November 14, 2024
Amit Shah Energy Mantra article by Sukrtu Khandekar
Home » अमितभाईंचा ऊर्जामंत्र…
सत्ता संघर्ष

अमितभाईंचा ऊर्जामंत्र…

निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शिस्तबद्ध केडर भाजपच्या प्रचारासाठी नेहमीच सज्ज असते. राज्यात विधानसभा निवडणूक नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात अपेक्षित आहे. म्हणूनच भाजपचे चाणक्य म्हणून ओळखले जाणाऱ्या अमितभाईंचे मार्गदर्शन पक्षासाठी मौल्यवान होते. महाराष्ट्र हे भाजपच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे राज्य आहे. देशाची आर्थिक राजधानी या राज्यात असून पुरोगामी व प्रगतिशील महाराष्ट्राची सत्ता भाजपच्या हाती राहिली पाहिजे, यावर नरेंद्र मोदी, अमित शहा व जे. पी. नड्डा यांचा कटाक्ष आहे.

डॉ. सुकृत खांडेकर

सव्वादोन वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीचे सरकार खाली खेचण्यात भाजपने यश मिळवले, आघाडीतील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली आणि ते पक्ष दुर्बल झाले. तरीही लोकसभा निवडणुकीत महाआघाडीने बाजी मारली ही भाजपला डोकेदुखी ठरली. राज्यात भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) अशा तीन पक्षांचे मिळून महायुतीला २०० आमदारांचे समर्थन असले तरीही वेगवेगळ्या सर्वेक्षणात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाआघाडीचे आमदार जास्त निवडून येतील असे अंदाज प्रकटले आहेत. महायुतीचे १२३ व महाआघाडीचे १५२ आमदार विजयी होतील असे सर्व्हे सांगत आहेत. म्हणूनच विधानसभा निवडणुकीत महायुतीचे काय होणार? हा प्रश्न मौल्यवान बनला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्रातील परिस्थितीवर बारीक लक्ष ठेऊन आहेत. अमित शहा यांनी मुंबईत दादर आणि वाशी येथे प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन केले. यावेळी राज्यात महायुतीचे सरकार येईल पण सन २०२९ मध्ये भाजपा स्वबळावर सत्तेवर येईल, असे त्यांनी भाकीत केले. अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत. राज्यातील राजकीय परिस्थिती व लोकांची मानसिकता कशी आहे, याचे गुप्तचर यंत्रणांचे अहवाल थेट त्यांना मिळत असतात. शिवाय पक्षाची स्वतंत्र यंत्रणा आहेच.

निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शिस्तबद्ध केडर भाजपच्या प्रचारासाठी नेहमीच सज्ज असते. राज्यात विधानसभा निवडणूक नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात अपेक्षित आहे. म्हणूनच भाजपचे चाणक्य म्हणून ओळखले जाणाऱ्या अमितभाईंचे मार्गदर्शन पक्षासाठी मौल्यवान होते. महाराष्ट्र हे भाजपच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे राज्य आहे. देशाची आर्थिक राजधानी या राज्यात असून पुरोगामी व प्रगतिशील महाराष्ट्राची सत्ता भाजपच्या हाती राहिली पाहिजे, यावर नरेंद्र मोदी, अमित शहा व जे. पी. नड्डा यांचा कटाक्ष आहे. म्हणूनच लोकसभा निवडणुकीनंतर अपयशाने निराश झालेल्या नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्यासाठी अमितभाईंनी महाराष्ट्रात व मुंबईत कार्यकर्त्यांचे मेळावे घेतले. काहीही करा पण सत्ता परत आणा, असे अमितभाईंनी कार्यकर्त्यांना आवाहन केले. देवेंद्र फडणवीस सक्षम आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली भाजप निवडणूक लढवेल असेही त्यांनी स्पष्ट केले.

भारतीय जनता पक्षाची स्थापना दि. ६ एप्रिल १९८० रोजी मुंबईत झाली. पक्षाची चार दशकांची वाटचाल ही अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आदी ज्येष्ठ नेत्यांच्या नेतृत्वाखाली झाली. पण नरेंद्र मोदी व अमित शहा यांचा देशाच्या राजकीय क्षितीजावर प्रवेश झाल्यापासून भाजपची देशभर घोडदौड सुरू झाली. देशात गेल्या दहा वर्षांत एकवीस राज्यांत भाजपची सत्ता आली. पण भाजपच्या स्थापनेपासून गेल्या चव्वेचाळीस वर्षांत महाराष्ट्रात भाजपची एकदाही स्वबळावर सत्ता स्थापन झाली नाही. आज देवेंद्र फडणवीस हाच भाजपचा महाराष्ट्राचा चेहरा आहे. राज्यात फडणवीस हेच भाजपचे सर्वस्व आहेत. भाजपचा कोणताही नेता स्वत: स्वतंत्र निर्णय घेऊ शकत नाही. फडणवीसांचा हिरवा कंदील असल्याशिवाय पक्षात कोणताही महत्त्वाचा निर्णय होत नाही. अर्थात मोदी व शहा यांचा फडणवीसांवर वरदहस्त आहे, म्हणून राज्यात फडणवीस हे भाजपचे नंबर १ नेते आहेत.

सन २०१४ मध्ये देशात अनेक राज्यांत भाजपची सत्ता आली. महाराष्ट्रात विधानसभेत १४४ हा बहुमताचा जादुई आकडा आहे. त्या निवडणुकीत भाजपचे १२२ आमदार निवडून आले व नंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे समर्थन घेऊन भाजपने पाच वर्षे युतीचे सरकार चालवले. अर्थातच त्या सरकारवर पूर्ण वर्चस्व भाजपचे म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचेच होते. २०१९ च्या निवडणुकीत भाजपने ठाकरे यांच्या शिवसेनेची युती करून निवडणूक लढवली पण पक्षाचे १०५ आमदार निवडून आले. आता २०२४ मध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस यांना बरोबर घेऊन भाजपा निवडणुकीच्या रणसंग्रामात उतरली आहे.

मी पुन्हा येईन… असे २०१९ च्या निवडणूक प्रचारात देवेंद्र फडणवीस वारंवार सांगत होते, विरोधी पक्षांनी त्याची बरीच टिंगल-टवाळी केली. पण निकालानंतर देवेंद्र यांनी मुख्यमंत्री म्हणून व अजितदादांनी उपमुख्यमंत्री म्हणून सर्वात अगोदर शपथ घेतली पण त्यांचे सरकार जेमतेम ८० तासच टिकले. त्यांचा पहाटेचा शपथविधी बरेच दिवस गाजत राहिला.

गेल्या दहा-अकरा वर्षांत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधून अनेक दिग्गज नेते भाजपमध्ये आले. त्यांची यादी बरीच मोठी होईल, पण त्यामुळे भाजपचा राज्यात विस्तार झाला. अनेक नेते चौकशीचा ससेमिरा चुकविण्यासाठी भाजपमध्ये आले तर अनेकजण सत्तेच्या मोहापायी आले. असे असूनही लोकसभा निवडणुकीत मतदारांनी महाआघाडीचे (विरोधी पक्षांचे) ३१ खासदार निवडून दिले व भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी या महायुतीच्या १७ जणांना विजयी केले.

केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार असताना महायुतीला मोठा फटका बसला. भाजपचे अगोदरच्या लोकसभेत २३ खासदार होते, यंदा केवळ नऊच विजयी झाले. केवळ भाषणबाजी करून नि घोषणांचा पाऊस पाडून तसेच विरोधकांच्या पाठी ईडी-सीबीआय लावून मते मिळत नाहीत, हे आता लक्षात आले असावे. सत्तेत असलेल्या दोन प्रमुख पक्षांची केलेली तोडफोड जनतेला आवडलेली नाही, हा संदेश लोकसभा निकालाने दिला आहे. येत्या निवडणुकीत मोदींचा करिष्मा व दीड कोटी लाभार्थी लाडक्या बहिणी हाच आता महायुतीचा प्रमुख आधार आहे.

बदलापूर शाळेत झालेला अत्याचार व आरोपीचे झालेले एन्काऊंटर, शाळेच्या संस्थाचालकांना दीड महिन्यांनी झालेली अटक, पुणे-वरळी-मुलुंड येथे झालेल्या हिट अॅण्ड रनच्या घटनांच्या चौकशीचे गौडबंगाल सरकारला मुळीच शोभादायक नाही. नागपूरच्या हिट अॅण्ड रन घटनेत प्रदेशाध्यक्षांच्या मुलाचे पुढे काय झाले, हे गूढ कायम आहे. धारावी पुनर्वसन प्रकल्पासाठी मुलुंडमधील एक इंचही जमीन दिलेली नाही, असे भाजपचे बडे नेते लोकसभा निवडणुकीत प्रचारात रोज सांगत होते, प्रत्यक्षात राज्य मंत्रिमंडळाने ठराव करून मुलुंड, भांडुप व कांजूर मार्ग येथील मिठागरांच्या जमिनी धारावीसाठी देऊन टाकल्या. सरकार कोणाच्या दबावाखाली व कोणाच्या हितासाठी सर्व करतेय हे मतदारांना कळत नाही असे महायुतीला वाटते काय? नवरात्र सुरू होण्यापूर्वी राज्य मार्ग परिवहन, सिडको, आदी महामंडळांच्या अध्यक्षांच्या नेमणुका घाईघाईने झाल्या तेव्हाच निवडणुका उंबरठ्यावर आल्या हे लोकांना कळून चुकले.

लोकसभेतील अपयश विसरा व उमेदीने कामाला लागा. प्रत्येक बूथवर २० सदस्य करा, प्रत्येक बूथवर १० कार्यकर्ते हवेत. मतदान १० टक्के वाढले पाहिजे. विधानसभेला फाजिल आत्मविश्वास असता कामा नये. गटबाजी टाळा, एकमेकांच्या विरोधात बोलू नका, वादग्रस्त विधाने टाळा, विरोधकांच्या फेक नॅरेटिव्हला लगेच उत्तर द्या, आदी सूचना पक्षाच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना करण्यात आल्या. काहीही करा, फोडाफोडी करा पण सत्ता आणा, असेही आव्हान करण्यात आले.

लोकसभा निवडणुकीत अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची मते भाजपकडे वळली नाहीत म्हणून भाजपचे नुकसान झाले, असा युक्तिवाद अगोदर संघाच्या मुखपत्राने केला व नंतर स्वत: फडणवीस तेच बोलू लागले. त्याच अजितदादांना बरोबर घेऊन भाजप विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरत आहे. आपले १०५ आमदार सांभाळा आणि मित्रपक्षांचेही रूसवे-फुगवे काढा, अशी कसरत भाजपला करावी लागते आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या संस्काराच्या मुशीतून तयार झालेले मनोहर जोशी, नारायण राणे, एकनाथ शिंदे असे राज्याचे तीन मुख्यमंत्री झाले. वडिलांच्या पुण्याईचा लाभ उद्धव ठाकरे यांनाही मिळाला. पण भाजपाला आजवर (देवेंद्र फडणवीस) एकदाच मुख्यमंत्रीपद मिळाले. सर्वाधिक आमदार असूनही गेल्या पाच वर्षांत भाजपला (८० तास वगळून) मुख्यमंत्रीपद नव्हते. नोव्हेंबरमध्ये महायुतीला बहुमत मिळाले, तर पुढचे मुख्यमंत्रीपद कोणाला हे मात्र अजून गुलदस्त्यात आहे. पुन्हा एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस की पाच वेळा उपमुख्यमंत्री झालेले अजितदादा?


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading