हेडाममध्ये नागू विरकर लेखक म्हणून नव्हे, तर माणूस म्हणून जगून गेलेल्या त्यांचा स्व अस्तित्वाचा इतिहास आणतांना दिसतात. आपल्या अस्तित्वाची, जगत गेलेल्या काळाची, भोवतालच्या प्रदेशाची, नात्यांची, मातृभाषेची, लोकसाहित्याची, नैसर्गिक संकेतांची दखल घेताना विशेष नोंदतांना दिसतात.
प्रविण पवार, धुळे
रोज नवं गाव नवी चूल करत मुलखावर जाणाऱ्या, सूर्य चंद्र चांदण्यांचं झुंबर माथ्यावर घेऊन जगणाऱ्या, भुईला अंथरूण रात्र पांघरणाऱ्या आणि तपत्या युगातील मेंढरांची धूळ पिढीपरात सहणाऱ्या माणसांची ही ‘हेडाम’ आहे. जी एका प्रवाहातील पिढ्यानपिढ्यांचं प्रतिनिधित्व करताना दिसते. काळाचा हात धरून नजरेतून माणदेशी प्रदेश डवरताना शब्दांच्या प्रवाहात बनगरवाडी, फेसाटी जरी मराठी साहित्यात या आधी आलेल्या असल्या तरी आत्मनिवेदनाच्या दृष्टीने हेडाम प्रवाह जगून जातांना स्वतंत्र वलंय निर्माण करताना दिसते.
बिऱ्हाड मुलखावर निघताना घराला कुलूप लावून गेल्या नंतरचे पुढील जे प्रश्न निर्माण होतात ते भावनाप्रत आहेत. नात्यांना लढा लावून गाव शिवार ओलांडताना मागे वळूनही न पाहता येणाऱ्या आपल्याच अस्तित्वाच्या सावलीला गवसत नाही स्थिर होण्यासाठी आपली म्हणावी अशी दिशा. कित्येक गाव शिवारं ओलांडत मेंढरांमागे चालत मेंढरांच्या पावलांची परंपरागत धूळ सहणाऱ्या मेंढपालकांच्या अस्तित्वांची नोंद ही हेडाम घेतांना दिसते. मेंढरांच्या कळपात राहून ‘वाडा’तील माणसांचा कळप मेंढरांसारखे पिढीपरात गत जगतात ? की जगण्याचीच सवय करून घेतात ? हे प्रवाह जगणाऱ्या माणसांना आणि लेखकांना बऱ्यापैकी माहीत असावं.
उध्वस्त हंगामानंतर नक्षत्रे सजक होतात. रानाला जेव्हा नवे कोंब फुटतात बाभळीला पिवळी फुले येतात तेव्हा आपलेच आपल्यांची पाहतात वाट ‘वाडा’ येण्याची. काय कमवलं ? काय गमवलं ? काय सहलं ? कसं निभलं ? याचं उत्तर पाठ फिरवून आलेल्या मुलखाला, मेढरांना आणि माणसांनाच माहीत. हेडाममध्ये नागू विरकर लेखक म्हणून नव्हे, तर माणूस म्हणून जगून गेलेल्या त्यांचा स्व अस्तित्वाचा इतिहास आणतांना दिसतात. आपल्या अस्तित्वाची, जगत गेलेल्या काळाची, भोवतालच्या प्रदेशाची, नात्यांची, मातृभाषेची, लोकसाहित्याची, नैसर्गिक संकेतांची दखल घेताना विशेष नोंदतांना दिसतात.
‘मेंढी सर्वच सारख्या वाटणाऱ्या कोकऱ्यातून आपण जन्म दिलेलं कोकरू त्याच्या ढुंगणाचा वास घेऊन ओळखत. वासावरून आपल्याच गर्भातून हे जन्मलय ती ओळखण्याची देणगी तिला परमेश्वरानं (निर्सग) दिलेली असावी.’ [पान नंबर : १०] वरील ही नोंद मला फारच महत्त्वाची व हवीहवीशी वाटली. कारण माणसांच्या कळपात राहून माणूस माणसाचाच बऱ्यापैकी विचार करत आलाय पिढीपरात आणि मानवी अस्तित्वांना नोंदवत राहिलाय. पण नैसर्गिक देणची ही नोंद आधीपासूनच नोंदली जायला हवी होती ज्याची गरज ग्रामीण, भटक्या प्रवाहाला सुरूवातीपासून होती. मुलखावर मेंढरं चरायला नेतांना इतर गाव शिवारातील लोक कसे काट खाऊन असायचे, मेंढरं चोरीच्या बेतात कसे चाल करून यायचे, हे भटक्या जाती जमातीतलं पूर्वीचं टोळीयुद्धाचं वर्णन करताना लेखक त्या प्रसंगाला शब्दात जिवंत करण्याचा प्रयत्न करतात.
हेडाम मधील दोन प्रभावी – उल्लेखनीय व्यक्तीमत्व
{१} ‘सीताआजी’, लेखकाची आजी. ह्या ‘हेडाम’च्या लेखनात तसेच लेखकांच्या जीवनात उमटून दिसणारं व्यक्तीमत्व आहे. सीताआजी, अशिक्षित पण अनुभवांनी पारंगतच. तिचा निर्मळ मनाचा भाव लेखकाच्या जगण्यात आणून देतांना लेखकाला माय बापापेक्षा आजी अधिक प्रिय वाटते. म्हणून सीताआजीला आजही आठवताना लेखकांच्या पापण्यांचे काठ भरुन येणारे आहेत. अजान नात्यातल्या स्पंदनातील आजी – नातवाचा हा गोडवा कदाचितच मातीआड झालेल्या व उगवत्या पिढीला लाभणारा आहे.
{२} ‘ जालिंदर पोळ गुरूजी’, आदर्श शिक्षक कसा असावा ? याचं सर्वोत्तम उत्तर म्हणजे पोळ गुरूजी. पोळ गुरूजींनी जी पिढी घडविली आहे ती खरंच उल्लेखनीय आहे. गुरूजींनी विरकर गुरूजी घडवला तेही अशा काळात ज्या काळात वंचितांना शिक्षणाची समज नव्हती. मातीचा गंध श्वासात भरून शैक्षणिक आकाशाचा अर्थ समजून सांगणारे हे पोळ गुरूजी फारच प्रेरणादायी आहेत.
शिक्षण पर्व
” खिलारी पोरांना शाळा शिकवली पाहिजेती. असं वनवन तुमच्या माघं फिरून काय फायदा. किती कष्टाचं जीवन तुम्ही जगता. पाण्यापावसासात तुमचं किती हाल होतात. तुम्हाला सवय लागलेय म्हणून सोडा पण आम्हाला हे पाहून अंगावर शहारे येतात. तुम्ही घालवलं आयुष्य याच्यात पण या लेकरांच्या वाट्याला कशाला आणता ? आता जग बदलत चाललंय. शिक्षण तिसरा डोळा हाय. पोराबाळांना शिकवून कुठं तरी सुखाचं स्थिर जीवन जगू द्या.!” [पान नंबर : ६५] वरील गुरूजींचा हा संवाद उगवत्या पिढीसाठी आशादायक वाटला. तसेच ‘ आबांच्या खांद्यावर बसलू. आबांनी शाळेत घालण्यासाठी २७ कि.मी. चालत जायाचा घेतलेला निर्णयच माझ्या आयुष्याचा शिक्षण प्रवासाचा पहिला मैलाचा व मोलाचा दगड ठरला असावा. भटकंतीपासून मुक्तीचा हा पाह्यला प्रवास असावा.’ [पान नंबर : ६६] वरील प्रसंग वर्णन करताना मला लेखकांची ओढ शिक्षणासाठी आतुरतेने लागलेली जाणवली. खोरेवाडी ते धुळदेव तीन किलोमीटर पायी चालत जायाचं, सवंगडी सोबत रहायचे म्हणून काही नाही वाटायचं. पण अभ्यासक्रम बुडवायचा नाही, मनानेच मनाशी ठरवलेली ही निरागस भुमिका उगवत्या सूर्याच्या किरणांप्रमाणेच आशादायक आहे.
धनगरांच्या नव्या पालवीला आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देणारी कळ मला पोळ गुरूजींच्या प्रतिमेतून जाणवली. ” नागु राहतोस का माझ्या बरोबर.?” [पान नंबर: ७९] हा प्रश्नच आशादायक आहे लेखकांसाठी. ज्यांच्या पिढ्यानपिढ्या कधी शिक्षणाच्या पायरीला स्पर्शल्या नाहीत, त्यांच्या घरातून आपल्या जगण्याला अर्थ प्राप्त करून घेणारे ह्या आत्मनिवेदनात्मक कादंबरीचा नायक नागू विरकर शिक्षणातून झालेल्या बदलामुळे त्यांच्या समकालीन पिढीसाठी प्रेरकच ठरतात. शिष्यवृत्ती परीक्षा पास होऊन म्हसवड भागात दुसरा नंबर आल्याचा आनंद पोळ गुरूजी, हेडमास्तर, शाळेकरी मित्रांनी साजरा केला. हा आनंद आजीला सांगताना ” मुडद्या कुणाला सांगू नगूस, लोकांना बघवत न्हाय पुढं गेलेलं. तुझा आयबाप हितं न्हायीत. कुठं रस्त्यात एकट्याला गाठून मारत्याली. इरळीत – कापसवाडीत तसं झालं होतं मागंदी.” [पान नंबर: ८५] आजीचा हा संवाद नातवासाठी काळजी वाचक ठरतो. कारण पिढ्यानपिढ्या समाज प्रवाहात माणसाला माणसाची प्रगती सहन झालेली नाहीये, उपेक्षित, वंचित माणसांची प्रगती तर आजही समाजाला सहन होत नाही.
दहावी पास झाल्या नंतरचा जो आनंद व्यक्त झाला आहे तो फारच आशादायक आहे. हवाहवासा वाटणारा आहे. हा आनंद लेखकाच्या आयुष्यात आला नसता जरका लेखकाने शिक्षणाला नाकारलं असतं, म्हणून इथं शिक्षण अजान काजव्यांना देखील आपली चमक सिध्द करायला लावणारे आहे.
‘ समाजात तशी स्वप्नं कोणी दाखवली नव्हती. आदर्श कुणाचा घ्यावा तर तसा दिपस्तंभ कुठे दिसत नव्हता. पाठ्यपुस्तकाच्या आशयातून काय ते जग कळत होतं. पण विश्वास वाटत होता काही तरी कस्ता खाल्ल्या शिवाय इतरांपेक्षा वेगळं काही केल्याखेरीज जगावेगळं होत न्हाय; चांगलं प्रचलित समाजापेक्षा वेगळं जीवन जगायचं असेल तर शिक्षण हा एकच सेतू हाय. जो मला मेंढराच्या समुहातून आदर्श जीवन जगणाऱ्या माणसांच्या समूहात घेऊन जाईल, असं मन निष्कर्ष काढत होतं.’ [पृष्ठ क्रमांक : १४९] बारावी उत्तीर्ण झाल्यानंतरचा मनापासून मनातून निर्माण झालेला हा भाव लेखकाला खरंच सुखद क्षण, आनंद, शिक्षणापासून वंचित असलेल्या प्रवाहातील नवपिढीला प्रेरणा देणारा आहे. ज्यांची पहिली पिढी शिक्षणामुळे आयुष्य जगायला सक्षम झाली, त्यांना हा आनंद व्यक्त करावासाच वाटेल.
महाविद्यालयात प्रेम भाव व्यक्त करताना लेखक दोन दिवसांसाठी का होईना पण ‘रंजना’साठी प्रियकर झालेले दिसतात. विशेष ‘ मी कोणाला तरी आवडलू’ ही भावना मनात उधाण भरती आणतांना दिसते. ह्या प्रेमात दोघांनीही एकमेकांना पत्ते दिले, पण पत्र पोस्टात पडलंच नाही.! हा काळजात नवी स्पंदने उमलणाऱ्या तरूण मनाच्या काळाला लाभलेला अपूर्णांकच वाटतो. परिस्थिती बदलून नव्या वैचारिक अंगाणी आयुष्याला आकार देऊन जगू पाहणाऱ्या सदर तरूणपणाला इथं प्रेम गौण वाटतं. दुसऱ्यांसाठी टाळ्या वाजवता वाजवता आपल्या विविध खेळ कलागुणांनी स्वतःसाठी टाळ्या मिळवणारा हा लेखक. काळाला शब्दात कुरवाळणारा आहे.
शिक्षणासाठी घेतलेलं सावकाराचं कर्ज, इभ्रत जाऊ नये लेखकाच्या आईने मोडलेलं सोनं “आसू द्या कितीबी भारी दागिना माझी पोरं मोठी झाल्यावर करतेली मला. दारातली जनावरं हीच माझ्या दागिन्यागत हायती. मोडा डाग बघू पुढच्या पुढं. पोरं मोठी झाली म्हणजी करतील.” हा आईचा संवाद. आणि ‘पेपरवर खळाळा मणी सांडलं. तसं आईचं डोळ्यातून टपाप आसवं पडायला लागलं’ हा प्रसंग अनुभवताना लेखकाच्या मनातून ‘लागलोच नोकरीला तर पहिल्या दोन पगारातून आईला दागिनाच घेईल ‘ असा मनानी केलेला दृढनिश्चय काळ वाचक आहे. ” नागा माझ्या आईनं दिलेला दागिना म्या आज मोडला तुह्या भविष्यासाठी. मला मिळंल का रं पुढं तुमच्या संसाराच्या राज्यात तरी?” हा आईनं निर्माण केलेला प्रश्न खरंच काळजाला कळ आणणारा आहे. ही कळ आहे स्वतःला शिक्षणातून सिध्द करायची. आणि लेखक हेडाम जगून जातांना सिध्द देखील होतात.
लोकसाहित्याला पुरक असे शब्दार्थ
हेडाम - म्हणजे एक खेळच. [पान नंबर : ५९]
वायदेशात - वाईचा भाग
वाडा - आठ दहा बिऱ्हाडांचा एक वाडा
खिलारी - भटक्या समूहाचा लिडर
गजी - नृत्य हा धनगरांचा पारंपारिक नाद.
पारा - म्हणजे रात्रीची राखन.
नवचंड - म्हणजे धनगर वाडीचा सुख आनंदाचा काळ.
आसामी - मेंढरं बसवल्यावर शेतकरी त्या बदल्यात जे धान्य देतात त्या धान्याच्या वाटणीला 'आसामी' म्हणतात.
गजीघाय - नृत्याचा पंधरा वीस मिनिटात एक प्रकार संपवायचा त्याला गजीघाय म्हणतात. या साऱ्या घायांना चाली लावणारा एक मुखिया गजी नाचतो त्याला 'मोहऱ्या' म्हणतात.
‘हेडाम’. इथं प्रश्न फक्त जगण्याचाच नाहीये, समाजाचा माणूस म्हणून माणसाचा दृष्टीकोन बदलवण्याचा आहे. मान – सन्मानाचा आहे. प्रवाहाची धूळ झटकून ‘आम्हाला’ समजून घेण्याचा आहे. अस्तित्वाला कुरवाळू नका मात्र दुखवूही नका, ही बोंब ठोकण्याचा आहे. शिवारातून घसरत जाणाऱ्या अस्वस्थ संध्याकाळचा आहे आणि जगायचाय प्रवाह म्हणून आस लागल्या उगवत्या सूर्यकिरणांचा आहे. माणदेशातील मातृभाषा सौंदर्य सदर आत्मकथनाला उंचीवर नेतं, प्रासंगिक क्षणे शब्दातून बोलकी होतात, दूर्मिळ होत जाणाऱ्या लोकसाहित्यातील शब्द, लोकगीते, परंपरा याची विशेष नोंद लेखक जगण्यात घेतात. ह्या आत्मनिवेदनात्मक कादंबरीत संवादांपेक्षा प्रसंग वर्णने भरीव आहेत. विशेष ‘हेडाम’चा हा प्रवाह इथं वाचून थांबत नाही, असं वाटतं की आजही हेडाम ह्या भुईच्या पाठीवर कुठे ना कुठे उमलत असावं. कुणी तरी जगत असावं, कुणी तरी जगून लिहून घेण्याचा प्रयत्न करत असावे…
विश्वास पाटील यांची पाठराखण
'बनगरवाडी' या अजरामर कादंबरीच्या अलौकिक रस्त्यावरचा पुढचा पल्ला म्हणजे 'हेडाम' आहे. १९३८ मध्ये व्यंकटेश माडगुळकर यांनी माणदेशी मेंढपाळाचं जगणं पहिल्यांदा साहित्यात आणलं. त्याच माणदेशातील एक धनगराच लेकरू मेंढ्याच्या कळपात वाढलेला, नागु जेव्हा आपल्या व आपल्या समाजाच्या भोगाचे चटके स्वतः त्याच्या बोलीभाषेत शब्दबद्ध करतो तेव्हा सहाजिकच त्याच्या शब्दांना मेंढीच्या कच्च्या दुधाचा सुगंध आहे. शेरडाकरडाच्या लेंड्यामुताचा गंध आहे.
आपली जित्राब घेऊन चारा मिळेल तिकडे रोज नवं गाव नवी चूल करत फिरणाऱ्या वारा, पावसात उघड्या माळावर राहूटी करणाऱ्या 'रानशाळेत' लेखकाचं जीवन गेलं आहे. त्यामुळे तो मोठ्या आगत्याने त्या चित्रमय रित्या वहात्या जीवनाला तुंबा घालून साहित्याचे कुंड किंवा रांजन भरतो. गुरुजनांची कृपादृष्टी शिष्यावर झाल्यावर काय घडतं वाचनीय आहे.
कोकरं, बालींग, खडपा, कोयाळ, मारकुंडा, कोडगा, फासमी कुत्रं, हुर्द, छकाटा, खवीस, किकाळी, पासारी, मोहरक्या, अवकाळ गाबनं पाऊस, कोचाळ, खेकटं, फाजर, हेलगडी, डोकं भंजाळनं, वांबाळ, बावळाट, खैताळ अशा प्रकारे शब्दांची पखरण करत राहतो.
'हेडाम' ही कांदबरी समाजशास्त्र मानववंशशास्त्राच्या अशा अनेक ज्ञानशाखांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा 'दस्ताऐवज' आहे. असे गोड वाङ्मयीन अपघात क्वचितच कधीतरी घडतात. या कादंबरीच्या निमित्ताने माय मराठीच्या ओट्यात नागू विरकर यांनी अपरिचित समर्पक व माळामुरडाच्या शब्दफुलांचा जो झेला मुठीमुठीने ओतला आहे. त्या दृष्टीने 'उपरा' नंतर अशी अजब करामत क्वचितच कोणाकडून घडली असेल. वाचकांना एक अप्रतिम ग्रामीण कलाकृती वाचल्याचा नक्की आनंद होईल. प्रत्येकांनी ती वाचली पाहिजे.
पुस्तकाचे नाव : हेडाम
लेखक : नागु विरकर
साहित्य प्रकार : आत्मनिवेदन कादंबरी
प्रकाशक : समीक्षा पब्लिकेशन
पुस्तक मूल्य : ३२०
वितरक नंबर : ८८५०६४३६३४
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.