शिवरायांचे आठवावे रुप ।
शिवरायांचा आठवावा साक्षेप ।
शिवरायांचा आठवावा प्रताप ।
भूमंडळी ।।
आज शासकिय तारखेनुसार शिवाजी महाराज यांची जयंती. त्यानिमित्ताने शिवाजी महाराज यांची स्वराज्य संकल्पना ही आंतरभारतीवर कशी आधारित होती हे मांडण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. कदाचित याला पुरक पुरावे मिळूही शकणार नाहीत. त्यामुळे काही इतिहास तज्ज्ञांना हा विचार रुचनारही नाही. पण भारतीयत्व अन् हिंदवी स्वराज्य या दृष्टीने व भावी पिढीला मार्गदर्शक ठरावे या उद्देशाने या विचाराची मांडणी करत आहोत.राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल Whatsapp – 9011087406
छत्रपती शिवाजी महाराज यांनी सोळाव्या शतकात स्वराज्य उभे केले. यापूर्वी बाराव्या शतकात ज्ञानेश्वरांनी विश्वाच्या कल्याणाची विश्वची माझे घर यातून मांडली होती. मानवतेचा संदेश देणारा हा विचार घेऊन मऱ्हाठीच्या नगरीत त्यांनी ब्रह्मविद्येचा सुकाळ करण्याचा प्रयत्न प्रारंभला होता. साहजिकच याला विरोधही तितकाच तीव्र झाला. पण संत ज्ञानेश्वरांनी सर्वांच्या कल्याणाचा हा विचार रुजविण्यासाठी सर्व जाती धर्मात या बिजाची पेरणी केली. यातूनच मग सावतामाळी, संत गोरा कुंभार, संत नामदेव शिंपी, संत चोखामेळा, संत तुकाराम असे विविध जातीतील संत या भूमीत होऊन गेले. ही विश्वाची कल्पना होती त्यामुळे विश्वभर याचा प्रसार होण्यासाठी कार्य करणे गरजेचे आहे या दृष्टीने प्रयत्न होऊ लागले अन् काही उत्तरेत गेले तर काही दक्षिणेत गेले. अर्थात मराठी उत्तरेतही गेली अन् दक्षिणेतही गेली. विश्वाचा विचार असल्याने त्याला सर्वमान्यताही मिळू लागली.
विश्वाच्या कल्याणाचा विचार राजमुद्रेमध्ये स्पष्ट दिसून येतो.
प्रतिपच्चंद्र लेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता ।।
शाहसूनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।।
याचा अर्थ असा आहे की प्रतिपेदेच्या चंद्रकलेप्रमाणे हळूहळू क्रमाने वाढणारी आणि विश्वाने वंदिलेली शहाजीपुत्र शिवाजी यांची ही मुद्रा सर्वांच्या कल्याणासाठी विलसत आहे.
या स्वराज्य स्थापनेत विश्वाच्या कल्याणाचा विचार आहे. हे मराठी विचार इतर प्रांतातही रुजावेत यासाठीच मग हिंदवी स्वराज्य हा विचार आला. अर्थात भारतातील सर्व भाषांना एकत्रित गुंफण्याचा हा विचार. शहाजी राजांनी यासाठीच चौदा भाषांचा अभ्यास केला होता. यात भेदभावाला थारा न देता मानवेतच्या विचारावर उदात्त आणि आध्यात्मिक तत्त्वाला प्राधान्य देण्यात आले. येथेच आंतरभारतीय संकल्पनेचा विचाराची सुरुवात झाली. हिंदवी यात सर्व जात धर्म पंथ अशा अर्थाने आहे. हिंदी लोकांचे केवळ हिंदूचे नव्हे तर मुसलमान, ख्रिश्चन अशा सर्व भूमिपुत्रांचे हे राज्य होते.
विश्वाच्या कल्याणाचा, मानवतेचा विचार रुजविताना प्रथम स्त्री स्वातंत्र्याचा, स्त्रीमुक्तीचा विचार शहाजीराजे व शिवाजी महाराज यांनी प्रथम अंमलात आणला. यातूनच स्त्री सन्मानासाठी स्त्रियांच्या न्याय हक्काची चळवळ उभी केली. हीच त्यांची पेरणी पुढे स्वराज्याचे भरघोस पिक घेऊन उभी राहीली. हिंदवी स्वराज्यात भारतीयत्वावर अधिक भर दिला गेला. आता हे भारतीयत्व पुन्हा उभे करून विश्वाच्या कल्याण्यासाठी कार्य सुरु व्हावे यासाठी विश्वची माझे घर हा विचार रुजावा यासाठी हा प्रयत्न.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.