कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातअसे अनेक किल्ले आहेत, ज्यांची नावेसुद्धा आपणास ज्ञात नाहीत. अशा किल्ल्यांचा शोध इतिहासाच्या पानापानातून घेऊन त्या दिशेने लेखकाची भटकंती सुरू होते.
डॉ. बाळासाहेब लबडे
‘अपरिचित दुर्गांची सफर : रत्नागिरी जिल्ह्यातील किल्ले’ हे पुस्तक संदीप भानुदास तापकीर यांनी लिहिले आहे. १९९४ -९५ पासून लेखक सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत भटकंती करतो आहे. या खोऱ्यातील किल्ल्यांचा इतिहास त्याला खूणावतो आहे. हे किल्ले त्याला प्रेरणा देत आले आहेत. किल्ला पाहिला की, त्याचा प्रवास आनंददायी असतो. इतिहासाच्या पोटात तो शिरतो. त्याची शहानिशा करतो. त्याला नवीन किल्ले पाहिले की पराकोटीची ऊर्जा मिळते. परिचित किल्ले तर सर्वांनी पाहिलेले असतातच, परंतु कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात असे अनेक किल्ले आहेत, ज्यांची नावेसुद्धा आपणास ज्ञात नाहीत. अशा किल्ल्यांचा शोध इतिहासाच्या पानापानातून घेऊन त्या दिशेने लेखकाची भटकंती सुरू होते.
कोकणातील वाटा ह्या अनवट वाटा आहेत. न रुळलेल्या वाटांवरून लेखक चालला आहे. त्याने पाहिलेल्या किल्ल्याला जसा एक इतिहास आहे, तसेच माणसासारखे व्यक्तिमत्त्वही आहे. पुस्तक वाचताना आपल्याबरोबर कोकण व इतिहास घेऊन चालायला लागतो. हे किल्ले आपली कहाणी सांगायला, खुणवायला लागतात. या प्रत्येक किल्ल्याची कहाणी लेखक मायेने, ममतेने सांगतो आहे. त्याच्या मनात शिरतो आहे. तेच लिहितो आहे, जे मनात आहे. इतिहासाचे संवर्धन, जतन, वारसा समृद्ध करण्याविषयीची जाज्वल्य वृत्ती त्याच्या ठायी आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील किल्ल्यांचा इतिहास सांगताना आपपर भाव न ठेवता वस्तुनिष्ठ पद्धतीने सांगण्याचा त्याचा प्रयत्न आहे. स्वकीय आणि परकीय उल्लेख तटस्थपणे आले आहेत. त्यामुळे त्याने पूर्वसुरीच्या अभ्यासकांचे संदर्भ शेवटी दिले आहेत. एखाद्या किल्ल्याचा इतिहास सांगताना त्याचे मूलभूत संदर्भही दिले आहेत. त्यावरून इतिहासाची वैधता लक्षात येते. स्थलकाल, व्यक्तिनिर्देश, वर्णने अचूक आहेत. ऐतिहासिक प्रामाण्यता त्यात दिसून येते. एक काळ आपल्या समोर उभा करण्याचे सामर्थ्य लेखकात आहे.
नवीन किल्ल्यांचा शोध ही या पुस्तकाची जमेची बाजू आहे. नवऐतिहासिक ठेवा त्यामुळे वाचकांना उपलब्ध झाला आहे. पुस्तक नव्या ऐतिहासिक खजाण्याचा शोध आहे. रत्नागिरीतील रत्नांचा शोध आणि बोध आपणास होतो. आपण अचंबित होतो. आपल्या आजूबाजूला हे किल्ले असतात. त्यांचा इतिहास आपणास ज्ञात नाही, ही इतिहासप्रेमींची खंत यामुळे संपृष्टात आली आहे. कोकणचा निसर्ग हा समृद्ध आहे. तो पर्यटकांना सतत खुणावत असतो. इथल्या माड – झावळ्या, काजू, आंबा, सुपारीच्या संपन्नतेत हे किल्ले उठून दिसतात. सागराच्या गाजेच्या संगतीने नांदतात ते जलदुर्ग; तर सह्याद्रीच्या शिखरावर विराजमान होतात ते गिरीदुर्ग; तसेच काही गावाने वेढलेले स्थलदुर्गही आहेत. अशा तिन्ही प्रकारच्या किल्ल्यांना आपला स्वत:चा एक इतिहास आहे, तसा भूगोलही आहे.
पर्यटनाचा आवाज आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील २८ किल्ले लेखकाने शोधले आहेत. या किल्ल्यांचे व्यापारी महत्त्व प्राचीन काळापासून आहे. ते लेखकाने उलगडले आहे. या किल्ल्यांची रचना त्याने दिली आहे. त्याची सद्य:स्थिती दिली आहे. तिथे घडलेल्या घटनांचा तपशील काळानुसार दिला आहे. राजापूरचा किल्ला, यशवंतगड, आंबोळगड, साटवलीचा किल्ला, पूर्णगड, रत्नदुर्ग, जयगड, महिमतगड, भवानीगड, विजयगड, गोपाळगड, कासारदुर्ग, कोळकेवाडी, बारवाई, गुढ्याचा किल्ला, माणिकदुर्ग, गोवळकोट, रसाळगड, सुमारगड, महिपतगड, पालगड, गोवागड, फत्तेगड, कनकदुर्ग, सुवर्णदुर्ग, प्रणालकदुर्ग, बाणकोट आणि मंडणगड हे यात समाविष्ट असलेले किल्ले आहेत.
या प्रत्येक किल्ल्याची माहिती दिल्यानंतर जवळपासच्या पर्यटनाच्या स्थळांची यादीदेखील लेखकाने दिली आहे. मंदिरे दिली आहेत, बंदरे, कंपन्याही दिलेल्या आहेत. या पुस्तकाच्या प्रेरणेबद्दल लेखक म्हणतो, ‘मी मुळात इतिहासाचा विद्यार्थी. मी शिवचरित्राचा, शंभूचरित्राचा, इतिहासाचा अभ्यासक. या अभ्यासातूनच या किल्ल्यांकडे ओढला गेलो. परिपूर्ण इतिहास देण्याचा माझा प्रयत्न असतो.’
लेखकाची दृष्टी पारदर्शी आहे. तशीच सौंदर्यशोधक, तळमळीची आहे. इतिहासाविषयी स्वाभिमान, प्रेम, आस्था, निष्ठा, आहे. छत्रपतींविषयी आदर आहे.
निसर्गाच्या सान्निध्यात असलेले किल्ले पाहिले की, कुणाही पर्यटकाला तिथे जावे वाटेल अशी उत्सुकता या लेखनाने वाढवली आहे. इथल्या भटकंतीचा आनंद घेता येतो. इथे जैवविविधता आहे. लोकांनी ट्रेकिंग करावे, त्यांना जंगलाची आवड निर्माण व्हावी, ग्रामीण तरुणांना किल्ल्यातून रोजगार निर्माण व्हावा, किल्ल्यांचे जतन-संवर्धन व्हावे या अनुषंगाने लेखकाने यात भाष्य केले आहे. पर्यटकाच्या नजरेतून लेखनात ललितरंग भरले आहेत. त्यात लालित्य आहे. स्थळाला जिवंत केले आहे; जणू आपण लेखकाबरोबर आहोत असे आपणास वाटते. वृक्षवल्ली, सागरकिनारे, पक्षीवैभव, प्राणीवैभव समृद्ध आहे. त्यांचे अनेक प्रकार यात पाहायला मिळतात. हळदीचे पाणी, घुबडांचे प्रकार, सापांचे अनेक प्रकार,आवाजाचे प्रतिध्वनी, कोळ्यांच्या प्रजाती, शिकारी पक्षी अशी विविधता इथे दिसते. पर्यटनाची दृष्टी असणारे पुस्तक ही याची दुसरी ओळख आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात फिरताना हे पुस्तक आपल्या सोबत असायलाच हवे. हे एक ऐतिहासिक काम आहे. किल्ले उद्ध्वस्त होण्यापूर्वी पाहून घ्यावेत असे लेखकाला वाटते. सध्याची पडझड, शासनाचे दुर्लक्ष पाहून त्याने खंत व्यक्त केली आहे. तरुणांना नवी वाट या पुस्तकामुळे मिळेल. किल्ल्यांना नवसंजीवनी प्राप्त होईल. अंधारात असलेला इतिहास या पुस्तकाने उजेडात आला आहे. म्हणून हे पुस्तक इतिहासप्रेमींना जसे महत्त्वाचे आहे, तसेच पर्यटकांनाही खुणावते आहे.
पुस्तकाचे नाव – ‘अपरिचित दुर्गांची सफर : रत्नागिरी जिल्ह्यातील किल्ले’
लेखक : संदीप भानुदास तापकीर
प्रकाशक : विश्वकर्मा पब्लिकेशन, पुणे
पृष्ठे : १३१
किंमत : १८० रुपये
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.