March 19, 2024
bhubhari-poetry-book-by-arun-zhagadkar
Home » व्यथेच्या आर्जवातून जन्मलेला कवितासंग्रह
मुक्त संवाद

व्यथेच्या आर्जवातून जन्मलेला कवितासंग्रह

व्यथेच्या आर्जवातून जन्मलेला भूभरी हा कवितासंग्रह समाजाला निश्चित नवी दिशा देणारा आहे. आपल्या मनातील एक एक ठिणगी शाबूत ठेवण्यासाठी स्वतःच भूभरी होतो आहे कारण ती आजच्या काळाची गरज आहे.

ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर

चंद्रपूर

पूर्व विदर्भातील डोंगर पर्वताच्या कुशीत आणि वर्धा वैनगंगेच्या मुशीत, निसर्गाच्या तालमीत तयार झालेला जन्मत: निसर्ग सान्निध्य आणि संस्कृतीच्या पदराखाली मोठे झालेल्यापैकी अरुण झगडकर हे एक नाव. त्यांचा भूभरी हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. चिकित्सक वृत्ती आणि सूक्ष्म निरीक्षण हे सत्यशील व्यक्तीला समाजाच्या दूर राहू देत नाही. त्याला ते वातावरण अस्वस्थ करते. ग्राम जाणिवांच्या उर्मीतून साकार झालेल्या झगडकरांच्या कविता भूभरी या कविता संग्रहात समाविष्ट आहेत. सभोवताली घडणाऱ्या भयाण समाज वास्तव्याच्या दाहकतेची झळ त्यांच्या कवितेत उतरलेली दिसून येते. मानवी मनाच्या व्यक्त-अव्यक्त भावस्पर्शाचे आस्वादक चिंतन, नैसर्गिक सौंदर्य वाचकाला भुरळ घातल्याखेरीज राहत नाही. प्रेम, शृंगार या प्रवर्गातील प्रतीक काही ठिकाणी रमणीय अर्थ व्यक्त करतात. काही कवितांना आंतरिक लयीचा प्रारंभिक मूलाधार असल्याने तालबद्ध झालेल्या आहेत. तशातच कवीला छंद आणि वृत्ताच्या आकृतिबंधाचे आत्मभान असल्याची साक्ष देतात. काव्य सौंदर्यधिष्टीत अर्थसौंदर्य हे शब्दांच्या चपखल वापरणे विशिष्ट उंचीवर जाणारे आहे. तसेच काव्य रुपाने व्यक्त झालेले अनुभव वाचकाला अंतर्मुख करणारे विचार सौंदर्य भूभरी या कवितासंग्रहाचे खास वैशिष्ट्य आहे.

कवीच्या भागाची भाषा ही झाडीबोली आहे. कवीला आपल्या बोलीभाषेचा अभिमान आहे. या भाषेच्या गाैरवार्थ ‘झाडीचा महिमा’ ही कवी अरुण झगडकरांची कविता लक्षवेधी ठरलेली आहे. कवी खास झाडीबोली बोलीभाषा सक्षम करण्यासाठी काम करत आहेत. झाडीबोली बोलणार्‍या प्रदेशाचे कवी गुणगान करतात. या भाषेचा महिमा अगोदर ज्यांनी वर्णन केला आहे. शेवटच्या कडव्यात वचनबद्ध होतांना कवी सांगतो,

जुन्या नव्या कारात ही, तिचा उमटवू ठसा ।
झाडीबोलीचा महिमा, आमी चालवू वारसा ॥

लेखणी माझी या कवितेत लेखणीला कोणते बळ मिळावे व लेखणीने भविष्यात काय व्हावे , याचे सुरेख वर्णन कवी करतांना दिसतात,
भक्तीचा भाव व्हावी
लेखणी माझी
स्वप्नातील गाव व्हावी
लेखणी माझी॥

ताळमेळ कवितेतून संसाराच्या बंधनात सहचारिणीची लाभलेली साथ आणि त्यातून आता पर्यंतच्या प्रगतीचा आलेख कवी प्रामुख्याने मांडतो. महाराष्ट्र गीत कवितेतून झाडी पट्ट्यातून बाहेर येऊन व्यापक होतांना कवी दिसतात. जीवन कवितेत कवी सांगून जातो,

तू कर्म काय केले ? जे कल्पिले मनाशी
मिळणार काय आता ती वेळ टळत आहे ॥
झाडीचा महिमा, लेखणी माझी , महाराष्ट्र गीत, विश्वंवंद्य सावित्री , क्रांतिकारक लहूजी साळवे, छत्रपती शिवाजी महाराज, पांथस्थ भीमाचा, मोहराचा हंडा बहिणाबाई या रचनांतून ते आपले भावपूष्प समर्पित करतांना दिसतात.

आयुष्याचा शिल्पकार या कवितेत वडीलाप्रति कृतज्ञता व्यक्त करतांना कवी सांगतात,

सारे आयुष्य झिजवणारा तूच माझा शिल्पकार
हाच तो बाप माझा पडद्यामागील कलाकार॥

तर आजी बद्दल कवी लिहितो,

धन्य हीच माता ।
अशी सर्व गुणी ।
कुळाची स्वामिनी ।
आजी माझी ॥

काव्यसंग्रह शीर्षकाची कविता ‘भूभरी’ या कवितेत स्त्री जन्माची करूण कहाणी कवी सांगून जातो. स्त्रीयांवर होणार्‍या अत्याचाराचे सत्र पिढ्यानपिढ्या अविरत सुरू आहे. आता मात्र स्त्रीयांना स्व- ओळख झाली आहे.

साध्या फुंकरानेच
उमटतील आगडोंबाचे ठसे. .
कोसळू द्या अंगावर कितीही
वादळी वार्‍याच्या सरी
राखेच्या धिगार्‍यातून प्रज्वेल पुन्हा
अस्तित्वशून्य निखार्‍यांतील भूभरी. . . .

पंढरीची वाट या कवीतेत कवी महाराष्ट्राच्या अखंड परंपरेला वंदन करतात. पंढरीचा विठोबा सर्वाठायी बैसला आहे. महाराष्ट्रातला तसेच महाराष्ट्र बाहेर पांडुरंगाचा वारकरी अभिमानाने बुक्का कपाळी मिरवतांना दिसतो आहे. कवीला पांडुरंगात समतेचे तत्वज्ञान देणारा बुद्ध दिसतो आहे. .

पंढरीच्या राया । मूर्ती तुझी शुद्ध ।
पाहिले मी बुद्ध । तुझ्या ठाई ॥
“काही बोलायचे आहे” या कवितेमध्ये समाजातील स्त्री-पुरुष समानतेचा दिंडोरा पिटणाऱ्या बेगडी वृत्तीवर त्यांनी प्रचंड ताशेरे ओढले आहे.
मुले मुली समान मानतात सारे लोक
तरी वंशाच्या दिव्याचे गातात रोज श्लोक
फुलातील कळ्यांना मला आता फुलवायचे आहे स्त्रियांच्या मातृत्वा वर मला काही बोलायचे आहे
वं. राष्ट्रसंतांच्या विचारांना शिरोधार्थ मानून संतविचारांचा वारसा आणि वसा हिरीरीने चालविणाऱ्यांपैकी हे कवी आहेत.
“जगा देऊ दिव्यदृष्टी”ही कविता त्यांच्या मेंदूत जन्माला येते.
रूढी प्रथा परंपरा श्रद्धारुपी समाजात
होऊ डोळस बुद्धीने अंधश्रद्धेवर करू मात
पुस्तकातील माणसे या कवितेत फक्त पुस्तकी किडा होऊन उपयोग नाही. समाजातील अनुभव तुम्हाला पुस्तका व्यतिरिक्त बरेच काही शिकवणारे असते. म्हणून कवीला माणसं वाचण्याचे स्वारस्य उरत नाही.

पण तीही पुस्तकांसारखीच वाटतात
कथा, कहाण्या, नाटकातील पात्रासारखी. . .
मानवी मनाचे उत्कट भाव आणि परिस्थितीजन्य बारकावे रेखाटताना झगडकरांची लेखणी मृगजळाप्रमाणे सैरावैरा धावणाऱ्या मनाच्या आभासी वृत्तीच्या मागे न धावता स्वानूभव कथन करताना बहिणाबाई चौधरी यांच्या ‘ मन वढाय वढाय , उभ्या पिकातलं ढोरं ‘ तर कधी ‘ नको नको मना गुंतू माया जाळी ‘ असी मनाला ताकीद देणाऱ्या तुकारामाची अनुयायी होते .

संत तुकारामाच्या मार्गावर निघालेला हा कवी संताच्या परिसस्पर्शाने तृप्त झालेल्या मानवी मनाचे चैतन्यस्वरूप हेच ईश्वराशी रूप मानून मानवी आयुष्याचे कल्याण करू पाहतो . इतकेच काय तर भवसागर पार करण्यासाठी लागणारा आत्मबोध हा संत संगतीने होतो . ईश्वरीय मूर्त-अमूर्त स्वरूप माणसात शोधणारा कवी अभंगातून व्यक्त होतो .

संगतीने होई । जीवनाचे सार्थ
विरक्तीचा अर्थ। आत्मबोधी ।।
राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, ताराबाई शिंदे आणि इरावती कर्वे यांच्या आचार विचाराने प्रभावित झालेल्या झगडकरांच्या कविता समाजविघातक विषमतेवर प्रखर टिका करतात . पुराणापासून ते आजतागायत स्त्रीत्वाला बंदीस्त करणाऱ्या मतांचे खंडण करताना कसलीही तमा न बाळगता विकृत वृत्तीचे उच्चाटन करण्यासाठी कवी आपले शब्द खर्ची घालतो आहे. आसवांचे आवंढे गिळत न बसता नव्या स्त्री स्वातंत्र्याचे खुलेआम स्वप्न साकरत बलिदान देणाऱ्यांना स्मरून कवी सर्व स्त्रीवर्गाचे प्रतिनिधित्व स्विकारतो. तळागाळातील पिडीतांच्या विचारमंथनातून जन्मलेली ‘ बंदीस्त ‘ कविता स्त्रीच्या अंतस्थ वेदनेच्या घुसमटीचे प्रदर्शन करते.
जन्माची बंदिस्त ।
केले व्यवस्थेने
गुंतली ही मने।
गुलामीत ॥ ( पृ. १०४ )

व्यथेच्या आर्जवातून जन्मलेला भूभरी हा कवितासंग्रह समाजाला निश्चित नवी दिशा देणारा आहे. आपल्या मनातील एक एक ठिणगी शाबूत ठेवण्यासाठी स्वतःच भूभरी होतो आहे कारण ती आजच्या काळाची गरज आहे.

पुस्तकाचे नाव – भूभरी (कवितासंग्रह)
कवीचे नाव – अरूण झगडकर, चंद्रपूर मोबाईल ९४०५२६६९१५
प्रकाशन – समीक्षा पब्लिकेशन
किंमत – १५० रुपये

Related posts

अग्रणी उत्कृष्ठ साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

Dnyneshwari : कर्मापासून अलिप्त अशा आत्म्याला जाणणे !

संसाराचा गाडा…

1 comment

अरूण झगडकर December 4, 2022 at 4:58 PM

धन्यवाद

Reply

Leave a Comment