January 26, 2025
The taste for art is narrowed in the Abhijan Bahujan debate - Ajay Kander
Home » अभिजन बहुजन वादात कलेचा आस्वाद संकुचित होतो – अजय कांडर
काय चाललयं अवतीभवती

अभिजन बहुजन वादात कलेचा आस्वाद संकुचित होतो – अजय कांडर

अभिजन बहुजन वादात कलेचा आस्वाद संकुचित होतो – अजय कांडर
पहिल्या साहित्य संगीत संमेलनाला रसिकांचा उस्फूर्त प्रतिसाद
कविता – गाण्यांची मैफल आणि साहित्य संगीत चर्चाही

कणकवली – साहित्य – संगीतसह कोणत्याही कलाकृतीचा आस्वाद घ्यायचा असेल तर आपली रसिकता सकारात्मक दृष्टीने विकसित केली जायला हवी. या पार्श्वभूमीवर विचार करताना अभिजन – बहुजन वादात कलेचा आस्वाद संकुचित होत जातो. साहित्यात विद्रोह असतो तसा तो संगीतातही असतो. जगभराच्या वाद्यात गिटार वादन हे विद्रोहाचे प्रतीक मानले जाते. कलेच्या रसिकांनी मात्र कोणत्याच कलेत भेद न करता त्याचा आस्वाद घेतला पाहिजे तरच समाजातील रसिकता वाढत जाते असे प्रतिपादन मराठीतील सुप्रसिद्ध कवी तथा चित्रपट गीतकार अजय कांडर यांनी कणकवली वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानच्या नाट्यगृहात आयोजित केल्या गेलेल्या पहिल्या साहित्य संगीत संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना केले.

सिंधुदुर्ग साहित्य संगीत मित्र मंडळातर्फे प्रतिष्ठानच्या नाट्यगृहात कवी कांडर यांच्या अध्यक्षतेखाली आणि संगीत अभ्यास माधव गावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पहिले साहित्य संगीत संमेलन आयोजित करण्यात आले. साहित्य संगीत रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेल्या या संमेलनात बोलताना कांडर यांनी चांगली कविता आणि चांगली गीत रचना याचं नात धूसर असत. म्हणूनच चांगली कविता चांगलं गीत होतं आणि चांगलं गीत चांगली कविताही असण्याची शक्यता राहते. आपल्याकडे भावगीताची परंपरा समृद्ध असून मालती पांडे बर्वे, कृष्णा कल्ले, गजाननराव वाटवे अशा जुन्या जमान्यातील गायकांनी गायलेली भावगीते ही मूळ कविताच होती असेही कांडर यांनी आग्रहाने सांगितले. यावेळी कवयित्री संध्या तांबे यांना मित्र साहित्य पुरस्कार गायिका नेत्रा पाचंगे प्रभू देसाई यांना मैत्री संगीत पुरस्कार आणि चित्रकार सुमन दाभोलकर यांना मैत्री कला पुरस्कार अजय कांडर आणि माधव गावकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी संमेलनाचे स्वागत अध्यक्ष महेंद्र चव्हाण, निमंत्रक सुभाष भंडारे, कविसंमेलन अध्यक्षा प्रमिता तांबे, संस्था पदाधिकारी सत्यवान साटम, वीरेश स्वामी, दीपक माने, राजू राऊत, संतोष कांबळे, सुनील आजगावकर, दिनेश डंबे, विठ्ठल चव्हाण, मंगेश आरेकर, मयुरी चव्हाण, अमर पवार , रमाकांत राणे, राजन धुरी, रेगेश धुत्रे, अभिषेक पेडणेकर, अवधूत सुतार , राजेंद्र चव्हाण, प्रशांत फोंडेकर आदी उपस्थित होते.

माधव गावकर म्हणाले, संगीताचा अभ्यास कधीच संपत नसतो म्हणूनच आपण आयुष्यभर संगीताचा विद्यार्थीच राहिलं पाहिजे. साहित्य संगीत संमेलन असे एकत्रित आयोजित करणे ही संकल्पना अभिनव असून ज्यांच्या बरोबर पूर्वी आम्ही काम केले त्यांच्यासोबत या संमेलनाच्या निमित्ताने आता पुन्हा बसता आले याचा आनंद होतो. कलेच्या क्षेत्रात जी गोष्ट कष्टाने सिद्ध होते तीच गोष्ट टिकत असते. म्हणून कलेत कष्टाला दुसरा पर्याय नसतो. कोकणात खूप दिग्गज लोक कलाक्षेत्रात होऊन गेले यांचं स्मरण अशा संमेलनाच्या निमित्ताने होत असते. हे या संमेलनाचे महत्त्वाचे मोल आहे.
संध्या तांबे म्हणाल्या साहित्य संगीत कला यांचे एकत्रित पुरस्कार देण्याची कल्पना प्रेरणा देणारी आहे. आपण काम करताना आपल्या गुणवत्तेची कदर केली जाते यासारखी चांगली गोष्ट दुनियेत कुठली नाही. साहित्य संगीत संमेलनाच्या आयोजकांनी मैत्र संगीत पुरस्कार देऊन जो सन्मान केला त्यामुळे कलाक्षेत्रातलं वातावरण निकोप आहे यावरही विश्वास बसला आहे. यावेळी नेत्रा पाचंगे प्रभू देसाई, सुमन दाभोलकर या पुरस्कार विजेत्यानी आपले मनोगत व्यक्त केले. तर महेंद्र चव्हाण यांनी संमेलना मागील पार्श्वभूमी विशद केली.

रंगलेली गीत – कवितांची मैफल

संमेलनात विविध गीतांची मैफल आयोजित करण्यात आली. यावेळी सुजित सामंत यांनी संगीत संयोजन केलेली गाणी सविता सुतार, पूनम गुजर विनायक सिद्धू,शिलवंत मयुरेश, प्रकाश मुणगेकर, श्रीधर पाचंगे यांनी सादर करून रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळविला. तर संमेलनाच्या तिसऱ्या सत्रात कवयित्री प्रमिता तांबे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या निमंत्रितांच्या कवी संमेलनात नामदेव गवळी, निशिगंधा गावकर, ऋतुजा सावंत भोसले, मधुकर मातोंडकर, प्रगती पाताडे, प्रज्ञा मातोंडकर,योगिता शेटकर, मंगल नाईक जोशी, रीना पाटील, प्रियदर्शनी पारकर, सत्यवान साटम, विशाल मराठे, प्रा. आर. एन. हेदूळकर, श्रवण वाळवे, आर्या बागवे, संगीता पाटील, रीमा भोसले, निलेश केरकर, ॲड. अर्चना गव्हाणकर, पल्लवी शिरगावकर, संतोष जोईल, किशोर कदम, धर्माजी जाधव, नरेंद्रकुमार चव्हाण, नीकेत पावसकर, हर्षल तांबे, श्रवण वाळवे, वैष्णवी सुतार, रिया परब, समिक्षा चव्हाण, समिक्षा गोसावी आधी कवीनी कविता सादर करून संमेलन उत्तरोत्तर रंगवीत नेले.

राजेश कदम यांनी सूत्रसंचालन केले. सुभाष भंडारे यांनी प्रस्तावना केली तर मंगेश आरेकर यांनी आभार मानले.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading