April 25, 2024
A great contributor to the service of Marathi literatur Dr Snehal Tavare
Home » मराठी साहित्य सेवेत भरीव योगदान देणाऱ्या डॉ. स्नेहल तावरे
मुक्त संवाद

मराठी साहित्य सेवेत भरीव योगदान देणाऱ्या डॉ. स्नेहल तावरे

सावित्री ते जिजाऊ जन्मोत्सव ३ जानेवारी ते १२ जानेवारी दरम्यान साजरा होत आहे. त्यानिमित्ताने जिजाऊ- सावित्रीच्या लेकी..यामध्ये आज डॅा. स्नेहल तावरे यांच्या कार्याचा परिचय…

ॲड. शैलजा मोळक
वाचक-लेखक-संपादक-समुपदेशक-व्याखाता
अध्यक्ष शिवस्फूर्ती प्रतिष्ठान व जिजाऊ ग्रंथालय पुणे.
मो. 9823627244

स्नेहवर्धन प्रकाशन व स्नेहवर्धन रिसर्च इन्स्टिट्यूटच्या संचालक डॅा. स्नेहल तावरे, डॅा. पंजाबराव जाधव यांची कन्या. आज वयाच्या सत्तरीतही साहित्यिक क्षेत्रात कार्यरत आहेत. एमए पी.एचडी. होऊन सन १९८४ पासून मॅाडर्न कॅालेजात मराठीच्या प्राध्यापक झाल्या. १९९७ पासून प्रपाठक. पदवीत्त्युर मराठी विभाग आणि मराठी संशोधन प्रमुख म्हणून कार्यरत. १९८४ ते २०१७ पर्यंत मॅाडर्न मधे त्यांची यशस्वी कारकीर्द झाली. सन १९८४ ला त्यांनी ‘शिवछत्रपतींवरील दीर्घकाव्ये आणि महाकाव्ये: एक परामर्श’ या विषयावर पीएचडी केली आहे. याशिवाय त्यांची साहित्य संपदा पाहिली तर सुमारे ४४ पुस्तके प्रकाशित आहेत. यात ज्ञानेश्वरी व २० वे शतक, साहित्याने मला काय दिले ?, श्री छत्रपती शिवाजी महाराज, छ. शिवाजी महाराजांवरील महाकाव्य, भारतीय संतांचे योगदान, देश-विदेशातील विविध संस्कृतींचे स्वरूप अशा विविध विषयांवरील पुस्तकांचा समावेश आहे. तसेच सुमारे इतर ३५ पुस्तकांना त्यांनी प्रस्तावना दिली आहे.

आकाशवाणीवर अनेक व्याख्याने व परिसंवादातून सहभाग, दूरदर्शनवर एक नाटक, मॅारिशस, दुबई, थायलंड, सिंगापूर, लंडन, स्वित्झर्लंड, मलेशिया, मॅास्को, जपान, श्रीलंका, बाली, भारत या ठिकाणी २५ आंतरराष्ट्रीय आंतरविद्याशाखीय परिषदांचे आयोजन त्यांनी केले आहे. २५ आंतरराष्ट्रीय परिषदा घेणे हे तसे सोपे नाही पण ताई एक उत्तम प्रशासक ,आयोजक या असल्याने त्यांनी २५ आंतरराष्ट्रीय परिषदा यशस्वीपणे घेऊन दाखवल्या. ही खरोखरच मराठी माणसाच्या दृष्टीने अभिनंदनीय अशी गोष्ट आहे ताईंनी केलेले कार्य हे मराठी भाषा व साहित्याच्या सर्वांगीण वृद्धीच्या दृष्टिकोनातून फारच महत्त्वाचे आहे. भविष्यात शासन दरबारी आपल्या कार्याची नोंद व्हावी अशी माझी स्वतःची प्रामाणिक इच्छा आहे. प्रकाशक म्हणूनही आपण यशस्वी असा ठसा उमटवलेला आहे .एक उत्तम शिक्षक म्हणूनही आपण नावाजलेला आहात .ब्रिक्सने आपला यथोचित सन्मान केलेला आहे ही महाराष्ट्राच्या दृष्टीने अभिमानची गोष्ट आहे.

