डॉ. दीपक टिळक गेले हे आजही खरे वाटत नाही. ते कुलगुरु असताना आणि कुलपती असताना अनेकदा त्यांच्या टिळक विद्यापीठातल्या कार्यालयात मी जात असे. मी आलो आहे म्हटल्यावर त्यांनी माझे नेहमीच अगदी उभे राहून स्वागत केले आहे. त्यांच्या चेहऱ्यावर एक निरागस भाबडेपणा होता. कोणत्याही कामात त्यांनी हात राखून काम केलेले नाही. त्यांचे झपाटलेपण हे सर्वच बाबतीत दिसून येत असे.
अरविंद व्यं. गोखले,
माजी संपादक केसरी
काही माणसे अबोल असतात, पण न बोलता बरेच काही घडवून जातात. त्यापैकीच एक म्हणजे डॉ. दीपक जयंत टिळक. टिळक विद्यापीठाचे कुलपती आणि केसरीचे संपादक. त्यांचे निधन झाले, बोलण्यातून करणारे नाही, पण करण्यातून बोलणारे. केसरीमध्ये नवे तंत्रज्ञान आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. प्लामाग रोटरी मशिनचे ऑफसेटमध्ये रुपांतर करून ते चालवण्याचा प्रयोग त्यांच्याच आग्रहातून यशस्वी झाला. सीआर ट्रॉनिक्सची पहिली मशिन्स केसरीने खरेदी केली आणि छपाईची क्रांती घडवली. मुंबईच्या अगदी पुढारलेल्या मराठीच काय पण इंग्रजी वृत्तपत्रातही जेव्हा फॅक्स मशिन नव्हते, तेव्हा ते केसरीत आणून ते सर्व जिल्हा कार्यालयांमध्ये बसवायचा प्रयोगही त्यांच्याच कारकीर्दीतला. धडाडी आणि चिकाटी ही त्यांची मूलभूत अंगे होती. ते एक माणूस म्हणूनही अनेकांच्या चिरकाल स्मरणात राहतील.
विधानपरिषदेचे माजी सभापती जयंतराव टिळक यांचे ते चिरंजीव. मी केसरीचे संपादकपद सोडले तेव्हा ते केसरीचे सरव्यवस्थापक होते. जयंतराव टिळक यांना जाऊन तेव्हा बरोबर सहा महिने झाले होते. मी केसरी सोडायचे तसे काही खास कारण नव्हते, पण मी जयंतराव टिळक यांना वचन दिले होते की, काही झाले तरी मी तुम्ही असेपर्यंत केसरी सोडणार नाही. याचा अर्थ ते गेल्यावर मी सोडायला पाहिजेच होता असे नाही, पण परिस्थितीने मला सोडायला भाग पाडले असे म्हटले तरी चालेल. प्रश्न तो नाही, पण मग मी जेव्हा माझा राजीनामा घेऊन डॉ. दीपक टिळक यांच्या कार्यालयात गेलो आणि इकडच्या तिकडच्या गप्पा मारून राजीनामा पत्र त्यांच्या हाती दिले आणि सहा महिन्यांनी मी रितसर केसरी सोडून जाईन असे त्यांना सांगितले तेव्हा त्यांनी ‘पण का? एवढाच प्रश्न केला. मी म्हटले नाही, काही खास कारण नाही, मी एवढे बोलून थांबलो तेव्हा मी त्यांच्या डोळ्यात पाणी पाहिले. त्यांनी मला सांगितले की, तुम्ही कधी राजीनामा द्याल याचा मी विचारच केलेला नव्हता. तुम्ही इथे संपादक असल्याने मी निर्धास्त होतो आणि टिळक विद्यापीठाकडे मला अधिक लक्ष देता येणे शक्य आहे, असेही मला वाटत होते. ही तुमच्यावर असलेली भिस्त होती. मी पुन्हा एकदा त्यांच्याकडे पाहिले तेव्हा त्यांच्या बोलण्यात कुठेही मला तो दिखावू आभास वाटला नाही. ते सांगत आहेत, त्यात तथ्य आहे हे मला कळत होते, पण तसाही मी ‘केसरी स्कूल’चा पहिल्यापासूनचा विद्यार्थी असल्याने आणि केसरीच्या कोणत्याही चौकटीबाहेर जाण्याचे धारिष्ट्य मी करून पाहिलेले नसल्याने माझ्याविषयी जयंतराव असतील किंवा डॉ. दीपक टिळक असतील, त्यांच्या मनात किंतू अजिबातच नव्हता.
मी केसरीचा संपादक झालो, पण त्यापूर्वी केसरीचा कार्यकारी संपादक होतो. त्यावेळी संपादकपदी डॉ. शरश्चंद्र गोखले होते. त्यांची निवड चंद्रकांत घोरपडे यांनी संपादकपद सोडल्यानंतर करण्यात आली होती. डॉ. शरश्चंद्र हे केसरीचे माजी संपादक दा. वि. गोखले यांचे चिरंजीव आणि त्या काळात केसरीचे विश्वस्त होते. एक दिवस अचानकपणे जयंतराव टिळक दुपारच्या वेळेस माझ्या खोलीत आले. मी अग्रलेख लिहिण्यात व्यग्र होतो. माझ्या टेबलासमोर उभे राहून त्यांनी काय लिहिताय, अशी विचारणा केली. मी त्या अग्रलेखाचा विषय त्यांना सांगितला. ते आले असे अचानक म्हटल्यावर माझी धांदल उडाली होती. त्यांना पाहून मी उभे राहिलो. तेव्हा त्यांनी म्हटले, ‘अहो गोखले, उभे काय राहताय? मी दोन मिनिटांसाठीच आलो आहे. बसा.’ तरीही मी उभ्या उभ्याच त्यांना म्हटले की, काही सांगायचे होते का? त्यांनी हो म्हटले आणि मला म्हटले की, केसरीचे पुढले संपादक तुम्ही आहात. त्यांनी मला दिग्मूढच केले होते. मी एक क्षण स्तब्ध झालो, पण काय बोलायचे ते मनाशी घोळवत असतानाच मी त्यांना म्हटले की, पण तुम्हाला तर दीपकला संपादक करायचे असेल ना ? वास्तविक हे मी बोलायला नको होते, पण मी बोलून गेलो.
ते लगेच त्यावर म्हणाले, की नाही दीपक आता विश्वस्त आहे आणि सरव्यवस्थापक म्हणून तो कामही करतो आहे. तो त्या पदावर खूश आहे. तो संपादक होणार नाही. तुम्हीच पुढले संपादक आहात. केसरीच्या संपादकपदाची पथ्ये काय, खबरदारी काय घ्यायला हवी यासंबंधी आपण नागपूरच्या विधिमंडळ अधिवेशनाच्या वेळी बोलू. तेव्हा तुम्ही दिल्लीला संसदेचे अधिवेशन ‘कव्हर’ करण्यासाठी जायचे आणि तिथूनच नागपुरास यायचे. आणि महत्वाचे म्हणजे मी तुम्हाला आता जे काही सांगितले ते कोणालाही सांगायचे नाही; अगदी घरीसुद्धा.’ आणि त्यानंतर ते पाठ वळवून निघूनही गेले. ते घरी जेवायला गेले. त्यानंतर काही मिनिटे माझी अस्वस्थतेत गेली. पुन्हा विषय जुळवून मी त्या अग्रलेखाचे लेखन पुढे सुरु केले. तेवढ्यात दारातून कोणीतरी आत येताना दिसले. पाहतो तो डॉ. दीपक टिळक समोर उभे. ते घरच्याच पोशाखात आले होते. त्यांनी मला म्हटले की, दादांनी मला तुमचा प्रश्न सांगितला. मी काही संपादक होणार नाही, तुम्हीच पुढले संपादक आहात. मला संपादक होण्यात रस नाही. दादांनी म्हणजेच जयंतरावांनी त्यांना हे सांगितले आणि ते ऐकून दीपक माझ्याकडे जेवणापूर्वी आले. हा दोघांच्याही मनाचा मोठेपणा होता.
मी त्यांना प्रथम पाहिले तेव्हा ते महाविद्यालयात शिकतच होते. कधीकधी ते ज्यूदोच्या पोशाखात यायचे, तर कधी अगदी अर्धी चड्डी आणि बनियन या अवस्थेत सुद्धा. त्यांनी किंवा अगदी जयंतरावांनी सुद्धा मला कधी अरेतुरे केलेले नाही. कायम माझा मान ठेवूनच ते बोलत असत. मी केसरी सोडला म्हणून डॉ. दीपक टिळक यांच्या मनात कदाचित राग असेल असे वाटले होते, पण तसे काहीही अजिबात नव्हते. मला ते केसरीच्या कार्यक्रमाची निमंत्रणे आवर्जून पाठवत आणि अनेकदा माझ्या पुस्तकांच्या प्रकाशनालाही ते उपस्थित असायचे. माझ्या मंडालेचा राजबंदी या पुस्तकाचे प्रकाशन मुंबईत विले पार्ले येथे लोकमान्य सभागृहात झाले. त्यांच्या हस्तेच झाले. ते वेळेवर आले आणि उत्तम बोलले. मला त्यांनी रात्री उशिरा कार्यक्रम संपल्याने मी पुण्याला परत कसा जाणार तेही विचारले. मी म्हटले की, मी आज थांबून उद्या येईन, माझ्या टिळकपर्व या पुस्तकाचे काम चालले असताना राजहंस प्रकाशनाने पुस्तकाची किंमत कदाचित सातशे रुपयेही ठेवावी लागेल, असे कळवले. त्याला टिळक महाराष्ट्र विद्यापीठ काही अनुदान देते का, ते विचारता का, असेही त्यांनी विचारले. मला तसे विचारता येणे अवघड वाटले तेव्हा त्यांच्या प्रतिनिधीने ते काम केले. तेव्हा त्यांनी एका क्षणात दीड लाख रुपये त्या पुस्तकासाठी मंजूर केले आणि तेवढ्या रकमेचा धनादेश माझ्या नावे दिला. त्यानंतर मी राजहंसच्या नावे तेवढ्याच रकमेचा धनादेश लिहून राजहंसच्या स्वाधीन केला. वास्तविक ही गोष्ट इतकी खासगी होती, की ती आतापर्यंत सांगितली गेली नाही, पण त्यांच्या मनाचे औदार्य कसे होते ते निदान त्यांच्या पश्चात सांगितले जावे म्हणून मी हे स्पष्ट केले आहे.
डॉ. दीपक टिळक गेले हे आजही खरे वाटत नाही. ते कुलगुरु असताना आणि कुलपती असताना अनेकदा त्यांच्या टिळक विद्यापीठातल्या कार्यालयात मी जात असे. मी आलो आहे म्हटल्यावर त्यांनी माझे नेहमीच अगदी उभे राहून स्वागत केले आहे. त्यांच्या चेहऱ्यावर एक निरागस भाबडेपणा होता. कोणत्याही कामात त्यांनी हात राखून काम केलेले नाही. त्यांचे झपाटलेपण हे सर्वच बाबतीत दिसून येत असे. कोणतेही काम एकदा का मनावर घेतले की ते त्यांच्याकडून झाले नाही, असे कधीच झालेले नाही. या खेपेला वसंत व्याख्यानमालेमध्ये मला माझ्या आवडत्या विषयावर बोलण्याचे निमंत्रण मला डॉ. गीताली टिळक यांच्याकडून मिळाले होते. त्यांनी दिलेल्या तारखेच्या दरम्यान मला त्याच विषयावर अन्यत्र बोलायचे असल्याने मी येऊ शकत नसल्याचे डॉ. गीताली यांना कळवले होते. पण काहीतरी कारण सांगायचे म्हणून मी त्यांना माझी तब्येत बरी नसल्याने मला येता येईल असे वाटत नसल्याचे सांगितले. ते काही प्रमाणात खरेही होते. तेव्हा दुसऱ्या दिवशी डॉ. दीपक टिळक यांचा फोन आला, ‘काय होतंय? काळजी घ्या.’ त्यांनी ही आवर्जून केलेली विचारपूस मी कधीच विसरणार नाही. त्यांना माझी विनम्र आदरांजली. असा मित्र, असा सहकारी पुन्हा होणे नाही.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.