दीड दशकाकडे वाटचाल करताना ‘दुर्गांच्या देशातून…’ या केवळ ट्रेकिंग या विषयाला वाहिलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या दिवाळी अंकाचा हा १४वा अंक आहे. महाराष्ट्रामध्ये ७०पेक्षा अधिक एव्हरेस्टर आहेत. एव्हरेस्टवीर आणि एव्हरेस्ट वीरांगना यांसाठी एव्हरेस्टर हा शब्द जाणीवपूर्वक वापरला आहे. या वर्षीच्या अंकाचा विचार करताना ‘एव्हरेस्ट विशेषांक’ काढावा, असे वाटले. अर्थात, ‘प्रत्येक वर्षी नवीन लेखक’ हे सूत्र या वर्षीही पाळायचे ठरवले. त्या दृष्टीने आजपर्यंत अंकात न लिहिलेल्या सर्व एव्हरेस्टरांशी संपर्क साधला. मी जरी ट्रेकिंग या क्षेत्राशी तीन दशकांहून अधिक काळ निगडित असलो, तरीदेखील सर्वच एव्हरेस्टर माझ्या परिचयाचे आहेत, असे नाही. यासाठी मला मनीषा वाघमारे, भगवान चवले आणि जितेंद्र गवारे या एव्हरेस्टरांनी इतर एव्हरेस्टरांचे क्रमांक देण्यात मोठे सहकार्य केल्याबद्दल मी त्यांचा मनःपूर्वक आभारी आहे.
संदीप भानुदास तापकीर
संपादक, दुर्गांच्या देशातून…,
‘श्रीनंदनंदन’ निवास, विठ्ठल मंदिरामागे, वाघेश्वरवाडी, मु. पो. चऱ्होली बुद्रुक (आळंदी देवाचीजवळ), ता. हवेली, जि. पुणे-४११०८१. भ्रमणध्वनी : ९८५०१७९४२१/९९२१९४८५४१
Email : sandeeptapkir@rediffmail.com
या वर्षी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट घडली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्रीयांचेच नव्हे, तर तमाम भारतवासीयांचे प्रेरणास्थान आहेत. त्यांनी आपले स्वराज्य किल्ल्यांच्या आधारेच उभारले नि वाढवलेदेखील. त्यांच्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावलेल्या किल्ल्यांपैकी १२ किल्ल्यांचा समावेश जागतिक वारसा यादीमध्ये करण्यात आला. याचा दुर्गप्रेमींपासून ते पंतप्रधानांपर्यंत सर्वांनाच आनंद झाला. त्यामुळे या विषयावर लेख असावा, हे ठरवले. म्हणूनच तर या अंकाची सुरुवात आणि शेवट याच विषयाने केला आहे. याशिवाय यामध्ये दोन वेगळे लेख आहेत. शिवछत्रपती पुरस्कारविजेत्या एव्हरेस्टवीरावर त्यांच्या कन्येने लिहिले आहे; तर अवघ्या तेरा वर्षांच्या वयात दोन खंडांतली सर्वोच्च शिखरे सर करणाऱ्या कन्येवर तिच्या आईने लिहिले आहे. हे दोन लेख अंकात घेण्यापाठीमागचे कारण म्हणजे, या दोन्हीही कन्या पुढे निश्चितच एव्हरेस्ट सर करतील, याबद्दल माझ्या मनात काहीच शंका नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले एकाच वेळी युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित होणे, यासारखा आनंददायी क्षण नाही. या प्रक्रियेत सर्वांत महत्त्वाची भूमिका बजावणारे आय.ए.एस. विकास खारगे यांची मुलाखत घेण्यासाठी गेले महिनाभर प्रयत्न करत होतो. शेवटी त्यांच्या अत्यंत व्यग्र नियोजनातून त्यांनी काही वेळ या मुलाखतीसाठी दिला. योग्य व्यक्ती योग्य जागी असेल, तर किती महत्त्वपूर्ण काम होऊ शकते, याचे खारगे सर हे उत्तम उदाहरण आहेत.
