कृष्णात खोत यांच्या रिंगाण या कादंबरीत झालेल्या चर्चा सत्रात आसाराम लोमटे, प्रा. प्रवीण बांदेकर, संपत देसाई आणि स्वतः कृष्णात खोत यांनी मते मांडले. त्याची मते ऐकण्यासाठी ऑडिओवर क्लिक करा…
कोल्हापूर – कृष्णात खोत हे शेती समूहाचे चित्रण करणारे समर्थ कादंबरीकार आहेत. असे प्रतिपादन लेखक आसाराम लोमटे यांनी केले.
शिवाजी विद्यापीठातील मराठी विभाग आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या निमित्त ‘रिंगाण’ चे विविध परिप्रेक्ष्य’ या एकदिवसीय चर्चासत्रात बीजभाषक म्हणून ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, आजच्या ऱ्हासशील समाज आणि राजकारणाचे चित्र कृष्णात खोत यांनी मांडले. तसेच निसर्ग आणि माणूस यांच्यातील विविध संबंधाचा शोध खोत आपल्या लेखनातून घेतात.
या चर्चासत्राचे अध्यक्ष शिवाजी विद्यापीठाचे सन्मानिय कुलगुरू प्रा. (डॉ.) डी. टी. शिर्के आपल्या मनोगतात म्हणाले की, खोत यांच्या रिंगाण कादंबरीला अनेक आयाम आहे. ग्रामीण जीवनातील वास्तव खोत यांनी लेखनातून मांडले. त्यामुळे त्यांचे लेखन सर्वश्रेष्ठ ठरते. लेखक कृष्णात खोत यांनी आपल्या मनोगतात कादंबरीच्या निर्मिती प्रक्रिया आणि लेखकाची भूमिका सांगितली. तसेच लेखकाने मूल्यदृष्टी घेऊन मांडणी केली पाहिजे, असे मत व्यक्त केले.
चर्चासत्रातील पहिल्या सत्रात ‘रिंगाण ची अवाहकता’ या विषयाच्या अनुषंगाने प्रा. प्रवीण बांदेकर यांनी मांडणी केली. ते म्हणाले की, रिंगाण ही कादंबरी वैश्विक होण्याची शक्यता असणारी कादंबरी आहे. ही कादंबरी माणसाच्या आदिमत्वाचा शोध घेते तसेच वाचकाला विचार करायला लावते हेच या कादंबरीचे श्रेठत्व आहे. चर्चासत्राच्या दुसऱ्या सत्रात ‘रिंगाण विस्थापितांचा आवाज’ या विषयाच्या अनुषंगाने मा. संपत देसाई यांनी मांडणी केली. ते म्हणाले की, रिंगाण ही कादंबरी विस्थापितांचे जगणं अधिक सजगपणे मांडते. तसेच माणूस आणि निसर्गाचे तुटलेपण कादंबरी चित्रित करते.
चर्चासत्राचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख प्रा.(डॉ.) नंदकुमार मोरे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा.(डॉ.) रणधीर शिंदे यांनी केला. सूत्रसंचालन सुस्मिता खुटाळे तर आभार राजेश पाटील यांनी मानले. या चर्चासत्रासाठी लेखक यशवंत गायकवाड, किरण गुरव, डॉ. प्रभंजन माने, डॉ.अक्षय सरवदे, शिवाजी विद्यापीठ संलग्नीत महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी, शिवाजी विद्यापीठातील विविध विभागातील प्राध्यापक, विद्यार्थी, तसेच संशोधक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.