नष्ट झाल्या. निसर्गचक्र बिघडले. वातावरणाचा समतोल ढासळला. मानवाला त्याची फिकीर नाही. तो स्वतःच्या स्वार्थासाठी हवे तेच करत राहिला. निसर्गाने मात्र आपला धर्म सोडला नाही. पशूपक्षांनी आपले वर्तन बदलले नाही. मला प्राण्यांविषयी वाचायला आवडते. असेच हत्तीविषयी वाचतांना त्यातील एक वाक्य अगदी हृदयावर कोरले गेले. त्याची मानवता माणसालाही लाजवणारी होती. तो हत्ती माझ्या काळजात घर करुन राहिला आणि या कादंबरीची निर्मिती झाली.

आफ्रिकेतील घनदाट जंगलाचे सुंदर वर्णन सुरुवातीला लेखिकेने केलेले आहे. आकाशाला गवसणी घालणारे उंच उंच वृक्ष, वेली, धबधबे, फुलांचे झोपाळे, पक्षांची किलबिल, चित्कारणारी माकडे, प्राणी, मोजता येणार नाही इतक्या प्रकारचे सजीव. प्रत्येक प्राण्यांचे आनंदी व स्वच्छंदी वेगवेगळे भावविश्व, स्वछ सूर्यप्रकाश, निसर्गाने मुक्त हस्ताने आपल्या जवळील सर्व काही उधळून टाकलं होतं. अशा या जंगलात कळपाच नेतृत्व करणार्‍या हत्तीच्या पोटी बछडा जन्माला येतो. त्याचेच पुढे नाव कांडा असे ठेवले जाते. तो इतका सुंदर, देखणा असतो की, सर्व कळपातल्यांचे मन वेधून घेतो. कळपात आनंदाचे वातावरण पसरते. या कळपात कांडाच्या आत्या, मावशा इतर भावंडही असतात. कांडाची आई त्याला सरंक्षणांचे धडे देऊ लागली. नदीत, डबक्यात पोहायला, लोळायला, मस्ती करायला कांडाला खूप आवडायचं.

एका दिवशी अशाच आनंदात हा हत्तीचा कळप आणि देखणा बछडा असतांना कसल्यातरी बंदुंकीच्या फैरी झडू लागल्या. कळपात गोंधळ सुरू झाला. जीव वाचवण्यासाठी मिळेल त्या दिशेने धावू लागले. तासाभराने हा गोंधळ संपतो. हत्तीचा कळप एकत्र जमा झाला. त्यात बछडा दिसेनासा झाला. त्यांच्या आईच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. आई आणि सोबतचा कळप शोध घेण्यासाठी फिरु लागली. सगळ्या कळपाचं जणू चैतन्यच हरवलं होतं. माणूसच आपल्या लेकरांवर जीव लावतो असे नाही तर प्राण्यांतही आपल्यापेक्षा अधिक जीव, भावना असतात. हे लेखिकेने कांडाच्या माध्यमातून पटवून दिले आहे.

हा बछडा आपला रस्ता आणि कळप चुकतो आणि तोशिबाच्या हाती लागतो. तोशिबा म्हणजे प्राण्यांना पकडून मोठ्या बाजारपेठेत विक्री करणारा तस्कर. तोशिबाने या बछड्याला गाडीत टाकले. गाडी सुसाट सुटली. या बछड्याला आपण कुठे चाललो आहे हे लक्षात येतं नव्हते. त्याला वाटा अनोळखी वाटू लागल्या. समुद्र काठावर गाडी आली. समुद्र काठावर त्याला माणसांची गर्दी दिसली. बछड्याला आपण वेगळ्या विश्वात आल्याचे कळू लागले. तोशिबा या बछड्याचा व्यवहार ठरवून अमाप पैसा घेऊन निघून जातो.

बछड्याचा दुसरा प्रवास सुरू होतो. सगळीकडे पाणीच दिसते. जंगल दिसत नाही. त्याला कळपाची, आईची आठवण खूप येते. तो निराश होऊन बसतो. हा हत्ती रामण्णाला विकला जातो. रामण्णासोबत एक मुलगा असतो. त्याला आईवडील नसतात. हा लहान पोरक्या मुलाला रामण्णा आपल्या बोटीवर कामाला घेतो. बछडा आणि या लहान मुलांची खूप मैत्री झाली. या मुलाला या बछड्याच्या भावना कळत होत्या. आईपासून खूप दूर आल्याचे कळते. दोघांचीही एकच गत होते. दोघांचेही कुणीच सोबत नसतात. हा लहान मुलगा या बछड्याची खूप काळजी घेतो. बछडाही या मुलांच्या भावना ओळखून घेतो. समुद्र प्रवास संपतो. बोट किनाऱ्याला लागते. बछड्याला माणसांचा हा जंगल दिसतो. बछडा खाली उतरण्यास तयार होत नाही. खूप प्रयत्न केला जातो. रामण्णाला या मुलांची सवय लागली ते कळते. आपण मुक्या प्राण्यांना जीव लावला तर ते पण आपल्याला जीव लावतात. हे या दोघांच्या घट्ट मैत्रीतून दिसून येते.

बछड्याला बाजूला जंगल आणि हत्तीचा कळप दिसतो. बछड्याला थोडे बरे वाटले, पण त्याला आईची येणारी आठवण काही केल्या जात नव्हती. हा बछडा परिसरातील प्रसिद्ध राजेसाहेबांनी हा मागवलेला होता. हा देखणा बछडा पाहील्यानंतर सगळ्यांना आनंद झाला. येथील हत्ती सिद्दमाच्या ताब्यात होते. या बछड्यालाही सिद्दम्माच्या ताब्यात देण्यात आले पण हा बछडा जात नव्हता. आता आपणाला हा मित्रही गमवावा लागणार हे दुःख त्याला होते. हे जाणून घेऊन रामण्णा सिद्दमाला या लहान मुलालाही या बछड्यासोबत ठेवण्याचे ठरवतो. पण सिद्दमा विचारतो, या मुलांना त्याचे आईवडील शोधणार नाहीत का ? तेंव्हा त्याला आईवडील नसल्याचे समजते. अनाथ असल्याने सिद्दमाला त्याची दया येते. तो मुलाला जवळ घेतो. त्यामुळे बछड्याला आनंद होतो. तसा या पोरक्या मुलालाही होतो.

त्रावकोरचं पद्मनाभम् मंदिर देशातील श्रीमंत देवस्थान. येथे हत्तीचा उपयोग देवस्थानच्या उत्सवाच्या वेळी केला जात होता. दरवर्षी हत्तीच्या कळपात नवा पाहुणा दाखल होत असायचा. यंदा या देखण्या, सुरेख, सुंदर बछड्याची भर पडते. राजाला हा हत्ती खूप आवडतो. सिदम्मा या बछड्याचे नाव येथे कांडा तर अनाथ मुलांचे नाव कृष्णा ठेवतो. मातृहृदयी सिद्दमा या दोघांनाही सांभाळू लागतो.

कांडा आणि कृष्णा मोठे होतात तसे ते दोघेही देखणे दिसू लागतात. दोघांनाही या परिसराची ओळख होते. कांडामध्ये मोठा बदल होऊ लागतो. तो सभ्य आणि संयमाने राहू लागतो. कृष्णा पंचविशीत तर कांडा पंधरा वर्षे ओलांडला असल्याने दोघेही तारुण्याने मुसमुसलेले दिसू लागतात. दोघांच्याही तारुण्याचे वर्णन लेखिकेने खूप सुंदर केलेले आहे.

एकदा सिद्दमाच्या मुलीला लग्नासाठी सत्या हा मुलगा पाहायला येणार असल्याचे कांडाला समजते. सत्या आल्यानंतर कांडा कृष्णाला सोंडेने उचलून सत्याच्या शेजारी उभा करतो. सिद्दमाला कांडाच्या भावना समजतात. कृष्णासारखा सुंदर मुलगा असताना आपण मुलीचे लग्न दुसऱ्यासोबत का करायचे, असे सिद्दमाला वाटते. अनाथ कृष्णाचा विवाह सिद्दमा आपल्या मुलीशी लावतो. कांडाला आनंद होतो. कांडा म्हणजे साक्षात गणेशासारखा कृष्णासाठी तो खरोखरच विघ्नहर्ता, सुखकर्ता ठरतो.

