November 8, 2025
डॉ. सदानंद मोरे यांनी महाराष्ट्राच्या लोककलांचे जतन व लावणीसारख्या कलांचे विकृतीकरण थांबवण्याचे आवाहन केले. ज्येष्ठ अभिनेत्री जयमाला काळे-इनामदार यांच्या सन्मान सोहळ्यात ते बोलत होते.
Home » लोककलांचे विकृतीकरण थांबणे आवश्यक : डॉ. सदानंद मोरे
काय चाललयं अवतीभवती मनोरंजन

लोककलांचे विकृतीकरण थांबणे आवश्यक : डॉ. सदानंद मोरे

महाराष्ट्राची संस्कृती, लोककलांचे जतन व्हावे : डॉ. सदानंद मोरे
रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ अभिनेत्री-नृत्यांगना जयमाला काळे-इनामदार यांचा सन्मान

पुणे : कला हे संस्कृतीचे अंग आहे. लोकनाट्य, वगनाट्य, लावणी, चित्रपट अशा सांस्कृतिक क्षेत्रात सर्वच कलाकारांचे मोठे योगदान आहे. ही संस्कृती, कलांचे जतन व्हावे व तिचा अस्सलपणा रसिकांपर्यंत पोहोचावा तसेच लावणी सारख्या लोककलांचे चाललेले विकृतीकरण थांबवावे या करिता प्रयत्न होणे आवश्यक आहेत, असे प्रतिपादन संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक, विचारवंत आणि महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी केले.

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ अभिनेत्री-नृत्यांगना जयमाला काळे-इनामदार यांच्या अभिनय-नृत्य कारकिर्दीस ६५ वर्षे पूर्ण झाल्याप्रित्यर्थ डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्या प्रसंगी डॉ. मोरे बोलत होते. पूना गेस्ट हाऊसचे संचालक डॉ. किशोर सरपोतदार यांची प्रमुख उपस्थिती होती. रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, रंगत संगत प्रतिष्ठान काव्य विभागाच्या कार्याध्यक्ष मैथिली आडकर मंचावर होते. पत्रकार भवन, नवी पेठ येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सन्मापत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते.

जयमाला इनामदार यांनी एकलव्याच्या भूमिकेतून कलेचे शिक्षण घेत स्वत:चे व्यक्तिमत्व स्वत: घडविलेले आहे. लावणीची व्याप्ती मोठी असल्यामुळेच लावणीत ‘ज्ञानेशाची ओवी, जनीचे अभंगा गाना’ असे शब्दही येतात. लावणी ही फक्त शृंगारापुरती मर्यादित नसून सैनिकांची करमणूक, विरंगुळा म्हणूनही तिचा वापर झाला आहे.

डॉ. सदानंद मोरे

सत्काराला उत्तर देताना जयमाला काळे-इनामदार म्हणाल्या, मला लहानपणापासूनच नृत्याची विशेष आवड होती. मी कोणाकडेही नृत्य न शिकता माझ्यातील कला जोपसत गेले. कलेशिवाय मी जगू शकत नाही. घरातील अडचणींमुळे मी या कलेला व्यवसाय म्हणून स्वीकारले. यातूनच परदेशातही सादरीकरण करण्याची संधी मिळाली. पंडित रविशंकर यांच्यासारख्या जगविख्यात कलाकारांना भेटण्याची संधी मिळाली. याचा विशेष आनंद आहे.

कलेनेच मला मान-मरातब-पैसा मिळवून दिला पण मी कधीच कलेचे हिडीस दर्शन मांडले नाही. सातत्यपूर्ण रियाज, तालमी, कष्ट यात मी कधीच मागे हटले नाही. मंचावर लावणी, वगनाट्य, लोककला सादर करताना त्यातील घरंदाजपणा, शालीनता जपली, प्रेक्षकांच्या नजरेला नजर दिली नाही की कधीही इशारे केले नाहीत. काही ठराविक कलावंतामुळे आजच्या काळात लावणीचा दर्जा घसरला असून लावणी या कलेचा मान कमी झाल्याचे जाणवते.

जयमाला काळे-इनामदार

जयमाला इनामदार यांनी कलेशी-नृत्याशी आपले इमान, प्रामाणिकपणा जपला असल्याचे सांगून किशोर सरपोतदार म्हणाले, जयमालाबाई यांनी नृत्यकलेवर जय मिळविला आहे. कलाकारांचे माहेर घर असणाऱ्या पूना गेस्ट हाऊसचा संचालक म्हणून माझ्या उपस्थितीत जयमालाबाईंचा सन्मान होणे म्हणजे एका माहेरवाशीणीचा सत्कार आहे. रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करणे हे समाजापुढे आदर्शवत ठरणारे कार्य आहे.

प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त करताता मान्यवर व्यक्ती आणि रसिक श्रोत्यांमुळे संस्था मोठी होते, असे सांगून ॲड. आडकर म्हणाले, गेली ६५ वर्षे कलेच्या क्षेत्रात योगदान देणाऱ्या जयमाला इनामदार यांच्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ‘लावण्य‌’या विषयावर लावण्यांचे कविसंमेलन आयोजित केले होते. यात जयंत भिडे, डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी, प्रभा सोनवणे, वर्षा कुलकर्णी, मीना शिंदे, रूपाली अवचरे, विजय सातपुते, वासंती वैद्य, मनीषा सराफ, स्वप्नील पोरे, सुजाता पवार यांचा सहभाग होता. सूत्रसंचालन वैजयंती आपटे यांनी केले.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading