November 22, 2024
Kalavati is a self-sufficient farmer after the suicide of her husband
Home » शेतकरी पतीच्या आत्महत्येनंतर स्वावलंबी शेती करणारी कलावती
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शेतकरी पतीच्या आत्महत्येनंतर स्वावलंबी शेती करणारी कलावती

ओळख : वेगळी वाट चोखाळणाऱ्या नवदुर्गांची..!

पहिली शिक्षण घेतलेल्या, शेतीमातीत कष्ट करून स्वतःच्या पायावर उभ्या राहून स्वावलंबी शेती करणाऱ्या, मकाम या संस्थेत सक्रिय राहून सुमारे १००० महिलांना आजवर सक्षम करणाऱ्या, यशवंतराव प्रतिष्ठान मुंबईचा यशस्विनी पुरस्काराच्या मानकरी ठरलेल्या कलावती सवंदडकर या एकल महिला आज वसमत तालुक्यात अनेक महिलांच्या प्रेरणा ठरत आहेत.

ॲड. शैलजा मोळक
लेखक, कवी, समुपदेशक, व्याख्याता
अध्यक्ष शिवस्फूर्ती प्रतिष्ठान व जिजाऊ ग्रंथालय पुणे
मो. 9823627244

कलावती ताईंचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला. आईवडीलांची परिस्थिती बेताची असल्याने त्यांनी पहिलीलाच शाळेत घातले पण पहिली पास होताच त्यांचे शेतकरी घरात लग्न करून दिले. वयाच्या १४ व्या वर्षी त्यांना पहिली मुलगी झाली. ताईंना शेतातील काहीही काम येत नव्हते पण त्यांच्या सासूने त्यांना लहानपणापासूनच घरकाम व शेतीकाम शिकवले. लहान वयातच त्यांना अतिशय कष्ट करावे लागले. कालांतराने त्यांना आणखी एक मुलगी व मुलगा झाला. शेतकरी कुटुंबात काम व मुलीचे लग्न हे अत्यंत महत्वाचे मानले जाते त्याप्रमाणे मुलीच्या लग्नासाठी सावकाराकडून कर्ज घेतले. लग्न करून दिले. दरम्यान लहान मुलगी डेंग्यूने वारली. नापिकी, दुष्काळ, कर्ज या परिस्थितीला कंटाळून त्यांच्या पतीने २००४ ला आत्महत्या केली. वयाच्या ३० व्या वर्षी ताई विधवा झाल्या. शिक्षण नाही. शेती व घर याशिवाय बाहेरचे जग माहीत नसल्याने जगायचे कसे ? सावकार व पाहुण्यांचे पैसे कसे द्यायचे हा प्रश्न निर्माण झाला. आपण आजवर पाहिले की, शेतकरी आत्महत्या करतो पण त्याची पत्नी मुलांसाठी पदर खोचून अतिशय कष्टाने मुलांना वाढवते. शिकवते. मोठी करते. कष्टाने, जिद्दीने जगायचा प्रयत्न करते. ती आत्महत्या करत नाही. बाई कष्टाळू, सहनशील असते हे वारंवार सिध्द होते. ती जगण्याचे पर्याय शोधत असते.

कलावतीताईंनी मुलगा आठवीपर्यंत शिकवला. पण मुलाचे शिक्षण मात्र त्या परिस्थितीमुळे करू शकल्या नाहीत याचे दुःख त्यांना आहे. पतीनिधनानंतर ताईंनी हिंमत न हारता पर्यावरणस्नेही स्वावलंबी शेती करायला सुरूवात केली. स्वावलंबी शेती म्हणजे सेंद्रिय शेती, बिना खताची, औषधविरहित शेती. अशा पध्दतीच्या शेतीची माहिती त्यांनी आजपर्यंत १५० महिलांपर्यंत पोहोचवली आहे. सध्या ताई २ एकर शेतीत सोयाबीन, कापूस अशी पिके घेतात. पण ती वर्षभर उदरनिर्वाहाला पुरेशी ठरत नसल्याने त्या व त्यांचा मुलगा दोघेही इतरांच्या शेतात शेतमजुरी करतात. सुदैवाने ताईंची सासरची मंडळी चांगली आहेत हे ताई अभिमानाने सांगतात. सारेच शेतात कष्ट करणारे आहेत. परंतु स्वतः शेती कसायला सुरूवात केली तेव्हा अशी शेती करायला शेतीची जी अवजारे लागतात ती घेण्यासाठी ताईंकडे पैसे नव्हते. मग ताईंच्या असे लक्षात आले की, पती नसलेली मी एकटीच नाही तर माझ्यासारख्या अनेक महिला गावात आहेत. ताईंनी अशा महिलांशी संवाद साधून त्यांना एकत्र करून १० महिलांचा महिला बचत गट स्थापन केला. बचतीच्या माध्यमातून कर्ज घेतले व सर्वांनी मिळून शेतीला लागणाऱ्या अवजारांची खरेदी केली. आणि जिच्या शेतात काम तेथे सर्वांनी एकत्रित जाऊन शेतीत कसायला सुरूवात केली. परस्परांच्या मदतीने १० महिलांची शेती सुरु झाली. इतरांना द्यावा लागणारा रोजगार वाचला. प्रत्येकीच्या शेतात २ दिवस काम केले तर ते मोफत व त्यापेक्षा जास्त दिवस काम केले तर एकमेकींना रोज देणे आवश्यक हे ठरवले. यामुळे परस्परांत भगिनीभाव निर्माण होऊन सर्वांनाच मदत होऊ लागली.

ताई मकाम (महिला किसान आधार मंच) या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून वसमत तालुक्यात कार्यरत आहेत. या संस्थेमार्फत शेतकरी महिलांचे सक्षमीकरण, त्यांना घरकुल सुविधा, ऊसतोड कामगारांचे प्रश्न, त्यांना रहायला घर, पाणी सुविधा, त्यांच्या मुलांचे शिक्षण अशा विविध गोष्टींवर ही संस्था काम करते. कोणतेही काम करायला शिक्षणच हवे हे ताईंनी खोटे ठरवले. हिंमत, कष्ट, प्रामाणिकपणा, सातत्य व भगिनीभाव जोपासत ताईंनी आज मकामच्या माध्यमातून वसमत तालुक्यात हजारो महिला एकत्रित करून सक्षम केल्या आहेत. त्यांना बचतगटाची माहिती व फायदा सांगत स्वतःचे प्रश्न सोडवताना ताईंनी नकळत नेतृत्व हाती घेत इतर समदुःखी महिलांच्या घरातही आशेचा किरण फुलवला आहे.

अशा शेतीमातीत काम करणाऱ्या, महिला सक्षमीकरणाचे काम पुढे नेणाऱ्या या आधुनिक नवदुर्गा असणाऱ्या कलावतीताईंना मानाचा मुजरा ..!!

कलावती सवंदडकर – 86059 73453


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading