संसारात अनेक संकटे येत असतात. म्हणून संसार सोडायचा नसतो. कारण संसार हा होत असतो. संकटांना भिऊन काहीजण आत्महत्या करतात. जीवन संपवणे हा टोकाचा निर्णय घेण्या अगोदर जीवनात आपण कशासाठी आलो याचा विचार करायला हवा. आपले मुख्य कर्म काय हे जाणून घ्यायला हवे. जीवनाचा खरा अर्थ समजून घ्यायला हवा.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406
एवं आदि ना अंत स्थिती । ना रुप ययासि आयां ।
आतां कायसी कुंथाकुंथी । उन्मूळणी गा ।। 247 ।। ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा
ओवीचा अर्थ – या प्रमाणे संसार वृक्षाला आदि, अंत व स्थितीही नाहीत व याला रुपही नाही. आता असे जर आहे तर अर्जुना याला उपटून टाकण्यात श्रम ते काय ?
जन्माला आल्यानंतर जगण्यासाठी आवश्यक गोष्टी ह्या कराव्याच लागतात. त्या टाळता येणे शक्य नाही. जीवनात अमाप संपत्ती घेऊन जन्माला आला तरी त्याला दररोजच्या दिनचर्या साठी कर्म हे करावेच लागते. पण त्या कर्मात आपण गुंतायचे नसते. कारण संसार हा होत असतो. राजा म्हणून जन्माला आला तरी त्याला दैनंदिन कर्म हे करावेच लागते. त्याला वाटून दिलेले कर्म हे करावेच लागते. अन्यथा राजाला सुद्धा पाय उतार व्हावे लागते. जन्माने राजवाड्यात जन्माला आला म्हणजे राजा झाला. पण कर्माने राजा नसला तर तो नावापुरताच राजा होतो. म्हणजेच कोठेही जन्माला आला तरी त्याचे कर्म काही चुकत नाही. कारण कर्माने, कर्तृत्वानेच माणूस कायम स्मरणात राहातो. आजकाल इतिहासवाले पुरावे मागतात. पुरावा असेल तर राजा नाहीतर तो प्रजा. असा आजचा इतिहास आहे. म्हणजे राजाच्या वंशजालाही कोठेही असला तरी (संन्यास घेऊन प्रजेत असला तरी) कर्तृत्वाने राजा असल्याचा गुण हा दाखवावा लागतो. तरच त्याला राजा म्हणतात. म्हणजे मनुष्य जन्माने कोणीही जन्माला आला तरी तो कर्तृत्वानेच सिद्ध होत असतो. कपटानेही राजे होतात पण कार्याने राजा झालेली व्यक्ती लोकांच्या मनात कायम राहाते. सांगण्याचा उद्देश इतकाच की राजाला सुद्धा कर्म हे करावेच लागते. नाहीतर चंगळवादी, भोगी राजा अशी त्याची ओळख होते. यासाठीच संसारातील अभासी जग ओळखता यायला हवे. म्हणजे आपण त्यात गुरफटणार नाही. कर्म हे चुकवता येणारे नाही. पण त्या कर्माचा आपल्या जीवनावर परिणाम होणार नाही असा विचार करायला हवा.
संसारात अनेक संकटे येत असतात. म्हणून संसार सोडायचा नसतो. कारण संसार हा होत असतो. संकटांना भिऊन काहीजण आत्महत्या करतात. जीवन संपवणे हा टोकाचा निर्णय घेण्या अगोदर जीवनात आपण कशासाठी आलो याचा विचार करायला हवा. आपले मुख्य कर्म काय हे जाणून घ्यायला हवे. जीवनाचा खरा अर्थ समजून घ्यायला हवा. जीवन हे कशासाठी आहे हे जाणून घेऊन जगायला शिकले पाहीजे. म्हणजे खऱ्या जीवनाचा आपणास आनंद उपभोगता येईल. काही क्षणाच्या आनंदाने आपण आनंदी जरूर होतो. जीवनात अशा आनंदाची गरज आहे. पण संपूर्ण जीवन आनंदी करण्यासाठी काय करायला हवे. हे ओळखायला हवे. संसारातील दुःख हे मुळी दुःख नसते. संसारात सुख-दुःखे ही क्षणिक असतात. ती आपल्याच वागण्यातून निर्माण झालेली असतात. यासाठी आपण संसाराचे आभासी जग ओळखायला हवे. म्हणजेच संसार वृक्ष हा ज्ञानानेच नष्ट करता येतो. हे समजून घ्यायला हवे.
जीवनाचा मुख्य उद्देश मी कोण आहे याचा शोध घेणे आहे ? संसारात राहूनही हा शोध घेता येतो. यासाठीच संन्यास म्हणजे काय हे समजून घ्यायला हवे. साने गुरुजी यांच्या मते संन्यास म्हणजे निर्वाण. स्वतःला पूर्णपणे मालविणे. माझे कुटुंब, माझा समाज, माझा देश असे तेथे महत्त्व नाही. माझा मान, मला खायला, मला पैसा असला तेथे प्रकार नाही. संन्यास म्हणजे समदृष्टी, सूर्याचे किरण सर्वांसाठी तसा संन्यास सर्वांसाठी, माझ्याकडे कोणीही येवो, त्यांच्यासाठी मी आहे. असे गुरुजींच्या विचाराने प्रेरीत होऊन संसार केल्यास आपल्याबरोबरच इतरांचेही जीवन सुखी होऊ शकते.
गृहस्थाश्रमाबाबात बोलताना गुरुजी म्हणतात, गृहस्थाश्रमात संयम, त्याग, वासनाविकारांना आळा घालणे, प्रेम, सहकार्य इत्यादी गुणांचे शिक्षण मिळते. आपण जसा पिकत जात असतो. उच्छृंखल पणा कमी होतो. पोक्तपणा येतो. जीवनाचा नानाविध अनुभव येतो. आंबटपणा जाऊन जीवनात मधुरता येते.
आपण जन्माला येतो आणि मरतो. हेच जीवन आहे का ? जीवनाचा त्याग करून जीवन समजत नाही. यासाठी जन्म-मरणाच्या या फेऱ्यातून मुक्त होण्यासाठी या जगात आपण आलो आहोत हे लक्षात घेऊन कार्य करायला हवे. संसारात राहूनही हा विचार केला जाऊ शकतो. फक्त संसारातील क्षणभंगूरपणा समजून घेऊन कार्यरत व्हायला हवे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
लाईक अन् कमेंट्स…