December 4, 2024
People who lived Gandhi Indumati Jondhale book article by Ajay Kandar
Home » गांधी जगलेली माणसं…
मुक्त संवाद

गांधी जगलेली माणसं…

‘गांधी जगलेली माणसं ‘ हा ग्रंथ जरी आपण वाचला तरी गांधी विचाराच्या प्रभावाची मौलिकता समजून घेणे आपल्याला शक्य आहे ! त्यातून आपल्यात गांधी किती उतरेल हे सांगता येणार नाही पण किमान गांधी यांचे स्मरण तरी आपण करू एवढे मात्र निश्चित !

अजय कांडर
लेखक विख्यात कवी,व्यासंगी पत्रकार आहेत. ९४०४३९५१५५

अनेक लोक सांगत असतात की ” मी गांधी यांच्या जगण्याच्या तुसभरही बाजूला न सरकता गांधींसारखाच जगतो “. पण हे सगळ खोट असत. गांधी यांच्यासारखं हुबेहूब जगता येत नाही. मात्र गांधी यांच्यासारखं जगण्याचा प्रयत्न करता येतो. आणि असा प्रयत्न करून जे प्रामाणिकपणे जगतात ते खरे गांधी अनुयायी असतात. ज्येष्ठ लेखिका इंदुमती जोंधळे यांनी लिहिलेल्या ‘गांधी जगलेली माणसं’ हा ग्रंथ वाचताना आपल्याला याच प्रामाणिकपणाचा प्रत्यय येतो. या ग्रंथातील सर्वच गांधीवादी माणसं ही तत्त्वनिष्ठेची जपणूक करणारी आणि गांधीजींवर निष्ठा ठेवून सचोटीने गांधींसारखा जगण्याचा प्रयत्न करणारी महान व्यक्तिमत्वे आहेत. यापुढे या व्यक्तींसारखी गांधीनिष्ठा ठेवून जगणारी माणसं भेटण्याची शक्यता नाही.म्हणूनच जगण्याच्या नैतिकतेच्या कसोटीला सुरंग लागणाऱ्या या पुढील काळात सदर ग्रंथाचे मोल अभाधित असणार आहे.

या जगात गांधीबाबा एवढा माणसाच्या मनावर गारुड केलेला दुसरा तत्त्ववेता नाही. जगातल्या हाताच्या बोटावर मोजता येतील अशा विचारवंतांमध्ये भारतातल्या दोनच विचारवंतांचा समावेश होतो.ते म्हणजे महात्मा गांधी आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर. गांधींचे वैचारिक मतभेद ज्यांच्याशी होते असे लोकही गांधींना मानत होते आणि गंमत म्हणजे गांधीजींचेही ज्यांच्याशी वैचारिक मतभेद होते त्यांनाही गांधी मानत होते. म्हणूनच गांधी आणि आंबेडकर हे आपापल्या जागी श्रेष्ठ असले तरी दोघांनाही एकमेकांच्या विद्वत्तेबद्दल आदरच होता. त्यामुळेच गांधीनी आंबेडकर यांना घटना समितीचे प्रमुख करण्याचे नाव सुचविले. असे गांधी हे अहिंसेचे पुजारी होते म्हणून अनेकांची गोची झाली. गांधींएवढं ‘पॉलिटिकली करेक्ट’ कोणी नव्हतं. म्हणूनच ते रामाचा उच्चार सतत करत असतानाही त्यांना धर्मातही बांधता येत नाही. कारण त्यांचा राम सत्याचा शोध घेणारा होता. मात्र आजच्या जय श्रीराम मध्ये आणि गांधीजींच्या राम मध्ये मूलभूत फरक आहे; हे लक्षात घ्यावं लागत. या सगळ्याच पार्श्वभूमीवर गांधींना मुस्लिम धार्जिनेही ठरवले गेले आणि प्रत्यक्षात त्यांच्यावर गोळ्या झाडून झाल्यावर आज अनेक वर्ष त्यांच्या प्रतिमेवरही गोळ्या पुन्हा पुन्हा झाडल्या जात आहेत. एके बाजूला प्रचंड द्वेष आणि दुसऱ्या बाजूला गांधींबद्दलची कमालीची आस्था, प्रेम. हा दुर्मिळ भाव गांधींशीवाय या जगात कुणाच्याही वाट्याला आलेला नाही. यामुळेच गांधींचे अनुयायी निर्माण झाले पण त्या अनुयायांचे कळप निर्माण झाले नाहीत.मनोविकास प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘गांधी जगलेली माणसं’ हा ग्रंथ वाचल्यावर आपल्याला गांधीजींना लाभलेल्या द्वेष आणि कमालीच्या प्रेम या दोन्ही भावनांच तीव्रतेने स्मरण होते. कारण या ग्रंथातील सगळीच गांधी जगलेली माणसं फक्त गांधीजींवर शाब्दिक प्रेम करणारी किंवा त्यांच्या प्रतिमेचे पूजन करणारी नाहीत तर त्यांनी स्वतःच्या जगण्यात गांधीजींच्या विचाराचं अनुकरण केलं. हे त्यांच्या जगण्याचं मोल अनमोल असेच आहे.

म्हणूनच इंदुमती जोंधळे यांनी गांधी जगलेली माणसं या ग्रंथात गांधीजीच्या अनुयायांच्या व्यक्तिमत्त्वाचा खराखुरा मांडलेला जगण्याचा वास्तववादी शोध सर्वांनीच आवर्जून वाचायला हवा !
सदर ग्रंथामध्ये एकूण ३८ गांधी अनुयायांवर लेखन करण्यात आले आहे. यात विनोबा भावे, अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे एस.एम. जोशी, अप्पासाहेब पटवर्धन, ग. प्र. प्रधान, यदुनाथ थत्ते, नरहर कुरुंदकर, इंदिराबाई हळबे अशा अनेक महत्त्वाच्या गांधी अनुयायांचा समावेश आहे. हा ग्रंथ वाचताना या गांधी अनुयायानी आयुष्यभर गांधींच्या विचाराचे अनुकरण केले म्हणजे नेमकं काय केलं? तर स्वतःच्या जीवन आणि समाज जीवन यात अंतर राखलं नाही. जे आपलं ते सार्वत्रिक. हा विचार त्यांच्या कृतीतून दिसतो. सहाजिकच गांधींच्या विचाराने प्रभावित होऊन ही व्यक्तिमत्वे समाजासाठी कार्यरत राहिली असली तरी ती स्वतंत्र विचाराची होती म्हणूनच ती समाजासाठी अमूल्य असे योगदान देऊ शकली. प्रसंगी समाजासाठी कार्यरत राहताना समाजाकडूनही त्यांना मानहानी स्वीकारावी लागली. तरी ती समाजासाठीच कार्यरत राहिली. कारण त्यांची कृतीशीलता ही समाजाला उभं करण्याची होती, सामुदायिकतेला महत्त्व देणारी होती. उदाहरणार्थ अप्पासाहेब पटवर्धन यांनी गोपुरी आश्रमाची स्थापना करून तिथे एक मीठ सोडून माणसाच्या रोजच्या जगण्याला आवश्यक असणाऱ्या प्रत्येक गोष्टीची निर्मिती केली. भेदाची दरी नाहीशी व्हावी म्हणून स्वतः मैला वाहून नेला. जातीची उच्च निच्यता कृतीतून संपविली. असाच सामाजिक दायित्वाचा अनुभव हा ग्रंथ वाचताना या ग्रंथातील सगळ्या गांधी अनुयायांचा येतो.

गेल्या दोन वर्षात या देशात सर्वाधिक विषय चर्चेचा राहिला तो हा की राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा. या यात्रेशी अप्रत्यक्षरीत्या महात्मा गांधी यांच्या विचाराची जोड होती. गांधी म्हणायचे, मी कुठलीच गोष्ट आधी समजून घेतल्याशिवाय त्याच्यावर बोलणार नाही. राहुल गांधी यांनी तळागाळातला भारत समजून घेण्यासाठी भारत जोडो यात्रा काढली. तथापि इंदुमती जोंधळे या स्वतः गांधीवादी आहेत. त्यांना या गांधी अनुयायांपैकी अनेकांचा सहवास लाभला. किंबहुना गांधी विचाराने चाललेल्या आश्रमांमध्ये त्या राहिलेल्या, वाढलेल्या आहेत. त्यामुळेच त्यांना गांधी जगलेल्या माणसांचं महत्व कळलं. आपणाला आता तसं तर जगता येणार नाहीच पण किमान त्यांनी लिहिलेला ‘गांधी जगलेली माणसं ‘ हा ग्रंथ जरी आपण वाचला तरी गांधी विचाराच्या प्रभावाची मौलिकता समजून घेणे आपल्याला शक्य आहे ! त्यातून आपल्यात गांधी किती उतरेल हे सांगता येणार नाही पण किमान गांधी यांचे स्मरण तरी आपण करू एवढे मात्र निश्चित !


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading