‘सतीश काळसेकर काव्य पुरस्कार’ ज्येष्ठ कवी नारायण कुलकर्णी-कवठेकर (अकोला) यांना, तर ‘ऋत्विज काळसेकर काव्य पुरस्कार’ कवी वर्जेश ईश्वरलाल सोळंकी (वसई, मुंबई) यांना जाहीर
कोल्हापूर : येथील शिवाजी विद्यापीठाने यावर्षीचा ‘सतीश काळसेकर काव्य पुरस्कार’ ज्येष्ठ कवी नारायण कुलकर्णी-कवठेकर (अकोला) यांना, तर ‘ऋत्विज काळसेकर काव्य पुरस्कार’ कवी वर्जेश ईश्वरलाल सोळंकी (वसई, मुंबई) यांना जाहीर केला आहे. या पुरस्कारांची निवड कुलगुरु डॉ. डी. टी . शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त समितीने केली आहे. या निवड समितीमध्ये डॉ. रणधीर शिंदे, प्रा. प्रविण बांदेकर, डॉ. गोविंद काजरेकर यांचा समावेश आहे.
मराठीतील ज्येष्ठ कवी, लेखक आणि ग्रंथप्रेमी सतीश काळसेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ काळसेकर कुटुंबीयांनी विद्यापीठाकडे देणगी दिली. त्यातून काळसेकर यांच्या नावाने प्रतिवर्षी मराठी कवितेत आपले योगदान देणाऱ्या ज्येष्ठ कवीस ‘सतीश काळसेकर काव्य पुरस्कार’ आणि तरुण कवीस ऋत्विज काळसेकर यांच्या नावाने पुरस्कार देण्याची इच्छा व्यक्त केली होती. यंदा पुरस्काराचे दुसरे वर्ष आहे.
सतीश काळसेकर काव्य पुरस्काराचे स्वरुप सन्मानचिन्ह आणि २१ हजार रुपये असे आहे. यंदा या पुरस्काराने ज्येष्ठ कवी नारायण कुलकर्णी-कवठेकर यांना गौरविण्यात येणार आहे. ते संपादक म्हणूनही मराठी साहित्य क्षेत्राला परिचित आहेत. त्यांचे हे माझ्या गवताच्या पात्या’, ‘मागील पानावरून सुरू’ अनुवादित कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. ‘हस्व आणि दीर्घ’ ललितलेख संग्रह प्रकाशित आहे. मानवतावादी जाणिवा, माणसाच्या जगण्यातले विविध पातळीवरील संघर्ष, जगण्याचा अंतर्बाह्य शोध त्यांनी कवितेतून घेतला आहे.
कवी ऋत्विज काळसेकर काव्य पुरस्काराचे स्वरुप सन्मानचिन्ह आणि १० हजार रुपये असे आहे. या पुरस्काराने यंदा कवी वर्जेश सोळंकी यांना सन्मानित केले जाणार आहे. त्यांचा पहिला कवितासंग्रह ‘वर्जेश ईश्वरलाल सोळंकीच्या कविता’ सन २००२ मध्ये प्रकाशित झाला. त्यानंतर ‘ततपप’ कवितासंग्रह प्रकाशित झाला. बदलता भवताल, व्यवस्थेच्या दाबाने दबलेला माणूस आणि स्थिती त्यांच्या कवितांमधून दिसते.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.