April 17, 2024
Wari article by sunetra Joshi
Home » वारी एक अनुभव ….
काय चाललयं अवतीभवती

वारी एक अनुभव ….

कुणी डोक्यावर तुळस घेऊन तर कुणी पताका हाती घेऊन विठुच्या भजनाच्या तालावर चालत होते कुणी नाचत होते. फुगड्या घालत होते. अशा भक्तीपूर्ण वातावरणात वारी मारुती मंदिर ते विठ्ठल मंदिर चालली होती.. बहुतेक प्रथमच एवढ्या संख्येने लोक रस्त्यावर बघायला मिळाले.

सौ सुनेत्रा विजय जोशी
रत्नागिरी.

विठुचा गजर हरीनामाचा झेंडा रोवला… ये ग ये ग विठाबाई.. निघालो घेऊन विठुची पालखी.. अशा गजरात वारी सुरु झाली . नेहमी मनात यायचे खरेच जे वारकरी असे चालत जातात नक्की काय वाटत असेल त्यांना. आपली इच्छा तर खूप असते. पण वारीला जाणे मात्र जमत नाही. जमत नाही असे नाही पण आपणच संसारात स्वतःला खूप गुरफटवून घेतो. मी सुद्धा त्यातलीच एक. त्यामुळे जेव्हा रत्नागिरी मधे वारीचे आयोजन मारुती मंदिर ते विठ्ठल मंदिर असे झाले तेव्हा विचार केला त्या पंढरपूर वारीचा योग येईल तेव्हा येईल पण इथे इतके तरी जाऊन बघू या. तेव्हा मी लगेच ठरवले की आपण जायचे. . आणि त्या विठुरायाच्या कृपेने काही घरगुती किंवा तब्येतीची अडचण न येता जायला जमले. खरे तर वेधशाळेने अतिवृष्टीचा अंदाज वर्तविला होता. पण आश्चर्य म्हणजे विठुरायाचे देऊळात दर्शन होईस्तोवर पावसाने स्वतःला रोखून धरले. जणू तो पण वारी बघून मगच कामाला म्हणजे बरसायला जाऊ असे म्हणून बरसला नाही. आणि स्वतःच भक्तिरसात चिंब न्हाला. त्यामुळे सगळ्या भक्तांना पावसाच्या नव्हे तर भक्तिरसाच्या धारेत चिंब भिजता आले.

कुणी डोक्यावर तुळस घेऊन तर कुणी पताका हाती घेऊन विठुच्या भजनाच्या तालावर चालत होते कुणी नाचत होते. फुगड्या घालत होते. अशा भक्तीपूर्ण वातावरणात वारी मारुती मंदिर ते विठ्ठल मंदिर चालली होती.. बहुतेक प्रथमच एवढ्या संख्येने लोक रस्त्यावर बघायला मिळाले.

दोन वर्षे देवळे पण बंद होती. त्या पार्श्वभूमीवर तर लोकांना विठू दर्शनाची आस जास्त लागली होती. तीन तास कुणाला न तहान लागली न भूक लागली कशाकशाची आठवण नव्हती.नेहमी थोडे चालून आल्यावर दुखणारे पाय आज दुखत नव्हते आणि घरी आल्या नंतर पण दुखले नाही. कदाचित आपली पावले तोच डोक्यावर धरून चालत असेल का? आतून एक प्रवाह वाहताना जाणवत मात्र होता. यालाच अनुभूती म्हणतात का? त्याची पालखी खांद्यावर घेताना वाटले आपला भार सांभाळणारा तो. आणि आज क्षणभर का होईना तो आपल्या खांद्यावर विसावला.जसे आईवडील मुल लहान असते तेव्हा त्याचे बोट धरुन चालवतात. मग तेच मुल मोठे झाल्यावर आपण म्हातारे झालो की आपले बोट धरते.

तेव्हा आपल्याला जितका आनंद होतो. जसा आनंद होतो. तसा विठुला पण भक्तांच्या खांद्यावर विसावल्यावर होत असेल का? तो पण पुन्हा नव्याने जगाचा भार सांभाळण्यासाठी ताजातवाना होत असेल का? आत्मा म्हणून काहीतरी दिव्यशक्ती आहे याची जाणीव होते. एक वेगळीच ओढ त्या परमात्म्याची जाणवते. एरवी आपण देवळात देव दर्शनासाठी जातो ते वेगळे. आणि वारीसोबत जातो ते वेगळे हे सुद्धा जाणवते. ती जाणीव नेमक्या शब्दात पकडता नाही येत. कदाचित सगळ्या लोकांच्या मनातील भावलहरी एक होऊन एक वेगळी वातावरण निर्मिती होत असावी.सगळ्यांमधल्या सकारात्मक उर्जेचे एखादे मंडल तयार होत असावे.

भारावलेल्या त्या अवस्थेला काही नाव देता येणार नाही. चैतन्य जाणवते. हे चैतन्य म्हणजेच माझा विठु असेल का?त्याच्या पायावर डोके टेकवताना मनात काही मागणे नव्हते. फक्त तो भेटला याचा आनंद होता. आणि आपल्या आत त्याच्या भेटीची तीव्र आस होती हे जाणवले. ही वारी एक उर्जा देणारी झाली. ही उर्जा आता पुढच्या वारीपर्यंत नक्कीच पुरेल. संतमहंत विठुला माऊली म्हणतात आणि पंढरीला माहेर. पण तसे का म्हणतात ते आता उलगडले. किती सार्थ उपमा.
विठु माझी माऊली.. माझे माहेर पंढरी.किती सार्थ उपमा खरोखरी.

Related posts

महावितरण डबघाईस…!

रानमित्र – माणूस आणि प्राणी यांच्यातल्या अनोख्या नात्याची अदभूत गोष्ट

मानवतेची गुढी

Leave a Comment