तुकारामांनी दैनंदिन जीवनशैली सुद्धा अर्थपूर्ण असावी असेही यातून अपेक्षित केले आहे. अप्रत्यक्षपणे आजच्या शिक्षण पद्धती व अध्ययन यादृष्टीने मार्गदर्शक तत्त्वप्रणाली सांगितली आहे. व्यावहारिक कौशल्ये सांगून लोकशिक्षक, प्रबोधनकार आणि सामाजिक जाणीव जागृती करणाऱ्या तुकारामांचे अभंग म्हणजे अमोल ठेवा म्हणावा लागेल.
डॉ. लीला पाटील, कोल्हापूर
अर्थाविणा कासया करावे। व्यर्धचि मरावे घोकुनिया ।।१।।
पोकुनिया काय वेगी अर्थ पाहे। अर्थरूप राहे होऊनिया ।।२।।
तुका म्हणे ज्याला अर्थी आहे भेटी। नाही तरी गोष्टी बोलू नका ।।३ ।।
(४२१२)
तुकारामांनी पाठांतर आणि घोकंपट्टी याबद्दलचे विचार आपल्या या अभंगात सांगितले आहेत. अर्थ न जाणता केलेले पाठांतर है पोकळ शब्द ज्ञान आहे अशी त्यांची भूमिका होती. अशा शब्द ज्ञानाच्या जोरावर पंडित म्हणून मिरवायांवर त्यांनी कठोर टीका केली. पोटासाठी गुरुवाजीचा बाजार मांडणारी मंडळी ही स्वतः अर्थाविना अज्ञानी असतात. मग त्यांच्याकडून दुसऱ्यांना ज्ञान काय मिळणार ? अशी या मंडळींची अवस्था.
कै. मामा दांडेकर एक उदाहरण नेहमी द्यायचे की, भगवद्गीतेतील ‘बहुनि में व्यतितानि जन्मानि तवाचार्जुन’ या वाक्याचा अर्थ काही मंडळी असा लावतात की, ‘अर्जुना, मे महिने अनेक होऊन गेले. पण तुझा जन्म मात्र चार जूनला झाला अशा अर्थ न कळणाऱ्या व नुसती घोकंपट्टी वा पोपटपंची करणाऱ्याबद्दलचे मत व्यक्त करणारा हा अभंग आहे.
पाठांतरामुळे मनुष्य ज्ञानी वा विवेकी न होता केवळ वाचाळ होतो असे तुकारामांना वाटते. शब्दज्ञानाने नाश केला आहे असे ते मानतात. तू जरी पंडित असलास तरी तू केवळ शब्दांचे पांडित्य करीत असल्यामुळे ते खऱ्या ज्ञानी माणसांचे लक्षण नव्हे, असे ते एका अभंगात म्हणतात ‘स्वतःला पंडित म्हणवून घेताना त्याला मोठे सुख वाटत असले तरी त्याचा काय उपयोग ? ते वेद पठण वाया गेले असेच म्हटले पाहिजे. तो दुराचारी मनुष्य वेदांनी सांगितल्याप्रमाणे वागत नाही. समब्रह्म जाणत नाही. असाही मतीतार्थ असलेला अभंग तुकारामांचा आहे. खरे मोल गुणांना असते आणि मिथ्या बोल हे फिके असतात. शब्दांची पोकळ बडबड, निष्फळ असते इत्यादी प्रकारचे विचारही त्यांनी व्यक्त केले आहेत.
व्यर्थ केला भराभर पाठांतर। जोवरी अंतर शुद्ध नाही ।।
घोडे काय थोडे वागविते ओझे। भावेविना तैसे पाठांतर ।।
हा तुकारामांचा अभंग अर्थपूर्ण आहे. म्हणून त्याचा उल्लेख करणे उचित वाटते. जोपर्यंत अंतःकरण शुद्ध नाही तोपर्यंत भाराभर केलेले पाठांतर व्यर्थ आहे हे त्यांनी सांगितले. एका अत्यंत मार्मिक उपमेद्वारे त्यांनी भावशून्य पाठांतराची निरर्थकता दाखवून दिली आहे. घोडे काय थोडे ओझे वागवते का? असा प्रश्न ते उपस्थित करतात. त्याचे उत्तर एका वेगळ्या अर्थाने ते देतात. घोड्याने पाठीवरून कितीही ओझे वाहून नेले तरी पाठीवरील धान्य वगैरेचा प्रत्यक्ष त्याला काही जसा काहीच उपयोग होत नाही, तसेच शब्दांचा भाव समजून न घेता पाठांतर करणे निरर्थक आहे असे ते म्हणतात. ‘ज्ञानाचे आंधळे भारवाही’ असेही तुकारामांना वाटते.
बैलाच्या पाठीवर साखरेच्या गोण्या असतात, पण शेवटी त्याला स्वतःला मात्र कडबाच खावा लागतो. उंट आपल्या पाठीवरून मालाच्या पेट्या वाहतात. पण त्यांना खाण्यासाठी त्यातील माल मिळत नाही. नेहमीचेच खाणे त्यांच्या नशिबी येते.
अशा तऱ्हेने तुकारामांनी अर्थाविना पाठांतर कशाला करावे ? उगाच घोकून कशाला भरावे ? असे प्रश्न केले. घोकून घेतलेले शब्द हे अर्थाशिवाय बोलणे म्हणजे नुसती पोपटपंची होय. ज्याला अर्थ कळलेला आहे, त्यानेच बोलावे. अर्थाची जाण नसेल तर त्यांनी बोलूच नये असेही ते सुचवतात.
आधुनिक शिक्षण तज्ज्ञ हे शिक्षणातील पाठांतर ही अध्ययन पद्धती कुचकामी आहे, असे मत मांडतात. पोपटपंची ही संकल्पना स्पष्टता व आकलन यास अडसर ठरणारी आहे. तेव्हा अर्थ, आशय समजून घ्यावा असे तज्ज्ञांचे मत आहे. प्रगत शिक्षणाची विचारप्रणाली त्या काळात तुकारामांनी मांडलेली आहे. सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी सुद्धा आशययुक्त अध्यापनास महत्त्वाचे स्थान आहे.
‘अर्थाविना पाठांतर’ यास सक्त विरोध करणाऱ्या तुकारामांना लोकशिक्षक म्हणावे लागेल. पोथी, श्लोक पुराण वाचणारे पण अर्थ ज्ञात नसलेले प्रवचनकार सामान्य माणसांची दिशाभूल करतात. धार्मिक विधी संपन्न होत असतानाही ज्या पद्धतीने त्यासंबंधी बोलले जाते त्याचा अर्थ समजण्याशिवायची बडबड अशीच पद्धत काही भटजी अवलंबितात.
शिक्षण, प्रशिक्षण यासंदर्भात तुकारामांच्या अभंगातील विचार लक्षात घेणे उचित आहे. अंतःकरण शुद्ध नाही तोपर्यंत भाराभर केलेले पाठांतर व्यर्थ आहे, असे म्हणणाऱ्या तुकारामांच्या विचारामागील मतीतार्थ लक्षात घेणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या शिकविण्याकडे लक्ष नसेल तर शिक्षकाचे अध्यापन म्हणजे वायफळ बडबड होय. शिवाय शाळेत वा घरात अभ्यास करताना मनाची एकाग्रता नसेल तर केवळ अक्षरांवरून डोळे फिरविणे होईल. भक्ती ही श्रद्धा ठेवून करायची तसे अभ्यास हा मनापासून व आनंददायी चित्ताने करावा असेही त्यांनी अप्रत्यक्षपणे सूचित केले आहे.
तुकारामांनी दैनंदिन जीवनशैली सुद्धा अर्थपूर्ण असावी असेही यातून अपेक्षित केले आहे. अप्रत्यक्षपणे आजच्या शिक्षण पद्धती व अध्ययन यादृष्टीने मार्गदर्शक तत्त्वप्रणाली सांगितली आहे. व्यावहारिक कौशल्ये सांगून लोकशिक्षक, प्रबोधनकार आणि सामाजिक जाणीव जागृती करणाऱ्या तुकारामांचे अभंग म्हणजे अमोल ठेवा म्हणावा लागेल.
वरवर पाहता पाठांतर, घोकंपट्टी, पोपटपंची हे शब्द सहजी वापरले जाणारे आणि ते करणारेही अनेकजण. मात्र तुकारामांनी तो शब्द नसून ती प्रवृत्ती आणि त्याची मर्यादा, फोलपणा तर दाखविला. ढोंगी प्रवचनकार, वाचाळ गुरू महाराज, आणि भोंदू भटजी यांच्याही वृत्तीवर प्रकाशझोत टाकला हे विशेष. शब्द इतके वेचक, उपमा इतक्या चपखल आणि अर्थाचे नवे नवे पदर गुंफणारे तुकाराम हे महाकवी व्यापक अनुभूतीचे दर्शन घडविणारे संतश्रेष्ठ !
डॉ. लीला पाटील, कोल्हापूर
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.