कांडा अत्यंत शुभलक्षणी होता. कृष्णा आणि सिद्दमाच्या तालमीत कांडा अतिशय सभ्य आणि सुसंस्कृत असतो. सर्व सोबतचे हत्ती कांडापुढे सन्माने वागत असतात. उत्सवात मोठी जबाबदारी कांडावर येते. पहिल्यांदाच कांडा लोकांच्या महासागरात उतरणार असतो. तेंव्हा काय होईल हे सांगता येत नाही याची भीती कृष्णाला वाटते. उत्सव दोन दिवसांवर येतो. त्रावणकोर नगरी नवरीसारखी सजलेली असते. सर्वत्र चैतन्यमय वातावरण असते. कांडालाही सजवण्यात येते. कांडाला नजर लागावी असा तो दिसत असतो. याचे सुंदर वर्णन लेखिकेने केले आहे.

उत्सवाला सुरुवात होते. परिसर माणसांनी, हत्तीनी आणि राजेशाहीत थाटामाटात राहणाऱ्या माणसांनी गजबजून जातो. पत्रकार पुढेपुढे करु लागतो. ते कांडाला आवडत नाही. कांडा त्यातील एकाला आपल्या सोंडेने उचलतो आणि उंच आकाशात फेकतो. त्यावेळी मोठा स्फोट होतो. सगळे हादरतात. अतिरेक्यांचा मुख्यमंत्र्यांना मारण्याचा कट कांडा उधळून लावतो. अनेकांचा जीव कांडामुळे वाचतो. जे माणसाला जमले नाही ते कांडाने करून दाखवले. राजा कांडाजवळ जातो. ‘खरा सेनानी आहेस तू’ असे म्हणत कांडाच्या सोंडेवरुन राजा हात फिरवतो. पण कांडा या स्फोटात होरपळून पडतो. कृष्णांच्या डोळ्यात अश्रू भरुन येतात. कांडा अनंतात विलीन होतो. सगळे कळपातले हत्ती कांडाला सोंडेने मानवंदना देतात. येथे या कादंबरीचा शेवट होतो.

सुनिताराजे पवार यांनी हा वेगळा विषय घेऊन कादंबरी लेखन केल्यामुळे वाचकाला ही कादंबरी नक्कीच आवडेल. मुक्या प्राण्यांतही कशी मानवता असते ? माणसांनी प्राण्यांशी चांगले वागले तर प्राणीही कशी माणसांवर दया करतात हा संदेश या कादंबरीतून मिळतो.

प्रसिद्ध साहित्यिक रा. रं. बोराडे यांची पाठराखण आहे. ते या कादंबरी विषयी लिहीतात, दीडशे हत्तीच्या कळपाचे नेतृत्व करणाऱ्या एका हत्तीणीच्या पोटी जन्माला आलेला कांडा या नावाच्या एका उमद्या, देखण्या हत्तीची गोष्ट. त्याच्या जन्मापासून ते वीरमरण येईपर्यंतची ही कथा आहे.
सुनिल मांडवे यांनी सुंदर असे मुखपृष्ठ तयार केले आहे. तर आतील रेखाचित्रे प्रतिक काटे यांनी रेखाटलेली आहेत. वाचनिय अशी ही कादंबरी आहे.

पुस्तकाचे नाव – कांडा
लेखिका – सुनिताराजे पवार
प्रकाशक – अक्षरबंध प्रकाशन
पृष्ठे – १०४ ,मूल्य – १५०

पुस्तक परिचय आणि परिक्षणासाठी आपणही आपली पुस्तके जरुर पाठवा आम्ही त्याची जरूर दखल घेऊ आणि योग्य ती प्रसिद्धी देऊ…
पुस्तके पाठविण्याचा पत्ता –
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, संपादक, इये मराठीचिये नगरी
श्री अथर्व प्रकाशन, १५७, साळोखेनगर, कोल्हापूर ४१६००७. मोबाईल – ९०११०८७४०६

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

video: मंचकी निद्रेसाठी कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे प्रस्थान…

मोर खरचुडी वेलीने निसर्गप्रेमींना घातली भुरळ !

प्रेम.. अडिच अक्षरांची जादू

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading