April 19, 2024
Find Proper Place for Mental Development through Mediation
Home » मानसिक विकासासाठी योग्य ठिकाण शोधायलाच हवे
विश्वाचे आर्त

मानसिक विकासासाठी योग्य ठिकाण शोधायलाच हवे

कितीही मोठे शहर असले तरी त्याच्या मध्यवर्ती ठिकाणी देवालय, शिवालय किंवा मठ हे असतेच. नगरांची रचना करताना पूर्वीच्याकाळी तशी उपाययोजना केली जात होती. विस्कटलेली मने येथे घडवली जात होती. गावांमध्येही मंदिरामध्ये तंटे, वादविवाद सोडविले जात होते. अशी ठिकाणे ही मने जोडणारी असतात.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

मोबाईल – 9011087406

परि अवश्यक पांडवा । ऐसा ठावो जोडावा ।
तेथ निगूढ मठ होआवा । कां शिवालय ।।१७९।। ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा

ओवीचा अर्थ – परंतु, अर्जुना असले स्थान जरूर शोधून ठेवावे. त्या ठिकाणी सहज दृष्टीस न पडणारा एखादा मठ अथवा शंकराचे देऊळ असावें.

सद्गुरू कोणत्याही साधनाने लाभत नाहीत. पण जे निष्कामभावानें, साम्यबुद्धीने सद्गुरूंची प्रार्थना करतात. आत्मज्ञान लाभावे अशी इच्छा करतात, त्यांना सद्गुरूंच्या इच्छेने या आत्मज्ञानाचा लाभ होतो. सध्या वाढत्या शहरीकरणात साधना, ध्यान-धारणा करण्यासाठी योग्य ठिकाणे सापडणे कठीण झाले आहे. पण ही ठिकाणे शोधली तर सहज सापडतात. पुणे शहराच्या गजबजलेल्या मध्यवर्ती ठिकाणीही अशी ठिकाणे आहेत. जंगली महाराज रोड हा सदैव गजबजलेला. गोंगाट असणारा रस्ता. पण या रस्त्यावरच जंगली महाराजांचा मठ आहे. रस्त्यावर गाड्यांचा गोगाट असला तरी मठामध्ये शांतता आहे. झाडीमध्ये असणारे हे ठिकाण गारवा देणारे, मनाला शीतलता, प्रसन्नता देणारे असे आहे. शेजारीच पाताळेश्वर मंदीर आहे. या दगडी मंदिरात साधनेसाठी उत्तम वातावरण आहे.

धकाधकीच्या या जीवनात अशी ठिकाणे निश्चितच मनाला प्रसन्नता देणारी आहेत. मठ किंवा शिवालय हे अध्यात्माची पाठशालाच आहे. येथे आत्मज्ञानाच्या विकासासाठी आवश्यक वातावरण असते. मठामध्ये समाधी अवस्थेत सद्गुरुंचे नित्य वास्तव्य असते. यासाठी अशा ठिकाणी नित्य साधना करावी. कितीही मोठे शहर असले तरी त्याच्या मध्यवर्ती ठिकाणी देवालय, शिवालय किंवा मठ हे असतेच. नगरांची रचना करताना पूर्वीच्याकाळी तशी उपाययोजना केली जात होती. विस्कटलेली मने येथे घडवली जात होती.

मंदिर दिसले तरी दोन मिनिटे थांबून नमस्कार केला जायचा. पण आता थांबायलाही वेळ नाही. मग नमस्कार कधी करणार अशी स्थिती झाली आहे. मठ, मंदिर, शिवालयाचे उद्देश टिकवायला हवेत. मने जोडणारी, प्रसन्नता वाढवणारी ही ठिकाणे आहेत याचा विचार करून त्यानुसार तेथे आचरण हे ठेवायला हवे. सध्या अनेक संस्था ध्यान धारणेसाठी विकसित होत आहेत. दहा दिवस, तीन दिवस साधना करण्याची संधी तेथे उपलब्ध करून दिली जात आहे. पण तेथे जाण्यासाठी आपणाला आपला वेळ काढावा लागतो हा वेळच आपल्याकडे नाही. इतके आपण व्यस्त झालो आहोत. पण आपल्या मानसिक आरोग्यासाठी, मानसिक विकासासाठी, मनशांतीसाठी ही ठिकाणे आवश्यक आहेत. हे विचारात घ्यायला हवे यासाठी ती शोधून त्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न आपण जरूर करायला हवा.

Related posts

सो ऽ हम भाव म्हणजे काय ?

विज्ञान दृष्टीची गरज

दमसाचे ग्रंथ पुरस्कार जाहीर

Leave a Comment