वाचायलाच हवा असा कुळवाडी दिवाळी अंक ‘शाळा विशेषांक’
शाळा ही प्रत्येकाच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. संस्काराचे बीजारोपण आणि विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास शाळेतून होतो. मानवी जीवनात असलेले शाळेचे महत्त्व जाणून घेण्यासाठी सन २०२४ मधे ‘कुळवाडी ‘ दिवाळी अंक शाळा विशेषांक नक्की वाचायला हवा.
डॉ. योगिता राजकर / 98908 45210
‘दिवाळी-दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा’अगदी खरंय दिवाळीत सानथोरांपासून सगळ्यानाच आनंदाचे जणू भरते येते. दिवाळी साजरी करण्यात अनेक गोष्टींइतकाच दिवाळी अंक हा अविभाज्य भाग बनला आहे. दिवाळीचा आनंद द्विगुणित होतो तो दिवाळी अंकांमुळे.
दिवाळी अंकांना एकशे दहा वर्षांची वैभवशाली परंपरा आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वात दिवाळी अंकांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. विविध आशय विषय घेऊन दरवर्षी दिवाळी अंक प्रसिद्ध होत असतात. एक विशिष्ठ विषय घेऊनही दिवाळी अंक काढले जातात. त्यातीलच एक दिवाळी अंक म्हणजे, कुळवाडी दिवाळी अंक २०२४. या दिवाळी अंकात शाळा या एकाच विषया भोवती गुंफलेले साहित्य संपादक माधव जाधव यांनी प्रकाशित केले आहे.
शाळा ही प्रत्येकाच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. संस्काराचे बीजारोपण आणि विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास शाळेतून होतो. मानवी जीवनात असलेले शाळेचे महत्त्व जाणून घेण्यासाठी सन २०२४ मधे ‘कुळवाडी ‘ दिवाळी अंक शाळा विशेषांक नक्की वाचायला हवा. संपादक डॉ. माधव जाधव यांनी नांदेड इथून हा दिवाळी अंक प्रकाशित केला आहे. शाळा विशेषांक असल्याने मुखपृष्ठावर शाळा आणि शाळेत जाणारी मुले असे विशेषांकाला साजेसे चित्र चित्रकार विजयकुमार चित्तरवाड यांनी रेखाटले आहे. त्यांनीच अंकाची मांडणी व सजावट अतिशय आकर्षक केली आहे. अंतरंगातील रेखाटने जितेंद्र साळुंखे आणि सुनील यावलीकर यांनी रेखाटली असून आशयाला अधिक उठावदार करणारी आहेत. २४८ पृष्ठे असलेला हा दिवाळी अंक लेखन आणि त्यावरील चित्रे यांनी अगदी देखणा झाला आहे.
आठवणी शाळेच्या या पहिल्या विभागाचे संपादन डॉ. माधव पुटवाड यांनी केले आहे. साहित्यिकांनी आपल्या काळातील शाळेच्या आठवणी या विभागात सांगितल्या आहेत. या विभागात डॉ. जनार्दन वाघमारे, डॉ. यशवंत मनोहर, प्रा. इंद्रजित भालेराव, विनायक पवार अशा अनेक मान्यवरांनी यात लेखन केले आहे. या विभागात ‘शाळेचे दिवस’ हा माझ्याही लेखाचा समावेश आहे. शिक्षणविषयक तळमळ, शिक्षण व्यवस्थेची त्या काळातील वस्तुस्थिती, त्या त्या काळातील सामाजिक जीवन, आर्थिक स्थिती या बाबीही या लेखनातून उजागर होतात. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शिक्षण घेत असताना खालेल्या खस्ता, एकूणच शिक्षणाची असलेली स्थितीगती याचे आकलन या विभागातील लेखातून होते. शिक्षणाने व्यक्तिमत्वाची झालेली जडणघडण आणि एकूणच शिक्षण घेताना केलेला अवखळपणा वाचून वाचक आपल्या शाळेचे दिवस आठवतील हे नक्की!
कथा या दुसऱ्या विभागात प्रा. हंसराज जाधव, अशोक पवार या लेखकांसह एकूण दहा लेखकांच्या कथा प्रकाशित झाल्या असून त्याचे संपादन ज्येष्ठ कादंबरीकार डॉ. शेषराव मोहिते यांनी केले आहे. शाळेची आवड निर्माण झाल्यानंतर आपले आयुष्य शाळेने कसे बदलून टाकले हा आशय काही कथामधून व्यक्त होतो. जगाविषयी प्रचंड जिज्ञासा , शाळेचा निरागस काळ , कटू गोड प्रसंग यातून झालेला शाळेचा प्रवास वाचण्यासारखा आहे. शोषितांच्या जगण्यात शाळा कशी असते ? हे अस्वस्थ करणारे चित्र कथातून उलगडते. समाजाचे विदारक वास्तव ‘मला खूप खूप शाळा शिकायची ‘ या अशोक पवार यांच्या कथेत आले आहे. सामाजिक अंगाने लिहिलेल्या या कथा मुळातून वाचाव्या अशा आहेत.
शाळा म्हटलं की आपण आपल्या शाळेच्या आठवणींत रमून जातो. शाळेच्या आठवणीचा हळवा कोपरा प्रत्येकाने आपल्या मनात जपलेला असतो. कुळवाडी दिवाळी अंकात कविता विभागही तितकाच वैशिष्ट्यपूर्ण आहे. डॉ.मोना चिमोटे यांनी कवितांचे संपादन केले आहे. या कवितांमधून शाळेचे भावविश्व, शाळा आणि शिक्षण याविषयीचे चिंतन, शिक्षणाचा बदलते स्वरूप, बदलते व्यवहार अशा व्यापक स्तरावर काही नवे विचार उलगडतात. शोषितांच्या जगण्यात शाळा नावाची गोष्टच नसते अशी खंत ‘त्यांच्या आयुष्याचा कोरा कागद ‘या कवितेत कवी अजय कांडर मांडतात. वेगवेगळ्या प्रतिमासृष्टीतून या विभागातील कविता वाचकास अंतर्मुख करतात. यात कवी कांडर यांच्यासोबतच ज्येष्ठ कवी प्राचार्य सुखदेव ढाणके, लोकनाथ यशवंत, रमेश इंगळे उत्रादकर, उत्तम कोळगावकर, बालाजी इंगळे अशा अनेक मान्यवरांच्या कवितांचा समावेश आहे.
क्षणक्षण बदलत्या माहिती तंत्रज्ञानाच्या जगात शिक्षणाचा विचार त्याबाबत चिंतन पुढील विभागात मांडले आहे. चिंतन शाळेचे असे या विभागाचे नाव असून याचे संपादन जाधव यांनी केले आहे.
शालेय शिक्षणापुढील आव्हाने, सरकारी शाळा प्रणालीचा अस्त, आजच्या शिक्षणापुढील आव्हाने, शालेय शिक्षण धोरण, शिक्षणाची सद्यस्थिती या लेखांमधून शाळा, शिक्षण आणि आताचे जग यांच्याविषयी चर्चा, चिंतन याची मांडणी केली आहे. समाजमनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यांचा विचार केला आहे. वंचितांचे शिक्षण आणि मुलांच्या शिक्षणातील काही सकारात्मक बाबी सुद्धा लेखातून मांडल्या गेल्याने हा विभाग एकांगी न होता सर्वांगाने विचार मांडणारा झाला आहे.
शाळा म्हटलं की विविध उपक्रम आलेच. कारण विद्यार्थ्यांना घडविताना त्यांचा सर्वांगीण विकास करताना उपक्रम खूप महत्त्वाचे असतात. शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणारे शिक्षक सतत काहीतरी नवनिर्मिती करत असतात. त्यातून विद्यार्थ्यांवर संस्कार करत असतात. आपल्यातील कल्पकतेने विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या ऊर्जेला योग्य वळण देत असतात. उपक्रम शाळा आणि शिक्षणाचे या विभागात अशा शिक्षकांनी विविध प्रकारचे राबवलेले उपक्रम आणि केलेले विविध प्रयोग याविषयी सांगितले आहे. या विभागाचे संपादन डॉ. कमलाकर चव्हाण यांनी केले आहे.
फिरता वाचनकट्टा, माझे शिक्षण विषयक प्रयोग, भाषा समृद्धीच्या उपक्रमशील वाटा, माय लेकींचा पत्रलेखन प्रवास, शाळेबाहेरची शाळा असे विविध उपक्रम आणि त्यांची कार्यवाही याबाबत लिहिले आहे. प्रत्येक शिक्षकाने हा अंक आपल्या संग्रही ठेवावा असे मला आग्रहाने सांगावेसे वाटते.
निर्मिती मुलांची या विभागाचे नाव वाचूनच यात काय असेल ते उमगते. अर्थात मुलांनी केलेली अभिव्यक्ती यामधे वाचायला मिळते. एका विद्यार्थिनीची डायरी, शाळा बोलू लागली तर, शाळेचे आत्मवृत्त, कोण ग तू ?,जोतिबा फुले यांना पत्र यासारखे लेख विद्यार्थ्यांनी लिहिले असून कविताही लिहिल्या आहेत. यातून त्यांच्या मनातील शाळा , शिक्षण आणि भोवतालचा परिसर याचे विश्व आपल्यासमोर उलगडते.
लक्षवेधी पुस्तके या विभागात मुलांसाठी प्रेरणादायी पुस्तके निवडून त्यांचा परिचय करून दिला आहे.” ती शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि समाजातील सुजाण माणसांनी वाचावी असे आम्हाला वाटते. ती नक्कीच वाचतील.” हा आशावाद डॉ. रंगनाथ नवघडे यांनी संपादकीयात व्यक्त केला आहे. तोत्तोचान, टीचर माझी काटेमुंढरीची शाळा , देशोदेशीचे शालेय शिक्षण तसेच आणखी काही पुस्तकांचा परिचय या विभागात करून दिला आहे.
एकूणच ‘शाळा’ विषय सूत्र घेऊन त्याच्याशी संबंधित सर्व विषयांची चर्चा व चिंतन विचार आणि भविष्यवेधी शिक्षणासाठी दिशादर्शक विचार कुळवाडी दिवाळी अंकात वाचायला मिळतात. अंकाची निर्मिती सर्वांगसुंदर झाली असून समकाळातील महत्त्वाचा विषय घेऊन केलेली निर्मिती दर्जेदार केली आहे.
पुस्तकाचे नाव – कुळवाडी दिवाळी अंक (शाळा विशेषांक)
संपादक – डॉ. माधव जाधव
मूल्य – ₹ ४१०
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
1 comment
कुळवाडी हे नांव 96 कुळी मराठा समाज आणि कडू मराठा दोघांना इतर जातीतील लोक पुर्वी वापरत.. मराठवाडा मधे ही मराठा म्हणजे शेतकरी जातीला कुळवाडी वापरतात का.. कुळवाडी हे शेती पेशा आणि लष्करी पेशा करत तर कुणबी हा फक्त शेती कसत…. त्यामूळे सध्याचे कुणबी म्हणतात मराठा हे कुणबी नाहित पण ते कुणबी जाती पेक्षा थोडी वरची जातं कुळवाडी आहेत है ते सांगत नाहित .. जसे दलीत पेक्षा मोठी कुंभार.. कुंभार पेक्षा माळी.. माळी पेक्षा कुणबी आणि कुणबी पेक्षा कुळवाडी..