October 25, 2025
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे स्थानिकांना खरंच लाभ होणार का? डॉ. सुकृत खांडेकर यांच्या लेखातून प्रकल्पाचा सामाजिक आणि आर्थिक परिणामाचा सखोल विचार.
Home » नवी मुंबई विमानतळाचा लाभ कोणाला ?
विशेष संपादकीय

नवी मुंबई विमानतळाचा लाभ कोणाला ?

स्टेटलाइन

एकाच महानगरात दोन आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याचा मान मुंबईला मिळाला आहे. जगभर विमान वाहतूक क्षेत्रात वेगाने प्रगती होते आहे. गेल्या दहा वर्षात मोदी सरकारच्या काळात भारतानेही हवाई क्षेत्रात विलक्षण झेप घेतली आहे. देशात विमानतळांची संख्या 160 वर पोचली आहे.

डॉ. सुकृत खांडेकर

नवी मुंबई विमानतळाचा उद्घाटन समारंभ हा मोठा इव्हेंट म्हणून साजरा केला गेला. या विमानतळामुळे लोकल टू ग्लोबल अशी झेप घेणे शेतकऱ्यांना, लघु उद्योजकांना, व्यापार – व्यावसायिकांना साध्य होणार आहे असे स्वप्न दाखविण्यात आले आहे. मोठा प्रकल्प उभारला गेला की त्याचा मोठा गजावाजा होतो, पण ज्यांच्या जमिनी त्या प्रकल्पासाठी घेतल्या त्यांना व त्यांच्या लेकरांना त्यात काय संधी मिळणार याविषयी कोणी बोलत नाही. जमिनीचा मोबदला दिला की काम संपले असे होता कामा नये.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे शानदार उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आणि नवी मुंबईचे नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नकाशावर नोंदवले गेले. नवी मुंबई विमानतळामुळे राज्याच्या व देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळेल, राज्यातील प्रवाशांना- पर्यटकांना जगाच्या पाठीवर वेगाने पोचता येईल, उद्योजक- व्यावसायिकांसाठी, शेतकऱ्यांसाठी, अगदी मासे, फळे, फुले, भाज्यांच्या निर्यातीसाठी नवे दालन खुले होईल. नवी मुंबई विमानतळामुळे निर्माण होणाऱ्या आर्थिक सुबत्तेचा लाभ राज्यातील लोकांना विशेषत: कोकणवासियांना आणि भुमिपुत्रांना अधिकाधिक कसा मिळेल यावर कटाक्ष ठेवण्याची जबााबदारी राज्यकर्त्यांची व लोकप्रतिनिधींची आहे. अन्यथा फुलला पारिजात अंगणी, फुले का पडती शेजारी अशी अवस्था मराठी माणसाची होईल.

वीस हजार कोटी खर्च करून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात आला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दर्जेदार सेवा सुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत. मुंबईची गरज लक्षात घेऊन नोव्हेंबर 1997 मध्ये नागरी वाहतूक मंत्रालयाने मुंबईत दुसरा आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणे शक्य आहे का याची चाचपणी करण्यासाठी समिती नेमली होती. युपीए सरकारच्या कारकिदत जुलै 2007 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने नवी मुंबईत विमानतळ उभारण्यास तत्वत: मान्यता दिली. ऑगस्ट महिन्यात सिडकोने पब्लिक- प्रायव्हेट पार्टनरशीप (पीपीपी ) मध्ये हा प्रकल्प उभारण्यास नवी मुंबई विमानतळाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. संरक्षण मंत्रालयाने डिसेंबर 2010 मध्ये हिरवा कंदील दिला. फेब्रुवारी 2017 मध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ विकसित करण्याची बोली जीव्हीके कंपनीने जिंकली.

फेब्रुवारी 2018 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवी मुंबई विमानतळाचे भूमिपूजन केले. सन 2021 मध्ये अदाणी समुहाने नवी मुंबई विमानतळ उभारण्याची जबाबदारी स्वीकारली. जुलै 2022 मध्ये सिडकोने भूमिसंपादन व त्याच्या मोबदल्याविषक प्रश्न सोडवून 2866 एकर जमीन अदाणी समुहाच्या ताब्यात दिली. 29 डिसेंबर 2024 रोजी विमान उ्‌‍ड्डाणाची चाचणी यशस्वी झाली. 8 आॉक्टोबर 2025 रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन झाले. प्रत्यक्षात प्रवासी वाहतूक दोन महिन्यांनी सुरू होणार आहे.

देशात सर्वात बिझी विमानतळ हा नवी दिल्लीचा आहे. या विमानतळावरून वर्षातून अडीच कोटी प्रवासी ये-जा करतात. दुसरा क्रमांक मुंबईचा आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरून वर्षाला एक कोटी ऐंशी लाखापेक्षा जास्त प्रवाशांची ने-आण केली जाते. तिसरा क्रमांक बंगळुरू व चौथा क्रमांक हैदराबादचा आहे. देशातील एकूण विमान प्रवाशांपैकी 43 टक्के दिल्ली, 31 टक्के मुंबई व 25 टक्के प्रवासी बंगळुरू विमानतळाचा वापर करतात. मुंबईची वाढती गरज व अपुऱ्या जागेमुळे विमान वाहतुकीला आलेली मर्यादा लक्षात घेऊन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात आले आहे.

भविष्यात पुढील दहा वर्षात नवी मुंबई विमानतळावरून नऊ कोटी प्रवाशांची जा-ये होईल असा आराखडा बनवला आहे. दिल्ली-मुंबई हा जगातील मोठ्या गदचा विमान प्रवासाचा मार्ग म्हणून ओळखला जातो. या दोन महानगरांच्या दरम्यान रोज शंभरपेक्षा जास्त विमानांची जा-ये चालू असते. मुंबई विमानतळाची दिल्लीशी स्पर्धा चालू असते. पण विस्ताराला जागा नसल्याने विमानांच्या उड्डाणांच्या संख्येवर मर्यादा पडते. मुंबई विमानतळावर दोन धावपट्ट्या असल्या तरी त्या एकमेकांना छेद देणाऱ्या असल्याने एकाचवेळी दोन्हींचा वापर करता येत नाही.

विमानतळाच्या उभारणीस सर्वाधिक विलंब झालेला प्रकल्प म्हणून नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाचा उल्लेख करावा लागेल. प्रस्तावासाठी समिती नेमल्यापासून तब्बल 29 वर्षांनी विमानतळाचे उद्घाटन झाले. यात पूर्वीच्या काँग्रेस सरकारला जरी दोष दिला जात असला तरी त्यात वाजपेयी सरकारची चार व मोदी सरकारची अकरा अशी भाजप सरकारची 15 वर्षे आहेत.

एकाच महानगरात दोन आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याचा मान मुंबईला मिळाला आहे. जगभर विमान वाहतूक क्षेत्रात वेगाने प्रगती होते आहे. गेल्या दहा वर्षात मोदी सरकारच्या काळात भारतानेही हवाई क्षेत्रात विलक्षण झेप घेतली आहे. देशात विमानतळांची संख्या 160 वर पोचली आहे. भारतातील विमान कंपन्यांनी जगातील नामवंत विमान निर्मिती कंपन्याकंडे जवळपास एक हजार विमाने खरेदी करण्यासाठी नोंद केली आहे. दिल्ली जवळ एनसीआर मध्ये ( न‌’शनल क‌’पिटल रिजन ) नोएडा येथे 1324 हेक्टरवर उभारलेल्या नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन येत्या तीस ऑक्टोबरला पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. हे दिल्लीचे तिसरे विमानतळ असेल.

नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनाची घाई का केली असा प्रश्न अनेकांना पडला आहे. उद्घाटन झाल्यावर दोन महिन्यांनी डिसेंबरमध्ये प्रवासी वाहतूक सुरू होणार आहे. विमानतळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्यास अजून दोन वर्षे लागणार आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे मुंबईतून किंवा अन्य कोठून कसे पोचायचे? थेट रेल्वे, मेट्रो किंवा बेस्टची बससेवा आहे काय? मुंबईतील सांताक्रूज विमानतळाला जाण्यासाठी थेट मेट्रो आहे, ठाणे किंवा कुलाब्याहून थेट बेस्ट बस आहे. नवी मुंबई विमानतळाकडे जाण्यासाठी खाजगी मोटार किंवा टॅक्सीशिवाय पर्याय नाही. नवी मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतुकीची सदैव कोंडी असतेच त्यात आता आणखी भर पडणार आहे. वाहतूक पोलिसांची डोकेदुखी वाढणार आहे. कनेक्टिव्हिटी सर्वात महत्वाची आहे.

नवी मुंबई विमानतळाचा उद्घाटन समारंभ हा मोठा इव्हेंट म्हणून साजरा केला गेला. या विमानतळामुळे लोकल टू ग्लोबल अशी झेप घेणे शेतकऱ्यांना. लघु उद्योजकांना, व्यापार- व्यावसायिकांना साध्य होणार आहे असे स्वप्न दाखविण्यात आले आहे. मोठा प्रकल्प उभारला गेला की त्याचा मोठा गजावाजा होतो पण ज्यांच्या जमिनी त्या प्रकल्पासाठी घेतल्या त्यांना व त्यांच्या लेकरांना त्यात काय संधी मिळणार याविषयी कोणी बोलत नाही. जमिनीचा मोबदला दिला की काम संपले असे होता कामा नये. नव्या प्रकल्पात बाहेरून अन्य राज्यातून प्रशिक्षित कर्मचारी, अधिकारी व तंत्रज्ञ येतील मग तसे प्रशिक्षण स्थानिकांना देण्यासाठी सरकारने काय केले असा प्रश्न मनात येतो.

नव्या प्रकल्पाचा आराखडा तयार करतानाच स्थानिकांना रोजगार कसा देता येईल, याचा विचार केला होता का? पंतप्रधानांनी दिबा पाटील यांचे नाव घेतल्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला. दिबा ही आमच्या सर्वांसाठी प्रेरणा आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले पण विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव देणार असे जाहीर केले नाही. दिबांच्या समर्थकांनी व प्रकल्पग्रस्तांनी विमानतळाबाहेर लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असे फलक लावले होते. डिसेंबरमधे प्रवाशांसाठी विमानतळ सुरू झाल्यावर दिबा पाटील यांचे नाव तिकिटावर दिसेल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असल्याचे दिबांचे पुत्र अतुल पाटील सांगत आहेत.

पंतप्रधानानी नेहमीप्रमाणे या कार्यक्रमातही काँग्रेसवर टीका केली. पण राज्यात अतिवृष्टी व पूरग्रस्त शेतकऱ्यांविषयी शब्द उच्चारला नाही. पंतप्रधानांनी भाषणात भ्रष्टाचारावर भाष्य केले. तेव्हा गेल्या दहा वर्षात अन्य पक्षांतून भाजपासोबत गेलेल्या व सत्तेत सहभागी झालेल्या डझनभर बड्या नेत्यांची नावे व चेहरे डोळ्यासमोर आले. विशेष म्हणजे, त्यांनाच भाजपाने जाहीरपणे भ्रष्टाचारी म्हणून संबोधले होते.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading