August 14, 2025
Covers of L.R. Nasirabadkar’s books “History of Medieval Marathi Literature” and “Practical Marathi” published by Bhasha Vikas Sanstha, Kolhapur.
Home » ल. रा. नसिराबादकर यांचे दोन महत्त्वाचे ग्रंथ आणि त्याची उपयुक्तता…
मुक्त संवाद

ल. रा. नसिराबादकर यांचे दोन महत्त्वाचे ग्रंथ आणि त्याची उपयुक्तता…

ल. रा. नसिराबादकर यांचे मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास आणि व्यावहारिक मराठी हे ग्रंथ भाषाविकास संशोधन संस्था, कोल्हापूर यांनी अलीकडेच पुनर्प्रकाशित केलेले आहेत. यानिमित्ताने…

डॉ. विनोद कांबळे, कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठातील मराठी अधिविभागात डॉ. नंदकुमार मोरे हे कार्यरत आहेत. संशोधक, अभ्यासक आणि समीक्षक अशी जरी सरांची ओळख असली तरी मराठी भाषा आणि साहित्यासाठी ते नेहमीच आग्रही भूमिका घेऊन आपल्यापरीने गंभीर स्वरूपाचे लेखन आणि उपक्रम राबवत असतात. त्याचाच एक भाग म्हणून त्यांच्या संशोधन केंद्राच्यावतीने साहित्य, समाज आणि संस्कृती यामधील निवडक ग्रंथाना ते नव्याने प्रकाशित करत आहेत. प्रकाशन करत असताना त्यांनी प्रत्येक ग्रंथामध्ये नवीन आणि आजच्या काळाला उपयोगी पडेल, अशी भर घालून या ग्रंथाचे प्रकाशन केलेले आहे. त्यामुळेच त्यांच्या संशोधन केंद्राच्या प्रत्येक प्रकाशित पुस्तकाकडे कानाडोळा करून चालणार नाही.

अलीकडे प्रकाशन व्यवसायात तरुण आणि उमदे मित्र-मैत्रिणी काम करत आहेत. आर्थिक फायदा बघण्यापेक्षा ग्रंथ वाचकापर्यंत पोहोचवणे किंवा त्याच्या घरात असणे किती महत्त्वाचे आहे हे त्यांची ग्रंथ प्रकाशनाची धडपड बघताना आपल्या लक्षात येते. त्यामुळे दिवसागणिक ग्रंथ व्यवसाय डिजिटल स्वरूपात येताना दिसतोय. मात्र वाचकही याच पद्धतीने यायला हवेत. ग्रंथ खरेदी व्हायला हवा. ग्रंथ वाचायला हवेत. त्यावरती विचार, चर्चा, मंथन व्हायला हवे. भलेही तुम्ही कितीही जीपीटी चॅट, ग्रॉक ही ॲप वापरत असला तरी मूळ संदर्भासाठी पुस्तके आवश्यक असतात हे नाकारून चालणार नाही.

आता या दोन ग्रंथाबद्दल…

१. मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास :

‘प्राचीन मराठी वाङ्मयाचा इतिहास’ या नावाने प्रसिद्ध असलेला हा ग्रंथ तो अद्ययावत करून ‘मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास’ या नावाने प्रकाशित केला आहे. या ग्रंथामध्ये महाराष्ट्र हे देशभाषा मराठी, आद्यकवी राजयोगी मुकुंदराज, महानुभवांची साहित्यसरिता, ज्ञानदेवें रचिला पाया, नामयाची वाणी अमृताची खाणी, संतमेळ्याची अभंगवाणी, नाथपूर्वकालीन साहित्य, समन्वयकार एकनाथ, कलाकवी मुक्तेश्वर, तुका झालासे कळस,’ दासबोध’कार समर्थ, पंडित कवी, कृष्णदयार्णव आणि श्रीधर, मध्यमुनीश्वर आणि अमृतराय, संतचरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, निरंजन माधव आणि मोरोपंत, शाहिरी काव्य, बखर गद्य ही अठरा प्रकरणे आहेत. यामध्ये नव्याने भर घालून तंजावरचे मराठी वाङ्मय- नंदकुमार मोरे, मध्ययुगीन मराठी जैन साहित्य – गोमटेश्वर पाटील, वीरशैव संप्रदायाचे मध्ययुगीन मराठी साहित्य – मांतेश हिरेमठ, मध्ययुगीन मराठी मुस्लिम साहित्य- इकबाल तांबोळी यांचे महत्त्वाचे लेख आहेत आणि शेवटी संदर्भ ग्रंथांची यादी दिलेली आहे.

२. व्यावहारिक मराठी :

प्राथमिक शिक्षकापासून ते संशोधक, अभ्यासक, प्राध्यापक, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी आणि जो जो मराठी भाषिक आहे त्याच्याजवळ हा ग्रंथ असणे आवश्यक आहे. इतके या ग्रंथाचे मोल आहे. या ग्रंथामध्ये मराठीची अभिवृत्ती,भाषिक कौशल्य आणि रोजगाराच्या संधी या अनुषंगाने केलेल्या प्रकरणांमध्ये भाषिक कौशल्य आणि व्यक्तिमत्व विकास, संवाद कौशल्य, भाषण आणि संभाषण कौशल्य, लेखन कौशल्य, भाषेची शब्दनिष्ठ सर्जनशीलता, मराठी भाषा, तंत्रज्ञान आणि संगणकावरील संवाद, कल्पनाविस्तार,सारांशलेखन, कार्यालयीन लेखनव्यवहार, पत्रव्यवहार, प्रसारमाध्यमांसाठी वृत्तलेखन, वृत्त भाषांतर, जाहिरात मसुदालेखन, स्मरणिका संपादन आणि मुद्रणप्रत, ग्रंथपरीक्षण, मुलाखत लेखन, लेखनविषयक नियम आणि प्रमाण शब्दांची सूची, मुद्रितशोधन, देवनागरी लिपी आणि मराठीची वर्णमाला, पारिभाषिक शब्दसूची आणि संदर्भ ग्रंथ शेवटी दिलेले आहेत.

या दोन्ही ग्रंथांवरील ब्लर्ब नंदकुमार मोरे यांनी लिहिलेले आहे. ख्यातनाम चित्रकार अन्वर हुसेन यांनी दोन्ही ग्रंथांचे मुखपृष्ठ सुबक आणि नेमके केलेले आहे. कोल्हापुरातील निहाल शिपुरकर आणि तनुजा शिपुरकर यांच्या भारती मुद्रणालयामध्ये हा ग्रंथ तयार झाला आहे. मराठीचा अभ्यास, वाचन आणि लेखन करणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाजवळ हे दोन्ही ग्रंथ असणे आवश्यक आहे. कारण मराठी भाषा आणि तिचा इतिहास समजून घ्यायचा असेल तर ‘मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास’हा ग्रंथ तर मराठी भाषेची व्यवहारिकता, लेखन कौशल्य, मुद्रित शोधन, स्मरणिका संपादन, प्रसार माध्यमांसाठी लेखन, जाहिरात लेखन यासाठी ‘व्यावहारिक मराठी’ हा ग्रंथ अत्यंत उपयोगी आहे. आजच्या काळात या दोन्ही ग्रंथाचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. त्यामुळे हे ग्रंथ आपल्या संग्रही असायलाच हवेत.

पुस्तकाचे नावमध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास
लेखक – ल. रा. नसिराबादकर
पाने – ४५१, मूल्य – ₹६००
पुस्तकाचे नाव – व्यावहारिक मराठी
लेखक – ल. रा. नसिराबादकर
पाने – ४७८, मूल्य – ₹६००
प्रकाशक: भाषाविकास संशोधन संस्था, कोल्हापूर
पुस्तकासाठी संपर्क – पवन पाटील – 7507168461, अमोल देशमुख – 9420878062


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading