राजर्षी शाहू महाराजांनी अनेक सामाजिक सभांमधून आणि परिषदांच्या माध्यमातून व्यासपीठावर अध्यक्ष किंवा प्रमुख पाहुण्यांच्या भूमिकेतून सामान्यांच्या जागृतीसाठी भाषणे दिली. त्या भाषणांना शाहू महाराजांच्या चरित्रामध्ये अतिशय मोलाचे स्थान मानावे लागते. कारण हेच एकमेव साधन असे आहे की, ज्यातून राजर्षीसारख्या युगकर्त्या समाजसुधारकाच्या समाजक्रांतीच्या विचाराचे आपल्याला मूळ गवसते. त्यामुळे राजर्षीच्या जीवनावरील एखादा ग्रंथ लिहितांना किंवा लेख लिहितांना लेखकाला त्यांच्या मूळ भाषणांचा आधार घेतल्याशिवाय पुढे जाताच येणार नाही इतकी ती भाषणे प्रभावी आणि मोलाची आहेत.
डॉ. अनंता सूर
१९२० साली राजर्षी शाहू महाराजांच्या कारकीर्दीत जैनेन्द्र प्रिंटिंग प्रेसने ‘श्रीमन्महाराज शाहू छत्रपती सरकार करवीर यांची भाषणे’ या नावाने १२ भाषणे छापली होती. परंतु काळाच्या ओघात दिवसेंदिवस ही भाषणे मिळणेच दुर्मिळ होऊन बसले. याशिवाय १९२० नंतर राजर्षीनी आणखी काही भाषणे वेगवेगळ्या ठिकाणी दिली. ही भाषणे मराठीत असली तरी प्रसंगानुसार काही भाषणे इंग्रजीतूनही त्यांनी दिली होती. ह्या समग्र भाषणाचा परिश्रमपूर्वक शोध पुढे कोल्हापूरचे शाहू चरित्राचे अभ्यासक प्रा. श्याम येडेकर आणि भगवानराव बापूसाहेब जाधव यांनी घेतला. या दोघांनी ही भाषणे १९७१ साली स्वतंत्रपणे संपादीत करून प्रकाशित करण्याचे मोलाचे काम केले. याचा खरा फायदा ज्यावेळी महाराष्ट्र शासनाने १९७४ साली ‘राजर्षी शाहू गौरव ग्रंथ’ प्रकाशित केला त्यावेळी अनेक लेखकांना लेख लिहितांना या ग्रंथातील संदर्भ अथवा उतारे घेण्यासाठी करता आला. राजर्षी शाहू महाराजांची सर्व भाषणे मी ‘राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ’ या जयसिंगराव पवार यांच्या संपादीत ग्रंथातून घेतलेली आहेत.
लगेच १९७४ साली मराठीचे ख्यातनाम प्राध्यापक डॉ. एस. एस. भोसले यांनी राजर्षीची ही भाषणे संपादीत स्वरुपामध्ये मराठी व इंग्रजी अशी स्वतंत्रपणे दोन्ही भाषांमध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आश्रयाखाली प्रकाशित केली होती. आता या गोष्टीलाही ४५-४६ वर्षांचा काळ लोटला आहे. प्रा. भोसले यांच्या ग्रंथाला प्रामाण्य मानून ही भाषणे या संपादीत पुस्तकामध्ये समाविष्ट केलेली आहेत. यातील भाषणाला जी शिर्षके दिलेली आहेत ती त्या भाषणातील भावार्थ, आवाका आणि वेगळेपणा लक्षात घेऊनच योजलेली आहेत.
राजर्षीनी ज्या अनेक सामाजिक संघटनांच्या व्यासपीठावरुन ही भाषणे दिली, त्या संघटनांची नावे नजरेसमोर ठेवली तरी त्यांच्या भाषणांचे सामाजिक कल्याणाच्या दृष्टीने असलेले महत्त्व लक्षात येते. उदा. १) अखिल भारतीय मराठा परिषद, खामगाव २) कामगार मेळावा-परळ, मुंबई ३) आर्यधर्म परिषद-नवसारी, गुजरात ४) अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय सामाजिक परिषद – कानपूर, उत्तरप्रदेश ५) अस्पृश्य वर्गाची परिषद – माणगांव, कोल्हापूर ६) श्री उदाजी मराठा विद्यार्थी, नाशिक ८) अखिल वसतिगृह, नाशिक. ७) सोमवंशीय समाज अधिवेशन, नागपूर ९) कर्नाटक ब्राह्मणेत्तर सामाजिक भारतीय बहिष्कृत समाज परिषद, हुबळी १०) अखिल भारतीय अस्पृश्य परिषद, दिल्ली. या सर्व ठिकाणी जी राजर्षींनी भाषणे दिली त्यामध्ये शोषीत-पिडितांचे सामाजिक विषय, समस्या आणि उपाय या सगळ्या गोष्टींचा उहापोह करणारे पुरोगामी विचार मांडले.
या ठिकठिकाणच्या भाषणांच्या माध्यमातून राजर्षीनी अस्पृश्यता व जातिभेदाचा प्रश्न, मागासलेल्या समाजाचा उद्धार, समाजातील वर्णव्यवस्था, समानतेचे तत्त्वज्ञान, बौद्धिक स्वातंत्र्य, सामाजिक नितीमत्ता, इंग्रजी शिक्षण, विद्येचा महिमा, विधवा विवाह, पडदा पद्धती, महात्मा फुले, आर्यसमाज, महात्मा गांधी, व्यापार-धंदे, आरक्षण, कृषीकर्म, शेतकरी, मजूर संघ, कारखानदारी, सहकारी तत्त्वांसारख्या अनेक सामाजिक, धार्मिक, राजकीय व आर्थिक विषयांना हात घातला. सामान्य रुपाने जनतेमध्ये राहून त्यांच्या सामाजिक वेदनेशी एकरूप होणारा कल्याणकारी राजा या देशाच्या इतिहासात सापडणे कठीण आहे. या दृष्टिकोनातून राजर्षीच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकण्याचा हा प्रयत्न आहे. निदान या निमित्ताने का होईना वाचकांना त्यांची भाषणे आणि कर्तृत्वाची जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही.
या संपादीत ग्रंथामध्ये समाविष्ट केलेली राजर्षी शाहू महाराजांची १६ भाषणे ही प्रामुख्याने ३ मार्च १९१६ ते २६ फेब्रुवारी १९२२ या प्रामुख्याने सहा वर्षातील आहेत. काही ठिकाणी राजर्षी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गेले तर काही ठिकाणी त्यांनी प्रमुख पाहुणे म्हणून भूमिका बजावली. मात्र त्याच्या प्रत्येक भुमिकेमध्ये मानव, समाज आणि राष्ट्राच्या विकासाची सुत्रेच गवसतात. ब्राह्मणवादाचा कडाडून विरोध करतांनाच सर्व जाती आणि धर्माच्या लोकांना स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे यासाठी त्यांची धडपड दिसते. वेदांनी सामान्य माणसाच्या जगण्याचे हनन केल्याने ब्राह्मण वगळता क्षत्रिय, वैश्य आणि शूद्रांच्या वाट्याला अपमानित जगणे आले याची राजर्षींना जाणीव होती. म्हणूनच कोल्हापूरसारख्या संस्थानाचे ते राजे असूनही आपल्या प्रत्येक भाषणाच्या प्रारंभी ते जनतेपुढे ‘मी तुमचा दास आहे, सेवक आहे, मी आपला गुलाम आहे’ अशा शब्दात नम्रपणाची भूमिका घेऊन जनतेला आपला फायदा करुन घेण्याचे आवाहन करतात. त्यामुळेच जनतेने शाहूंना मनोभावे स्वीकारलेले दिसते.
मानव कल्याण आणि सकस समाजनिर्मितीसाठी आपले राजसिंहासन पणाला लावून समाजपरिवर्तनाचे काम शाहूंनी केले. प्रजाहितासाठी त्यांनी राजा म्हणून आपले व्यक्तिमत्व बाजूला ठेवून समाजातील प्रत्येकाला समान दर्जा देऊन जातीअंताचे धोरण स्वीकारले. याचाच एक परिपाक म्हणून शाहूंनी मागासलेल्या जातीजमातीतील मुलांना व किलीची सनद बहाल करुन राज्यकारभारामध्ये समाविष्ट करुन घेतले. बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हे ब्रीद प्रत्यक्षपणे राबवून शाहूंनी सामाजिक समतेपासून उद्योग उभारणीपर्यंत, स्त्री उद्धारापासून कृषि क्रांतीपर्यंत अशा अनेक क्षेत्रात अतुलनीय योगदान दिले. या त्यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकल्यास ३ एप्रिल १८९४ ते ६ मे १९२२ या २८ वर्षांच्या त्यांच्या राज्यकारभाराची कारकीर्द इतिहासाला कलाटणी देणारी ठरली हे नाकारता येत नाही.
वयाच्या विसाव्या वर्षी ब्राह्मण आणि ब्राह्मण्यवादी विचारसरणीने ग्रासलेल्या अत्यंत बिकट परिस्थितीत शाहूंनी राज्यसूत्रे हाती घेतली. सामान्य जनतेची सर्वांगीण प्रगती साधण्यासाठी राज्यकारभार केला. शिक्षण, प्रशासन, कला, क्रीडा, शेती, उद्योग, आरोग्य यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये आमुलाग्र बदल त्यांनी घडवून आणले. त्यामुळे तत्कालीन भारतात असलेल्या ७०० संस्थानिकांत शाहूंनी केलेली क्रांती आज देशाला त्याच नियमावर व कायद्यावर पुढे जाण्यासाठी दिशादर्शक ठरते. खरे तर त्यांची भाषणे महात्मा फुलेंच्या परिवर्तनवादी विचारांची साक्ष देणारी आहेत आणि शाहू महाराजांच्या निधनानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जे दलितोद्धाराचे कार्य केले त्या कार्याचा वैचारिक वारसा मोठ्या प्रमाणात शाहूच्या कार्याशी मिळतांना दिसतो. एक राजा असूनसुद्धा सामान्य माणसाप्रमाणे वागून जनकल्याणाशी एकरूप होत जगणारे शाहूंचे व्यक्तिमत्त्व आहे. त्यामुळे शाहूंच्या जीवनसंघर्षाशी पार्श्वभूमी आणि त्यांनी भाषणातून वेळोवेळी मांडलेल्या तर्कशुद्ध भूमिका समजून घेण्यासाठी हे पुस्तक मोलाची भूमिका अदा करेल याची मला शाश्वती आहे.
आधुनिक युगात महात्मा फुल्यांच्या नंतर माणसामाणसांमध्ये घडून येणारा अस्पृश्यतेचा कलंक धुवून काढण्याचे काम लोककल्याणकारी राजा छत्रपती शाहू महाराज यांनी केले. या महाराष्ट्राच्या मातीत पुरोगामी विचारांचा वारसा जोपासणारे युगपुरूष कित्येक वर्षापासून जन्माला येत आहेत. परंतु एक राजा आजुबाजुला इंग्रजांचे साम्राज्य असतांना आपल्या जनतेच्या हाती परिवर्तनाची, उजेडाची आणि वैचारिक गुलामगिरीतून मुक्त होण्याची विचाररूपी मशाल देतो तो म्हणजेच छत्रपती शाहू होय. माणूस हाच आपल्या कार्याचा मध्यबिंदू मानून जात, वंश, संप्रदायासारख्या कृत्रिम आधारावर माणसामाणसांमध्ये भेद करणाऱ्या व्यवस्थेचा त्यांनी कडाडून विरोध केला. इतकेच नव्हे तर एक राजा जेव्हा जनतेमध्ये समाजसुधारकासारख्या प्रसिद्धीच्या झोतात येत आहे, हे लक्षात येताच इंग्रजांनी त्यांच्यावर दडपण आणण्याची भाषा वापरली. त्यावेळी “तुम्ही मला गादीवरुन काढण्याची भाषा कशाला वापरता ? तशी वेळ येण्यापूर्वीच मी स्वतः होऊन राजीनामा देईन. पण बहुजन समाजाच्या उद्धाराचे जे पवित्र कार्य मी हाती घेतले आहे. ते मात्र प्राणांतीही सोडणार नाही. अशा स्पष्ट शब्दातून करारीपणे, निर्भिडपणे आपल्या जीवनाची भूमिका मांडणारा राजर्षी शाहू महाराजांसारखा परोपकारी राजा इतिहासात शोधूनही सापडणार नाही. आपण जनतेचे गुलाम आणि दास आहोत त्यामुळे जनतेने माझ्याकडून आपला उद्धार करून घ्यावा, ही त्याच्या जगण्यातील मध्यवर्ती कल्पना होती. त्यामुळे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी जनतेचे दास म्हणून अलौकिक असे योगदान दिल्याचे जाणवते.
२६ जून १८७४ रोजी कागलच्या घाटगे घराण्यात राजर्षी शाहूंचा जन्म झाला. बालपणीचे नाव यशवंतराव. १८८४ साली कोल्हापूरच्या घराण्यात दत्तक म्हणून ‘शाहू छत्रपती’ हे नाव धारण करुन आले. २ एप्रिल १८९४ रोजी कोल्हापूरच्या गादीवर म्हणजेच स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या गादीवर त्यांचे राज्यारोहण झाले. राज्यकारभाराची सर्व सूत्रे हाती घेताच त्यांना दरबारच्या नोकऱ्यांमध्ये आणि खाजगी खात्याच्या नोकऱ्यांमध्येही मोठी तफावत आढळून आली. शाहूंना ही गोष्ट खटकली आणि तिथून ब्राह्मणी व्यवस्थेशी संघर्षमय प्रवास सुरु झाला. आज शाहूंची जी ‘समतावादी लोकराजा’ म्हणून प्रतिमा आपल्यापुढे दिसते त्यामागे त्यांचा फार मोठा त्याग दिसतो. त्यामुळेच डॉ. जयसिंगराव पवार यांनी, महाराष्ट्रातील बहुजन समाजाच्या उद्धाराची चळवळ महात्मा फुले यांच्यापासून सुरू होते. या चळवळीची स्थूलमानाने फुलेपर्व, शाहूपर्व आणि आंबेडकरपर्व अशी विभागणी करता येईल.
आज अनेकदा असे दिसून येत की, महाराष्ट्रात सामाजिक चळवळी चालवणारे काही कार्यकर्ते व विचारवंत बहुजनांच्या उद्धाराचा विचार मांडत असता फक्त फुले-आंबेडकरांच्याच कार्याचा निर्देश करतात. शाहू महाराजांच्या कार्याची उपेक्षा केली जाते. वस्तुतः महात्मा फुले यांच्या निधनानंतर महाराजांचे कार्य सुरु झाले आणि त्यांच्या अस्ताच्या वेळी डॉ.आंबेडकरांचा उदय घडून आला. हिंदुस्थानच्या तत्कालीन राजकारणात जसे टिळकपर्वाचा अस्त होऊन गांधीपर्व सुरु झाले, तसे महाराष्ट्राच्या राजकारणात शाहूपर्वाचा अस्त होऊन आंबेडकर पर्व सुरु झाले. अशा शब्दात आधुनिक महाराष्ट्राची जी जडणघडण मांडली आहे. त्यामागील पार्श्वभूमीसुद्धा समजून घ्यावी लागते. जिथे महात्मा फुलेंचे युग संपतेव(१८९०) आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे युग सुरु होते. (१९२३) यामधील महत्त्वाच्या कालखंडात (१८९१-१९२२) राजर्षी शाहू महाराजासारख्या तेजस्वी तारा नव्या विचारांच्या रूपाने महाराष्ट्रात वावरत होता. केवळ बाबासाहेबच नव्हे तर पुढे कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. पंजाबराव देशमुख यांसारखे शिक्षणमहर्षी त्यांच्या भाषणे आणि विचारांमधून घडले. रयत आणि शिवाजी शिक्षण संस्था पुढे उदयास आल्या. याला प्रामुख्याने शाहूंची भाषणेच कारणीभूत ठरली.
छत्रपती शाहू महाराज राजा असूनही एखाद्या फकीराप्रमाणे वागणारे कल्याणकारी असे विचारवंतदेखील होते. त्यामुळे फकीरी भोगाच्या पार्श्वभूमीवर त्यांचा वैचारिक योग पाहून त्या युगाचा इतिहासदेखील स्तंभित झाला. ते एक क्रांतीनिष्ठ राज्यकर्ते होते. ज्या परिस्थितीमध्ये ते राजा होऊन सिंहासनावर आरूढ झाले ती परिस्थितीच मुळात अतिशय भीषण आणि प्रतिकूल स्वरूपाची होती. कोल्हापूरचे राज्य त्यावेळेपर्यंत एका खिळखिळ्या, कमजोर आणि ढिल्या तसेच सुस्तावलेल्या कारकिर्दीने गाजलेले होते. त्यामुळे कोल्हापूरचा राजकीय कारभारातील प्रतिनिधीच (Political Agent) स्वतःला कोल्हापूरचा राजा मानत होता. राजाच्या सन्मानाची वैभवशाली परंपरा हा पोलिटिकल एजंट पायदळी तुडविण्यामध्येच धन्यता मानीत होता. तर दुसरीकडे ब्रिटीश अधिकाऱ्यांना आपल्या पदाचा माज चढला होता. त्याप्रमाणे सर्वसामान्य प्रजा अतिशय उपेक्षित आणि व्याकुळ झाली होती. अशा चौफेर अंधारमय, भितीदायक आणि घातकी परिस्थितीला काबूत आणून ती जनकल्याणासाठी वळविणे हे डोंगर फोडून काढण्यासारखेच महाकठीण काम होते. अशा या गुंतागुंतीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शाहू महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. त्यामुळे सिंहासनावर येताच आर्थिक अनागोंदी, उधळपट्टी आणि अज्ञान दूर करणे हे आपले सर्वप्रथम कर्तव्य मानले. यासाठी पहिल्यांदा ‘प्रशासन मंडळ’च रद्द करून टाकले. आपल्या मनातील भावना त्यांनी जनतेसमोर मांडल्या. १६ एप्रिल १९२० रोजी नाशिक येथे ‘निराश्रित सोमवंशीय समाजाची सभा भरली होती. या सभेतील भाषणात त्यांनी, “श्री शिवछत्रपतीच्या नावाला किंवा त्यांच्या गादीला बट्टा लागेल असे नीच वर्तन माझ्याकडून होणार नाही. राज्याधिकारसूत्रे हाती आल्यानंतर मागासलेल्या जातींना वर आणण्याचे मी अनेक प्रयत्न केले. परंतु यावरुन ब्राह्मणाचे ठिकाणी माझा द्वेषभाव आहे, असे मात्र मुळीच नाही. अनेक ब्राह्मण माझ्या पूर्ण विश्वासाचे अंमलदार व सल्लागार आहेत. अनेक ब्राह्मणांना मी इनामे वगैरे दिलेली आहेत व इतर जातींप्रमाणे त्यांच्या कल्याणकारी इच्छा बाळगलेली आहे. या सर्व गोष्टी माझे ब्राह्मण प्रजाजनच या विद्वान एडिटरांना सांगतील. सारांश, अशक्त मुलाला ताकद आणण्यासाठी, त्याची आई त्याची जशी काळजी बाळगते त्याचप्रमाणे माझे हे प्रयत्न आहेत. अशा स्वरूपात आपल्या जीवनातील उद्दिष्ट राजर्षीनी स्पष्ट करुन दाखविले. जाती, धर्म, पंथ आणि भाषेच्या आधारावर मानवामानवांमध्ये भेदभाव न करता सर्व जातीधर्मांना समान न्याय आणि अधिकार आत्मसात करता यावे यासाठी त्यांची प्रामाणिकपणे धडपड होती.
शाहूच्या मनात ब्राह्मणेतरांविषयी आस्था निर्माण होण्यामागे एक महत्त्वाचे कोणते कारण असेल तर ब्राह्मण वर्ग त्यांच्यावर करीत असलेले अत्याचार हे होय. त्या बदलाची जबाबदारी त्यांचीच होती. जहालवाद्यांनी होमरूल चळवळीत सक्रिय भाग घेण्यास सुरुवात केल्यामुळे ब्राह्मणेत्तर चळवळीकडे झुकण्याबाबत शाहू महाराजांनी अधिक सावधगिरी बाळगून अतिशय विचारपुर्वक अशी पाबले टाकलेली दिसतात. होमरुल चळवळीस बाळ गंगाधर टिळकांनी मोठ्या हिरीरिने आपला पाठिंबा दिलेला होता. त्यांच्याप्रमाणेच मद्रासस्थित डॉ. अॅनी बेझंट यांची थिऑसॉफिकल सोसायटीही त्या चळवळीच्या पाठीमागे होती. शाहू महाराजांच्या दृष्टीने देशातील जहालवादी राजकारण म्हणजे निव्वळ ब्राह्मणी राजकारणच होते. त्यांची इच्छा होती की, त्यांच्या विरोधात केवळ एक समाज उभा राहून भागणार नाही तर त्यासाठी इतरही समाज पुढे येण्याची गरज आहे. शाहूंची धारणा हीच होती की, जोपर्यंत हिंदूच्या धार्मिक पुजाअर्चा ब्राह्मणांशिवाय पार पाडूच शकत नाही, असे इतर जातींना वाटते तोपर्यंत एकूण समाजावर असलेला ब्राह्मणांचा प्रभाव कधीही कमी होणार नाही. यावरुन आपल्याला स्पष्टपणे कळून येते की, शाहू महाराज हे भूत व भविष्याचा अचूक व सखोल वेध घेऊ शकत होते. या दोहोंबद्दलची त्यांची जाण कौतुकास्पद होती.
शाहू महाराजांना कल्पना होती. त्यामुळे जातीभेद तसाच राखून जे ब्राह्मण पुढारी समाजसुधारणा करु पाहतात, त्यांच्याकडून समाजात एक प्रकारची ‘धार्मिक ब्युराक्रसी’ निर्माण होईल याची त्यांना जाणीव होती. त्यामुळे समाजसुधारणा घडवून आणायची असेल तर जातीभेद मोडून आपण सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे, असे मत मांडले. या संदर्भात प्रमुख पाहुणे म्हणून दि. १५ एप्रिल १९२० रोजी नाशिक येथे श्री उदाजीराव मराठा विद्यार्थी वसतिगृहाच्या इमारतीच्या पायाभरणीप्रसंगी ते “सर्व जातींच्या पुढाऱ्यांना माझे सांगणे आहे की, आपली दृष्टी दूरवर ठेवा. पायापुरतेच पाहू नका. जातिभेद मोडणे इष्ट आहे. जरूर आहे. जातीभेद पाळणे हे पाप आहे. देशोन्नतीच्या मार्गात हा अडथळा आहे. हा दूर करण्याचे प्रयत्न जोराने केले पाहिजेत. ही जाणीव पक्की ध्यानात ठेवून मग ह्या दिशेचा प्रयत्न म्हणून जातीपरिषदा भरवा. जातीबंधन दृढ करणे, जातीभेद तीव्र होणे, हा परिणाम ह्या परिषदांचा होऊ नये, ही खबरदारी घेतली पाहिजे.”३ असा परिणामसूचक सल्ला देतात. जातीपरिषदा भरविण्याचा उद्देश हा जातीजातींमध्ये द्वेषभाव निर्माण करणे हा नसून सर्व जातीधर्माच्या माणसांना माणूसकीच्या झेंड्याखाली एकत्र आणणे हा असायला हवा. त्यामुळे माणूस, समाज आणि देशही सुधारेल. परंतु त्यासाठी ‘जातीभेद मोडा आणि माणसं जोडा’ हे तंत्र अवगत करण्याची गरज त्यावेळच्या परिस्थितीनूसार शाहूंना महत्त्वाची वाटत होती, असे दिसून येते.
शाहूंचे गुरू, मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान सर स्टुअर्ट मिटफोर्ड फ्रेझर हे ३१ डिसेंबर १९१९ ला आपल्या भारतातील प्रदीर्घ सेवेतून निवृत्त होणार होते. भारत सोडण्यापुर्वी त्यांनी कोल्हापूरला भेट देण्याची व त्यांच्या शिष्याने (राजर्षी शाहू महाराज) आपल्या संस्थानाची केलेली प्रगती, राज्यकारभार लोकाभिमुख करण्यासाठी सुरू केलेल्या कारभाराच्या नवीन पद्धती पाहण्याची इच्छा व्यक्त केली. त्याप्रमाणे ३ फेब्रुवारी १९२० रोजी दिलेल्या कोल्हापूर संस्थानाच्या भेटीनंतर शाहू राजांच्या गौरवादाखल ते म्हणतात, “आतापर्यंत कोणत्याही संस्थानिकाने आपल्या प्रजेतील प्रत्येक वर्गाला जातपात न पाहता इतक्या उदार अंत:करणाने वागविले नसेल. ते स्वत:ला उच्चवर्णियांचे तसेच दलितांचे, मुसलमानांचे व ख्रिश्चनांचे हिंदूसारखेच पिता समजतात.” यातही शाहूंचा समानतावादी दृष्टिकोन दिसतो. हजारो वर्षे ग्रासणाऱ्या गुलामगिरीचे मूळ जातीभेदात असून हिंदुस्थानला त्याचा नायनाट झाल्याशिवाय आपल्या समाजाची खरी उन्नती होणार नाही, यांची शाहू महाराजांनी अनेक भटक्या समाजांना जवळ करुन त्यांच्यातील गुणवानांना संधी दिली. वडार हा अशापैकीच एक भटका समाज होय. या समाजातील इराप्पा नावाच्या व्यक्तीस महाराजांनी पाहिले. तो एकटाच दगडाच्या खाणीतून मोठमोठे दगड काढून गाडी भरत होता आणि आपल्या आडमाप ताकदीने गाडी ओढत होता. रेड्यालाही ओढता येणार नाही अशी गाडी ओढत असतांना इराप्पाला त्यांनी पाहिले. तो त्यांच्या चांगलाच लक्षात राहिला. काही दिवसांनी कोल्हापुरात पंजाबी पैलवान आले. बलदंड शरीराचे उंचेपुरे पंजाबी पैलवान हत्तीसारखे दिसत. त्यांनी महाराजांकडे येऊन आपल्या लढतीस जोड मागितला. तेव्हा अचानक शाहू महाराजांना इराप्पाची आठवण झाली. त्यांनी इराप्पाला बोलावून घेतले आणि पंजाबी पैलवानातील सर्वात मोठ्या पैलवानाबरोबर कुस्ती करण्यास सांगितले. खरे तर इराप्पा हा काही पैलवान नव्हता. त्याला कुस्तीतले डावपेच वगैरे काहीच माहीत नव्हते. परंतु महाराजांची आज्ञा होताच तो तयार झाला. आणि आश्चर्य म्हणजे इराप्पाने आपल्या अचाट ताकदीने त्या पंजाबी पैलवानास उचलून गरगर फिरवले आणि दाणकन् जमिनीवर आपटले. महाराज त्यावर खूश झाले आणि, ” इराप्पा, मोठी कामगिरी केलीस ! काय मागायचे ते माग !” म्हणताच त्याने महाराजांना एक बकरं आणि मॉटबर दारू मागितली. तेव्हा महाराजांनी, “अरे इराप्पा, राजाकडं मागून मागून काय मागितलंस ! बकर आणि दारू? ते तर देतोच रे, पण त्याशिवाय काही तरी माग की !” तेव्हा इराप्पा म्हणाला, “महाराज, आमच्या जातीला दगड काढायला खाणी द्या.” त्यावेळी महाराजांनी आनंदाने वडार समाजाला खाणीसाठी जागा उपलब्ध करून दिली. इराप्पाचं मन भरुन आलं.
शाहू महाराजांनी शंभर वर्षापुर्वी महाराष्ट्रातील अशा भटक्या विमुक्त जा ‘माणूस’ पाहिला. या माणसातील स्वावलंबन आणि स्वाभिमान जागृत करुन त्याला समाजातील जगण्याच्या मुख्य प्रवाहात आणून उभे केले. ही गोष्ट आजच्या भटक्या-विमुक्त जातींना कृतज्ञतेची व अभिमानाची वाटल्यास यात नवल नाही. आजच्या आपल्या लोकाभिमुख राज्य करणाऱ्या सरकारने आणि प्रतिष्ठीत समाजाने महाराजांच्या या कार्यातून बरेच काही शिकण्यासारखे आहे. संस्थानाबाहेर बडोदा, ग्वाल्हेर, इंदूर इत्यादी ठिकाणी महाराज ज्यावेळी राजे-राजवाड्यांना भेटायला जायचे त्यावेळी आपल्याबरोबर विश्वासू म्हणून फासेपारध्यांनाही घेऊन जात असत. राजाराम महाराजांच्या विवाहप्रसंगी शाहू महाराजांनी जे वऱ्हाड बडोद्यास नेले त्यात निरनिराळ्या समाजाचे जसे लोक व पैलवान होते तसेच फासेपारधीही होते. आपल्या युवराजाच्या वऱ्हाडात कोरवी, फासेपारधी यासारख्या अत्यंत उपेक्षित समाजातील लोकांना नेऊन त्यांची ‘माणूस’ म्हणून प्राणप्रतिष्ठा करणारा राजा जगाच्या इतिहासात शोधूनही सापडणार नाही.
१९ एप्रिल १९१९ रोजी उत्तर प्रदेशातील कानपूर येथे अखिल भारतीय कुरमी क्षत्रियांची १३वी सामाजिक परिषद भरली होती. याच परिषदेत महाराजांना ‘राजर्षी’ ही मानाची पदवी देण्यात आली आणि त्यांचा सन्मान करण्यात आला. या परिषदेच्या अध्यक्षपदावरून बोलतांना त्यांनी हिंदू समाजांतर्गत वर्णजातीव्यवस्थेची समाजशास्त्रीय व ऐतिहासिक अशा स्वरूपाची मांडणी केली. सद्यस्थितीत विद्येद्वारे आत्मोन्नती करण्यासंदर्भात ते म्हणतात, “युरोपात शेतकरी लोक प्रतिष्ठित समजले जातात. तेथील शेतकरी राज्यातील उच्च दर्जाच्या नोकरीवर आहेत. तसेच तिकडे शिल्पकलेमधील लोकांची प्रतिष्ठा मोठी आहे. जो आज चांभार अथवा भंगी आहे त्यास नीच असे म्हणण्याचे साहस कोणाच्याही अंगी नाही. याचे कारण असे आहे की, शिल्पकला सर्वस्वी त्यांच्याच हातात असते. येथील लोक निर्धन व अज्ञानी असल्यामुळे इथल्या शिल्पकलेची सुधारणा कशी होईल? सुशिक्षित बी. ए., एम. ए. झालेले लोक हे काम अशा भीतीपोटी घेत नाहीत की, आम्हाला शूद्र म्हणतील, आम्हाला नीच समजतील. अशाने देशात ऐश्वर्य कसे वाढेल? ऐश्वर्याशिवाय देशाची उन्नती कशी होईल?” व्यक्तीने आपल्या अंगी असलेली कला विकसित करावी. ती विकसित करतांना कोणत्याही प्रकारची लाज बाळगू नये, ही महाराजांची अपेक्षा होती. सर्व जातीधर्माची माणसे एकसमान आहेत. कोणी उच्च नाही की नीच नाही, हे तत्त्वज्ञान उराशी बाळगून शेतकरी आणि कलावंत प्रगतीशील व्हावे, ही महाराजांची रास्त अपेक्षा होती.
मनुस्मृतीनुसार स्त्रीशूद्रांना गुलामगिरीचे जीवन भारतात जगावे लागले. शूद्र दलितांसाठी शाहू राजांनी जसा शिक्षणाचा प्रसार आणि नोकऱ्यांमध्ये राखीव जागा देऊन न्याय दिला त्याप्रमाणे स्त्रीशिक्षणासाठी त्यांनी खंबीर पावले उचलली. स्वत:च्या राजघराण्यापासून त्याचा त्यांनी प्रारंभ केला. त्यांचे द्वितीय पुत्र प्रिन्स शिवाजी याचे अपघाती निधन झाल्यामुळे त्यांना जबरदस्त धक्का बसला. स्वतःच्या दुःखापेक्षाही आपल्या तरूण विधवा सुनेचे अर्थात इंदुमती राणीसाहेबांचे दुःख त्यांना असह्य झाले. त्यांना शिक्षण देण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यावेळी खुद्द राजवाड्यातूनच या गोष्टीस विरोध करणे सुरू झाले. कारण राजघराण्यातील स्त्रियांनी पडद्याआड राहण्याची प्रथा होती. आणि शिक्षण घ्यायचे म्हटले तर ही प्रथा मोडावी लागणार म्हणून हा विरोध होता. शिवाय राजघराण्यातील स्त्रियांनी शिकून काय करायचे? हा परंपरागत विचारही त्यामागे होता..
शाहू महाराज मात्र आपल्या निश्चयापासून तसूभरही मागे हटले नाही. उलट खास शिक्षकांची नेमणूक करुन राजवाड्यावर इंदुमती देवीचे शिक्षण त्यांनी सुरु केले. राज्यामध्येही स्त्रियांच्या शिक्षणासाठी खास सोयीसवलती त्यांनी जाहीर केल्या… मागासवर्गीय स्त्रियांच्या शिक्षणाची व निवासाची मोफत सोय केली. महाराणी लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कुलमध्ये राज्यातल्या आणि बाहेरच्या विद्यार्थीनींसाठीही खास शिष्यवृत्त्या दिल्या. स्त्रीशिक्षणाधिकारी या पदावर शाहूंनी खास मिस. एच. लिटल यांची नेमणूक केली. कृष्णाबाई केळकर यांना मुंबईस ग्रँट मेडिकल कॉलेजला पाठवून पुढे शिष्यवृत्ती देऊन विलायतेत धाडले. डब्लिनमधील उच्च वैद्यकिय शिक्षण घेऊन त्या १९०३ साली परत आल्या आणि समाजसेवेचे व्रत स्वीकारले. कोल्हापुरात आलबर्ट हॉस्पिटलमध्ये १९२४ पर्यंत त्या सेवारत होत्या.
आपल्या प्रजेबद्दल आणि समाजाबद्दल शाहू महाराजांना कळकळ होती. त्यामुळे लोकांचे कल्याण झाले पाहिजे, हेच त्यांच्या राज्यकारभाराचे अविभाज्य अंग बनले होते. शोषित, दलित समाजाच्या गरजांच्या यज्ञात आपल्यासोबत आपल्या कुटूंबातील लोकांच्या आशाआकांक्षांची आहुती देणे हा त्यांचा एकप्रकारे स्वभावधर्मच बनला होता. राजर्षी शाहूंच्या अंगी निपजत असलेली ही परोपकारी भावना पाहून खरोखरच अंगावर करुणामय संवेदनेचे रोमांच उभे राहते. कितीतरी ब्राह्मण आणि इंग्रज लोकांकडून झालेल्या व्यक्तिगत टिकांना त्यांना सामोरे जावे लागले. इंग्रज सरकार आतल्या आत त्यांच्याविषयी असमाधानी होते. इतर देशीय राजांचा त्यांच्या लोकप्रियतेकडे पाहून जळफळाट होत होता. याशिवाय तत्कालीन ब्राह्मणांची कटकारस्थाने, कौटुंबिक कुरबुरी, पुत्राच्या अकाली निधनाचे दुःख लोकमान्य टिळकांशी चाललेली खटलेबाजी, शेतकरी समाजाच्या बिकट समस्या, दलितोद्धारासाठीची उत्कटता या साऱ्यांशी ते एकाचवेळी निकराने लढत होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आर्थिक पाठबळ देऊन इंग्लंडला शिक्षण पूर्ण करण्यासाठी शाहू महाराजांनीच प्रेरित केले. त्यामुळे बाबासाहेब नेहमीच पत्राद्वारे त्यांच्या संपर्कात राहत. एकप्रकारे ते बाबासाहेबांच्या रूपाने भारतातील शोषितांच्या, दलितांच्या उद्धारकाची, उत्कर्षकर्त्याची निर्मिती करीत होते. त्यामुळेच १६ फेब्रुवारी १९२२ रोजी दिल्ली येथे झालेल्या अखिल भारतीय अस्पृश्यता परिषदेच्या तिसऱ्या अधिवेशनात प्रमुख पाहुणे म्हणून शाहू महाराज गेले. त्यावेळी अस्पृश्यांनी आपल्या उन्नतीसाठी कोणते आदर्श आणि भूमिका घ्याव्या यावर चिंतन मांडले. त्यात ते म्हणतात, “आपण, आपल्या एकाच पूर्वापार धंद्याला चिकटून न राहाता शिक्षण घेतले पाहिजे. आपण फौजेत तसेच कचेऱ्यात मोठमोठ्या जागा पटकाविल्या पाहिजे. तसेच वकील, बॅरिस्टर, डॉक्टर, व्यापारी वगैरे स्वतंत्र धंद्यात प्रवीणता मिळवून आपली उन्नती करुन घेतली पाहिजे… आपण आपले पुढारी भीमराव आंबेडकर यांचे उदाहरण डोळ्यापुढे ठेऊन त्याप्रमाणे होण्याचा प्रयत्न करावा. मी आपला गुलाम आहे, मी आपला दास आहे. माझ्याकडून आपण सेवा करून घ्यावी, हीच माझी विनंती आहे.”” एका राज्याचा राजा असूनही अस्पृश्यांच्या उद्धाराबद्दल त्यांच्या मनात असलेली पराकोटीची तळमळ प्रत्ययाला येते. स्वभावातील नम्रता आणि स्वत:ला गुलाम, दास ही बिरूदे लावून बाबासाहेबांचा आदर्श निर्माण करण्याचा सल्ला देणारे शाहू नव्या रूपात अनुभवायला मिळतात. देहावरील राजाची वल्कले बाजुला सारुन लोककल्याणकारी राजा होण्याची सार्थ भुमिका त्यांच्या भाषणातून अभिव्यक्त होते.
छत्रपती शाहू महाराजांच्या सामाजिक आणि वैचारिक क्रांतीचे शिक्षण, श्रम, अर्थ आणि समाज हे प्रामुख्याने चार मुलाधार होते. या चारही मुलाधारांचा संबंध सरळसरळ समाजातील पिढ्यानुपिढ्याच्या शोषित आणि दलित समाजव्यवस्थेशी होता. त्यामुळे त्यांचा उद्धार जोपर्यंत घडून येणार नाही तोपर्यंत देश सुखाच्या आणि प्रगतीच्या दिशेने कधीही उत्कर्षमय वाटचाल करू शकत नाही यांची जाणीव त्यांना होती. धर्माच्या आधारावर ही सर्वांगीण शोषणव्यवस्था उभी असल्यामुळे धर्माधिष्ठीत परमेश्वर शाहूंनी नाकारला. आणि ‘परमेश्वराची नव्हे, तर माणसाची पूजा करा. परमेश्वर आमच्याकडून चांगल्या कार्याची अपेक्षा करत असतो. खोट्या स्तुतीची नाही. जर का परमात्मा एकच आहे तर मग त्याला निरनिराळ्या रूपात का व्यक्त करण्यात आले आहे ? भारतीय धर्मग्रंथांमध्ये कितीतरी अनैतिक आणि अश्लील कथांचा भरणा आहे. अशा प्रकारची पुस्तके लिहिणाऱ्यांना फसवणुकीबद्दल शिक्षा केली पाहिजे.’ अशा विचारांचे एक पत्रक त्यांनी लिहिले. माणूस आणि त्याचा सर्वांगीण विकास हे एकमेव ध्येय शाहूंनी आपल्या नजरेसमोर ठेवून अध्यात्माला सडेतोडपणे नाकारण्याची स्पष्ट भूमिका घेतली. हे नाकारणे जाणिवपूर्वक नव्हते तर त्यामागे आपला समाज धार्मिक गुलामगिरीतून मुक्त झाला पाहिजे, ही एक प्रांजळपणाची प्रामाणिक भूमिका त्यामागे शाहूंची होती.
महात्मा ज्योतीराव फुले यांचे तत्त्वज्ञान शाहू महाराजांच्या मेंदूतील अणुरेणूमध्ये खोलवर सळसळत होते. अशिक्षितांसाठी शिक्षण, उपेक्षितांचे संरक्षण, सामाजिक आणि आर्थिक समता हीच महात्मा फुलेंची विचारतत्त्वे होती. याच प्रमुख तत्त्वानुसार शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये नवनवीन शिक्षण संस्था सुरु केल्या. समाजातील उच्चनिचतेचा भेदभाव मुळापासून उपटून काढण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला. वाटेल त्या परिस्थितीत जाती आणि वर्णव्यवस्था संपविण्यासाठी शाहू महाराज अतिशय उत्सुक आणि व्याकुळ झालेले होते. म्हणूनच त्यांनी महात्मा फुल्यांच्या ‘सत्यशोधक समाज’ या संस्थेचे पुनरुज्जीवन करून तिचा विकास केला आणि ११ जानेवारी १९११ रोजी कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून प्रामुख्याने परमेश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी कुठल्याही दलालाची, पुजाऱ्याची अथवा महंताची गरज नाही तसेच सगळे मानव हे एकाच परमात्म्याची लेकरे आहेत. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा भेदाभेद पाळणे हा गुन्हा आहे. या दोन गोष्टींवर विशेष भर देण्यात आला. याचेच प्रतीक म्हणजे एक राजा असूनदेखील आपल्या कुणबी (कुर्मी) बंधुंना आपले म्हणतांना शाहू महाराजांना जरादेखील कमीपणा न वाटणे हे होय.
शाहूंच्या विलक्षण क्रांतिकारी कार्याचा प्रभाव त्याकाळी इतरांवर इतका प्रचंड पडला की, थोड्या अवधीतच कोल्हापूर संस्थान ब्राह्मणेत्तर चळवळीच्या आदर्शाचे, सिद्धांतांचे एक मार्गदर्शक केंद्रस्थान बनले. आणि त्यांची बीजे संपूर्ण दक्षिण भारतात रूजायला लागली. सर्व जातीधर्माला त्यांनी उचलून धरले. त्यामुळेच मराठीतील सुप्रसिद्ध कवी कुसुमाग्रजांनी शाहूंच्या थोरवीबाबत, “एक गोष्ट निश्चित की, त्या काळातील बहुसंख्य संस्थानिकांप्रमाणे ते ऐषआरामाच्या कोशात अदृश्य झालेले ‘महाराज’ नव्हते, तर मराठी मातीशी एकरूप झालेले, तिच्या व्यथा-वेदनांची, अपेक्षांची आणि गुणगौरवाची जाण असलेले ते लोकनेते होते. जातीयतेला आणि जातीय वर्चस्वाला त्यांचा प्रखर विरोध होता, पण म्हणून कोणत्याही समाजाचा घाऊक द्वेष करणं त्यांच्या स्वभावात नव्हतं, हे त्यांच्या चरित्रावरुन स्पष्ट होतं. मराठा मल्लांना त्यांनी प्रोत्साहन दिलं, त्याचप्रमाणे पुर्णत: ब्राह्मणी असलेल्या ‘किर्लोस्कर नाटक मंडळी लाही त्यांनी आधार दिला आणि बालगंधर्वांसारख्या गुणी कलावंताच्या पाठीशी ते पालक म्हणून उभे राहिले. त्या काळातही पुरोगामी दृष्टिकोन असणारे, विद्वान आणि लोकाभिमुख असे काही संस्थानिक होते. परंतु पायउतार होऊन लोकात वावरणारे शाहू महाराज हे एकच होते.” अशा प्रखर शब्दात वर्णन केल्याचे दिसते. निराधार कलावंतांना आर्थिकदृष्ट्या आधार देऊन त्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देण्याचे काम शाहूंनी जीवनभर केले. अनेक जातीजमातीतील कलावंतांना आपल्या दरबारी आश्रय दिला.
अस्पृश्योद्धारांची चळवळ यशस्वी करुन दाखविण्यासाठी शाहू महाराजांनी पुढाकार घेतला. याचाच एक भाग म्हणजे समाजातील दलितांना न्याय देण्यासाठी त्यांनी काळाच्याही पुढे जाणाऱ्या नव्या योजना अंमलात आणल्या. शिकलेल्या दलितांपैकी काहींना त्यांनी वकिलीच्या सनदा दिल्या. गणाचार्य (मांग), रामू कारंडे (चांभार), मंडपाळकर (महार), आणि डी. एस. पवार (चांभार) यांना वकिलीच्या सनदा दिल्यामुळे त्यावेळी प्रचंड खळबळ माजली. महाराजांवर ब्राह्मण वर्गीयांकडून टिकाटिप्पणी सुरू झाली. त्यांना उत्तर म्हणून महाराजांनी, “जे धंदे अस्पृश्य वर्गास रूढीने, कायद्याने अगर दडपशाहीने बंद झाले आहेत ते त्यास मोकळे करून द्यावेत आणि त्यांची स्थिती सुधारून त्यांच्यात आपण इतर माणसांसारखे त्यांच्या बरोबरीचे आहोत, असा आत्मविश्वास निर्माण करावा एवढाच माझा हेतू आहे.” असा आशावाद स्पष्ट करून सांगितला. कारण जपानमधल्या सामुराई जातीच्या उच्च वर्गातील लोकांनी आपले विशेषाधिकार सोडले. आम जनतेला वर आणले.. त्यामुळे जपान प्रगतीशील, बलशाली आणि अग्रेसर राष्ट्र बनले. इथल्या ब्राह्मणांनी मात्र तसे न केल्यामुळे, ब्राह्मण-शूद्र यांच्यातील भेदभावाची दरी वाढतच गेली.
शाहू राजांच्या कारकिर्दीत कोल्हापूर संस्थानच्या कृषी-औद्योगिक प्रगतीचा पाया रचला गेला. १९०२ साली खुद्द महाराजांनी युरोपची सफर करून या क्षेत्रातील तिथल्या प्रगतीचे त्यांनी जवळून निरीक्षण केले. आणि भारतात आल्यावर त्यातील अनेक गोष्टी अंमलात आणल्या. नद्यांवरील धरणे आणि पाझर तलाव यांच्या योजना कार्यान्वित केल्या. त्यातील महत्त्वाचे म्हणजे भोगावती नदीवर राधानगरी येथे धरण बांधले. एका लहानशा संस्थानाच्या आर्थिक आवाक्याबाहेरचे हे काम असल्यामुळे त्यासाठी मुंबई सरकारकडून त्यांनी आर्थिक मदत आणि तंत्रज्ञांचे मार्गदर्शन मिळवले. या राधानगरी धरणामुळे भोगावती नदीच्या खोऱ्यातील शेतकऱ्यांच्या शेताला पाणी मिळू लागले. कोल्हापूर शहरालाही पिण्याचे पाणी उपलब्ध होऊ लागले. कृषी-औद्योगिक प्रगतीचे जे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले त्यादृष्टीने यंत्रयुगाशी नाते जोडणारी स्पिनिंग अॅन्ड वेव्हिंग मिल त्यांनी सुरू केली. आर्थिक प्रगतीसाठी सहकारी चळवळींची मुहूर्तमेढ रोवली. आज कोल्हापुरात आणि महाराष्ट्रात सहकारी संस्थांचे जे जाळे पसरलेले दिसते आहे त्याला सुरूवातीच्या काळात प्रेरणा आणि प्रोत्साहन शाहू महाराजांनीच दिल्याचे लक्षात येते.
शाहू महाराजांच्या कारकीर्दीत वेदोक्त प्रकरणाने (१८९९-१९२०) एक नवा अध्याय ब्राह्मण वर्गाच्या रूपाने जन्माला आला. या वेदोक्त प्रकरणाने संपुर्ण महाराष्ट्रच ढवळून निघाला. महाराजांच्या पदरी असणाऱ्या ब्राह्मण पुरोहितांनी महाराजांना ‘शूद्र’ ठरवून त्यांचा वेदोक्त मंत्राचा अधिकार नाकारला. महाराष्ट्रातील ब्राह्मण वर्गाने केलेला हा एक प्रकारचा घणाघात प्रहार होता. महाराजांचे वतनदार उपाध्याय नारायणशास्त्री राजोपाध्ये यांनी, “महाराज, तुम्ही शूद्र आहात. शूद्रांना पुराणोक्त मंत्रच म्हणावयाचे असतात, किंबहुना त्यासाठी आम्हाला स्नान करून शुचिर्भूतही व्हावे लागत नाही.” असे म्हटले आणि हा संघर्ष व्यापक बनला. यावेळी शाहू महाराजांनी धैर्याने पावले उचलली. राजाज्ञेचा भंग केल्याबद्दल प्रमुख राजपुरोहित राजोपाध्ये यांना नोकरीतून बडतर्फ करुन त्यांची वतनेही काढून घेतली. त्यावेळी लगेच राजोपाध्यांनी न्यायालयात धाव घेतली. अपिलावर अपिले केली परंतु शेवटी न्यायालयाचा निकाल शाहू महाराजांच्या बाजुने लागला. न्यायालयातील हे प्रकरण मिटले असले तरी वृत्तपत्रातून ते चालूच राहिले. पुण्यातील केसरीकरांनी राजोपाध्येची बाजू घेऊन शाहूंवर टीकेचा भडीमार केला. त्या ब्राह्मणी वृत्तपत्रांना उत्तरे देण्यासाठी काही वृत्तपत्रे आणि वृत्तपत्रकार पुढे आले. त्यात ‘प्रभात’कार कोठारी, ‘विजयी मराठाकार शिंदे’, ‘प्रबोधन’ कार ठाकरे यांनी शाहूंची वैचारिक बाजू महाराष्ट्रातील जनतेपुढे समर्थपणे मांडण्याचे काम केले.
वेदोक्त प्रकरणाच्या संदर्भामध्ये प्रा.कमलाकर दिक्षितांनी, “वेदोक्त प्रकरण हे शाहू महाराजांच्या कारकीर्दीतील नव्हे तर महाराष्ट्राच्या जीवनातील एक अत्यंत महत्त्वाचे होते. १८९९ साली कार्तिक स्नानाच्या निमित्ताने सुरू झालेले हे प्रकरण १९२० साली क्षात्रजगद्गुरूंच्या प्रतिष्ठापनेने संपले. सुमारे वीस वर्षे चाललेल्या या प्रकरणामुळे महाराष्ट्राचे केवळ धार्मिकच नव्हे तर संपूर्ण सामाजिक जीवन ढवळून निघाले. त्यामुळे जातीभेद नष्ट झाले नसले तरी जातीभेदांची सामाजिक प्रतिष्ठा संपली. ” हे प्रतिपादीत केलेले सत्य आपल्याला स्वीकारावेच लागते. प्रारंभी वेदोक्त प्रकरणातील हा संघर्ष ब्राह्मण व क्षत्रिय यामध्येच होता. नंतर तो ब्राह्मण-ब्राह्मणेत्तर-शूद्र असा बनला व संपूर्ण समाजाला ग्रासून राहिला. त्यामुळे ब्राह्मणेत्तर संघटित झाले. पण ब्राह्मण मात्र विस्कळीत झाले आणि एका अर्थाने समाज निर्ब्राह्मण झाला. यामध्ये राजारामशास्त्री भागवत, नारायणशास्त्री सेवेकरी व कुरूंदवाडचे अधिपती पटवर्धन या तीन प्रमुख ब्राह्मणांनी संपूर्ण ब्राह्मण समाज विरोधात असतांना सुद्धा शाहूची साथ दिली. तर विरोधात नारायणशास्त्री राजोपाध्ये, राजाराम कॉलेजमधील एक प्राध्यापक विजापूरकर आणि भारतातील राजकीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक ही तीन मातब्बर मंडळी होती. वेदोक्त प्रकरणाने शाहू महाराज बदनाम होण्याऐवजी सर्वसामान्य लोकांच्या लौकिकास पात्र ठरले, हे त्यांच्या विरोधकाचे दुर्दैवच म्हणावे लागेल.
शिकारीसारख्या मर्दानी खेळाचे स्वरूप कायम राहावे यासाठी शाहू महाराजांनी कटाक्षाने आग्रह धरला. हाकाऱ्यांनी रान उठवून सावजाला शिकाऱ्याजवळ आणावे आणि शिकाऱ्याने झाडावर उंच सुरक्षित जागी मचाणावर बसून बंदुकीची गोळी झाडून शिकार करावी, ही गोष्ट शाहूंना पसंत नव्हती. ही खरी मर्दानगी नाही म्हणून त्यांनी स्वतः चाल करून ढाण्या वाघांच्या शिकारी केल्या. सोनतळीच्या पन्हाळा- ज्योतिबाच्या जंगलात तेंडवा जातीचा वाघ चुकून आला आणि पाळीव जनावरे खाऊ लागला. तेव्हा महाराज आपली शिकारी कुत्रे सोबत घेऊन गेले. तेंव्याने त्यांनाही लोळवले तसे महाराज स्वतः त्याच्यावर धावून गेले आणि चपळाईने उजव्या हाताने त्याचे नरडे पकडले. श्वास न घेता आल्यामुळे शेवटी तडफडत तेंदवा गतप्राण झाला. वाघाच्या शिकारीप्रमाणेच घोड्यावर स्वार होऊन डुकरांचा पाठलाग करीत भाल्याने शिकार करण्यात ते पटाईत होते. एकदा दाजीपूरच्या जंगलात अस्वल आणि महाराज यांची कुस्ती जुंपली. महाराजांच्या खोड्यातून सुटण्यासाठी अस्वलीने आपली सारी ताकद पणाला लावली. पण त्यांच्या अचाट ताकदीपुढे ती आपली सुटका करून घेऊ शकली नाही. शेवटी जवळून चाललेल्या एका धनगरास बोलावून आपल्या खांद्यावरची बंदुक अस्वलीवर रोखून मारण्यास त्यांनी सांगितले. धनगराने चुकतमाकत बंदुकीचा चाप ओढला. ती धिप्पाड अस्वली जमिनीवर कोसळली आणि शाहूंचे प्राण वाचले. धनगराच्या या कामगिरीवर खुश होऊन शाहू महाराजांनी त्यास एक डोंगरच बक्षिसादाखल दिला.
शाहू महाराजांनी जातवार वसतिगृहे काढून जातीसंस्थेला खतपाणी घातले, अशी काही विरोधक त्यांच्यावर टीका करतात. मात्र यासंदर्भात खरी वस्तुस्थिती अशी दिसते की, प्रारंभी महाराजांनी सर्वजातीय वसतिगृह काढले आणि त्यावर खरे तर ब्राह्मण अधिकारी नेमले होते. परंतु दहा वर्षात तेथे फक्त ब्राह्मण विद्यार्थीच शिकल्याचे आढळून आल्यावर त्यांनी ती कल्पना सोडून दिली आणि जातीजातींचे कार्यकर्ते हुडकून काढून, त्याना मदत व मार्गदर्शन करुन त्यांनी पुढे जातवार वसतिगृहे उघडली. हे कार्य केवळ जातीनिरपेक्ष भावनेने केल्याचेही ते सांगतात. कारण उच्चजातीय लोकांचे निहित स्वार्थ जातीव्यवस्थेत गुंतल्याचे त्यांना जाणवले. अशावेळी जातीनिर्मूलनाची भूमिका अधिक सक्षम करायची असेल तर जातवार वसतिगृहे निर्माण करण्याशिवाय पर्याय नाही, या निर्णयाप्रत शेवटी ते येऊन पोहोचले.
