गेल्या दहा वर्षांत देवेंद्र यांनी राज्यात काही ठरावीक नेत्यांची असणारी मक्तेदारी संपुष्टात आणली. राजकारणातील घराणेशाहीवरही प्रहार केले. काँग्रेस व राष्ट्रवादीतील अनेक दिग्गजांना भाजपच्या दिशेने येण्यास भाग पाडले आणि एकाच वेळी पवार आणि ठाकरे यांना आव्हान निर्माण केले.
डॉ. सुकृत खांडेकर
दि. ५ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५.३० वाजता अथांग जनसागराच्या साक्षीने मुंबईतील ऐतिहासिक आझाद मैदानावर महायुतीच्या नव्या सरकारचा शपथविधी सोहळा शानदारपणे संपन्न झाला. देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस यांनी राज्याचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून आणि एकनाथ गंगुबाई संभाजीराव शिंदे व अजित आशाताई अनंतराव पवार या दोन्ही नेत्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा तसेच डझनभर केंद्रीयमंत्री, भाजपच्या विविध राज्यांचे मुख्यमंत्री, राजकारणी, सिनेसृष्टीतील व कॉर्पोरेट क्षेत्रातील नामवंतांच्या उपस्थितीत दृष्ट लागण्यासारखा हा सोहळा देशातील कोट्यवधी जनतेने चित्रवाणीच्या पडद्यावरून पाहिला.
देशातील अन्य राज्यांच्या मुख्यमंत्र्यांपेक्षा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाला जे विशेष महत्त्व आणि करिष्मा आहे त्याची तुलना अन्य राज्यांशी होऊच शकत नाही. देशाची आर्थिक राजधानी महाराष्ट्रात आहे, देशाचे ग्लॅमर असणारे बॉलिवूड महाराष्ट्रातच आहे. देशातील सर्व नामवंत दिग्गज राजकारण्याची, उद्योगपतींची नि सेलिब्रेटींची निवासस्थाने याच मुंबापुरीत आहेत. देशाची सर्वात मोठी आर्थिक उलाढाल व सर्वात मोठे आर्थिक व्यवहार याच राज्यातून होत असतात. अशा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेण्याचे भाग्य देवेंद्र फडणवीस या भाजपाच्या एकमेव नेत्याला लाभले आहे.
सन २०१४ मध्ये देशात मोदी लाटेने मोठा चमत्कार घडवला. केंद्रात जशी भाजपची सत्ता आली तसे महाराष्ट्रातही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. सलग पाच वर्षे मुख्यमंत्रीपदाचा काळ पूर्ण केलेले फडणवीस हे वसंतराव नाईक यांच्यानंतरचे राज्यात दुसरे मुख्यमंत्री ठरले. २०१९ च्या निवडणुकीत देवेंद्र यांनी, मी पुन्हा येईन, अशी घोषणा दिली होती. पण नियतीच्या मनात वेगळेच होते. २०१९ ला भाजप-शिवसेना युतीला सरकार स्थापनेचा जनादेश मिळाला होता. भाजपचे सर्वाधिक १०५ आमदार निवडून आले होते. पण उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर घरोबा केला आणि सर्वाधिक आमदार असूनही भाजपला मुख्यमंत्रीपदाने
हुलकावणी दिली.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत विरोधी पक्षनेता म्हणून भूमिका बजावली. रोज सरकारला धडकी भरवणारी त्यांनी भाषणे केली. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख व दुसरे मंत्री नवाब मलिक यांच्यावर काय पाळी आली हे सर्व महाराष्ट्राने पाहिले आहेच. सचिन वाझे हे कुठे आहेत हे वेगळे सांगायची गरज नाही. विरोधी पक्षांत असताना देवेंद्र हे एकीकडे महाआघाडी सरकारच्या अकार्यक्षमतेचे ते वाभाडे काढत होते व दुसरीकडे कुटनिती यशस्वी राबवून ठाकरे सरकार कसे अस्थिर केले, ते उद्धव यांना समजलेच नाही.
जून २०२२ मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी चाळीस आमदारांसह बंडाचा झेंडा फडकवला व भाजप श्रेष्ठींनी शिंदे यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ घातली. तेव्हाही देवेंद्र यांची मुख्यमंत्रीपदाची संधी हुकली. खरे तर देवेंद्र यांना शिंदे यांच्या सरकारमध्ये जाण्याची इच्छा नव्हती. पण अमित शहा आणि नड्डांचा फोन येताच त्यांना पक्षाच्या आदेशाचे पालन करावे लागले.
पाच वर्षे मुख्यमंत्रीपदावर राहिलेल्या देवेंद्र यांनी एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये इच्छा नसतानाही उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले. तेव्हा विरोधी पक्षाने त्यांच्यावर यथेच्छ टीकाटीप्पणीही केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा व राज्याचे चार वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या शरद पवारांनी, मुख्यमंत्रीपदावर राहिलेल्या व्यक्तीने उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणे यात चुकीचे काही नाही, असे तेव्हा भाष्य केले. मात्र उपमुख्यमंत्रीपदावर राहिलेली व्यक्ती पुढे कधी मुख्यमंत्री झाली नाही अशीही त्याला पुष्टी जोडली. राज्यात नाशिकराव तिरपुडे, रामराव आदिक, छगन भुजबळ, विजयसिंह मोहिते-पाटील, आर. आर. पाटील असे अनेक उपमुख्यमंत्री होऊन गेले, पण ते पुढे कधी मुख्यमंत्री झाले नाहीत हे वास्तव आहे. पण देवेंद्र यांनी पवारांचे भाष्य खोटे ठरवले व एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमध्ये अडीच वर्षे उपमुख्यमंत्री म्हणून काम केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी राज्याचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून ५ डिसेंबरला शपथ घेतली.
