साधनेचे हे फायदे विचारात घेऊन तरी साधना करायला हवी. खरे देवदर्शन घडण्यासाठी साधना करायला हवी. कारण अनुभवातूनच शरीरात असणाऱ्या आत्म्याचा आपणास बोध होतो. आत्मज्ञानाची अनुभुती येते. ही अनुभुती नित्य राहावी यासाठी साधना आहे.
राजेंद्र जलादेवी कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406
या उपाधिमाजीं गुप्त । चैतन्य असे सर्वगत ।
तें तत्त्वज्ञ संत । स्वीकारिती ।। १२६ ।। ज्ञानेश्वरी अध्याय २
ओवीचा अर्थ – या देहादी प्रपंच्यामध्ये सर्वत्र चैतन्य गुप्त रुपाने आहे. तत्त्व जाणणारे संत ते ओळखून त्याचेच ग्रहण करतात.
अध्यात्माकडे आता धार्मिक पर्यटन म्हणून पाहीले जात आहे. उतारवयात काशीला जाण्याची पद्धत होती. तसेच धार्मिक स्थळांना भेटी देण्यासाठी लोक जात. आता भेडसावणाऱ्या प्रश्नांना त्रस्त होऊन मनशांतीसाठी देवधर्म करण्याचे प्रकार पाहायला मिळतात. यात अनेकांची फसगतही होत आहे. कारण धर्माच्या नावावर शोषण करणारे, लुटणारेही आता जागोजागी पाहायला मिळत आहेत. कायद्याच्या कचाट्यातही ते सापडत नाहीत. श्रद्धा – अंधश्रद्धा याचा ते बरोबर फायदा घेऊन आपले हीत साधत असतात.
देवदर्शनाला जाण्याने निश्चितच फायदा होतो. धकाधकीच्या जीवनात थकवा दूर व्हावा यासाठी देवदर्शन, धार्मिक पर्यटन जरूर करायला हवे. नव्या जोमाने नव्या कार्याला व्हावून घेण्याची प्रेरणाही यातून मिळते. त्यामुळे जीवनात असे बदल निश्चितच असावेत. ठराविक कालावधीनंतर पर्यटन हे करायलाच हवे. पण अध्यात्माच्या अभ्यासाची जोडही या पर्यटनाला द्यायला हवी, म्हणजे फसगत होणार नाही. अध्यात्म समजून घेऊन आचरण करायला हवे.
नामाचे महत्त्व, शब्दाचे महत्त्व ओळखायला हवे. तरच खरे अध्यात्म आत्मसात होईल. खरे देवदर्शनही घडेल. सोहम हा शब्द आहे. तसा तो स्वरही आहे. तसे ते नामही आहे. जपही आहे. हे समजून जेंव्हा आपण याची साधना करू लागतो तेंव्हाच त्याचे फायदे आपणास होतात. साधनेत मन रमू लागल्यानंतर शरीरात अनेक प्रकारची शुद्ध रसायने धावू लागतात. या रसायनांची अनुभुती साधकाला येते. साधनेच्या तृप्तीचे ढेकरही येतात. अर्थात पचनक्रिया सुधारते. शरीरात असलेले अनावश्यक वायू आपोआप बाहेर पडू लागतात. साधनेमध्ये शरीर हलके वाटू लागते. शरीरातून धावणाऱ्या या रसायनांनी अनेक ठिकाणी गरमपणा जाणवू लागतो. कधी कधी याचा त्रासही वाटू लागतो. जडताही जाणवते. अवघडल्यासारखे वाटते. पण आपले मन आपण साधनेत स्थिर ठेवायला हवे. मनाची चंचलता दूर करून साधनेवर लक्ष केंद्रित करायला हवे. शक्य असेल तितकी एकाग्रता आपण साधन्याचा प्रयत्न करायला हवा. या एकाग्रतेमुळेच मग हे होणारे त्रास आपोआपच कमी होऊ लागतात. या त्रासातूनच खरा आनंद आपणास प्राप्त होतो.
साधनेने शरीराचे वाढलेले तापमान हळू हळू घामही गाळू लागते. अनावश्यक असणारी ही रसायने बाहेर पडल्याने शरीराची क्रियाशक्तीही वाढते. त्वचा तजेलदार होते. आलेल्या घामाला जेंव्हा बाहेरचा वारा लागतो तेंव्हा शरीराला शितलताही जाणवू लागते. हा थंडावा मानसिक शांती अन् समाधानही देतो. या सर्व क्रियेत मनाचा उत्साह वाढतो. साधनेचे हे फायदे विचारात घेऊन तरी साधना करायला हवी. खरे देवदर्शन घडण्यासाठी साधना करायला हवी. कारण अनुभवातूनच शरीरात असणाऱ्या आत्म्याचा आपणास बोध होतो. आत्मज्ञानाची अनुभुती येते. ही अनुभुती नित्य राहावी यासाठी साधना आहे. खरे संत या अनुभुतीत नित्य असतात. त्यातच ते रमतात. शरीरातील चैतन्यच ते स्वीकारतात अन् तसे आचरण ते ठेवतात. शिष्यालाही यात पारंगत करतात. अनुभुतीतून शिष्याला हे बोधामृत ते पाजतात. अशा प्रकारे ही आत्मज्ञानाची परंपरा वृद्धींगत होते. खरे देवदर्शन येथेच घडते.
राजेंद्र जलादेवी कृष्णराव घोरपडे
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.