June 25, 2024
The threshold of service to the house of knowledge Rajendra Ghorpade article
Home » ज्ञानाच्या घराचा सेवा हा उंबरठा
विश्वाचे आर्त

ज्ञानाच्या घराचा सेवा हा उंबरठा

सेवेमुळे मनुष्यास आधार भेटतो. सेवेमुळे मनुष्य सुखावतो. सेवेमुळे मनुष्याचा बोजा हलका होतो. संकटात सापडलेल्या, खचलेल्या मनांना सेवेने दिलासा मिळतो. यासाठी माणसांमध्ये सेवाभाव उत्पन्न करण्याची गरज आहे.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

मोबाईल – 9011087406

जे ज्ञानाचा कुरुठा । तेथ सेवा हा दारवंटा ।
तो स्वाधीन करी सुभटा । वोळगोनी ।। १६६ ।। ज्ञानेश्वरी अध्याय चौथा

ओवीचा अर्थ – कारण ते ज्ञानाचें घर आहेत. त्यांची सेवा हा त्या घराचा उंबरठा आहे, अर्जुना, तूं सेवा करून तो स्वाधीन करून घे.

सेवा म्हणून काम करण्याची प्रथा आता लोप पावत आहे. यावरून माणसाचा स्वभाव किती बदलत चालला आहे हे समजते. आर्थिक गणितांमुळे माणूस बदलतो आहे. समीकरणे बदलत चालली आहेत. जीवन जगणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. सर्वसामान्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. उद्या पोट कसे भरायचे याची काळजी त्यांना लागून राहिली आहे. अशा या संकटांतच शेतकरी, कष्टकरी कामगार नुकसानीमुळे आत्महत्या करू लागले आहेत. नुकसान पचविण्याची ताकद आता त्याच्यामध्ये राहिलेली नाही. या बदलत्या काळात सेवाधर्म महत्त्वाचा ठरणार आहे.

सेवेमुळे मनुष्यास आधार भेटतो. सेवेमुळे मनुष्य सुखावतो. सेवेमुळे मनुष्याचा बोजा हलका होतो. संकटात सापडलेल्या, खचलेल्या मनांना सेवेने दिलासा मिळतो. यासाठी माणसांमध्ये सेवाभाव उत्पन्न करण्याची गरज आहे. एकमेकांमध्ये हा भाव उत्पन्न झाल्यास खचलेली मने दुभंगणार नाहीत. त्यांच्या हातून गैरकृत्य होणार नाही. सेवेचा गैरफायदा घेणारेही असतात. पण सेवा हा धर्म मानणाऱ्या व्यक्तींनी निःस्वार्थी भावाने सेवा केल्यास गैरफायदा घेणाऱ्यांचीही मने बदलू शकतात. त्यांच्यामध्येही हा सेवाभाव उत्पन्न करण्याचे सामर्थ्य यामध्ये आहे. याचा विचार करून ही सेवा करायला हवी.

प्रत्येक मानवामध्ये भगवंत आहे, असे समजून सेवा करायला हवी असे अध्यात्म सांगते. दुसऱ्याला सुख देण्याने स्वतःला सुख मिळते. दुसऱ्याचे दुःख पुसायला शिकले पाहिजे. यामध्ये सेवा हा भाव असायला हवा. जेथे सेवा आहे तेथे प्रेम आहे. जिव्हाळा आहे. आपुलकी आहे. सेवेचा भाव संपतो तेव्हा तेथे व्यापार होतो. व्यापारात मी तू हा भाव येतो. त्याचे मोजमाप होते. उच्चनीच हा भाव येतो. तेथे आपुलकी, प्रेम, जिव्हाळा राहत नाही. दुःख नांदते. अशाने मनाला उभारी मिळत नाही. मन खचते. यासाठी सेवा हा भाव जोपासून व्यवहार करायला हवेत. त्याचा व्यापार होता कामा नये. ही काळजी घ्यायला हवी. अध्यात्मातही सेवा हा भाव ठेवूनच सेवा करायला हवी. अन्यथा तोही व्यापार होतो.

अध्यात्म ज्ञानाच्या घराचा सेवा हा उंबरठा आहे. सेवा म्हणजे शोषण नव्हे हे लक्षात घ्यायला हवे. सद्गुरुंना काय हवे आहे. ते त्यांना देणे हा सेवेचा भाग आहे. सद्गुरु हे भक्ताकडे भाव मागतात. निरपेक्ष भावाने सद्गुरुंनी दिलेल्या मंत्राचा जप करणे हे त्यांना अपेक्षित असते. साधना ही सुद्धा एक सेवा आहे. सद्गुरुंना ही सेवा खूप आवडते. यासाठी साधनेने सद्गुरुंची सेवा केली तर ज्ञानाच्या घराचा सेवेचा उंबरठा सहज ओलांडता येऊ शकतो. आत्मज्ञानाचे लाभार्थी होता येते.

Related posts

गोकूळी हवा धूंद आहे

पावसाची शक्यता महाराष्ट्रात कश्यामुळे वाढली ?

दुधाच्या एफआरपीसाठी आता राष्ट्रीय स्तरावर संघर्ष

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406