May 30, 2024
Book Review of Poet Arun Deshpande
Home » बालकांच्या आनंदाची मेजवानी : ‘ माझे आबा,आज्जी ‘
मुक्त संवाद

बालकांच्या आनंदाची मेजवानी : ‘ माझे आबा,आज्जी ‘

बालकांना विविधांगी नातेसंबंध, आपला देश, महापुरुष, निसर्ग आणि पर्यावरण इत्यादिंचा सार्थ आणि नेमका परिचय सहजसुंदरतेने करून देण्याचा कवी अरुण वि. देशपांडे यांचा हेतू सफल झाला आहे आणि हेच या बालकवितेचे यश आहे.

उमेश मोहिते, माजलगाव, जि. बीड

जेष्ठ बालसाहित्यकार अरुण वि.देशपांडे यांचा ‘ माझे आबा,आज्जी ‘ हा २६ बाल कवितांचा संग्रह असून या सर्व बालकविता बालकांच्या निरागस,संवेदनशील आणि नाजूक भावविश्वाचा अविभाज्य भाग असणाऱ्या आई, आज्जी, परी, आजोबा, शाळा, देशप्रेम, निसर्ग, ढग, पाऊस आदी विषयांवरील असून या कवितांमधून कवीने अगदी सहजसुंदर तेने बालकांचे आनंदी विश्व उलगडले आहे.

उदा.बालकांच्या जडणघडणीत असलेले आईचे महात्म्य सांगताना कवी म्हणतो :
लेकरा घडवी आई
शहाणे करी आई
बाळाची शिल्पकार ती
नाव तिचे असे आई !

बालकांना नेहमी रंजक आणि बोधपर गोष्टी सांगून मुलांना आनंद व मौज देणाऱ्या आजी आणि आजोबांचे अनन्यसाधारण असे महत्त्व मुलांच्या भावविश्वात असते,हे नोंदवून मुलांच्या मनात आजी-आजोबांविषयी ममत्वाची रुजवण करताना कवी म्हणतो :
मित्रांनो,चला आता
आपण एक करू
आपल्या आजी आबांची
रोज खूप सेवा करू..

याशिवाय बालकांच्या कोवळ्या मनामध्ये आपल्या देशाविषयी आणि थोर महापुरुषांविषयी प्रेमभाव निर्माण व्हावा,या उद्देशाने लिहिलेल्या काही बालकविता संग्रहात आहेत.

उदा.राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या कार्याची नेमकी ओळख करुन देताना कवी लिहितो :
बापू , युगपुरुष खरा
भारतमातेला लाभला
मायभूमीच्या मुक्तिसाठी
स्वातंत्र्यलढा उभारला ..

तसेच आपल्या विविध भारतीय सणांविषयी अगदी छान नि रंजक माहिती इथे कवितांमधून देण्यात आलेली आहे.उदा.दीपावली या सणाचे महत्त्व आणि त्यामधून मुलांना मिळणारा आनंद नोंदवताना कवी म्हणतो :
आवडतो मज हा
सण दीपावलीचा
दूर करी अंधार
सण हा प्रकाशाचा..

या सोबतच बालकांनी आपल्याला भरभरून देणाऱ्या भोवतालच्या निसर्गाचा आनंद घ्यावा आणि निसर्ग, पर्यावरण यांचे संवर्धन करावे,या प्रांजळ हेतूने काही कविता इथे आहेत. कवी एके ठिकाणी म्हणतो :
कसे होईल हो सांगा
या निसर्गाचे रक्षण
थांबणार ना जोवरी
या निसर्गाचे भक्षण …

थोडक्यात जेष्ठ कवी अरुण वि. देशपांडे लिखित ‘ माझे आबा, आज्जी ‘ या संग्रहातील बालकविता मुलांच्या परिचित भावविश्वातील घटकांवर असून कवीची सहज सुलभ भाषाशैली मुलांच्या परिचयाची व आकलनातील असल्याने ह्या कविता भावस्पर्शी झाल्या आहेत.

तसेच या बालकविता बालकांचे छानसे मनोरंजन तर करतातच आणि त्यासोबतच बालकांना संस्कारक्षम अशी छानशी शिकवणही देतात ; त्यामुळे या बालकविता संग्रहातील कविता लहान मुलांच्या पसंतीस नक्कीच उतरणाऱ्या आहेत,असा विश्वास वाटतो. त्यासोबतच प्रौढ वाचकांनाही त्यांच्या हरवलेल्या बालविश्वाचा पुनःप्रत्यय देणाऱ्या आहेत.

एकूणात बालकांना विविधांगी नातेसंबंध, आपला देश, महापुरुष, निसर्ग आणि पर्यावरण इत्यादिंचा सार्थ आणि नेमका परिचय सहजसुंदरतेने करून देण्याचा कवी अरुण वि. देशपांडे यांचा हेतू सफल झाला आहे आणि हेच या बालकवितेचे यश आहे..

पुस्तक ( बालकविता ) – माझे आबा, आज्जी
कवी – अरुण वि.देशपांडे, संपर्क- 9850177342
प्रकाशक – सप्तर्षी प्रकाशन, मंगळवेढा ,जि.सोलापूर
पृष्ठे – ४०, मूल्य – ६० रुपये

Related posts

मध्ययुगीन मराठी संत कवयित्रींची काव्यधारा

आव्हान स्वीकारून दूर करा ज्ञानाच्या मार्गातील अडथळे

नीट इंडिया, थ्रू लिटरेचर !

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406