बदल हि काळाची गरज आहे. बऱ्याचवेळा असे म्हटले जाते कि आम्ही बदललो आता तुम्ही बदला रोजगाराच्या बाबतीतसुद्धा असेच झाले आहे. रोजगाराचे क्षेत्र, स्वरूप, व्याप्ती बदलली आहे त्यादृष्टीने कामगारांनी आपल्यात बदल केला पाहिजे त्याला दुसरा पर्याय नाही मात्र हे होत असताना कामगारांच्या कल्याणाचा विचार सोडून चालणार नाही. नाहीतर ऑनलाईनच्या जमान्यात आम्ही कधी ऑफलाईन झालो हे लक्षात येणार नाही.
प्रा. संजय ठिगळे
अर्थशास्त्र विभाग प्रमुख
भारती विद्यापीठाचे मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालय, कडेगाव, सांगली.
२० व्या शतकाच्या उत्तरार्धात खाजगीकरण,उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या लाटेत अनेक बदल घडून आले. त्यातून आपण बाहेर पडतो न पडतो तेवढ्यात २१ वे शतक उजाडले.२१ वे शतक हे माहिती व तंत्रज्ञानाचे शतक असून सध्याच्या परिस्थितीत अनेक क्षेत्रात बदल घडू लागले आहेत. रोजगाराचे क्षेत्र, स्वरूप आणि व्याप्ती बदलू लागली आहे एवढेच नव्हे तर कामगार संघटनांचे अस्तित्व धोक्यात येऊ लागले आहे. शेती, उद्योग क्षेत्रापेक्षा सेवा क्षेत्रात रोजगाराच्या संधी अधिक उपलब्ध होऊ लागल्या आहेत. संगणक साक्षरता, डिजिटल साक्षरता, कृत्रिम बुद्धिमत्ता, ऑटोमेशन, रोबोटिक्स तंत्रज्ञान असे एक ना अनेक शब्द आमच्या कानावर पडू लागले आहेत. त्यामुळे अकालनीय भीती वाढू लागली आहे. मात्र एक गोष्ट नक्की नवीन तंत्र, मंत्र आणि यंत्राच्या जमान्यात वाढत चाललेली जीवघेणी स्पर्धा चिंतन करायला लावणारी आणि चिंता वाढविणारी आहे.या सर्व प्रक्रियेत जो टिकेल तोच टिकेल हे वास्तव नाकारून चालणार नाही.आता ऑनलाईन रोजगार आणि ऑनलाईन कार्यप्रणाली अस्तित्वात आली आता कामासाठी घराबाहेर पडण्याचे दिवस हळूहळू संपू लागलेत ऑनलाईनचा नवीन जमाना आला आहे. त्यामुळे आम्ही आमच्यात बदल केला नाही तर अनर्थ अटळ आहे.
भारत हा चळवळ करणाऱ्या लोकांचा आणि क्रांतीकारकांचा देश आहे असे म्हटले तर फारसे वावगे होणार नाही.२० व्या शतकाची सुरवात स्वातंत्र्य क्रांतीने झाली तर समारोप माहिती व तंत्रज्ञानातील झालेल्या क्रांतीने झाली. २० व्या शतकात झालेल्या हरित क्रांतीने आम्हाला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण केले. तर औद्योगिक क्रांतीने अर्थव्यवस्थेची चक्रे गतिमान केली. धवल क्रांतीने आम्हाला सुदृढ बनविले. नील क्रांतीने एका नवीन विश्वाची माहिती करून दिली तर माहिती व तंत्र ज्ञान क्षेत्रात झालेल्या क्रांतीने आम्हाला जगाच्या कानाकोपऱ्यात नेऊन पोहोचाविले. त्यामध्ये क्रांतीकारांचे योगदाना आम्हाला विसरून चालणार नाही. वेगवेगळ्या क्षेत्रात झालेले बदल आम्हाला बरेच काही देऊन गेले. त्याहीपेक्षा बरेच काही शिकवून गेले.
तरुणाईची शेतीकडे पाठ !
हरितक्रांतीने आम्हाला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनविले. हे जरी खरे असले तरी शेतीत आलेल्या नवीन तंत्रज्ञानाने रोजगार निर्मितीवर परिणाम झाला. शेतीत कुशल कामगार काळाची गरज निर्माण झाली. बैलाची जागा यंत्राने घेतली. ट्रक्टर चालविणारा, तणनाशकाची फवारणी करणारा माणूस आम्हाला महत्वाचा वाटू लागला. एवढेच नव्हे तर खंडून काम घेणारा शेतमजुरांचा वर्ग तयार झाला. तर दुसऱ्या बाजूला शेतीत कसणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या हळूहळू घटू लागली. तरुणाईने तर गेल्या दोन दशकापासून शेतीकडे बऱ्यापैकी पाठ फिरवलेली दिसून येते. अजूनही बऱ्यापैकी महिला वर्ग शेतीत काम करीत आहेत म्हणून शेतीक्षेत्र जिवंत आहे हे आपणास विसरून चालणार नाही.
