गांधीना त्यांच्या हत्येनंतरही त्यांच्या प्रतिमेवर हल्ला करून पुन्हा पुन्हा मारलं जात आहे. एवढं करूनही गांधी शेवटी या जगात उरतोच ! तो का उरतो याचा ऊहापोह करणारा हा लेख…
अजय कांडर
९४०४३९५१५५
मोहनदास करमचंद गांधी उर्फ महात्मा गांधी हे त्यांच्या हयातीत आणि मृत्यू पश्चात एक दंतकथा बनून राहिलेले आहेत. महात्मा गांधी ही केवळ एक व्यक्ती नाही, तर जगभरात अहिंसेने आणि माणूस म्हणून जगू पाहणाऱ्या लोकांचे ते प्रेरणास्थान आणि जीवनदायी ऊर्जा पुरवणारी एक विचार चळवळ बनून राहिले आहेत.
विशेष म्हणजे गांधीहत्येनंतरही त्यांच्या विचारांचा परिणामकारक अंश जगाच्या कणाकणात व्यापून राहिल्यामुळे त्यांना पुन्हा पुन्हा मारण्यात येत आहे. कधी त्यांच्या प्रतिमेवर गोळ्या झाडून, कधी त्यांचे आणि त्यांच्या कुटुंब परिवाराचे चारित्र्यहनन करून, कधी त्यांचे पुतळे उद्ध्वस्त करून, कधी त्यांनी लिहिलेली ग्रंथसंपदा नष्ट करून, कधी त्यांच्यावर जी लाखो पुस्तके लिहिली गेली ती अग्नीच्या भक्ष्यस्थानी टाकून त्यांना संपविण्याचा प्रयत्न सतत केला जात आहे.
परंतु त्यांच्या नावाच्या उच्चाराने मनोरुग्ण झालेल्या, सतत उजवीकडे बघण्याच्या नादात डावीकडे बघण्याचा प्रचंड त्रास होणाऱ्या गांधींच्या विरोधकांना काही केल्या गांधींच्या विचारांना नष्ट करता येत नाही. कारण गांधींची जीवनदृष्टी आणि विचारांचा पाया हा “सत्याचा” आहे. त्यामुळे काळ कोणताही असो, आपल्याला ‘अजूनही जिवंत आहे गांधी!’ असेच म्हणावे लागते.
विचारांच्या या घुसळणीतूनच हे दीर्घ काव्य उत्स्फूर्तपणे लिहून झाले. आमचे कादंबरीकार मित्र सुशील धसकटे यांचा व्यासंग सर्वश्रुत आहे. चिकित्सक पद्धतीने जगाकडे पाहणे आणि वर्तमानाचा नव्याने अर्थ लावणे ही गोष्ट त्यांच्याकडून त्यांच्या मागून येणाऱ्या पिढीने शिकण्यासारखी आहे. गांधी-आंबेडकर हा त्यांच्या आस्थेचा विषय. अर्थात ही दोन व्यक्तिमत्त्व जगातील करोडो लोकांच्या आस्थेचा आणि अभ्यासाचा विषय आहेतच; परंतु वर्तमानाकडे म्हणजे पर्यायाने आजच्या जगण्याकडे, समाज वास्तवाकडे अधिक डोळसपणे पाहणे आणि या दोन महामानवांचे विरोधक समजून घेणे, हा धागा धसकटे आणि कवी म्हणून आमच्यात महत्त्वाचा ठरत आला.
