श्रमाने थकलेल्या देवाला निदान थोडी तरी विश्रांती मिळावी, अवघडलेपणा कमी व्हावा म्हणून पाठ टेकण्यासाठी पाठीला लोड दिला जातो. अगदी पुरातन काळापासून ही परंपरा आहे. तो लोड आषाढ शुद्ध द्वितीये पासून प्रक्षाळपुजा होईपर्यंत असतो.
मीरा उत्पात-ताशी.
तुम्ही विठ्ठलरूक्मिणीचे सध्या काढलेले फोटो पाहात असाल तर तुम्हाला विठ्ठलाच्या मागे लोड लावलेला दिसेल. आणि रूक्मिणी मातेच्या मागे तक्क्या लावलेला. दिसेल. याच्या मागे काय कारण आहे? ही काय परंपरा आहे? असा प्रश्न पडला असेल ना? तर त्याचं उत्तर असं आहे की आषाढी वारीची देव सुद्धा वाट पहात असतो. या विठ्ठलाचं सगळं उलटं आहे. इतर ठिकाणी भक्त देवाच्या भेटीसाठी आतुर असतात. पण इथे देव सुद्धा भेटीसाठी भक्तांइतकाच आतुर असतो.
आषाढी कार्तिकी विसरू नका मज।
सांगतसे गूज पांडुरंग।
असं प्रत्यक्ष विठ्ठल सांगतो आहे. कारण त्याला भक्तांचा नित्य सहवास आवडतो. त्यामुळे जसे भक्त त्याच्या भेटीसाठी आसुसलेले असतात. तसा तोही त्यांच्या भेटी साठी आसुसलेला असतो. त्यामुळेच तो केवळ आणि केवळ त्यांच्या मनमुक्त भेटीसाठी आपले राजोपचार त्यागतो. अन् विटेवर तासन् तास तिष्ठत उभा राहतो. काकडा, अपरान्ह पूजा, धुपारती, शेजारती सगळं सगळं त्यागतो. केवळ नित्य स्नान आणि भोजन इतकेच उपचार करवून घेतो.. ज्यामुळे भक्तमांदियाळींना अविरत भेटता येईल. आणि त्यांचं सुखदुःख जाणता येईल. देवाणघेवाण होईल. कारण देवालाही आपली सुखदुःखं सांगायची आहेत. त्याला हे सांगायला भक्तांशिवाय कोण आहे? तिन्ही त्रिभुवनी नाही मज कोणी। म्हणे चक्रपाणी नामयासी।
इतर उपचारांमध्ये, निद्रेमध्ये कालापव्यय होईल. पर्यायाने भक्तांच्या भैटीचा कालावधी कमी होईल म्हणून देव या साऱ्या गोष्टी त्यागतात. अन् केवळ भक्त भेटीसाठी विटेवर उभे राहतात.
ते अगदी यात्रा संपेपर्यंत. मग रात्रंदिवस उभं राहून देवाला किती शीण होतो. श्रमाने थकलेल्या देवाला निदान थोडी तरी विश्रांती मिळावी, अवघडलेपणा कमी व्हावा म्हणून पाठ टेकण्यासाठी पाठीला लोड दिला जातो. अगदी पुरातन काळापासून ही परंपरा आहे. तो लोड आषाढ शुद्ध द्वितीये पासून प्रक्षाळपुजा होईपर्यंत असतो. आणि देवही प्रक्षाळपूजेपर्यत भक्तभेटीसाठी तिष्ठत उभा असतो.. रूक्मिणीमातेसह…
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.