आत्मज्ञान प्राप्ती ही लगेच होत नाही. यासाठी गुरुची आवश्यकता आहे. गुरुमंत्र, साधनेची गरज आहे. गुरू हा शोधावा लागतो. आत्मज्ञानी गुरूच योग्य मार्गदर्शन करू शकतो. गुरुंची कृपा झाली तरच आत्मज्ञान प्राप्ती होते. यासाठी आवश्यक साधनेचे कर्म हे करावे लागते.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406
तेंचि आत्मप्राप्तिफळ । दिठी सूनि केवळ ।
कीजे जैसें कांजळ । सेविजे ताहने ।। ७०० ।। ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा
ओवीचा अर्थ – ज्याप्रमाणें तहान लागली तर केवळ ती भागविण्याकरिता पाणी प्यावे घ्यावे. त्याप्रमाणें केवळ आत्मप्राप्ति या फळाकडे दृष्टि ठेवून, ते शास्त्रविहित नित्य कर्म करावे.
तहान लागल्यावर पाणी पिल्यानंतरच तृप्ती येते. तसे आत्मज्ञान प्राप्ती झाल्यानंतर समाधी अवस्था प्राप्त होते. यासाठी शास्त्राने सांगितलेले कर्मच करणे योग्य असते. इतरत्र भटकत राहण्याऐवजी जे आवश्यक आहे तेच करण्यावर भर द्यावा. तहान लागल्यानंतर विहीर खणण्यापेक्षा त्याचे नियोजन अगोदरच करायला हवे. उन्हाळ्यात पाण्याची टंचाई जाणवते. पाण्याची कमतरता भासू नये यासाठी पूर्वनियोजन हे असायलाच हवे. म्हणजेच कोणतीही गोष्ट पटकण उपलब्ध होत नसते. पाण्यासाठी विहीर खोदायला मोठा कालावधी लागतो. विहीर खोदूनही पाणी लागेल याची शाश्वती नाही. याचा अभ्यास, अन् योग्य नियोजन हे यासाठीच असायला हवे. तरच तहान लागल्यावर तृप्तीसाठी पाणी उपलब्ध होईल.
आत्मज्ञान प्राप्तीही लगेच होत नाही. यासाठी गुरुची आवश्यकता आहे. गुरुमंत्र, साधनेची गरज आहे. गुरू हा शोधावा लागतो. आत्मज्ञानी गुरूच योग्य मार्गदर्शन करू शकतो. गुरुंची कृपा झाली तरच आत्मज्ञान प्राप्ती होते. यासाठी आवश्यक साधनेचे कर्म हे करावे लागते. आत्मज्ञान प्राप्ती हेच ध्येय ठेवून कार्यरत राहायला हवे. गुरुप्रती भक्ती, श्रद्धा, विश्वास हा असायला हवा. विहीर खोदताना पाणी लागेल हा विश्वास ठेवूनच कार्य करत राहावे लागते. तसे आत्मज्ञान प्राप्ती होईल हा विश्वास ठेवूनच भक्ती अन् श्रद्धेने साधनेचे कर्म करत राहायला हवे. नुसते ज्ञानेश्वरी पारायण करून चालत नाही, तर त्या ज्ञानेश्वरीचा बोध हा घ्यायला हवा. एका तरी ओवीची अनुभुती यायला हवी. एकतरी ओवी समजून घ्यायला हवी.
आत्मज्ञान प्राप्तीसाठी गुरूमंत्राची साधना ही करायला हवी. गुरुमंत्राचा बोध होईल, अनुभुती येईल अशी साधना करणे आवश्यक आहे. यासाठी मन साधनेत रमणे आवश्यक आहे. मनाला साधनेची गोडी लागायला हवी. हटयोगाप्रमाणे शरीराला त्रास देऊन आत्मज्ञान प्राप्ती होईलच असे नाही. अशाने पदरी दुःखच पडते. यासाठी श्रद्धा अन् भक्तीने साधना ही करायला हवी. मन लावून एक मिनिटही केलेली साधना फलद्रुप होऊ शकते. कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी दृढनिश्चय हा महत्त्वाचा असतो. व्यसन सोडण्याचा निर्णय घेतला, पण ते सुटत नाही. ते सुटायचे असेल, तर तसा दृढनिश्चय हा करायला हवा. दृढनिश्चयाने कर्म करायला हवे, तरच त्यात यश प्राप्त होते. व्यसन सोडण्याचा मनाने दृढनिश्चय केला तरच ते सुटते. आत्मज्ञान प्राप्तीसाठीही दृढनिश्चय करायला हवा. मनाचा दृढनिश्चयच आत्मज्ञानाची द्वारे उघडू शकतो. यासाठी दृढनिश्चयाने मनाला नियंत्रित करायला हवे. साधनेत मन रमवायला हवे.
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असा दृढनिश्चय करून स्वराज्य निर्मिती करायला हवी. स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य. म्हणजेच प्रथम या स्व ची ओळख करून घ्यायला हवी. स्वः म्हणजे मी कोण आहे हे जाणायला हवे. स्वतःची ओळख पटल्याशिवाय, त्याचा बोध आल्याशिवाय प्रगती साधता येत नाही. मी कोण आहे ? मी आत्मा आहे. हे जेंव्हा समजेल. याचा बोध जेंव्हा होईल, तेंव्हाच आत्मज्ञान प्राप्तीचा मार्ग सुकर होईल. स्वतःला ओळखण्यासाठी हा जन्म प्राप्त झाला आहे. यासाठी स्व ची ओळख हा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळविण्याचा दृढनिश्चय, दृढसंकल्प करायला हवा. असे केल्यास निश्चितच आत्मज्ञान प्राप्ती होईल.