वर्तमानकाळात किंवा येणाऱ्याही काळात गांधी आणि गांधीविचार हा सातत्याने कालोचीत ठरणार आहे. कारण गांधींनी ज्या “निसर्ग-मानवकेंद्रित सत्याचा” आग्रह धरलेला होता ते सत्य हे “युनिव्हर्सल ट्रुथ” Universal Truth आहे. या पृथ्वीवर शेवटचा माणूस जिवंत असेपर्यंत तरी हे “सत्य” नष्ट होणार नाही… इत्यादी अशा वैविध्यपूर्ण चर्चांनी आम्हा दोघांनाही गांधी नावाच्या महासागरात खोल खोल तळाकडे जाण्याची ओढ लागली. जसजसे तळाकडे जाऊ लागलो तसतसे गांधी अधिक कळायला लागले. हे तळाकडे जाणे म्हणजेच माणूस म्हणून अधिकाधिक उन्नत होत जाणे आहे. माणूस म्हणून उन्नत होत जाण्याचा असाच मार्ग या आधी छत्रपती शिवराय, संत तुकाराम आणि महात्मा फुले यांनी सांगितलेला होताच. गांधींनी या मार्गाला सामान्य माणसांच्या दृष्टीने अधिक सोपे आणि प्रशस्त केले. ह्या तळाकडे जाण्याच्या प्रक्रियेत जी घुसळण झाली ती म्हणजे “अजूनही जिवंत आहे गांधी”!
नेल्सन मंडेला हे शांतीच्या राजदूतांपैकी एक होते. सलोखा आणि क्षमा यांवर त्यांचा विश्वास होता. ते महात्मा गांधी आणि त्यांच्या सत्याग्रहाच्या तत्त्वाचे कट्टर अनुयायी होते. वर्णद्वेष आणि भेदभावाचा त्यांना तिटकारा होता. सर्व स्तरांतील प्रतिकार चिरडून टाकण्यासाठी तिथल्या राष्ट्रवादी राजवटीने त्यांना जखडून ठेवले. राष्ट्रवादाच्या नावाखाली हुकूमशहाचा जन्म होतो, तेव्हा तेव्हा अशा व्यवस्थेला “गांधी” आडवा येतच असतो. मग तो भारत असो की जगभरातील कोणतीही भूमी असो.
गांधी हे फक्त व्यक्ती राहिलेले नाहीत गांधी म्हणजे तत्त्वज्ञान, गांधी म्हणजे विचार, गांधी म्हणजे अनुकरण आणि गांधी म्हणजे पर्यायी व्यवस्थेची दिशा. जिथे जातीभेद येतो जिथे धर्माचा भेद येतो, जिथे वर्णभेद येतो, जिथे रंगाचा भेद येतो, जिथे लोकशाही संपुष्टात आणून एकाधिकारशाहीकडे वाटचाल होण्याचा प्रारंभ केल्या जाण्याची शक्यता दिसते तिथे तिथे गांधी विचार अशा एकाधिकारशाहीला प्रतिकार करणारा ठरतो. म्हणूनच अलीकडच्या काही वर्षात गांधींना त्यांच्या निधनानंतर पुन्हा पुन्हा मारण्याचा प्रयत्न झाला. परंतु ते मरतच नाहीत. म्हणूनच नेल्सन मंडेला यांना नोबेल पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांनी शांतीचा आणि अहिंसेचा विचार मी गांधींकडून घेतला, असे सांगितले. त्यांच्या या उद्गगाराचे मोल असे आहे की, जगभराच्या मातीत गांधी विचार व्यापून पुन्हा उरतोच आहे. मात्र एक जात, एक धर्म, एक वर्ण, एक खानपान हा राष्ट्रवादाचा नवा नियम सांगणाऱ्या आजच्या सत्ताधारी व्यवस्थेला गांधींची ही महत्तता कळत नाही. अर्थात ती त्यांना कळलेलीच आहे, परंतु ती पचत नाही. अशावेळी सांस्कृतिक राजकारण करू पाहणाऱ्या एखाद्या लेखक, कवीला ‘अजूनही जिवंत आहे गांधी’ याचा वेगवेगळ्या पातळीवर शोध घ्यावासा वाटतो.
आपल्या देशात गांधीप्रेम आहेच, परंतु गांधीद्वेषही टोकाचा आहे. गांधीप्रेम आणि गांधीद्वेष यांचा वापर पावलोपावली राजकारणासाठी केला जातो. तरीही निर्मळ गांधी प्रेम उरतेच आहे. हे अलीकडे फार प्रकर्षाने लक्षात येऊ लागले आहे. २०१४ नंतर गांधीद्वेषाची परिसीमा गाठली गेली. पण याच कालावधीत गांधींवरचे जनतेचे निर्व्याज प्रेम अनुभवता आले आहे. ज्या भूमीत जगाला शांतीचा आणि अहिंसेचा संदेश देणाऱ्या एका महात्म्याचा जन्म झाला, त्याच भूमीत गोध्रा हत्याकांड झाले, गुजरात दंगलीने जगासमोर भारताचा चेहरा हिंसक असा आणला. हे गांधींच्या तत्त्वाच्या विरोधात घडलंच, परंतु याच्या आतील गोष्ट अशी की ज्या गांधींनी हा देश जातीधर्माच्या पलीकडे उभा केला त्याला सुरुंग लावणे हे द्वेषाचे राजकारण यामागे मोठे होते. कारण गांधींनी अहिंसेने या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले आणि त्यांचा प्रभाव उजव्या विचारसरणीच्या धर्मवादी गटाला पुसून काढणे कधीही शक्य नाही, हे लक्षात येऊ लागले. त्यामुळे धर्माच्या आधारावर माणसाला संपविण्याच्या घटनेचे समर्थनही केले जाऊ लागले आणि अशा प्रकारच्या घटना दिवसेंदिवस वाढू लागल्या.
महात्मा गांधी हे नाव अहिंसा या तत्त्वाशी कायमचे जोडले गेले. वास्तविक हिंसा न करणे म्हणजे अहिंसा असं समजलं जातं. पण गांधी गांधींच्या अहिंसेचा तेवढ्या पुरताच सीमित विचार करून चालत नाही. हिंसा वाईट असते हे मान्यच आहे, पण गांधी अहिंसेचा अन्वयार्थ शोधताना. हिंसेबरोबरच माणसाची गुलामीही तेवढीच वाईट असते, हे समजून घ्यायला हवे. गांधींनी हिंसेचे आणि गुलामीचे कधीच समर्थन केले नाही. पण प्रसंगी हिंसा करणाऱ्यांच्या विरोधात आपली ताकदही त्यांनी लावली. १९४२ मध्ये हिटलरच्या विरुद्ध ब्रिटनच्या बाजूने एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून उतरण्यास गांधींची तयारी होती. १९४७ मध्ये पाकिस्तानने भारतावर हल्ला केल्यानंतर गांधी नेहरूंच्या बाजूने ठामपणे उभे राहिले. जनतेने शस्त्र हातात घ्यावे आणि यश मिळवावे, याला स्वातंत्र्य म्हणता येत नाही हा गांधी विचार होता. त्यामुळे त्यांनी लाखो करोडो भारतीयांच्या हातात शस्त्र देण्याचा विचार कधीच केला नाही. तरीही गांधींचे मोठेपण हे की गांधीजींनी शस्त्राविना या देशाला निर्भय बनवले.
आपल्या मृत्यूची ज्यांना ज्यांना भीती वाटत नव्हती ते ते लोक रस्त्यावर उतरण्यास तयार झाले. रस्त्यावर उतरल्यानंतर होणाऱ्या सगळ्या परिणामांना भोगण्याची त्यांची तयारी होती. अशी नि:शस्त्र जनता हा गांधी विचारांचा आवाज होता आणि हेच गांधींचे सर्वात मोठे यश होते. त्यामुळे पंडित नेहरू, सरदार पटेल यांच्यासारखे आपले सर्वस्व उधळून साथ देणारे सहकारी त्यांना भेटले, तसेच बाबू गेनूसारखे मरणाला हसत हसत सामोरे जाणारे कार्यकर्तेही त्यांना लाखोंच्या संख्येने भेटले. ही लोकमान्यता हीच गांधींची सर्वांत मोठी जमेची बाजू आहे. अशावेळी मानवताविरोधी, धर्मांध व संकुचित विचारधारेतून तयार झालेला एक हत्यारा गांधींना मारतो, तरीही भारतावरच नाही तर जगावर असा हा गांधी नावाचा नि:शस्त्र माणूस त्याच्या मृत्यूनंतरही आजतागायत राज्य करतो, हेच नकोसे झाल्याने त्यांना पुन्हा पुन्हा मारण्यात येत आहे. तरीही तो जिवंतच राहतो आहे. ही वेदना गांधींची हत्या करणाऱ्या अमानवीवृत्तीच्या लोकांच्या मनात कायम सलत राहिलेली आहे. विशेष म्हणजे ही वेदना घेऊनच सत्तेवर आलेले लोक गांधीद्वेषाने भ्रमिष्ट झालेले आहेत.
गांधी विरोधकांना जसे पचनी पडत नाहीत, तसेच त्यांच्या समर्थकांनाही गांधीविचार जगणे जमत नाही, असे दिसते. गांधी जगण्याचा प्रयत्न करणे म्हणजे निखळ माणूस होणे असते. गांधींना एका जातीत वा एका धर्मात बांधता येत नाही आणि कुठल्या एका विशिष्ट दृष्टिकोनातूनही पाहता येत नाही. गांधी या सगळ्या पलीकडे पोहोचले असल्याने त्यांच्याकडे फक्त माणूस म्हणूनच पाहता येतं. पण दुर्दैव असे की, कोणत्याही काळात निखळ माणूस म्हणून जगणाऱ्या माणसाला एकटंच जगावं लागतं. गांधी यांचंही असं झालं. जगातल्या बहुसंख्य महामानवांना त्यांच्या त्यांच्या टोकदार जाती अस्मितेचे अनुयायी लाभले, पण गांधी हे एकमेव असे आहेत, की त्यांना त्यांच्या जातीचेच काय त्यांच्या जन्मभूमीचेही टोकदार अस्मितावादी अनुयायी लाभले नाहीत.
गांधी विचारांचे हे सगळ्यात महत्त्वाचे यश आहे. गांधींचे माणूसपण असे की त्यांनी धर्माला नाकारलं नाही तरी ते धर्मवादी दिसत नाहीत, त्यांनी कोणत्याही जातीचं समर्थन केले नाही तरी त्यांना मानणारा कुठल्या जातीतला त्यांचा चाहता वर्ग नाही असे झाले नाही. त्यांनी शेवटच्या घटकाचा अधिकाधिक विचार केला आणि त्याच्या मनात मानवतेचा दिवा कायम जागृत ठेवला. या देशातील शोषितघटकांपैकी काहींना अंगावर वस्त्र पांघरायलाही मिळत नाहीत, हे लक्षात आल्यावर हा माणूस पूर्ण हयातभर अर्धवस्त्र पांघरून जगला. यापेक्षा निखळ माणूस म्हणून जगण्याचं या जगातलं दुसरं उदाहरण नाही. सर्वसामान्य माणसाचं दुःख ज्याला कळतं त्यांच्या वेदनेशी जो समरस होतो, तोच अधिक सर्वसमावेशक नेतृत्व करू शकतो.
स्वातंत्र्य लढ्यातील महात्मा गांधी आणि बाबासाहेब आंबेडकर असे दोन महान नेते होते, की त्यांनी आधी स्वातंत्र्यलढ्याएवढाच सामाजिक परिवर्तनाचा लढाही महत्त्वाचा मानला. विशेष म्हणजे या देशात बाबासाहेबांचे नेतृत्व उदयास येऊ लागले होते त्याच कालखंडात गांधीं स्वातंत्र्यलढ्याचे सर्वोच्च नेते झाले होते. वास्तविक पाहता टिळकांसारख्या धर्माला महत्त्व देणाऱ्या आणि त्याआधारे स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यानंतर गांधीजींनी भारतासारख्या विविध जातीधर्मांनी ग्रस्त अशा भूभागाचे नेतृत्व करणे, ही काही साधी गोष्ट नाही. पण गांधींनी अखेरपर्यंत म्हणजे त्यांची हत्या होईपर्यंत या देशावर निर्विवाद वर्चस्व ठेवले. सुमारे पाऊण शतकापेक्षा जास्त काळ गांधी हेच स्वातंत्र्यलढयाचे सर्वोच्च नेते होते. त्यांच्या आदेशाने चालणारे सरदार पटेल, पंडित नेहरु, मौलाना आझाद यासारखे मातब्बर नेते त्यांच्या सोबत होते. पण जनतेची अचूक नस पकडण्याची किमया गांधींना खूप जास्त ठाऊक होती. म्हणूनच आपल्या भोवतींच्या दिग्ग्ज नेत्यांचे ते नेते होते. याच कालखंडापासून भारताबरोबरच इतर जगातही गांधी हा माणूस ‘भारतीयत्वाचे प्रतीक’ बनून राहिला होता.
भारत देश म्हणजे बुद्धाचा देश, अशी जगभर प्रतिमा आहे. मात्र यात विसाव्या शतकाच्या प्रारंभीपासूनच भारत म्हणजे गांधींचाही देश आहे अशी नवी ओळख निर्माण झाली. अर्थात गौतम बुद्धांबरोबर गांधींची अशी प्रतिमा उभी राहणे, हा केवळ गांधींचाच सन्मान नाही तर तो अखंड भारताचा सन्मान आहे, हे आपण समजून घ्यायला हवे. त्याशिवाय आपल्याला नीट गांधीही समजून घेता येणार नाही आणि ही समजण्याची कुवत त्यांच्या विरोधकांना नसल्यामुळेच गांधी यांची हत्या वेगवेगळ्या प्रकारे पुन्हा पुन्हा केली जाते आहे. म्हणूनच गांधी दर क्षणाला नव्याने पुन्हा जिवंत होत आहेत ! अशावेळी हे त्यांचे जिवंतपण कशात आहे, याचा शोध घेण्याची उत्सुकता म्हणजे ‘अजूनही जिवंत आहे गांधी’ हा दीर्घ कवितेचा उद्गगार होय ! गांधी माणसांच्या डोक्यात असलेल्या तथाकथित संकुचित विचारांच्या मुळांना धक्का देतात.
तुम्ही जगण्याचा एकरेषीय विचार करत असला तर तुमच्या मनात विचाराची अनेक आवर्तने निर्माण करतात. या अर्थाने गांधी हे तुमच्या संकुचित विचारांची मुळेच उखडून टाकतात. तुम्हाला तुमच्या विचारांचा सतत पुनर्विचार करायला लावतात. जगात माणसाची निर्मिती झाली तेव्हा तो एकच होता. त्याच्यात भेदांचा विचार हा मानवाच्या पुढील प्रगत अवस्थेत आला. आपला “वंश” वेगळा आहे ही वंशवादी भावना मूळ धरू लागली. या वंशवादी भावनेतून प्रदेशनिहाय विविध शाखा जन्माला घातल्या. या शाखांनी पुढे जात, जमाती आणि धर्म जन्माला घातल्या. आणि मानवाचा संकुचिततेच्या दिशेने प्रवास सुरू झाला. मानसिकता तयार होऊ लागली.
जात आणि धर्म ही माणसाचीच निर्मिती आहे. “माणूस” म्हणून एकच असलेल्या माणसाने विविध जातीधर्मात स्वतःला वाटून घेतले. हे भेद निसर्गनिर्मित नाहीत तर ते मानवनिर्मित आहेत. जातीधर्माच्या आधारावर माणूस आपले वर्चस्व दुसऱ्यावर लादू लागला. यातून वर्णवर्चस्ववादी नवी मानसिकता तयार झाली. गांधी या वर्चस्वांच्या मुळांनाच धक्का देतात. या सगळ्या पार्श्वभूमीवर महात्मा गांधी यांचा मानवतावादी दृष्टिकोन आपल्याला समजून घ्यावा लागेल. महात्मा गांधींचा मानवतावादी दृष्टिकोन म्हणजे मानवाच्या समग्र हितासाठी माणसाची असलेली पूर्ण निष्ठा. त्यांच्या विचारांमध्ये मानवतावाद अंतर्निहित होता आणि त्यांच्या रोजच्या व्यवहारातही मानवतावादाची प्रचिती दिसून येते. त्यांच्या मानवतावादी दृष्टिकोनाचे विचार संपूर्ण समाजाच्या कल्याणासाठी आहेत.
गांधींचा मानवतावादी दृष्टिकोन त्यांच्या अहिंसा सिद्धांतावर आधारित होता. गांधींच्या मते, अहिंसा ही हिंसेपेक्षा माणसासाठी अधिक नैसर्गिक आहे. गांधींच्या मते, माणूस मुळात चांगला आहे. त्याला स्वतःला आणि जगाला चांगले बनवण्याची जन्मजात गरज आहे. गांधींच्या मते, अज्ञान आणि अंधविश्वासांपासून मुक्त होणे, विवेकशील आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे, हा मानवतावाद आहे. गांधींच्या मते, शांतता, बंधुत्व, सहिष्णुता, विकास आणि एकता हे मानवतावादाचे मूलभूत सिद्धांत आहेत. यातून गांधीजींचं संपूर्ण चरित्र लक्षात घेतलं की आपल्या एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत राहते, ती म्हणजे त्यांनी विवेकाला फार महत्त्व दिले.
माणसाच्या आयुष्यातील विवेक हरवला तर माणसाचं जगणं हरवतं. असा समाज अविवेकी तर बनतोच, परंतु त्यामुळे त्या समाजात सतत अस्वस्थता निर्माण होते. फॅसिस्ट वृत्ती तयार होऊन माणसं अराजकतेच्या दिशेने वाटचाल करतात. गांधींच्या हयातीतच १९२५ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. ही संघटना एकांगी म्हणजे फक्त “सनातनी हिंदुत्वाचा – त्यातही ब्राह्मणी हिंदुत्वाचा” पुरस्कार करते. इतकेच नव्हे तर आपले उद्दिष्ट साधण्यासाठी हिंसेचा, फुटीचा म्हणजेच फॅसिस्ट विचारांचा अवलंब करते. हे आजवरच्या इतिहासातील अनेक घटनांमधून सिद्ध झाले आहे. याच विचारसरणीच्या मुशीतून तयार झालेल्या एका माथेफिरूने अगदी प्रार्थनेच्या वेळेला गांधींवर गोळ्या झाडल्या आणि त्यांची हत्या केली.
गांधीजींच्या विवेकशील विचारांची कास या देशाने धरली असती तर आजचा समाज विवेकशून्य बनला नसता आणि विवेकशून्य आजची सत्ताधारी राजकीय व्यवस्थाही सत्तेवर आली नसती. राजकीय सत्तेची विवेकशून्यता किती आहे, याचे एक साधं उदाहरण आपल्याला देता येईल. स्वतःला साधू समजणाऱ्या धर्मांध मॅड स्त्रीने गांधींच्या प्रतिमेवर वारंवार गोळ्या झाडल्या. त्याच महिलेला सत्ताधारी व्यवस्थेने आपल्या राजसत्तेचा वाटा मिळवून दिला. यापेक्षा सत्ताधारी व्यवस्थेची विवेकशुन्यता ती कोणती ? अर्थात हे अभावाने झालेले नाही. त्याचे नीट व्यवस्थापन करण्यात आले आणि अशा प्रवृत्तीच्या अनेक लोकांना राजसत्तेत सामावून घेण्यात आले.
ज्यांचा पायाच धर्माच्या आधारावर आहे त्यांना आपल्या देशाच्या निधर्मी परंपरेचा गौरव कधी वाटणे शक्यच नसते. त्यामुळे अशा लोकांना गांधी काय – आंबेडकर काय ? या दोन महामानवांचे चेहरे – विचार अडचणीचे ठरत आले. त्यामुळे सतत गांधींना टार्गेट करणे आणि आंबेडकरांनी या देशाला सोपीविलेल्या संविधानावर हल्ला चढविणे हेच यांचे ध्येय राहिलेले आहे. या देशाचा प्रमुखच गावगुंडासारखा विचार करत असेल आणि तो विचार त्याच्या कृतीतून दिसून येत असेल तर गांधींवर हल्ले होत राहणे, यात काही आश्चर्याची गोष्ट नाही. पण वाईट याचे आहे की अशा गावगुंडाचे अनुयायीही स्वतःची बुद्धी गहाण ठेवून कळपाकळपाने मानवी समाजाला गृहीत धरून असा समाजच नष्ट होण्यासाठी प्रयत्न चालवीत आहेत. पण हेही आपण समजून घ्यायला हवे की यामुळेच गांधींचं महत्व अबाधित राहतं. यातूनच गांधी तहहयात जिवंत असल्याचे प्रत्ययास येते ! ‘अजूनही जिवंत आहे गांधी’ या कवितेच्या प्रस्तावनेमध्ये ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कोकणी लेखक दामोदर मावजो म्हणतात ते खरच आहे; “आज जगाला कधी नव्हे एवढे महात्मा गांधी कालोचित ठरत आहेत. बुद्ध कबीर येशू यांच्या मार्गाने पुढे गेलेल्या मोहनदास करमचंद गांधींना विविधतेत एकता दिसली होती. म्हणूनच माणसातील भेदभावाना त्यांनी मूठमाती दिली होती. सभ्यता, संस्कृती, प्रतिष्ठा याचे मोल त्यांना कळलं होतं. मात्र अशावेळी विकृतीला संस्कृती बनू पाहणाऱ्यांना आडवा येतो तो गांधीविचार. त्यामुळेच त्याला संपवायचे आटोकाट प्रयत्न चालू आहेत. पण इतिहासाची पाने फाडली तरी गांधीविचार फाडता येत नाही. एकदा महात्म्यावर तीन गोळ्या झाडून त्याला मारलं होतं, तरीही गांधी अजून जिवंत कसा राहतो, याचं प्रतीत झालेलं आकलन या दीर्घकाव्यातून मांडायचा प्रयत्न केलेला आहे.”
मावजो यांच्या या उद्गाराचा विचार करताना असे लक्षात येते, की विकृतीला संस्कृती बनविणाऱ्यांनी गांधीचा स्त्रीकडे बघण्याचा मानवतावादी दृष्टिकोन धुळीस मिळवला आहे. महात्मा गांधींचा स्त्री विषयी उदार दृष्टिकोन नाकारून आता पुन्हा स्त्रीवर बंधने घालण्याचा प्रयत्न चालू आहे. तिला स्वतःचा चेहराही पुरुषाच्या मर्जीशिवाय आरशात पाहता येऊ नये, एवढं निष्ठूर सनातनी अनिष्ट परंपरावादीवृत्तीने वातावरण बदलण्याचं काम सध्या जोमात चालू आहे. स्त्री मुक्तीची वाट कायमची बंद व्हावी, अशा योजना आखल्या जात आहेत. एवढेच काय तर स्त्री घराबाहेर पडल्यानंतर तिच्यावर पहारा ठेवणारे कायदेही बनवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तिने काय कपडे परिधान करावेत, तिने चारचौघात काय बोलावं, काय खावं, काय प्यावं यावर वक्रदृष्टी ठेवण्याचे धर्मांध लोक मनसुबे रचत आहेत. खरं तर धर्मांधांना पक्क माहीत आहे, की समाजावर, एकूण व्यवस्थेवर अंकुश ठेवायचा असेल आणि ही एकूण व्यवस्था आपल्या अंकित बनवायची असेल तर स्त्री कधीच बंधनमुक्त होऊ नये, याची काळजी अग्रक्रमाने घ्यायला हवी. याची कारणे अनेक असली तरी यातलं महत्त्वाचं कारण म्हणजे स्त्री हीच खऱ्या अर्थाने मानव कल्याणाची आणि प्रवाहित संस्कृतीची आद्यवाहक असते.