यासंदर्भात न. र. फाटक म्हणतात, “जातवार वसतिगृहे काढणे हे महाराजांच्या वेदांत विचारांशी सुसंगतच होते. आधी आत्मज्ञान व्हावे लागते. त्यानंतरच मोक्ष मिळतो, हे वेदांती सूत्र त्यांना त्यामागे आढळते. तुकारामानेही आत्मज्ञानातून अमंगळ भेदाभेद समूळ नष्ट होतात, असे म्हटले आहे. शिक्षणाच्या संस्कारातून प्रत्येक जातीतील तरूणांचा बुद्धीविकास होईल, आपण कोण आहोत याचे त्यांना ज्ञान होईल आणि जातीजातीतील द्वैत कमी कमी होत जाऊन शेवटी द्वैतशून्य एकजिनसी समाज अस्तित्वात येईल, अशी खुणगाठ त्यांच्या मनात होती.” यामुळेच जातीनिर्मुलनाच्या प्रत्येक प्रयत्नाला शाहू छत्रपतींनी पाठिंबा दिला होता. या दृष्टीने मोठ्या प्रमाणावर आंतरजातीय विवाह घडून येणे हा त्यांना जातीनिर्मूलनाचा सर्वात प्रभावी मार्ग वाटत होता. आंतरजातीय विवाहांना बेकायदेशीर ठरवून अशा दाम्पत्यांच्या अपत्यांचा वारसा हक्क हिरावून घेणारा कायदा त्यामुळेच त्यांना अन्यायकारक वाटत होता. विठ्ठलभाई पटेलांनी मध्यवर्ती कायदेमंडळात आंतरजातीय विवाहांना कायदेशीर ठरवणारे विधेयक जेव्हा मांडले, तेव्हा शाहू छत्रपतींनी त्याला जाहीरपणे पाठिंबा दिला. आपल्या संस्थानात त्यांनी १९१७ साली पुनर्विवाहाचा कायदा करुन हिंदू-जैन आंतरजातीय विवाहांना येणारी धर्मशास्त्राची अडचण दूर केली. एवढेच नव्हे तर अनेक आंतरजातीय विवाह जुळवून आणण्यात स्वतः पुढाकारही घेतला, ही त्यांच्या जातीनिर्मुलनाची एक भक्कम बाजू म्हणता येईल.
आपल्या संस्थानामध्ये शिक्षणाच्या सोयी निर्माण करण्यापुर्वी प्रत्यक्ष वस्तुस्थितीचा सूक्ष्म अभ्यास शाहूंनी केला. हा त्यांचा व्यावहारिक दृष्टीचाच पुरावा म्हणता येईल. विद्यार्थी-विद्यार्थीनींचे वर्ग-जातवार प्रमाण अभ्यासून विद्यार्थी संख्येत कशी वाढ होईल, याच्या योजना त्यांनी आखल्या होत्या. यातूनच मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण, विविध जातींच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृहे, अस्पृश्य कुटूंबातील मुलांसाठी तसेच सर्वच जातींच्या मुलींसाठी खास शाळा असे उपक्रम संस्थानात त्यांनी सुरु केले. त्यामुळेच कोल्हापूर संस्थान हे भारतात वसतिगृहांची जननी म्हणून ओळखले जाऊ लागले. सर्व जाती-धर्माच्या लोकांसाठी त्याग करण्याची भूमिका शाहूंनी आयुष्यभर जोपासली. प्रसंगी शत्रुंसमोर कठोरपणेही वागले.
यासंदर्भात १३ जानेवारी १९४० रोजी कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या कोल्हापूर दलित प्रजा परिषदेच्या अध्यक्षीय भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, “कोल्हापूरसंबंधी एक गोष्ट अगदी निश्चित आहे व या गोष्टीबद्दल अस्पृश्यांना व मला कोल्हापूरचा अभिमान वाटतो. शाहू महाराजांनी कोल्हापूरातच खरी लोकशाहीची मुहूर्तमेढ रोवली ही ती गोष्ट होय. आपण गोब्राह्मणपतीपालक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करीत असतो. शिवछत्रपतींना ब्राह्मण्य नष्ट करता आले नाही. आपल्या राज्यभिषेकासाठी सोने देऊन काशीहून गागाभट्टाला त्यांना आणावे लागले. ब्राह्मण्यांची नांगी तोडण्याबाबतीत शाहू छत्रपती हे शिवरायांपेक्षा श्रेष्ठ होते, असे म्हटल्याशिवाय गत्यंतर नाही… ब्राह्मण्य नष्ट झाल्याशिवाय समाजाची उन्नती होणे नाही. त्यांनी ब्राह्मण्य नष्ट करण्याचा धडाडीने प्रयत्न केला. यातच त्यांची थोरवी आहे. शाहू छत्रपतींनी समाजातील विषमता नष्ट करण्याचा आटोकाट प्रयत्न केला व ब्राह्मण्याचा बालेकिल्ला ढासळून टाकला. ही काही लहान कामगिरी नाही.”” “शिवछत्रपतींनी जे साम्राज्य निर्माण केले त्यापेक्षा ब्राह्मण वर्गांशी दोन हात करतांना धार्मिक आणि सामाजिक पातळीवर राजर्षी शाहूंना कसा लढा द्यावा लागला असेल याची प्रचिती येते. सर्व जातीधर्माच्या लोकांना जवळ करून त्याला माणूस म्हणून स्वयंभू करण्यासाठी राजर्षी धडपडत होते. त्यामुळेच आपल्या दरबारातही मांग-महार- चांभारांच्या सुशिक्षित मुलांना चांगल्या पदावर बसवून मानसन्मान दिल्याचे उदाहरण दुसरे कुठेच सापडत नाही.
शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रांप्रमाणेच सांस्कृतिक क्षेत्रातही राजर्षीनी भरीव कार्य केले. ‘बालगंधर्व’ म्हणून पुढे प्रसिद्धीस आलेले नारायणराव राजहंस यांच्या लहानपणी कानामध्ये दोष होता. त्यासाठी मिरजेच्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी ऑपरेशनची व्यवस्था केली. संगीतसूर्य केशवराव भोसले, गोविंदराव टेंबे यांसारख्या थोर कलावंतांनाही आर्थिक मदत केली. राजदरबारामध्ये अल्लादिया । खाँसारखे प्रसिद्ध गवई बोलावून आणून त्यांना राजाश्रय दिला. ‘महाराष्ट्र कोकिळ शंकरराव सरनाईक, ‘सूरश्री’ केसरबाई केरकर हे कलावंतही महाराजांच्याच प्रोत्साहनामुळे प्रगती करू शकले. आजच्या स्थितीमध्ये महाराष्ट्रात नाटकाच्या दृष्टीने सर्व सोयींनी युक्त म्हणून प्रसिद्ध असलेले असे भव्य ‘पॅलेस थिएटर’ शाह राजांनीच बांधले. या नाट्यगृहात भव्य पडद्यांचे पहिले यशस्वी प्रयोग करणारे आनंदराव पेंटर व बाबुराव पेंटर यांनाही महाराजांनीच प्रोत्साहन दिले. ‘अवलिया चित्रकार आबालाल रहमान यांना चित्रकलेच्या शिक्षणासाठी मदत केल्यामुळेच त्यांची निसर्गचित्रे पुढे विश्वविख्यात ठरली. शाहू राजांच्या प्रोत्साहनामुळे कोल्हापूरचे ‘कलापूर’ बनले. त्यामुळे मराठी नाट्यसंगीत आणि कलाक्षेत्र यावर शाहू राजांचे अनंत उपकार आहेत, असे म्हटल्यास ते अतिशयोक्तीचे ठरणार नाही.
आज कोल्हापुरात पॅलेस थिएटरला लागूनच उभे असलेले प्रचंड कुस्तीच मैदानही शाहू राजांनीच उभे केले. युरोपातील दौऱ्यात रोमच्या भेटीत त्यांनी पाहिलेल्या मैदानांप्रमाणे हे ‘खासबाग मैदान’ दक्षिण, पश्चिम आणि उत्तर बाजूला प्रचंड भराव टाकून उंच बनवलेले आहे. पन्नास हजार प्रेक्षक बसू शकतील, असा निमुळता उतार करुन मध्यभागी कुस्तीचा लाल मातीचा आखाडा केला आहे. अख्ख्या भारतवर्षात हे कुस्तीचे मैदान प्रसिद्ध आहे. आजही कोल्हापुरात गल्लोगल्ली तालमीतून तरूण मंडळी इथे व्यायाम आणि कुस्तीचा सराव करतांना वस्तादांचे मार्गदर्शन घेतात. यामागेदेखील शाहू महाराजांनी एकेकाळी दिलेले प्रोत्साहनच आहे. उत्तरेकडील मल्ल नेहमी दक्षिणेकडील मल्लांना कुस्तीमध्ये पराभूत करीत असत. ही गोष्ट शाहू राजांना बोचली. त्यासाठी त्यांनी भवानी मंडपामागील बाजूस ‘मोतीबाग तालीम’ तयार करून घेतली आणि मराठी मल्लांना प्रोत्साहन दिले. सरकारी खर्चाने त्यांच्या खुराकाची व्यवस्था केली. पंजाबी मल्लांशी मराठी मल्लांच्या झुंजी लावल्या. अनेक मराठी मल्लांनी पंजाबी मल्लांना चितपट केले.
श्री शाहू महाराज हे अलीकडे आपला अंगाबरोबरचा सदरा नेहमी भगव्या रंगाचा ठेवीत असत. या सदऱ्याचा रंग भगवाच ठेवण्यात हेतू कोणता ? असा प्रश्न ‘विजयी मराठा’ पत्राचे संपादक श्रीयुत श्रीपतराव शिंदे यांनी महाराजांस केला. त्यावर महाराज बोलले, “अलीकडे ब्राह्मण लोक माझ्यावर बरेच चिडलेले आहेत. ते आता शिष्टाचार सोडून माझ्या बायका-मुलांवरही टीका करू लागले आहेत. करीता त्यांना मी हा शेवटचा भगवा बावटा दाखविलेला आहे. कारवाई करून सातारच्या प्रतापसिंह महाराजांप्रमाणे मलाही गादीवरुन दूर केले तरी बेहत्तर ! पण रंजलेल्या ब्राह्मणेत्तरांची सत्य बाजू मी केव्हाही सोडणार नाही. हे त्यांना दर्शविण्याकरिताच मी हा भगव्या रंगाचा सदरा घालीत असतो. “१० अर्थात महाराजांना राजा म्हणून गादीवर बसण्यापेक्षा रंजलेल्या ब्राह्मणेत्तर समाजासाठी आपले जीवन उपयोगी आले पाहिजे, यासाठी त्यांची सगळी तळमळ होती. लोकांच्या मनाचा राजा होणे कधीही उत्तम ही भूमिका स्वीकारल्याने ब्राह्मणी गुण बाळगणाऱ्यांच्या विरोधात त्यांनी भूमिका मांडलेली दिसते. व्यक्तिगत विरोध हा व्यक्तीपुरता असावयास हवा त्याला कौटुंबिक पातळीवर आणता कामा नये, असे शाहूंना अपेक्षित होते.
या दृष्टीने शाहू महाराजाचे लोकमान्य टिळकांशी जे संबंध होते त्याची दुसरी बाजु पाहणेही महत्त्वाचे आहे. १ ऑगस्ट १९२० रोजी टिळकांचे मुंबईस देहावसान झाल्याची बातमी शाहूंना सकाळी कळताच त्यांनी पुढ्यातले जेवणाचे ताट दूर लोटले आणि दिवसभर उपाशीच राहिले. त्यांच्या राजघराण्याच्या प्रथेनुसार त्यांनी टिळकांच्या दहा दिवसाच्या काळात नवी वस्त्रे गायकवाड वाड्यात पाठविली. या रिवाजाची कल्पना त्यांना नसल्याने नवी वस्त्रे पाठवून शाहूंनी अजून वैर ठेवले आहे, असा अर्थ त्यांनी काढला. हे कळताच शाहू “ते बामन्. त्यास्नी आमचा रिवाज कळायचा न्हाई. त्यास्नी कळवा. छत्रपती कधी परक्याचं सुतक पाळत न्हाई। पण जवळच्या आप्तांचं पाळतो. ज्याच सुतक पाळतो त्याच्या घरच्या मानसास्नी नवे कपडे पाठविण्याची रीत हाय आमची” म्हणाले. असा हा लोकमान्यांचे सुतक पाळणारा लोकोत्तर राजा ब्राह्मणांना कळला नाही, यापेक्षा दुसरे दुर्दैव कोणते?
एकदा महाराज कोल्हापूरहून राधानगरीच्या जंगलात शिकारीला निघाले. रस्त्यात त्यांना डोंबाऱ्यांचा तांडा दिसला. तेव्हा महाराजांनी आपला खडखडा थांबवून त्यांची, “तुम्ही कोण ? कोठून आलात?” म्हणून चौकशी केली. तेव्हा तांड्याचा प्रमुख घाबरत घाबरत महाराजांच्या जवळ येऊन म्हणाला, “महाराज, आम्ही डोंबारी लोक, भाताची सुगी मागायला निघालोय.” तेव्हा महाराजांनी विचारले, “तुम्ही काय करता? कोणत्या वस्तू बनवता ?” तेव्हा तो डोंबारी म्हणाला, “महाराज, आमी फिरस्ती लोक, आम्ही गाणं म्हणतो, ढोलगं वाजवतो. त्यावर आमच्या बायकापोरी नाचतात. मग माणसं या सुगीच्या दिवसात आमच्या पदरात काही ना काही टाकतात. आमी जनावरांच्या शिंगापासून निरनिराळ्या चिजा बनवतो. पक्षांचे पिंजरेपण तयार करतो.” यावर महाराज म्हणाले, “मी आता शिकारीला निघालोय. तुम्ही मला शिकारीसाठी एक भाला आणि पक्ष्यांसाठी एक पिंजरा तयार करुन द्या, अन् चार दिवसांनी वाड्यावर या.” डोंबाऱ्यांना या साऱ्या गोष्टी स्वप्नासारख्या वाटल्या. राजा आपणाशी बोलला, याचेच त्यांना आश्चर्य वाटले.
ठरल्याप्रमाणे मोठ्या हौसेने त्यांनी शिकारीचा भाला व पक्ष्यांचा सुरेख पिंजरा तयार करून महाराजांची वाड्यावर भेट घेतली. डोंबाऱ्यांनी तयार केलेल्या त्या सुंदर वस्तू पाहून महाराज खूश झाले. ते म्हणाले, “अरे, तुम्ही तर हरहुन्नरी सुतारासारखे कलावंत आहात. खरं म्हणजे तुम्हाला सुतार डोंबारी म्हणायला पाहिजे. आजपासून तुम्ही सुतार डोंबारी आहात.” आणि पुढे या समाजासाठी कोल्हापूरच्या जयंती ओढ्याजवळ जागा उपलब्ध करुन दिली. त्याठिकाणी हा समाज स्वत:ची घरेदारे बांधून स्थायिक झाला. कलाकुसरीच्या वस्तू बनवून कुटूंबाचे पोट भरू लागला. शिवाय फासेपारध्यामधील काटकपणा व शिकारीतली हुशारी त्यांच्या नजरेस भरली. त्यांना त्यांनी आपल्याबरोबर कोल्हापूरास आणले. सोनतळी कॅम परिसरात वस्ती करुन राहण्यास सांगितले. सोनतळी कॅम्पमधील घरांची बांधकामे, रस्त्यांची कामे फासेपारध्यांना दिली. काहींना धरणाच्या, तलावाच्या कामावर पाठविले. कुणावरही अवलंबून न राहता प्रामाणिकपणे कष्ट करुन पोट भरण्याची सवय या लोकांना लागावी, हा यामागे महाराजाचा मुख्य हेतू होता.
वयाच्या अवघ्या ४८ व्या वर्षी म्हणजेच ६ मे १९२२ रोजी मुंबईला राजर्षी शाहू नावाच्या या वादळी व्यक्तिमत्वाला आपण पारखे झालो. त्यावेळी राजर्षी शाहूंच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकतांना प्रबोधनकार के. सी. ठाकरे यांनी आपल्या ‘सर्चलाईट विझला !’ या लेखात म्हटल्याप्रमाणे, “श्रीमन्महाराज शाहू छत्रपती हे एक असे अद्वितीय पुरुषश्रेष्ठ होते की, ते अनेकांना अनेक रंगात दिसत असत. नानाविध लोक त्यांना नानाविध दृष्टींनी पाहात असत व ते त्यांना तसे दिसतही असत. नव्हे, आम्ही स्पष्टच म्हणतो की, ते खरोखरच नानारंगी महापुरूष होते. पण त्यात मुख्य खुबी मात्र ही असे की प्रत्येक रंगात त्यांचे प्राविण्य त्यांच्या प्रतिस्पर्ध्याला जागच्या जागी चारी मुंड्या चीत करण्याइतके शंभर नंबरी तेखदार असे. चित्पावनांना ते वैऱ्याप्रमाणे दिसत; देशस्थांना धार्मिक क्षेत्रांतल्या बंडखोरांप्रमाणे भासत; मुंबई व हिंदुस्थान सरकारला ते ‘प्यारे दोस्त’ असत, ब्राह्मणेतरांना ते मायबाप वाटत; तर अस्पृश्यांना ते खास परमेश्वराचे अवतारच भासत असत. जनतेच्या मनात वेगवेगळ्या रूपाने वावरणारे शाहू जीवंतपणी एक राजा असूनही लोकनेते, क्रांतीकारक, महात्मा, राजर्षी, लोकराजा यांसारख्या नानाविद्य उपाध्यांनी सन्मानित होतात, यातच त्यांच्या कार्याचे मौलिकत्व दडलेले आहे.
परंपरा आणि आधुनिकता यांच्यातील अन्योन्याश्रय आणि सातत्य खऱ्या अर्थाने राजर्षीनी ओळखल्यामुळे परंपरेविषयी तुच्छता कधीच बाळगली नाही. त्यापेक्षा परंपरेतील सुप्त परिवर्तनक्षमता ओळखून त्यांचा वापर करुन घेणेच त्यांनी पसंत केले होते. सत्यशोधक चळवळीला मोठा राजाश्रय देऊनही आपण सत्यशोधक नसल्याचे त्यांना निक्षून सांगावे लागले. याचे कारण परंपरेविषयी एवढी परखड नकाराची भूमिका समाजाच्या पचनी पडणार नाही आणि त्यामुळे अशा चळवळींची व्याप्ती वाढणार नाही, हे शाहूंच्या लक्षात आले होते. ‘शठम् प्रति शाठ्यम्’च्या भूमिकेने केवळ द्वेषनिर्मिती होते, मात्र समाजाचे इष्ट दिशेने पाऊल पुढे पडत नाही, हीच बाब त्यांना नेमकी टाळायची होती. यासंदर्भात त्यांचे श्रेष्ठत्व मांडतांना न्या. जी.एन.वैद्य म्हणतात त्याप्रमाणे, “शाहू छत्रपती हे आधुनिक भारताचा बुलंद आवाज होते. केवळ ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र किंवा अतिशूद्र यांच्यापैकी कोण्या एकाचा नव्हे तर संबंध देशाचा-देशाच्या सर्व भागातील प्रत्येक जाती-धर्म, पंथाच्या वरिष्ठ-कनिष्ठ सर्व व्यक्तींचा तो आवाज होता. या आवाजाचेच प्रतिबिंब पुढे बाबासाहेबांच्या वैचारिक जाणिवेमध्ये सापडतात. त्यामुळे ‘ऐसा राजर्षी पुन्हा न होणे’ हेच शब्द शाहू महाराजांच्या संदर्भात तंतोतंत लागू पडतात.
पुस्तकाचे नाव – राजर्षी शाहू महाराजांची निवडक १६ भाषणे
संपादक – डॉ. अनंता सूर
प्रकाशक – प्रशांत पब्लिकेशन
किंमत – १९० रुपये (पोस्टेजसह)
पुस्तकासाठी संपर्क – डॉ. अनंता सूर, ९४२१७७५४८८
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.