स्नेहवर्धन प्रकाशनच्या माध्यमातून १९९० पासून आजवर १२५० पुस्तके प्रकाशित असून यात मराठी, हिंदी, इंग्रजी व उर्दू पुस्तकांचा समावेश आहे. त्यांच्या अनेक पुस्तकांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार, महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक पुरस्कार असे अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ताईंनी ८ वर्षाच्या मुलीपासून ते १०० वर्षाच्या आजीच्या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे. ताईंनी आजवर एकूण ३० मान्यवरांच्या मानपत्राचे लेखन केले आहे.

‘मराठी वाचवा.. मराठी जगवा’ असे म्हणत न बसतां त्यांनी मराठी साहित्य सेवेत भरीव योगदान दिले आहे. अनेक शैक्षणिक पुस्तके तर त्यांनी प्रकाशित केलीच पण मराठी भाषा व साहित्य, शुध्दलेखन अशा विषयांवरील पुस्तकेही त्यांनी लिहून प्रकाशित केली आहेत. लेखक व प्रकाशकांना भरीव पुरस्कार देणारी स्नेहवर्धन रिसर्च इन्स्टिट्यूट ही एकमेव संस्था असावी. उत्कृष्ट पुस्तक निर्मितीसाठी सन १९९७ पासून २७००० रुपयांचे ९ पुरस्कार दिले जातात.

ताईंना शैक्षणिक व साहित्यिक योगदानामुळे सन २०१० मधे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाच्या पहिल्या महिला अध्यक्ष होण्याचा मान मिळाला. भारती विद्यापीठ, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड, सेंट मीरा कॅालेज पुणे, सोलापूर विद्यापीठ अशा विविध ठिकाणी ताई स्वीकृत सदस्यपदी कार्यरत आहेत.

कोणत्याही महिलेला आपल्या क्षेत्रात पुढे जाताना तिचे कुटुंब पाठीशी असणे महत्वाचे असते. तसेच ताईंना त्यांचे पती डॉ. लालसिंह तावरे यांनी स्वतःचा व्यवसाय सांभाळत त्यांना पूर्ण स्वातंत्र्य दिले. आवडीच्या क्षेत्रात काम करायची मुभा दिली. ताईंनी नोकरी करत असतानाच स्नेहवर्धन प्रकाशनची निर्मिती करून आपला व्यवसाय वाढवला. ताईंना २ मुले असून ॲड. शिवजित तावरे हे स्वतंत्र व्यवसाय करतात तर सुनबाई सौ. मधुमिता तावरे मायक्रोबायोलॉजी मध्ये पीएच. डी. करत आहेत. डॉ. हर्षवर्धन तावरे एम बीए., पीएचडी असून सुनबाई सौ मंजिरी तावरे एम टेक , एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगमध्ये पीएच.डी करत आहेत. ताईंच्या वैविध्यपूर्ण कामगिरीसाठी त्यांना कर्तृत्ववान महिला म्हणून मराठा चेंबर्स ॲाफ कॅामर्स, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी अशा विविध संस्थांतर्फे सन्मानित करण्यात आले आहे. तसेच आदर्श शिक्षक पुरस्कार, राजमाता जिजाऊ पुरस्कार असे विविध पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. अशा या कर्तृत्ववान जिजाऊ-सावित्रीच्या लेकीला मानाचा मुजरा..!!

Related posts

एकात्म साहित्य अन् समाजाचा अनुबंध सांगणारा ऐतिहासिक दस्ताऐवज

 नफरत छोडो… भारत जोडो

दुसऱ्यात भगवंत पाहाणे हा सुद्धा भक्तीचाच प्रकार

Leave a Comment