त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन्समधून बी.ई., तसेच युकेमधून गव्हर्नन्स आणि डेव्हलपमेंट यामधून एम.ए. केले आहे. १९९४मधील आय.ए.एस. परीक्षेत ते महाराष्ट्रात पहिले, तर देशामध्ये ३४वे आले होते. आजपर्यंत त्यांनी साहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांपासून ते अतिरिक्त मुख्य सचिवांपर्यंत अनेकविध पदांवर मूलभूत काम केले आहे. त्यामध्ये ब्रह्मपुरीचे साहाय्यक जिल्हाधिकारी, नागपूर व चंद्रपूर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी, यवतमाळ आणि त्या वेळचे औरंगाबाद (आजचे छत्रपती संभाजीनगर) येथे जिल्हाधिकारी, जीएडीचे उपसचिव, विक्रीकर विभागाचे सहआयुक्त, भूजल सर्वेक्षण आणि विकास संस्थेचे संचालक, कुटुंब कल्याणचे आयुक्त, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानचे संचालक, रस्ते वाहतूक महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, मुख्यमंत्र्यांचे सचिव, बृहद् मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त, वनखात्याचे प्रधान सचिव, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव, सांस्कृतिक विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि सध्या महसूल नोंदणी आणि मुद्रांक शुल्कचे अतिरिक्त मुख्य सचिव अशा पदांवर त्यांनी सेवा केली आहे. त्यांचा कामाचा झपाटा अत्यंत विलक्षण आहे. म्हणूनच त्यांना त्यांच्या कामासाठी अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे महाराष्ट्राचे राज्यगीत लॉंच करण्यामध्ये त्यांचा विशेष पुढाकार होता. त्यांनी भारतातर्फे बँकॉक, थायलंड, स्टॉकहोम, स्वीडन, ढाका, बांगलादेश, ब्राझील, क्वालालुंपूर, मलेशिया, बर्सिलोना, स्पेन, सिंगापूर, केनिया, चीन, हार्वर्ड विद्यापीठ, युएसए, दुबई, पोलंड, इस्राईल, फ्रान्स, लंडन, जपान, मॉस्को इत्यादी ठिकाणी प्रतिनिधित्व केले आहे. यातील काही ठिकाणी आंतरराष्ट्रीय परिसंवादात सादरीकरण केले आहे. त्यांनी ‘पंचायत राज व्यवस्था : नवी भूमिका’ आणि ‘एक हरित चळवळ, वृक्ष लागवडीचा महाप्रयोग’ ही दोन पुस्तकेही लिहिली आहेत. त्यांना संगीताची आणि वाचनाची विशेष आवड आहे.
जेव्हा युनेस्कोमधील वारसा यादीत आपले किल्ले यावेत यासाठी जी प्रक्रिया चालू होती, तेव्हा ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या मुख्य सचिवांबरोबरच सांस्कृतिक विभागाचेसुद्धा मुख्य सचिव होते. त्यामुळेच प्रत्येक टप्प्यावर ते योग्य निर्णय घेत होते. म्हणूनच ही प्रत्येक टप्प्यावरील किचकट प्रक्रिया आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांची मुलाखत घ्यायचे ठरवले होते.
अधिकार पदावर दीर्घकाळ कार्यरत असलेल्या जाणकार व्यक्तीची मुलाखत घेण्यासाठी तितकीच अभ्यासू व्यक्ती असणे गरजेचे होते. यासाठी माझ्यासमोर डॉ. लता पाडेकर यांचे नाव सर्वप्रथम आले. संत साहित्याच्या अभ्यासक आणि प्रयोगशील शिक्षिका म्हणून त्या आपल्या सर्वांना सुपरिचित आहेत. शिवछत्रपतींबद्दलचा कमालीचा आदर आणि अनेक किल्ल्यांची केलेली भटकंती यांमुळे मी त्यांना ही मुलाखत घेण्याची विनंती केली. त्यांनीही लगेच होकार दिला. अत्यंत संयमाने ही दीर्घ मुलाखत घेतली आणि शब्दबद्ध केली. केवळ त्यांच्या प्रयत्नांमुळेच आज आपल्यासमोर ही मुलाखत आली आहे.
महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती सन्मान मिळवणारे ऋषीकेश यादव हे ट्रेकिंग विश्वातील एक अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्त्व आहे. १९९८मध्ये झालेल्या पहिल्या भारतीय यशस्वी नागरी एव्हरेस्ट मोहिमेचे नेतृत्व त्यांनी केले होते. युथ हॉस्टेलच्या माध्यमातून त्यांनी जम्मू-काश्मीर, मिझोराम यांच्यासह देशातील १२ राज्यांमध्ये राष्ट्रीय ट्रेकिंग मोहिमांचे आयोजन केले आहे. हिमालय माउंटन सायकलिंग मोहिमा राष्ट्रीय स्तरावर सर्वांत प्रथम त्यांनी सुरू केल्या. मिझोराम व मेघालयमध्ये त्यांनी राष्ट्रीय केव्हिंग मोहिमा आयोजित केल्या. अंधांमध्ये गिर्यारोहण रुजावे यासाठी ते १९८२पासून प्रयत्न करत आहेत. अंध व मूकबधिर गिर्यारोहकांची जगातील पहिली हिमालय शिखर मोहीम १९९२मध्ये त्यांच्याच नेतृत्वाखाली झाली होती. ट्रेकिंग विश्वात त्यांनी आपल्या कर्तृत्वाने आदर प्राप्त केला आहे. जागतिक वारसा समितीच्या भारत मंडपम, दिल्ली येथे झालेल्या बैठकीत शिवछत्रपतींच्या १२ किल्ल्यांचे स्केल मॉडेल करून तेथे शासनाच्या वतीने प्रदर्शित करण्यात त्यांचा अत्यंत सिंहाचा वाटा होता. अशा वंदनीय यादव सरांनी एव्हरेस्ट आरोहणाचा आलेख आपल्यासमोर नेमकेपणाने ठेवला आहे.
एव्हरेस्टवीर गणेश मोरे हे व्यवसायाने मेकॅनिकल इंजिनिअर आहेत. एका खाजगी कंपनीत सध्या ते नोकरी करत आहेत. दोन तपांपेक्षा अधिक काळ त्यांना पदभ्रमण, प्रस्तरारोहण आणि हिमालयातील गिर्यारोहणाचा अनुभव आहे. त्यांनी अनेक मोहिमा यशस्वी केल्या आहेत. २०१२च्या अयशस्वी प्रयत्नानंतर अजिबात हार न मानता पुढील वर्षी २०१३मध्ये त्यांनी अत्यंत निर्धाराने माउंट एव्हरेस्ट सर केले. एवढ्यावरच न थांबता त्यांनी पुढे २०१६मध्ये माउंट चो-ओयू हे अष्टहजारी शिखर सर केले. दोनच वर्षांपूर्वी २०२३मध्ये त्यांनी माउंट मेरू दक्षिण ही मोहीमदेखील केली आहे. त्यांचा प्रवास पुण्याजवळच्या सिंहगडापासून सुरू झाला आहे. जगातील सर्वोच्च शिखर असलेल्या एव्हरेस्ट मोहिमेतील अत्यंत थरारक अनुभवांचे कथन त्यांनी आपल्या लेखाद्वारे केले आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील द्वारका डोखे या २००५मध्ये पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. गेली २० वर्षे त्या महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आहेत. महाराष्ट्रातील अनेक किल्ले पाहिल्यानंतर त्यांची पावले हिमालयाकडे वळली. चंद्रखानी, रूपकुंड, माउंट नून ही शिखरे यशस्वीपणे सर केल्यानंतर त्यांना एव्हरेस्टची ओढ लागली. गतवर्षी वयाच्या ५०व्या वर्षी त्यांनी माउंट एव्हरेस्ट सर केले आणि महाराष्ट्र पोलीस दलातील त्या पहिल्या महिला, तसेच महाराष्ट्रातील सर्वांत ज्येष्ठ महिला होण्याचा सन्मान प्राप्त केला. जगातील सर्वोच्च शिखरावर त्यांनी ऑक्सिजनशिवाय भारताचे राष्ट्रगीत गायले आणि नवीन रेकॉर्ड रचले. या कृतीतून त्यांचे देशप्रेम प्रकर्षाने दिसून येते.
