वारंवार वाचल्याशिवाय या श्लोकांचे आकलन होणार नाही हे खरे असले तरी आध्यात्मिक विषयासंबंधी असणारी भीती किंवा दडपण दूर करण्यासाठी या ग्रंथाचा उपयोग होईल हे मात्र नक्की. आपल्या जवळील ज्ञान इतरांना वाटून ते अधिक मिळवण्यासाठी वाचकांना उद्युक्त करण्यात लेखक श्री. विप्र यशस्वी झाले आहेत.
सुहास रघुनाथ पंडित,
सांगली. ९४२१२२५४९१
श्री समर्थ रामदास स्वामी कृत मनोबोध अर्थात मनाचे श्लोक माहित नाहीत असा मराठी माणूस सापडणे कठीण आहे. मनाला ‘ सज्जन ‘ असे संबोधून या मनाचे नेमके काय चुकते आहे, त्याला योग्य मार्गावर कसे आणता येईल यासाठी केलेला उपदेश म्हणजे ‘ मनाचे श्लोक ‘. या श्लोकांचा अर्थ समजावून सांगणारे, निरुपणात्मक ग्रंथ आतापर्यंत अनेक जाणकार अभ्यासकांनी लिहीले आहेत. साधकांना ते उपयुक्तही ठरले आहेत. कोल्हापूर येथील योगिसुत अर्थात तुकाराम नारायण विप्र यांनी लिहीलेले ‘मना सज्जना’ हे पुस्तकही असेच सर्व अभ्यासकांना मार्गदर्शन करणारे आहे.
ईश्वर उपासनेचा पारंपारीक ठेवा आणि संत साहित्य अभ्यासण्याची मनोवृत्ती यामुळे श्री. विप्र यांनी संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत तुकाविप्र यांचे साहित्य, तसेच ज्ञानेश्वरी, भागवत ग्रंथाचे वारंवार वाचन करुन ते आत्मसात केले आहे. समर्थांच्या मनाच्या श्लोकाविषयी सविस्तर टीका करत असताना त्यांनी या सर्व ज्ञानाचा उपयोग करुन घेतला आहे.
ग्रंथाच्या सुरुवातीलाच मनोबोधाची रचना का व कशी झाली याबाबतचा मनोरंजक इतिहास त्यांनी सांगितला आहे. त्यानंतर त्यांनी प्रत्येक श्लोकाचा भावार्थ समजावून दिला आहे. ज्याठिकाणी श्लोक भावार्थात साम्य दाखवतात किंवा एकमेकांशी निगडीत वाटतात त्या ठिकाणी एका पेक्षा जास्त श्लोक एकत्र घेऊन त्यांचा अर्थ स्पष्ट केला आहे. हे सर्व करत असताना धार्मिक व पौराणिक कथा , बोधकथा , संत वचने, ओव्या, दोहे, सुभाषिते यांच्या बरोबरच आजच्या काळातील व्यावहारिक उदाहरणे ,आलेले अनुभव, घडलेल्या घटना यांचा भरपूर वापर केला आहे. त्यामुळे प्रत्येक श्लोक समजून घेणे अतिशय सोपे झाले आहे.
तरीही ते नम्रपणे म्हणतात,” संत वचनातील काही छटा चिंतनाच्या माध्यमातून आपल्या हाती लागल्या तर ते चिंतन म्हणजे त्या संत वचनांचा अर्थ नव्हे. कारण संत वचने म्हणजे अमृतसरिता आहे. प्रत्येकाने आपल्या ओंजळीत मावेल तेवढे अमृत घ्यावे. संत वचनाचे हे अमृत आपण ‘ मना सज्जना ‘ ग्रंथाच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहे. हे यथाशक्ती, यथामती केलेले निरुपण आहे. या वचनांचा एवढाच अर्थ आहे असा आपला दावा नाही ” .
वारंवार वाचल्याशिवाय या श्लोकांचे आकलन होणार नाही हे खरे असले तरी आध्यात्मिक विषयासंबंधी असणारी भीती किंवा दडपण दूर करण्यासाठी या ग्रंथाचा उपयोग होईल हे मात्र नक्की. आपल्या जवळील ज्ञान इतरांना वाटून ते अधिक मिळवण्यासाठी वाचकांना उद्युक्त करण्यात लेखक श्री. विप्र यशस्वी झाले आहेत. याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि अशाच मार्गदर्शक ग्रंथ निर्मितीची त्यांच्याकडून अपेक्षा !
पुस्तकाचे नाव. : मना सज्जना
लेखक : तुकाराम नारायण विप्र ९६०४३६३६६०
प्रकाशक : नचिकेत प्रकाशन , कोल्हापूर.
मूल्य. : रु.३५०/-
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.

1 review
TtfLbPPZwXGZGmED
WFenwvxCT