विद्वानाला वारीमध्ये असे अनेक गृहस्थ भेटले. जे मानापमान मानत नाहीत. कोणाची निंदा करत नाहीत. कोणाचे मन दुखावेल असे बोलत नाहीत. दुसऱ्याचे दुःख आपलेच आहे असे मानणारेही येथे त्यांना भेटले. तेव्हा त्या विद्वानाने या वयस्कर गृहस्थांना शोधून नमस्कार केला.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे
मोबाईल – 9011087406
जो मानापमानातें साहे । सुखदुःख जेथ सामाये ।
निंदास्तुती नोहे । दुखंडु जो ।। ३४५ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा
ओवीचा अर्थ – मान व अपमान मनाच्या सारख्या स्थितीने सहन करतो व सुख दुःखे ही ज्याच्या ठिकाणी सारखी मानली जातात व निंदेने आणि स्तुतीने ज्यांच्या मनाची स्थिती दुःखाची व संतोषाची अशी दोन प्रकारची होत नाही.
वारीमध्ये संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका मुक्कामाच्या ठिकाणी दर्शनासाठी ठेवल्या जातात. पादुकांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी उसळते. दर्शन मिळेल का याची शाश्वती देता येत नाही. एकदा वारीमध्ये पादुका दर्शनावेळी एक प्रसंग घडला. एक वयस्कर कुटुंब वारीमध्ये पादुकांच्या दर्शनासाठी आले होते. वयस्कर असल्याने इतक्या गर्दीत त्यांना जाणे शक्य नव्हते. दर्शनाची तीव्र इच्छा मात्र त्यांना होती. मनात माऊलीच्या पादुका आठवूनही दर्शन होऊ शकते. या वयस्कर कुटुंबाने तेच केले. पादुकांचे दर्शन घेऊन येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या ते पाया पडू लागले.
एक विद्वान गृहस्थ माऊलीच्या पादुकांचे दर्शन घेऊन तेथे आला. आपण विद्वान असल्याचा त्याला मोठा गर्व होता. त्या वयस्कर कुटुंबाने या विद्वानासही खाली वाकून नमस्कार केला. त्या विद्वानास वाटले आपल्याला हे लोक ओळखत असावेत यामुळे त्यांनी इतका मान आपणास दिला असावा. ठीक आहे, ठीक आहे, असे म्हणत त्या विद्वानाने त्यांचा नमस्कार स्वीकारला. त्या विद्वानाच्या मागोमाग एक सर्वसामान्य गृहस्थ आला. त्यालाही या वयस्कर कुटुंबाने नमस्कार केला. तेव्हा तो सामान्य गृहस्थ म्हणाला, अहो इतका मान मला कशाकरिता देत आहात? मी एक सामान्य गृहस्थ आहे. तेव्हा ते वयस्कर कुटुंब म्हणाले आपण सर्वसामान्य आहात. असे आपणास वाटत असेल. ठीक आहे. पण आपण माऊलीच्या पादुकांचे दर्शन घेऊन आला आहात. आपण त्यामुळे धन्य झाला आहात. आम्हाला या गर्दीमुळे लाभ घेता येणे शक्य होत नाही. म्हणून ज्या चरणांनी माऊलीच्या पादुकांचे दर्शन घेतले त्या धन्य चरणांना नमस्कार करून आम्ही माऊलीचे दर्शन घेत आहोत.
हे शब्द शेजारी उभा असलेल्या विद्वानाने ऐकले. तेव्हा त्याची विद्वत्ताच गळाली. इतके महान विचार असू शकतात. याचेच त्याला आश्चर्य वाटले. पण काही वेळाने त्या विद्वानाला वारीमध्ये असे अनेक गृहस्थ भेटले. जे मानापमान मानत नाहीत. कोणाची निंदा करत नाहीत. कोणाचे मन दुखावेल असे बोलत नाहीत. दुसऱ्याचे दुःख आपलेच आहे असे मानणारेही येथे त्यांना भेटले. तेव्हा त्या विद्वानाने या वयस्कर गृहस्थांना शोधून नमस्कार केला.
तो विद्वान म्हणाला तुम्ही वयस्कर असाल. सर्वसामान्य असाल. पण आपले विचार हे सर्वसामान्य नाहीत. विचारावर विद्वत्ता ठरते. पण तुम्ही केवळ विचार मांडत नाही तर त्याचे आचरणही करता. आपणच खरे विद्वान आहात. अशा चरणांना आपण सदैव नमस्कार करायला हवा.