वाचन हे सर्वांगीण , बहुआयामी, बहुसांस्कृतिक जाणीवेने समृद्ध आणि संपन्न व्यक्तिमत्त्व तयार करणारे, कल्पकता वाढवणारे, जीवनाचे विविधांगी भान देत, सर्व धर्म, संस्कृती, माणसे यांचा समान आदर करायला शिकवणारे आणि सभ्य, सुसंस्कृत समाज निर्मिणारे माध्यम म्हणूनच हजारो वर्षे टिकलेले माध्यम आहे.
डॉ श्रीपाद भालचंद्र जोशी
- दूरचित्रवाणी, मोबाईल या सारखी नव तंत्रज्ञानाधारित माध्यमे पुस्तक वाचनाला कधीच पर्याय ठरू शकणार नाहीत
- वाचन हे समग्र व्यक्तिमत्त्व आणि सभ्य, सुसंस्कृत समाज घडवण्याचे महत्त्वाचे माध्यम
- डॉ श्रीपाद भालचंद्र जोशी यांचे वक्तव्य
दूरचित्रवाणी, व्हाटस् अप, गुगल, मोबाईल या सारखी नवतंत्रज्ञानाधारित माध्यमे ही वाचन, ग्रंथ, पुस्तक या माध्यमाचा कधीच पर्याय होऊ शकत नाहीत कारण या माध्यमांचे हेतूच परस्परविरोधी आणि पूर्णतः भिन्न आहेत. वाचन हे सर्वांगीण , बहुआयामी, बहुसांस्कृतिक जाणीवेने समृद्ध आणि संपन्न व्यक्तिमत्त्व तयार करणारे, कल्पकता वाढवणारे, जीवनाचे विविधांगी भान देत, सर्व धर्म, संस्कृती, माणसे यांचा समान आदर करायला शिकवणारे आणि सभ्य, सुसंस्कृत समाज निर्मिणारे माध्यम म्हणूनच हजारो वर्षे टिकलेले माध्यम आहे. दूरचित्रवाणीसारख्या बाजार आणि बाजारू संस्कृतीला हवे तसे जग निर्माण करणाऱ्या माध्यमांमुळे वाचन आणि वाचनाधारित सभ्य समाज नष्ट केला जातो आहे. घराघरांतून मुलांवर वाचन संस्कार करणारा पालक त्यामुळे हरवला आहे, असे मत ज्येष्ठ कवी, संवाद – माध्यम तज्ज्ञ आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे पूर्वाध्यक्ष डॉ श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी धरमपेठ राजाराम वाचनालयातर्फे आयोजित एका कार्यक्रमात बोलतांना काढले.
धरमपेठ राजाराम वाचनालयाने मुलांसाठी संपूर्णपणे नि:शुल्क स्वरूपात पुस्तके वाचण्यासाठी उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमाचे उद्घाटन करतांना ते बोलत होते. या वाचनालयाचे कार्यवाह अनिल चनाखेकर यांनी वाचनालयातील पुस्तके झोपडपट्ट्यांमध्ये नेत तेथील मुलांचे पुस्तके आणि वाचनाशी जे नाते जोडले होते त्याचे स्मरणही डॉ. जोशी यांनी करून दिले.
सुमारे पन्नास वर्षांपूर्वी वाचन संस्कृती, ग्रंथ संस्कार, मुलांपर्यंत पुस्तके पोहचवण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ, शासनाची जिल्हा आणि विभागीय ग्रंथालये, शासनाचे ग्रंथालय संचालनालय हे सारे मिळून कशी धडपड करायचे, गावोगावी ग्रंथप्रदर्शने केली जायची, विभागीय ग्रंथालयात ‘ वाचक व्यासपीठ’ सारखे भरपूर उपस्थितीचे कार्यक्रम कसे होत व वाचन संस्कार त्यातून मोठ्या प्रमाणावर कसा होत होता यावर सविस्तर माहिती डॉ जोशी यांनी दिली.
रंजना पाठक यांनी अनुवादित केलेल्या सत्यजित रे यांच्या किशोर कथा संग्रहातील ‘ माकडांचे पूर्वज वानर’ या कथेचे सुंदर वाचन केले. तर कार्यवाह अनिल चनाखेकर यांनी पुस्तके मोफत उपलब्ध करून देणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली.
1 comment
Jion