मुंबई कॉलिंग
गेल्या अकरा महिन्यात नऊ वेळा आणि जुलै महिन्यापासून पाच महिन्यात सात वेळा ठाकरे बंधू एकमेकांना भेटले. महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे बंधू एकत्र येत आहेत. राजकीय युतीची अधिकृत घोषणा झालेली नाही. पण तुझ्या गळा, माझ्या गळा … हे चित्र महाराष्ट्राला दिसत आहे.
डॉ. सुकृत खांडेकर
राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईतील शिवतीर्थावर योजलेल्या दीपोत्सव २०२५ चे उद्घाटन उबाठा सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले आणि ठाकरे बंधुंची वाटचाल राजकीय मनोमिलनाकडे होत असल्याचे संकेत दोन्ही भावांनी दिले. गेली चौदा वर्षे राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर दीपोत्सवाचे आयोजन केले जात आहे. सुंदर सजावट आणि आकर्षक रांगोळ्या, भव्य रोषणाई, नेत्रदीपक आतषबाजी, विविध कलाकृतींनी लक्ष वेधून घेणारे शेकडो रंगीबेरंगी आकाश कंदिल बघण्यासाठी हजारो मुंबईकर दीपोत्सवात सहभागी होत असतात. यावर्षी मनसेचा दीपोत्सव खऱ्या अर्थाने वेगळा होता. यंदा उध्दव ठाकरे व राज ठाकरे यांचा सारा परिवार या दीपोत्सवाच्या उद्घाटनाला हजर होता.
उद्धव यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, पुत्र आमदार आदित्य, तेजस, तसेच राज यांच्या मातोश्री कुंदाताई, पत्नी शर्मिला, कन्या उर्वशी, पुत्र अमित व त्यांच्या पत्नी मिताली, उद्धव व राज यांचे मामा चंदुमामा वैद्य हेही दीपोत्सवाच्या उद्घाटनाला उपस्थित होते. दिवाळीच्या सणाला सारा ठाकरे परिवार आल्याचे पाहून उपस्थित असलेल्या शेकडो शिवसैनिकांचे व मनसैनिकांचे डोळे पाणावले. माजी मंत्री व मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी उद्धव यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले तेव्हा त्यांनाही गहिवरून आले होते… मराठी माणसाच्या एकजुटीचा प्रकाश सर्वाच्या आयुष्यात आनंद घेऊन येईल, अशा शुभेच्छा उद्धव यांनी या प्रसंगी दिल्या.
माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलेआहे, असा आरोप करीत राज ठाकरे यांनी सन २००६ मधे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला जय महाराष्ट्र केला. त्यांच्यापुर्वी अनेक नेत्यांनी शिवसेना सोडली किंवा त्यांची पक्षातून हकालपट्टी झाली. पण बहुतेकांनी काँग्रेस किवा राष्टवादी काँग्रेस पक्षाची कास धरली व सत्तेच्या परिघात राहण्यासाठी धडपड केली. छगन भुजबळ, नारायण राणे, गणेश नाईक अशी अनेक नावे सांगता येतील यांनी शिवसेनेतून बाहेर पडल्यावर सत्ताधारी पक्षात प्रवेश केला. पण राज ठाकरे हे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा भाजपामधे गेले नाहीत. त्यांनी स्वत:चा पक्ष स्थापन केला. राज यांचा करिष्मा आजही मोठा आहे. त्यांना सुरूवातीला जनतेने भरभरून पाठिंबा दिला. पक्ष स्थापन केल्यावर पहिल्याच निवडणुकीत विधानसभेत १३ आमदार निवडून जाणारा मनसे हा पहिलाच प्रादेशिक पक्ष असावा.
मनसेच्या स्थापनेनंतर उध्दव व राज यांच्यात अंतर वाढले, कटुता वाढली. दोन्ही नेते एकमेकांविषयी फार चांगले बोलत नव्हते. नाती जपायची असतात असे म्हणायचे व दुसरीकडे काका सेटींग करणारा आहे किंवा बिनशर्त की बिनशर्ट पाठिंबा देणारा नेता आहे अशी खिल्ली कोण उडवत होते ? काही पक्ष सुपारी घेणारे आहेत,, उठ दुपारी , घे सुपारी अशी टिंगल कोण करीत होते ? तुम्हाला कोणी घाबरत नाही, आमच्या नादाला लागायचे नाही असे कोण कोणाला दरडावत होते? मी संपलेल्या पक्षाबरोबर बोलत नसतो असे कोण पत्रकारांना म्हणत होते ? हे सर्व शिवसैनिक व मनसैनिकांना चांगले स्मरणात आहे. पण भाजपच्या केंद्रातील व राज्यातील अजस्त्र ताकदीपुढे हे दोन्ही पक्ष संकुचित झाले आहे.
भाजपच्या तोड फोड शस्त्रामुळे आणि इडी- सीबीआय या दोन धारदार हत्यारांमुळे सर्वच विरोधी नेते हबकले आहेत. भाजपाच्या रणनितीपुढे आपल्याला व आपल्या पक्षाला वाचवायचे असेल तर महाराष्ट्रात विशेषत: मुंबई – कोकणात मराठी माणसाच्या शक्तिचे विभाजन होता कामा नये हे उद्धव व राज यांना अनुभवावरून चांगले समजले आहे. म्हणूनच गेल्या एकोणीस वर्षात काय घडले, हे विसरून पुन्हा ठाकरे बंधू एकत्र येत आहेत. राजकीय भविष्यासाठी एकत्र येणे ही काळाची गरज आहे, हे उद्धव व राज यांनी जाणले आहे. शिवसेनाप्रमुखांच्या संस्कारातून वाढलेल्या दोन्ही भावांनी एकत्र यावे ही दोन्ही पक्षांतील सैनिकांची मनापासून इच्छा आहे.
सत्ता असो वा नसो, उद्धव व राज यांच्या निष्ठावान सैनिकांची संख्या बऱ्यापैकी आहे. राज्य सरकारने हिंदी भाषेची सक्ती लादली तेव्हापासून ठाकरे बंधू मराठीच्या मुद्यावर एकत्र आहेत. जुलै महिन्यात वरळी डोम येथे हिंदी भाषेच्या सक्तिच्या विरोधात ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन आवाज उठवला. राज यांनी मीरा भायंदर येथे याच मुद्यावर मनसेचा विराट मोर्चा काढून सरकारला धडकी भरवली. गेल्या अकरा महिन्यात नऊ वेळा आणि जुलै महिन्यापासून पाच महिन्यात सात वेळा ठाकरे बंधू एकमेकांना भेटले. महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे बंधू एकत्र येत आहेत. राजकीय युतीची अधिकृत घोषणा झालेली नाही. पण तुझ्या गळा, माझ्या गळा … हे चित्र महाराष्ट्राला दिसत आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