खेड्याकडे चला अशी हाक देणाऱ्या गांधीजींच्या विचाराला आम्ही मागेच मुठ्माठी देऊन बसलो आहोत. हे जरी खरे असले तरी शेती हाच अजूनही रोजगार मिळवून देणारा उद्योग आहे याची जाण आणि भान नसणारी माणसं शेतीविषयी अपप्रचार करू लागली आहेत. शेतीत आता अकुशल माणूस टिकेल अशी अवस्था राहिली नाही. ज्याला इलाज नाही तोच शेतीवर रोजगार करतोय.देशात कितीही तेजी मंदीची चक्रे आली तरी शेती हे एकमेव असे क्षेत्र आहे कि जिथे हमखास रोजगाराची संधी आणि खात्री आहे. अजूनही काही भागात शेतात कामगार मिळत नाहीत अशी तक्रार आहे.
बऱ्याच प्रदेशात शेतावर कामासाठी जाणाऱ्या शेत मजुरांना दररोज ने आण करण्यासाठी शेतकऱ्यांना वाहनांची व्यवस्था करण्याची वेळ आली आहे हे आपणास बरेच काही सांगून जाते. माहिती व तंत्रज्ञानाच्या अश्वावर आरूढ झालेल्या तरुणाईला शेती क्षेत्रात फार मोठी संधी आहे.मात्र दुर्दैवाने शेती क्षेत्रात काम करणाऱ्या माणसाला समाजात प्रतिष्टा नाही हेच खरे तरुणाईचे दुखणे आहे. एवढेच नव्हे तर शेतीत काम करणाऱ्या तरुणांचे लग्न ठरू शकत नाही हि खरी तर वैचारिक दिवाळखोरी आहे असे म्हटले तर फारसे वावगे होणार नाही.
उद्योग क्षेत्राला नवप्रवर्तकांची गरज
सध्याचे युग हे नवप्रवर्तनाचे आहे. विशेषतः मेड इन इंडिया आणि मेक इन इंडियासारख्या अनेक घोषणा आजच्या तरुणाईच्या कानावर पडत आहे. औद्योगिक क्षेत्र कमालीचे बदलू लागले आहे. विदेशी कंपन्या आपले साम्राज्य अधिक बळकट करू लागल्या आहेत. रोजगाराच्या बाबतीत विचार केला तर आता एकाच उद्योगात अनेक वर्षे काम करायचे दिवस संपलेत. आज टाटा कंपनीत असणारा माणूस उद्या हिंदुस्थान लिव्हर कंपनीत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकाच ठिकाणी नोकरी करून सेवानिवृत्त होण्याचे दिवस तर मागेच संपलेत. आता उद्योग क्षेत्राला नवप्रवर्तकांची गरज मोठ्या प्रमाणावर भासू लागली आहे.
भूमी, भांडवल आणि संयोजक यांच्यापेक्षा चांगल्या श्रमिकांची गरज अधिक भासू लागली आहे. उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर यांत्रिकीकरण आणि संगणकीकरण होऊ लागल्यामुळे त्याच धर्तीवर कामगारांची गरज भासू लागली आहे. बऱ्याच उद्योगधंद्यात माणसांची जागा आता यंत्रांनी घेतली. यंत्र हाताळणारी संगणके आणि संगणके हाताळणारी माणसे महत्वाची ठरली. हीच उद्योग क्षेत्रातील आता संगणनवीन यंत्राची भारतात येणाऱ्या आणि इंटरनेट ऑफ थिंग्जयासारख्या कृषी औद्योगिक क्षेत्रातील रोजगाराचे प्रमाण डिजिटल साक्षरतेचे युग आहे असल्यामुळे औद्योगिक क्रांतीतील तंत्रज्ञानाने नोकऱ्यांचे स्वरूप बदलणार आहे. त्याला आपणास सामोरे गेल्याशिवाय तरणोपाय नाही.
बदलत्या कामाच्या स्वरुपानुसार रोजगार
औद्योगिक क्रांतीशी संबंधित उगवत्या तंत्रज्ञानामुळे कामाचे मूलभूत स्वरूप बदलते आहे. त्यामुळे एकंदरीत आमूलाग्र सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन घडत आहे. कामाचे स्वरुप कसे बदलत आहे. नवीन प्रकारच्या नोकर्या तयार होत आहेत आणि जुन्या पद्धतीच्या नोकऱ्या गायब होत आहेत. नव्या युगात कोणती नवीन कौशल्ये आत्मसात करण्याशिवाय पर्याय नाही. भारतात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील वार्षिक वाढीचे प्रमाण उच्च असूनही, अनौपचारिक क्षेत्राचे आकारमान सुमारे ९०% स्तरावर कायम आहे. अनौपचारिक रोजगाराचे प्रमाण विशेषतः तरुणांमध्ये, ग्रामीण भागात आणि कृषी क्षेत्रात जास्त आहे. चौथ्या औद्योगिक क्रांतीतील तंत्रज्ञानाचा नोकऱ्यांवर फारसा परिणाम होणार नाही.शिक्षणाचा आणि कुशलतेचा अभाव असल्यामुळे आणि अजूनही शेती आणि उद्योग क्षेत्रात काही अंगमेहनतीच्या कामाची गरज असल्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत आहेत.
सेवा क्षेत्राची अर्थव्यवस्थेत मोठी मुसंडी
भारतात गेल्या दशकात घडलेला आणखी एक मोठा बदल म्हणजे सेवा क्षेत्रात झालेला बदल. भारतीय अर्थव्यवस्थेत सेवा क्षेत्राने फार मोठी मुसंडी मारलेली दिसून येते. विशेषतः हॉटेल,हॉस्पिटल या दोन टी ला अधिक महत्व प्राप्त झाले. वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. हे आपणास कोरोनाच्या काळात लक्षात आलेले आहे. डॉक्टर मंडळीना जेवढे महत्व प्राप्त झाले तेवढेच नर्स, आरोग्य सेविका, वार्ड बॉय यांना महत्व प्राप्त झालेले दिसून येते. भारतात गेल्या दशकात घडलेला आणखी एक मोठा तांत्रिक विकास म्हणजे, नोकरी शोधणारे आणि नोकरी देणारे यांना जोडण्यासाठी उदयाला आलेली विविध डिजिटल यंत्रणा कामगारांपासून ते उच्चशिक्षित कर्मचाऱ्यांच्यापर्यंत सर्वाना नोकऱ्या मिळवून देण्याचे कार्य करीत आहेत.असा डिजिटल यंत्रणेत सुद्धा फार मोठ्या रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. ओला आणि उबर या टॅक्सी सेवांनी रोजगारांच्या संधी सिद्ध केल्या आहेत. फिटनेस ट्रेनरपासून ते सुतारकाम करणाऱ्या पर्यंत आणि केशभूषाकारापासून ते स्वच्छता कामगारांपर्यंत सर्वांना फार मोठी रोजगाराची संधी ऑनलाईन मिळू लागली. डिजिटल व्यासपीठांमुळे कामगारांना ऑनलाइन पद्धतीने काम करता येऊ लागले.आता कामासाठी घराबाहेर पडण्याचे दिवस हळूहळू संपू लागलेत.ऑनलाईनचा नवीन जमाना आला आहे.पगारसुद्धा तुमच्या खात्यावर ऑनलाईन जमा होऊ लागला आहे.मात्र रोजगाराचे पारंपारिक क्षेत्र त्यापासून वंचित आहे याची फार मोठी खंत आहे.
कार्यक्रम व्यवस्थापन रोजगाराचे नवीन क्षेत्र
सेवा क्षेत्रात जे बदल होत आहेत ते कल्पनेच्या पलीकडचे आहेत.अलीकडच्या काळात काळाची गरज म्हणून वधू वर सूचक संस्थांचे जाळे अधिक बळकट होऊ लागले आहे. ब्युटी पार्लर आता गल्लोगल्ली दिसू लागले आहे. एव्हाना कार्यक्रम व्यवस्थापन हे तर रोजगाराचे नवीन क्षेत्र नव्याने डोके वर काढू लागले आहे. आता पर्यटनाच्या क्षेत्रात फार मोठे परिवर्तन होऊ लागले आहे. प्रवासी कंपन्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढतच चाललेली आहे. भारतात दरवर्षी किमान १.५० कोटी पर्यटक येतात.एवढेच नव्हे तर देशांतर्गत पर्यटकांची संख्या वाढली आहे पर्यटन करणे हि आता चैनीची बाब राहिलेली नाही.तर ती गरज झालेली आहे. पर्यटन क्षेत्र हे आता रोजगार निर्मितीचे फार मोठे क्षेत्र बनले आहे.गाईड म्हणून काम करणे कुक म्हणून काम करणे हा हे एक वेगळे करिअर झाले आहे. विदेशातील रोजगाराच्या संधी कितपत आहेत याचा नव्याने विचार करण्याची गरज आहे. कोरोनाच्या महामारीच्या काळात अनेक राष्ट्रांनी निर्बंध घातल्यामुळे पासपोर्ट पासून ते विसा मिळण्यापर्यंत अशा एक ना अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. शिक्षणासाठी विदेशात जाणे सोपे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र तिथेच नोकरीची संधी प्राप्त हि न्यावर मात्र नक्कीच मर्यादा पडणार आहे.
कर्मचाऱ्यांच्या असुरक्षेत वाढ
आधुनिक काळात रोजगारात रोजगाराच्या स्वरुपात अनेक महत्वपूर्ण बदल होत असले तरी नव्या युगातील कामगारांना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागणार आहे. कारण अलीकडे स्वतंत्र कंत्राटदार वर्ग सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाय रोवू लागला आहे. सरकारची रोजगार विनिमय केंद्रे बंद पडली आहेत. रोजगार करणाऱ्या अनेक लोकांना आरोग्य विमा मिळत नाही.पेन्शन बंद होत चालली आहे. सुरक्षतेचा अभाव दिसून येतो. कामगारांना कायद्याचे संरक्षण किती आहे हा पुन्हा चिंतनाचा विषय आहे. उत्पादन प्रक्रियेतील अविभाज्य घटक असणाऱ्या कामगारांचा विषय आणि रोजगार निर्मिती हे दोन्ही विषय फार वेगळ्या पद्धतीने हाताळले तरच विकासाची प्रक्रिया गतिमान होईल. बऱ्याचवेळा माणसाच्या श्रमाचा विचार जेवढा महत्वाचा असतो तेवढाच त्याच्या मनाचा विचारही महत्वाचा असतो. दुर्दैवाने रोजगार करणाऱ्या माणसाच्या मनाचा विचार फार कमी केला जातो. नोकरी जाण्याची भीती इथपासून ते अगदी आपले काय होईल. इथपर्यंतच्या असणाऱ्या भीती माणसाला अधिक विचलित करीत आहेत.
सामाजिक संरक्षण कायदे अन् योजनांमध्ये सुधारणेची गरज
रोजगार आणि रोजगाराचे बदलते स्वरूप विचारात घेता त्याबरोबर काही प्रश्न निर्माण होत आहेत याचाही विहार अग्रक्रमाने करावाच लागेल. वेगवान प्रगती करणाऱ्या कंपन्यांना आवश्यक ते स्वातंत्र्य दिलेच पाहिजे मात्र त्याबरोबर त्यांच्यावर अंकुश ठेवावा लागेल. कामगार हिताला प्राधान्य द्यावे लागेल.कामगार कल्याण हा विषय फार वेगळ्या पद्धतीने हाताळावा लागेल.रोजगाराच्या भविष्याला आकार देण्यासाठी आणि अनौपचारिकतेच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सरकार, उद्योगसमूह,स्वयंसेवी संस्था आणि कामगार प्रतिनिधींनी एकत्र काम केले पाहिजे. अपारंपारिक रोजगाराची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन भारतीय कामगार आणि सामाजिक संरक्षण कायदे आणि योजनांमध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे. कामगारांना आपली सामूहिक शक्ती अधिक बळकट करण्यासाठी संघटनेचे नवे स्वरूप आणि प्रतिनिधित्व असणे आवश्यक आहे.
बदल हि काळाची गरज आहे. बऱ्याचवेळा असे म्हटले जाते कि आम्ही बदललो आता तुम्ही बदला रोजगाराच्या बाबतीतसुद्धा असेच झाले आहे. रोजगाराचे क्षेत्र, स्वरूप, व्याप्ती बदलली आहे त्यादृष्टीने कामगारांनी आपल्यात बदल केला पाहिजे त्याला दुसरा पर्याय नाही मात्र हे होत असताना कामगारांच्या कल्याणाचा विचार सोडून चालणार नाही. नाहीतर ऑनलाईनच्या जमान्यात आम्ही कधी ऑफलाईन झालो हे लक्षात येणार नाही.
(लेखक अर्थशास्त्राचे अभ्यासक व मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे सदस्य आहेत)
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.