मुळात वृद्धाश्रम हे ज्यांचे करणारे कुणी मुले नाहीत त्यांच्यासाठी आहेत. दुर्दैवाने तिथे ज्यांना अनेक मुले मुली आहेत असे लोकही तिथे आहेत.. प्रत्येक वेळी पैसा सगळे काही नसतो. पैसा लागतोच पण काही ठिकाणी माणूस पण हवाच. पैसा स्वतः काही करू शकत नाही. माणूस पैशाच्या मदतीने ते करू शकतो.
सुनेत्रा विजय जोशी,
रत्नागिरी
पितृपक्ष.. पितृपंधरवडा…या पंधरा दिवसात दिवंगत व्यक्तीचे स्मरण आणि त्यांचे आवडीचे पदार्थ करून बाहेर ठेवतात. तसेच घरात मंत्रोच्चारण करून श्राद्ध पक्ष वगैरे त्या त्या तिथीला अनेक जण करतात. हे चांगलेच आहे. पण आजकाल मुळी प्रत्येक जुन्या पद्धती किंवा रितीरिवाज कसे चुकीचे आहेत ते म्हणण्याची जणू काही फॅशनच आहे. कुठलाही सण आला की त्यावर ताशेरे ओढायचे आणि काहीतरी वेगळे सगळीकडे पोस्ट करायचे. मुळात ज्यांचा विश्वास असेल त्यांना तसे करू द्या ना ? तुमचा नसेल तर तुम्ही नका करू..
हल्ली अनाथाश्रमात किंवा वृद्धाश्रमात देणगी दिली की झाले असे बरेच जण मानतात. त्यात गैर काहीच नाही. तिथे राहणार्या लोकांना मदत कराच. पण ती तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी पण करू शकता. किंवा इतर वेळी सुद्धा. त्यासाठी पितृपंधरवडा कशाला ? उलट तो पैसा आणि वेळ खर्च करून घरात काही विधी का करू नयेत.
कुठेही खर्च करतांना पैशाचा विचार आपण करत नाही. पण भटजींनी दक्षिणा सांगितली की देण्याचे का जिवावर येते ? का तो खर्च अनाठायी वाटतो ? आणि जेव्हा दानधर्म करतो ती गोष्ट श्राद्धाला पर्याय म्हणून करतो. पण पर्याय हा पर्याय असतो मूळ गोष्ट न करण्याचा. पण अशक्य असेल तेव्हा पर्याय निवडतात. आपल्या मनाला येईल तेव्हा नाही. पण आपण नेमके आपल्या सोयीनुसार ते वापरत असतो. जसे की ती व्यक्ती आईसमान आहे असे म्हणतो म्हणजे ती आई होत नाही. आणि व्यस्त जीवन हे नेहमीच असते तरी त्यातून सुट्टी घेऊन फिरायला आपण जातोच ना ? मग एक सुट्टी त्या आई किंवा वडिलांसाठी देऊच शकतो ना ? आणि ती पण वर्षातून एकदाच. असो हे ज्यांचे त्याचे मत आहे.
मुळात वृद्धाश्रम हे ज्यांचे करणारे कुणी मुले नाहीत त्यांच्यासाठी आहेत. दुर्दैवाने तिथे ज्यांना अनेक मुले मुली आहेत असे लोकही तिथे आहेत.. प्रत्येक वेळी पैसा सगळे काही नसतो. पैसा लागतोच पण काही ठिकाणी माणूस पण हवाच. पैसा स्वतः काही करू शकत नाही. माणूस पैशाच्या मदतीने ते करू शकतो. कधी तिथे जाणे पण महत्वाचे आहे.खरेतर जर आईवडीलांची जिवंतपणी कदर केली तर ते गेल्यावर काही नाही केलेत तरी चालेल. फक्त प्रत्येक वेळी त्यांची मनापासून आठवण ठेवा.
पूर्वापार आलेले रितीरिवाज पाळण्यात काहीच कमीपणा नाही. हो आमच्या घरी असे करतात असे सांगितले की कुणी काही म्हणत नाही . पण ते करण्यात खूप जणांना कमीपणा वाटतो. मग कुठेतरी आईवडीलांच्या नावाने दानधर्म आपले नाव देऊन मोठेपणा मिरवायचा असतो. अर्थात काहीच न करण्यापेक्षा हे ही नसे थोडके. शेवटी व्यक्ती तितकी मते. पटले नाही तर सोडून द्यावे. जिवंतपणीच जर त्यांचा पक्ष घेतलात तर पितृपक्षाची गरजच राहणार नाही. पण या दिवसात त्यांच्या आठवणी त्यांनी दिलेली शिकवण आणि त्यांच्या मुळे प्राप्त झालेले आजचे दिवस याचे स्मरण ठेवणे हीच खरी श्रद्धांजली…
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
1 comment
सुविजो ताई,
मी पितृपक्षात धार्मिक स्थळी जातो कारण आपल्या बरोबर पितरांना पण आमच्या पुण्याईतला हिस्सा घेण्याचा अधिकार आहे,
कारण आज जे काही आमच्याकडे आहे ते पूर्वजांच्या पण्याईनेच आलेले आहे.
पण काळाबरोबर वय वर्षे 40 असलेल्या पिढीनंतर पुढची पिढी त्यांच्यावर घरी संस्कारांचा कार्यक्रम केला गेला नसल्याने महाजालधर्मी बनले आहेत,
आणि त्यांचे दहन संस्कार पण ऑनलाईन अग्नीपुत्रच करेल अशी स्थिती येणार आहे..
दुख:वाटते पण,
कालाय तस्मै नमः