उपमुख्यमंत्री म्हणून काम करीत असतानाही, विरोधी पक्षांतील नेत्यांनी फडणवीसांची, मी पुन्हा येईल या घोषणेवरून भरपूर टवाळी केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने तर फौजदाराचा हवालदार झाला, अशा शब्दांत फडणवीसांची खिल्ली उडवली होती. पण देवेंद्र यांनी सर्व सहन केले. आपला संयम सोडला नाही. मी पुन्हा येईल ही घोषणा त्यांनी दि. ५ डिसेंबर २०२४ ला सत्यात उतरवून दाखवली. आज भाजपाकडे १३२ आमदार आहेत. शिवाय ५ आमदारांचे समर्थन आहे. गेली पाच वर्षे देवेंद्र यांनी बराच त्याग केला, खूप काही सहन केले. मतदारांचा जनादेश व मोदी-शहांचा आशीर्वाद ही देवेंद्र यांची मोठी जमेची बाजू ठरली.
सन २०१९ च्या विधानसभा निकालानंतर ठाकरे व फडणवीस यांच्यात संवाद होत नव्हता हे आता उघड होत आहे. सन २०१४ ते २०१९ या पाच वर्षांच्या काळात देवेंद्र हे मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांचा सन्मान करीत होते. त्यांच्या शब्दाचा आदर करीत होते. मुंबई महापालिका निवडणुकीनंतरही महापौरपद भाजपने खुल्या दिल्याने शिवसेनेला दिले. मग २०१९ च्या विधानसभा निकालानंतर ठाकरे यांनी फडणीसांचे फोन घेणेही थांबवले होते हे गूढ होते. देवेंद्र यांनी त्यांना अनेकदा फोन केला पण नंतर करा, मग करा, अशी उत्तरे दिली जात होती. ठाकरे आपला फोनही घेण्याचे टाळतात हे लक्षात आल्यापासून फडणवीस दुखावले गेले व नंतर कटुता वाढत गेली.
सन २०१९ मध्ये विधानसभा निकालानंतर शरद पवारांनी ठाकरेंना आपल्याकडे खेचून भाजपला सरकार बनवू दिले नव्हते. २०२२ मध्ये शिवसेनेत भाजपच्या महाशक्तीने बंड घडवून ठाकरे यांचे सरकारच सत्तेवरून उलथवून टाकले. २०२३ मध्ये महाशक्तीने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हाच प्रयोग केला व अजित पवारांनी त्यांच्या काकांनाच जय महाराष्ट्र केला. आता २०२४ मध्ये भाजपचे सलग तिसऱ्यांदा सर्वाधिक आमदार विजयी झाले. सरकारमध्ये जाण्यासाठी आढेवेढे घेणाऱ्या एकनाथ शिंदे यांनाही देवेंद्र यांनी उपमुख्यमंत्रीपदासाठी राजी केले. गेल्या दहा वर्षांत देवेंद्र यांनी राज्यात काही ठरावीक नेत्यांची असणारी मक्तेदारी संपुष्टात आणली. राजकारणातील घराणेशाहीवरही प्रहार केले. काँग्रेस व राष्ट्रवादीतील अनेक दिग्गजांना भाजपच्या दिशेने येण्यास भाग पाडले आणि एकाच वेळी पवार आणि ठाकरे यांना आव्हान निर्माण केले.
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात राजकीय संघर्ष टोकाला गेला आहे. २०१९ च्या निवडणुकीत अमित शहा यांनी मातोश्रीवर येऊन आपल्याला अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद देण्याचे आश्वासन दिले होते, असे ठाकरे यांनी अनेकदा जाहीरपणे सांगितले. पण अशी चर्चा झालीच नाही असे स्वत: अमित शहा व देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर उत्तर दिले. भाजपकडून शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद मिळत नाही, हे लक्षात येताच ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या वळचणीला गेले व ते स्वत:च मुख्यमंत्री झाले. पण पक्षात झालेल्या बंडानंतर अडीच वर्षांतच त्यांना सत्तेवरून पायउतार व्हावे लागले.
ठाकरे यांनी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात देवेंद्र यांनाच आपल्या हल्ल्याचे टार्गेट केले होते. ते म्हणाले – मला व आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी देवेंद्र यांनी डाव आखला होता. मी हे सर्व सहन करून उभा आहे. आता एक तर तू राहशील किंवा मी राहीन… गीतेमधेही हेच सांगितले आहे. अर्जुनाने पाहिलं की, त्याच्या समोर त्याचे नातेवाईक उभे आहेत. तेव्हा त्यालाही यातना झाल्या होत्या. मग मला यातना होत नसतील का?
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर त्यांना पत्रकारांनी त्यांच्या विरोधकांची आठवण करून दिली तेव्हा ते म्हणाले – महाराष्ट्रात राजकीय संवाद संपलेला नाही. अनेक राज्यांत दोन पक्ष व नेत्यांमध्ये विसंवाद असतो की, जणू खून के प्यासे असं बघायला मिळतं. महाराष्ट्रात तशी परिस्थिती कधीच नव्हती व पुढेही राहू नये, हा माझा प्रयत्न असेल. महाराष्ट्राची राजकीय परंपरा जपत विरोधकांशी शत्रुत्व नसेल… राजकारणात तेही राहतील व मीही राहीन…
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.