April 18, 2024
importance-of-sadguru-in muddy life article by Rajendra ghorpade
Home » गढुळ जीवन सद्गुरुंच्या सहवासाने निर्मळ
विश्वाचे आर्त

गढुळ जीवन सद्गुरुंच्या सहवासाने निर्मळ

साने गुरुजी म्हणतात, भारतात गुरु शब्दापेक्षा सद्गुरु शब्दाचा महिमा आहे. सद्गुरु म्हणजे काय ? गुरु त्या त्या ज्ञानप्रांतात किंवा त्या त्या कलेत आपणास पुढे पुढे नेतो. परंतु सद्गुरु जीवनाची कला शिकवतो. जीवन सुंदर करणे, स्वतःचे जीवन निर्दोष, निष्काम, निरुपाधी करणे ही सर्वात थोर विद्या. ही विद्या शिकवणारा तो सद्गुरु. नेपोलियन युद्धशास्त्र शिकणाऱ्यांचा गुरू आहे. परंतु स्वतःच्या जीवनातील कामक्रोधाच्या वेगाशी लढावयास शिकवणारा तो सद्गुरु होय.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406

कां पावो शीतळता लाहे । कीं जे डोळ्यांचिलागी होये ।
तैसा परसुखें जाये । सुखावतु ।। १६० ।। ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा

ओवीचा अर्थ – अथवा पायाला थंडावा मिळतो, तो डोळ्यांच्या उपयोगास येतो, त्याप्रमाणे जो दुसऱ्याच्या सुखानें सुखी होत असतो.

उन्हाळ्यात पायाला थंड वाटावे म्हणून कातडी चपला वापरण्यात येतात. किंवा झोपण्यापूर्वी पाच-दहा मिनिटे पायाला तेल लावून मालिश केले जाते. याचे अनेक फायदे आहेत. पायाला तेल लावल्याने शारिरीक आरोग्यासह मानसिक आरोग्यासही फायदा होतो. पायातील रक्तप्रवाह सुधारतो. शरीरातील पेशींना ऑक्सिजनचा पुरवठा होतो. थकवा, ताण घालवण्यासाठी, पायाला आलेली सूज कमी करण्यासाठी तळव्यांना तेलाचा मसाज करावा. यामुळे शांत झोपही लागते. दिवसभर मुड चांगल्या राहण्यासाठी याचा फायदा होतो. दृष्टीही चांगली होते. डोळ्यांचे तेज वाढते. असे अनेक फायदे आहेत. मराठी मध्ये एक म्हण आहे, तळपायाची आग मस्तकाला जावून भिडते. शास्त्रीयदृष्ट्या पायाला गारवा दिला तर तो डोळ्यापर्यंत पोहोचतो. डोळ्यांना त्यामुळे शीतलता मिळते. म्हणजे शरीराच्या एका अवयवावर केलेला उपाय दुसऱ्या अवयवासही होतो. झाडाच्या मुळांना पाणी घातले जाते पण ते पानाच्या टोकापर्यंत पोहोचते. एका गोष्टीच्या फायद्यासाठी केलेली कृती दुसऱ्याच्याही उपयोगी पडते. या एकाच शरीरातील किंवा एकाच वृक्षातील घटना आहेत. तसे मानवाच्या बाबतीतही आहे. एकाच्या सुखाने दुसऱ्याला सुख वाटते. यातून समस्त मानव हे एकच आहेत. असे सांगण्याचा प्रयत्नही येथे संत ज्ञानेश्वरांनी केल्याचे दिसते.

याबाबत अनेक उदाहरणे देता येऊ शकतील. कार्यालयातील महत्त्वाच्या पदावर बसलेली व्यक्ती उत्तम प्रशासक असेल तर त्याचा फायदा कार्यालयातील समस्त व्यक्तींना होतो. अशा कार्यालयातील वातावरणही सर्वांसाठी उपयोगी ठरते. एखाद्या चांगल्या व्यक्तीच्या सहवासात आल्यानंतर त्याचा परिणाम आपल्यावरही होतो. त्याच्या सहवासातून आपणासही सुख प्राप्त होते. मन परिवर्तन सहजासहजी होत नाही. पण चांगल्याच्या सहवासात आल्यानंतर वाईट विचार करणाऱ्या व्यक्तीच्या मनातही चांगले विचार उत्पन्न होऊ शकतात. इतका प्रभाव चांगल्या व्यक्तीच्या संगतीच्या होऊ शकतो. यासाठीच संतांची संगत, चांगल्या विचारांची संगत करावी असे सांगितले जाते. आपले गढुळ जीवन सद्गुरुंच्या सहवासाने निर्मळ होऊन जाते.

पूर्वीच्या काळातील गुरु हे शिष्याच्या प्रगतीत स्वतःचे सुख पाहात होते. शिष्य आपल्यापेक्षा मोठा झाला तर त्यांना अधिक सुख वाटायचे. आता परिस्थिती बदलली आहे. असा विचार करणारे गुरुच दुर्मिळ झाले आहेत. याचा परिणाम समाजातील सर्व घटकांवर झालेला पाहायला मिळत आहे. यासाठी गुरु कसा असावा याचाही विचार होणे गरजेचे आहे. याबद्दल साने गुरुजी म्हणतात, भारतात गुरु शब्दापेक्षा सद्गुरु शब्दाचा महिमा आहे. सद्गुरु म्हणजे काय ? गुरु त्या त्या ज्ञानप्रांतात किंवा त्या त्या कलेत आपणास पुढे पुढे नेतो. परंतु सद्गुरु जीवनाची कला शिकवतो. जीवन सुंदर करणे, स्वतःचे जीवन निर्दोष, निष्काम, निरुपाधी करणे ही सर्वात थोर विद्या. ही विद्या शिकवणारा तो सद्गुरु. नेपोलियन युद्धशास्त्र शिकणाऱ्यांचा गुरू आहे. परंतु स्वतःच्या जीवनातील कामक्रोधाच्या वेगाशी लढावयास शिकवणारा तो सद्गुरु होय.

अशा गुरुंच्या सहवासात वाढलेले शिष्यही सद्गुरुंच्या सारखेच होतात. साहजिकच याचा चांगला परिणाम समाज घटकावर होतो. सामाजिक सुख-शांतीसाठी अशा त्यागी गुरुंची आज खऱ्या अर्थाने गरज आहे.

Related posts

कृष्णात खोत म्हणाले, माझ्या कादंबरीतील वाक्ये लहान आहेत, पण हे कादंबरीत आले कोठून….

प्रगत शेतकरी

Neettu Talks : व्यावसायिक कार्यालयात काम करताना…

Leave a Comment