साधनेच्या काळात वाटणारी मनातील भीती दूर करायला हवी. साधनेत प्रगती होत राहिली तर साधना करताना शरीर जड होते. दगडासारखे होते, पण अशा गोष्टींची भीती बाळगू नये. साधनेचा हा अमृताचा सागर आहे. यात बुडण्याची भीती कशी ? इथे तर धैर्याने डुंबायला हवे.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – ९०११०८७४०६
हां गा समुद्र अमृताचा भरला । आणि अवसांत वरपडा जाहला ।
मग कोणीही आथि वोसंडिला । बुडिजेल म्हणोनि ।। ६२४ ।। ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा
ओवीचा अर्थ – अरे अर्जुना, प्रत्यक्ष अमृताचा समुद्र भरलेला असला आणि अकस्मात कोणी तेथे प्राप्त झाला, मग आपण यांत बुडून मरून जाऊं, म्हणून कोणी तरी त्याचा त्याग केला आहे काय ?
साधना करताना अनेक अडचणी येत असतात. कधी वेळच मिळत नाही, तर कधी वेळ मिळाला तर मनात इच्छाच होत नाही. मनात घोळणाऱ्या अनेक विचारांनी साधनेला बसण्याचे सामर्थ्यच होत नाही. अशा परिस्थितीत साधना कशी होणार? अशा बेचैन अवस्थेत प्रत्येक साधक असतो. साधनेसाठी बेचैन असणे हे देखील चांगले आहे. या ना त्या कारणाने सद्गुरूचे स्मरण तरी राहते, पण साधना सोडून देणे हे योग्य नाही.
मनाच्या स्थैर्यासाठी प्रयत्न करणे, साधनेसाठी वेळ काढणे गरजेचे आहे. साधनेचे अनेक फायदे आपणास माहीत असूनही या धकाधकीच्या जीवनामुळे याकडे आपण दुर्लक्ष करतो. तसे सध्या कामाच्या व्यस्ततेत साधनेसाठी वेळे देणे हे एक मोठे आव्हानच आहे, पण हे आव्हान आपणास स्वीकारावेच लागेल. साधनेचे हे अमृत प्यायलाच हवे. अमृताच्या या महासागरात आपण डुंबायलाच हवे.
साधनेच्या सुरवातीच्या काळात पायात मुंग्या येतात. शरीर जड होते, पण या गोष्टींची भीती बाळगू नये. अहो, अमृताच्या समुद्रात उडी घेतल्यावर मरणाला कशाला भ्यायचे ? उलट साधनेच्या प्रगतीतील या पायऱ्या आहेत, असे समजून उत्साहाने साधना वाढवायला हवी. मुंग्या हळूहळू कमी होतील. साधनेच्या काळात शरीरात अनेक हालचाली होतात. पित्त जळते, पण याचा फायदा होतो. पित्त जळाल्याने आपली भूक वाढते. चेहऱ्यावरील तेज वाढते. साधनेत हळूहळू प्रगती होत राहते. शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढते. स्मरणशक्ती सुधारते. हे फायदे विचारात घ्यायला हवेत.
साधनेच्या काळात वाटणारी मनातील भीती दूर करायला हवी. साधनेत प्रगती होत राहिली तर साधना करताना शरीर जड होते. दगडासारखे होते, पण अशा गोष्टींची भीती बाळगू नये. साधनेचा हा अमृताचा सागर आहे. यात बुडण्याची भीती कशी ? इथे तर धैर्याने डुंबायला हवे. याचा आनंद घ्यायला हवा. या आनंदातूनच, सकारात्मक विचारातूनच मग आध्यात्मिक प्रगती होत राहाते. यातूनच मग आत्मज्ञान प्राप्ती होते. यासाठी साधनेच्या या सागरात उडी मारून मनसोक्त पोहण्याचा आनंद घ्यायला हवा. सद्गुरुंच्याकृपेने यात बुडण्याची किंचितही भीती राहात नाही. उलट त्यांच्याकृपेने हा भवसागर तरून जाता येतो.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.