सावित्री ते जिजाऊ जन्मोत्सव ३ जानेवारी ते १२ जानेवारी दरम्यान साजरा होत आहे. त्यानिमित्ताने जिजाऊ- सावित्रीच्या लेकी..यामध्ये आज डॅा. सुवर्णा नाईक निंबाळकर यांच्या कार्याचा परिचय…
ॲड. शैलजा मोळक
वाचक-लेखक-संपादक-समुपदेशक-व्याखाता
अध्यक्ष शिवस्फूर्ती प्रतिष्ठान व जिजाऊ ग्रंथालय पुणे.
मो. 9823627244
सुवर्णा साळुंखे पाटील १९७५ मध्ये १० वी नापास झालेली मुलगी आज डॅा. सुवर्णा नाईक निंबाळकर.. एक प्रथितयश लेखिका म्हणून नावारूपाला येते. यामागील त्यांची जिद्द, कष्ट, संघर्ष, सातत्य, पतीचा पाठिंबा हे सारं आपल्याला प्रेरणादायी असेच आहे. त्यांचे वडील जिल्हा स्कूल बोर्डाचे चेअरमन व विद्या शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष. खानदानी श्रीमंत कुटुंबात वाढलेली ही मुलगी. स्वतःचीच शाळा असलेली. पण १० वी नापास. वास्तविक २८ वर्षांपूर्वी मुलगी नापास होणे ही बातमी नव्हती. पण आज ही बातमी आहे. आपण अनेक नापास मुलांच्या गोष्टी पाहिल्या आहेत. पुढे हीच माणसं कशी मोठी झाली हे ही पाहिलेय. अशाच डॅा. सुवर्णाताई..
त्याकाळी १० वी नापास मुलगी म्हटलं की लग्न हे ठरलेले. ताईंचेही २ वर्षात कृष्णराव निंबाळकर यांचेशी लग्न झाले. ते अन्न व औषध प्रशासन म.रा.येथे सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यांच्या महाराष्ट्रात बदल्या होत असत. त्यामुळे लग्नानंतर ११ वर्ष ताईंनी केवळ संसार व गृहिणीपद सांभाळले. पण त्यानंतर त्यांना काहीतरी करावे, शिकावे असे वाटत होते. पण १० वी नापास ही अडचण होती. अशातच मुंबईला असताना टिळक विद्यापीठाची जाहिरात त्यांच्या वाचनात आली. तेथील प्रवेश परीक्षा त्या उत्तीर्ण झाल्या व त्यांचा शिक्षणाचा मार्ग खुला झाला. १९९१ मधे त्या टिळक विद्यापीठ पुणे येथून बी.ए. समाजशास्त्र, बीड येथून मराठवाडा विद्यापीठातून एमए समाजशास्त्र पदवी घेतली. १९९३ मधे मुंबई येथील ना.दा. ठाकरसी महिला विद्यापीठातून पी. एचडीचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी झाला. तेव्हा तेथूनच त्यांनी एम ए मराठीची पदवी प्रथम वर्गात मिळवली. १९९८ मधे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांत एम.फिलसाठी प्रवेश घेतला. आणि विश्वास पाटील यांच्या ‘झाडाझडती’ या धरणग्रस्तांच्या विषयावर असलेल्या कादंबरीवर संशोधन करून विशेष प्राविण्यासह पदवी प्राप्त केली. सन २००० मधे रणजित देसाई यांचे समग्र वाड्.मय घेऊन पी.एचडीचे रजिस्ट्रेशन केले. काही कारणाने हे अर्धवट राहिले पण पुढे २ वर्षांनी त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पी. एचडी पूर्ण केली. त्याच वेळी त्यांनी एका दिवाळी अंकासाठी मंत्रीमंडळातील २० मंत्र्यांच्या सौभाग्यवतींच्या मुलाखती घेऊन लेख लिहून ‘गप्पागोष्टी मंत्र्यांच्या गृहिणींशी’ हे सदर केले व त्यांची लेखनाला सुरूवात झाली.
आज त्यांची शोध झाडाझडतीचा, रणजित देसाई यांचे कथाविश्व, गप्पा मंत्र्यांच्या पत्नींशी, समाजक्रांतीकारक राजर्षी शाहू महाराज, ज्ञानाई सावित्रीबाई फुले, भद्रकाली ताराराणी, महाराणी येसूबाई, राजमाता जिजाऊसाहेब, शिवपत्नी महाराणी सईबाई, सरसेनापती उमाबाईसाहेब दाभाडे, करवीर छत्रपती इंदूमती राणीसाहेब अशी ११ संशोधनपर अभ्यासपूर्ण पुस्तके प्रकाशित आहेत. सुखवस्तू कुटुंबात आयुष्य जगत असताना हा ऐतिहासिक वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचे काम ताई निष्ठेने करत आहेत. ‘केल्याने होत आहे रे’ हे ताईंकडे पाहिले की लक्षात येते. या त्यांच्या सर्व वाटचालीत त्यांचे पती व त्यांची मुले-सुना त्यांच्यासोबत कायम ठामपणे उभे राहिले हे त्या अभिमानाने सांगतात.
महिलांना लग्नानंतर आपले करियर करायचे किंवा शिकायचे म्हटलं की अनंत अडचणींना सामोरे जावे लागते. कित्येकदा कुटुंबाकडे, मुलांकडे दुर्लक्ष होईल म्हणून महिलांना काही करू दिले जात नाही किंवा महिला काही करत नाहीत परंतु ताईंनी लग्नानंतर ११ वर्षांनी शिक्षण तर पूर्ण केलेच परंतु आपले साहित्यिक म्हणून स्थान सुध्दा निश्चित केले असे म्हणावे लागेल. शिवाय मुलेही उच्चशिक्षित होऊन आपापल्या क्षेत्रात यशस्वी आहेत. मुलगा शार्दुलसिंह एम.बी .ए. फायनान्स असून सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये मॅनेजर आहे. सुनबाई शिवांजली १७ वर्ष कॉर्पोरेटमध्ये काम केल्यानंतर आत्ता इमेज कन्सल्टंट व सॉफ्ट स्किल्स ट्रेनर आहेत. मुलगी अनघा एम. फार्म असून लुपीन रिसर्च पार्क पुणे या कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून काम करते. जावई डॉक्टर आशिष देशमुख एम.फार्म.पीएच.डी.असुन लुपीन रिसर्च पार्क लिमिटेड पुणे मध्ये मॅनेजर या पदावर काम करतात.
त्यांच्या साहित्यिक योगदानासाठी त्यांना बार्शी तालुका भूषण, सोलापूर समाजभूषण, प्रियदर्शिनी इंदिरा, महाराणी ताराराणी, राजमाता जिजाऊ, बालगंधर्व परिवार, राष्ट्रशाहीर अमरशेख पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. अशा या कर्तृत्ववान जिजाऊ सावित्रीच्या लेकीला मानाचा मुजरा..!!
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.