एखादी स्त्री जरी सुसंस्कृत झाली तरी तिच्या गर्भातून येणारा या समाजाचा पुढचा वारस या धर्मांध लोकांच्या वर्चस्वाला सुरुंग लावू शकतो आणि गांधीजींसारखा समाजसुधारक पुन्हा जन्माला येऊ शकतो. कारण बाईने पालनपोषण केलेल्या प्रत्येकाला प्राप्त होत असते दूरदृष्टी. पण यांना नको आहे असा दूरदृष्टीचा समाज जो त्यांना प्रतिप्रश्न विचारेल! ज्या देशात गांधी, आंबेडकर, पेरियार ते दाभोळकर-पानसरे- कलबुर्गी अशा महनीय समाजसुधारक व्यक्ती जन्माला आल्या. त्यांनी या समाजातील सर्वांची बौद्धिक गुलामगिरी नष्ट व्हावी म्हणून प्रयत्न केले. एवढेच काय सॉक्रेटिसच्या परंपरेत काही महान सुधारकांना आपला जीव गमवावा लागला. त्याच देशातील आज अनेकांनी आपली बौद्धिक आत्महत्या केली आहे. हे बौद्धिक आत्महत्या करणारे लोक कोण असतात ? याचा विचार केला की एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे यांना कोणत्याच प्रकारची सुधारणा नको आहे. ते आपल्या मेंदूवरील परंपरेची जळमटं बाजूला करायला बघत नाहीत. इथे फार गमतीची गोष्ट म्हणजे अशा मेंदूहीन समाजाचे नेतृत्व करणारा सगळा वर्ग मात्र स्वतःच्या घरात- कुटुंबात सुधारणावादी असतो.
म्हणजेच त्यांचं जगणं आधुनिक असते. पण स्वतः आणि स्वतःचं कुटुंब सोडून इतर समाजाने मात्र परंपरेचे पालन करावे, हे सनातनी नेतृत्व दांभिक आहे. हे आता सर्वश्रुत आहे, परंतु धर्मा आडून लोकांची माथी भडकविणाऱ्या या नेतृत्वाला ओळखण्यास धर्मभाबडे लोक कमी पडतात आणि इथेच गांधीजींसारख्या महान व्यक्तीबाबत द्वेष पसरणाऱ्याना संधी प्राप्त होते. दिवसेंदिवस गांधीजींच्या नकाराचा जप करणाऱ्यांच्या मेंदूला बधिरता कशी येत नाही? आपल्या कानात गांधीजींच्या नावाचा उच्चारही पडू नये आणि गांधी एका अंशानेही मागे उरू नये, असा प्रयत्न सध्या होताना दिसतोय. तरी या भूमीच्या कणाकणात गांधीजी उरतातच. कारण गांधींचे विरोधक म्हणजे चेहरा आणि मानवी मेंदू गमावलेले मुखवटे आहेत. स्वतःच कळसुत्री बाहुले झालेले स्वतःच्या हातातले. पण अशावेळी त्यांचा फॅसिस्ट चेहरा अधिक विद्रूप दिसतो. याला अजून एक कारण म्हणजे गांधी संपता संपत नाहीत.
उलट गांधीजींचा शांतीचा मार्ग बुद्ध कबीर आणि येशूच्याच मार्गाने जाताना पाहून ते अधिकच हिंस्र बनताहेत. ते एके बाजूला स्वतःला परंपरावादी म्हणतायत, पण गांधीजींचा, बुद्धाचा देशीवाद नको आहे. याचे एक कारण म्हणजे तो स्वीकारला तर आपला धार्मिक उग्र चेहरा गळून पडेल आणि आपल्यातील तथाकथित संस्कृती रक्षणाचे कवचही राहणार नाही. त्यामुळेच त्यांना बुद्धाकडून गांधींपर्यंत वाहत आलेला सर्वांनी सुखात नांदावं, हा शांतीचा मार्गही नको आहे.
गांधींच्या विरोधकांना पूर्ण माहीत आहे, अंतिमत: बुद्ध वगळून गांधीजींना पाहता येत नाही. आणि दुसऱ्या बाजूला गांधींना धर्माच्या बंधनात अडकवलं तर गांधींचा धर्म पॉलिटिकली करेक्ट होता, हेही कळून चुकले आहेत. गांधींनी त्यांच्या विरोधकांसारखा धर्मासाठी माणूस हा विचार कधीच मांडला नाही. हीच नेमकी गोची गांधी यांच्या विरोधकांची झाली असल्याने ते गांधींना क्षणाक्षणाला धिक्कारण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्यांनाही माहीत नाही गांधी एक जग असेपर्यंत जिवंत असणार आहे; कारण या जगाला… मानवतेची तहान भागवण्यासाठी शेवटी पुन्हा गांधींकडेच यावं लागणार आहे !
( सौजन्य – सत्याग्रही विचारधारा )
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.