अनेक गिर्यारोहक एव्हरेस्ट सर केल्यानंतर थांबतात; मात्र त्यांनी माउंट ल्होत्से हे अष्टहजारी शिखर सर केले. याच वर्षी त्यांनी सप्टेंबर महिन्यात माउंट मनास्लू हे आणखी एक अष्टहजारी शिखर सर केले आहे. सर्व अष्टहजारी शिखरे सर करण्याचा त्यांचा मानस आहे. त्यांच्या या कामगिरीची दखल घेऊन त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. गिर्यारोहणाशिवाय गायनाची, संगीताची आणि डायरी लिहिण्याची त्यांना विशेष आवड आहे. आपला एव्हरेस्ट प्रवास त्यांनी दीर्घ लेखाद्वारे आपल्यासमोर ठेवला आहे.
सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात जन्मलेले मिलिंद रासकर यांनी आपल्या अहिरे गावातच बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर पुण्यात तीन वर्षांचे तांत्रिक शिक्षण घेतले. पुढे नाशिक येथील महिंद्रा प्लांटमध्ये त्यांनी सात वर्षे नोकरी केल्यानंतर स्वतःचा व्यवसाय सुरू केला. आजही या व्यवसायात ते यशस्वीपणे वाटचाल करत आहेत. शिवछत्रपतींच्या किल्ले भटकंतीतूनच त्यांना हिमालयाची ओढ लागली. वयाच्या ४५व्या वर्षी २०१९मध्ये त्यांनी जगातील सर्वोच्च शिखर असलेले एव्हरेस्ट सर केले. विशेष म्हणजे एवढ्यावरच न थांबता त्यांनी त्यानंतर सात खंडांतील सर्वोच्च शिखरे अगदी कमी वेळामध्ये यशस्वीपणे सर केली. ही शिखरे सर करणारे ते महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती आहेत. इतके यश मिळवल्यानंतरसुद्धा ते कुठेही प्रसिद्धीच्या झोतात येत नाहीत. कोणत्याही चंपूमध्ये अडकत नाहीत. एव्हरेस्ट अनेक गिर्यारोहक सर करतात; मात्र त्याची तयारी नेमकी कशी करायची, हे कोणीच सांगत नाहीत. त्यामुळे असंख्य अडचणी येतात. मिलिंद रासकर यांनी त्यांना आलेल्या अडचणींवर कशी मात केली, हे अगदी नेमकेपणाने आपल्या लेखातून मांडले आहे. पाश्चिमात्य गिर्यारोहक सरावाबरोबरच वाचनालाही महत्त्व देतात. आपल्याकडे त्याचा प्रचंड अभाव आहे. हा लेख वाचून भावी एव्हरेस्टवीर निश्चितच वाचनाकडेही गांभीर्याने वळतील, असा विश्वास वाटतो.
एकदा एव्हरेस्ट सर करणे जिथे अवघड असते, तिथे दोनदा एव्हरेस्ट सर करणारे कुंतल जोईशर हे एक हटके, अद्भुत व्यक्तिमत्त्व आहे, हे आपल्या लगेच लक्षात येते. ते उच्च दर्जाचे संगणक विज्ञान व्यावसायिक असून, एक कुशल गिर्यारोहक व फिटनेस प्रशिक्षकही आहेत. यामुळेच भारतातील टॉप ३० फिटनेस प्रभावकांपैकी ते एक आहेत. गिर्यारोहणासाठी त्यांनी जगभर प्रवास केला आहे. नेपाळ आणि चीन या दोन्ही बाजूंनी त्यांनी माउंट एव्हरेस्ट सर केलेले आहे. तसेच त्यांनी माउंट ल्होत्से व माउंट मनास्लू या अष्टहजारी शिखरांवर यशस्वी चढाई केली आहे. दक्षिण व उत्तर अमेरिकेतील सर्वोच्च शिखरेही त्यांनी सर केली आहेत. ते जगातील एक अत्यंत प्रसिद्ध छायाचित्रकार आहेत. त्यांची छायाचित्रे नॅशनल जिओग्राफिक, बीबीसी अर्थ, हिमालयीन जर्नल इ. जगभरातील अनेक वर्तमानपत्रे आणि मासिकांमध्ये प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीमुळे ते टेडएक्स (TEDx) या प्लॅटफॉर्मवरदेखील अनेक वेळा आले आहेत.
‘सेव्ह द डक’ या इटालियन कंपनीचे ते खेळाडू राजदूत आहेत. शरीरसौष्ठवपटू म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत. विशेष म्हणजे, ते व्हेगन आहेत आणि त्याचा त्यांना सार्थ अभिमान आहे. डिमेन्शिया आजाराबद्दल समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी ते सतत प्रयत्नरत असतात. जगभरात ते आपल्या एव्हरेस्ट चढाईच्या संदर्भात दृकश्राव्य प्रवास कथन करतात. वक्तृत्वाची कला अंगी असलेल्या कुंतल यांनी आपला एव्हरेस्टचा प्रवास इंग्रजीतील दीर्घ लेखातून मांडला आहे.
मुंबईत जन्मलेले व शिक्षण घेतलेले व्यंकटेश माहेश्वरी ‘वेंकी’ या नावाने प्रसिद्ध आहेत. कॉर्पोरेट क्षेत्रात अनेक वर्षे उच्च अधिकार पदावर नोकरी केल्यानंतर त्यांनी ‘गोक्यो’ हा आऊटडोअर कपडे व उपकरणे बनवण्याचा स्वतःचा व्यवसाय सुरू केला. ते अनुभवी गिर्यारोहक असून, त्यांनी अनेक कठीण मोहिमा यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. ते कुटुंबकेंद्री, शिस्तबद्ध आणि चिंतनशील आहेत. त्यांच्या लेखातूनसुद्धा हेच स्पष्ट होते. त्यांचा छोटेखानी लेख वाचून निश्चितच आपल्या विचारांची दिशा बदलेल, याची खात्री वाटते.
या अंकातील एक वेगळा लेख सातारा जिल्ह्यातील लोणंदच्या प्राजित परदेशी यांचा आहे. गिर्यारोहणाची काहीही पार्श्वभूमी नसताना एव्हरेस्टला जायचे हे ठरवल्यानंतर तेथे जाताना काय काय अडचणी आल्या येथून ते एव्हरेस्ट सर करेपर्यंतचा त्यांचा प्रवास त्यांनी आपल्या लेखातून अत्यंत प्रामाणिकपणे मांडला आहे. त्यांना लहानपणापासूनच सामाजिक कार्याची आवड असून, ते कमी काळात उच्च ध्येय साध्य करण्यासाठी कायम प्रयत्न करत असतात. राजकारणाच्या आवडीमुळे ते भाजपचे पदाधिकारी आहेत. गिर्यारोहक, पॅराग्लायडर पायलट असलेले प्राजित आज इतरांसाठी आदर्श ठरले आहेत. हॅंडीकॅप असूनही एव्हरेस्ट सर करतानाची त्यांची जिद्द निश्चितच इतरांना प्रेरणादायी ठरेल, यात काहीच शंका नाही.
स्वतःवर विश्वास ठेवल्यावर व्यक्ती आपले उद्दिष्ट कसे साध्य करू शकते, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अपर्णा प्रभुदेसाई. लहान वयात लग्न झाल्यानंतर त्यांना अनेक अडचणी येऊनही त्या खंबीर राहिल्या. डॉक्टरांनी त्यांना फिरण्यासाठी इतरांच्या आधाराची आवश्यकता असल्याचे सांगितल्यावरही त्यांनी अजिबात हार मानली नाही. त्यातूनच त्या खेळाकडे वळल्या. धावपटू, सायकलस्वार आणि गिर्यारोहक म्हणून आज त्या प्रसिद्ध आहेत. २०१७मध्ये उत्तर बाजूने माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या महाराष्ट्रातील त्या पहिला महिला आहेत. पुणे ते गोवा ही ६४८ किलोमीटरची डेक्कन क्लिप हँगर सायकलिंग शर्यत पूर्ण करणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. भारतात आणि भारताबाहेर त्या अनेक पूर्ण आणि अल्ट्रा मॅरेथॉन धावल्या आहेत.
आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यात महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च क्रीडा सन्मान असलेल्या छत्रपती क्रीडा पुरस्काराचादेखील समावेश होतो. पीएम आणि आयआरमध्ये त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले असून, सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी येथे मानव संसाधन विभागात त्या अभ्यागत प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. विविध महाविद्यालयांच्या प्राध्यापकांसाठी त्या स्वतंत्र कार्यशाळा घेतात. व्यावसायिकदृष्ट्या त्या एक कार्यकारी प्रशिक्षक, मास्टर प्रॅक्टिशनर, मास्टर ट्रेनर आणि ओडी सल्लागार आहेत. कम्युनिकेशन, संप्रेषण इत्यादी अनेक विषयांवर भारतात आणि परदेशात त्या कार्यशाळा आयोजित करतात. त्यासाठी त्यांनी ‘बोधिवृक्ष’ या संस्थेची स्थापना केली आहे. ‘ॲडव्हेंचर्स बियॉंड बॅरियर्स फाउंडेशन’ या संस्थेद्वारे त्या अपंग व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कार्यरत आहेत. त्यांनी आजपर्यंत ३३ देशांच्या प्रवासासह भारतातील प्रत्येक राज्यात प्रवास केला आहे. एव्हरेस्टविषयीचा त्यांचा इंग्रजी लेख आपल्याला निश्चितच त्यांचे वेगळेपण स्पष्ट करतो.
किशोर धनकुडे हे सिव्हिल इंजिनिअर असून, बांधकाम व्यावसायिक आहेत. चीन आणि नेपाळ या दोन्ही बाजूंनी माउंट एव्हरेस्ट सर करणारे ते भारताचे पहिले गिर्यारोहक आहेत. जगातील सात खंडांतील सात सर्वोच्च शिखरे सर करण्याचा त्यांचा संकल्प आहे. यातील आफ्रिका, युरोप, दक्षिण व उत्तर अमेरिका या खंडांतील शिखरे त्यांनी सर केली आहेत.
गिर्यारोहकाशिवाय त्यांची वेगळी ओळख म्हणजे, ते उत्तम धावपटू आहेत. जगातील सर्वांत उंच पर्वत मॅरेथॉन म्हणजेच खारदुंगला चॅलेंज ही ७२ किलोमीटरची अल्ट्रा मॅरेथॉन त्यांनी ६ सप्टेंबर २०२४ रोजी धावली. २६ मार्च २०२३ ते ३१ मार्च २०२४ या काळात त्यांनी दर रविवारी ५५ पूर्ण मॅरेथॉन धावल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेतील ‘कॉम्रेड अल्ट्रा मॅरेथॉन’ ही जगातील सर्वांत कठीण अल्ट्रा मॅरेथॉन आहे. ती त्यांनी आठ वेळा धावली आहे. अशा दुहेरी एव्हरेस्टवीर आणि धावपटू धनकुडे यांनी एव्हरेस्ट सर करताना आत्मविश्वासाबरोबरच धोका पत्करणे किती गरजेचे आहे, हे स्वतःच्या अनुभवातून अगदी छोटेखानी लेखाद्वारे आपल्यासमोर उलगडले आहे. अंकातील हा सर्वांत छोटा लेख असला, तरी दृष्टिकोन मात्र खूप महत्त्वाचा आहे. यातून आपल्याला निश्चितच ऊर्जा मिळेल, यात शंकाच नाही.
सौरज झिंगन यांनी एमबीए ही पदवी मिळवली आहे. अनेक ठिकाणी उच्च पदांवर काम केल्यानंतर त्यांनी स्वतःचीच कंपनी सुरू केली आहे. नेहरू इन्स्टिट्यूटमधून त्यांनी गिर्यारोहणाचे शिक्षण घेतले आहे. ऑस्ट्रेलियातील रॉयल लाईफ सेव्हिंग सोसायटीचे ते प्रशिक्षित गार्ड आहेत. तसेच ते इंडियन पॅराशूटिंग फेडरेशनचे मान्यताप्राप्त स्काय डायव्हर आहेत. २००९मध्ये त्यांनी नेपाळमधील मेरा पीक हे शिखर सर्वांत कमी वयात सर केले आहे.
त्यांचे एमबीएचे वर्गमित्र असलेल्या समीर पाथम यांनी त्यांच्यासोबतच एव्हरेस्ट सर केले आहे. प्रारंभी इन्फोसिसमध्ये काही काळ काम केल्यानंतर त्यांनी मित्रासोबतच कंपनीत भागीदारी स्वीकारली. भारताबरोबरच नेपाळमधील हिमालयातदेखील त्यांनी भरपूर पर्वतारोहण केले आहे. ते ॲडव्हान्स ओपन वॉटर सर्टिफाइड डायव्हर असले, तरी समुद्राइतकेच पर्वतामध्येही तितकेच रममाण होतात. मे २०१८मध्ये सौरज व समीर या दोन मित्रांनी एकत्र एव्हरेस्ट सर केल्याचा अनुभव आपल्या इंग्रजीतील लेखात मांडला आहे. या दोघांनी मिळून इंग्रजीतून ‘व्हॉट्स युवर एव्हरेस्ट? अ पाथ टू पॅशन अँड परपोज’ हे पुस्तकदेखील लिहिले आहे. हा लेख मिळवून देण्यासाठी मला त्यांचे मित्र आयुष कानिटकर यांनी मोलाचे सहकार्य केले आहे. यासाठी त्यांचे मनापासून आभार.
जय कोल्हटकर हे अगदी लहान वयापासूनच साहसी उपक्रमांमध्ये सहभागी होत आहेत. जंगल, निसर्ग, प्राणी संवर्धन यांची त्यांना मूलभूत आवड आहे. यातूनच ते गिर्यारोहण, रॉक क्लाइंबिंग, हायकिंगकडे वळले. याशिवाय इतरही विविध साहसी खेळांमध्ये ते सहभागी होत असतात. संयम, शिस्त आणि धैर्य या गुणांच्या जोरावरच ते जगातल्या सर्वोच्च शिखरावर पोहोचले. घराबाहेरच्या जगाला शाळा मानणाऱ्या कोल्हटकरांनी एव्हरेस्टचा आपला अनुभव शब्दबद्ध केला आहे.
नेपाळमधील नामचे बाजार या ठिकाणी जन्मलेल्या अस्मिता दोर्जी यांनी नेहरू इन्स्टिट्यूटमधून बेसिक व ॲडव्हान्स माउंटेनिअरिंग हे कोर्स केले आहेत. दोन दशकांहून अधिक काळ त्या टाटा स्टील ॲडव्हेंचर फाउंडेशनमध्ये प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. गंगोत्री, धर्मसुरा, स्टोक कांगरी, कांगयात्से, डजो जोंगो, सतोपंथ या शिखरांचा त्यांना अनुभव आहे. ऑक्सिजनशिवाय माउंट मनास्लू हे अष्टहजारी शिखर सर करणाऱ्या त्या दुसऱ्या भारतीय महिला आहेत. ऑक्सिजनशिवाय एव्हरेस्ट सर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. कॅम्प चारपर्यंत त्यांनी ऑक्सिजन वापरला नाही. शेवटच्या १०० मीटरपर्यंत ऑक्सिजनशिवाय पोहोचणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला आहेत. त्यांचे वडील हे देखील एव्हरेस्टवीर होते. त्यांनाच आदर्श मानून त्यांनीही वडिलांप्रमाणेच एव्हरेस्ट सर केले आहे. त्यांनी एव्हरेस्टबाबतचे आपले अनुभव इंग्रजी लेखातून मांडले आहेत.
महाराष्ट्र शासनाने आदिवासींसाठी अनेक योजना राबवून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा कायमच प्रयत्न केला आहे. आदिवासी मुळातच निसर्गाच्या सान्निध्यात राहतात. त्यांच्या कष्टप्रद जीवनशैलीमुळे त्यांच्यात काटकपणा लहानपणापासूनच येतो. हे लक्षात घेऊन शासनाने आदिवासी मुलांना एव्हरेस्ट सर करण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्यासाठी त्यांना योग्य ते प्रशिक्षण दिले. अशाच प्रशिक्षणातून, अकरावीत शिकत असताना एव्हरेस्ट सर केलेल्या चंद्रकला गावित यांनी आपले अनुभव शब्दबद्ध केले आहेत. धुळे जिल्ह्यातील महाराष्ट्राच्या सीमेवरच्या एका आदिवासी पाड्यात जन्मलेल्या चंद्रकला यांनी आदिवासी आश्रम शाळेतच शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांचा लेख वाचल्यानंतर संधी मिळाली, तर कोणीही यशस्वी होऊ शकतो, हे आपल्या लक्षात येते. म्हणूनच दोन आर्थिक व सामाजिक समाजातील दरी कमी करण्याच्या शासनाच्या या उपक्रमाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.
उमेश घेवरीकर हे उपक्रमशील शिक्षक, पत्रकार, लेखक, अभिनेता, दिग्दर्शक व सूत्रसंचालक आहेत. त्यांना गतवर्षी राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. ‘विजेता’, ‘हृदयस्थ’, ‘शिक्षणाच्या कविता’, ‘अब नॉर्मल’, ‘अवताराची गोष्ट’ ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. शालेय विद्यार्थ्यांसाठी त्यांनी ‘किलबिल’ या वार्षिक अंकाचे संपादन केले आहे. अनेक वर्तमानपत्रे, मासिके, दिवाळी अंकांमधून त्यांचे लेखन प्रसिद्ध झाले आहे. त्यांच्या ‘कवितांची बाग’ या अभिनव उपक्रमाला अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या आहेत. गेली २० वर्षे त्यांनी बालनाट्य स्पर्धेत सहभाग घेऊन अनेक पारितोषिके मिळवली आहेत. त्यांनी १८ लघुपटांची निर्मिती केली असून, त्यातील पाच लघुपटांना राज्यस्तरावरील पुरस्कार मिळाले आहेत. ‘बाबू बँड बाजा’ व ‘पुरुषोत्तम’ या मराठी चित्रपटांत त्यांनी भूमिकादेखील केल्या आहेत. अशा हरहुन्नरी कवी मनाच्या घेवरीकर सरांनी आपला विद्यार्थी असलेल्या अविनाश बावणे यांच्या एव्हरेस्टचा प्रवास अत्यंत सविस्तरपणे लेखातून आपल्यासमोर ठेवला आहे. शेतकरी विद्यार्थी ते नौदलापर्यंतचा अविनाश यांचा प्रवास अधोरेखित करताना त्यांना आलेल्या एव्हरेस्टच्या अडचणींवर जिद्दीच्या जोरावर केलेली मात आपल्याला प्रेरित करते.
या वर्षीचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार माझे मित्र एव्हरेस्टवीर कृष्णा ढोकले यांना मिळाला. त्यांनी अगोदरच अंकात लिहिले असल्यामुळे त्यांचा लेख अंकात घ्यायचा नव्हता. मात्र, त्यांच्यावर एक लेख असावा, असे वाटत होते. खूप विचारांती त्यांची कन्या चेलुवी ढोकले यांना लिहायला सांगितले. त्यांनी आपल्या वडिलांसोबत अनेक किल्ले पाहिले आहेत, हिमालयात गिर्यारोहण मोहिमा केल्या आहेत. त्यानंतर लिंगाणा, सिंहगड अशा अनेक शिखरांवर लीड क्लाइंब केले आहे. गेली काही वर्षे त्या गिर्यारोहणाबरोबरच भिंतीवर चढाईच्या अनेक स्पर्धांमध्ये भाग घेऊन पदके मिळवताहेत. स्पोर्ट क्लाइंबर असलेल्या चेलुवींनी थायलंडमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. काही वर्षांतच आपल्या वडिलांप्रमाणे त्या नक्कीच एव्हरेस्ट सर करतील, याची मला खात्री वाटते. त्यांनी आपल्या वडिलांबद्दलच्या भावना नेमक्या पद्धतीने शब्दबद्ध केल्या आहेत. विशेषतः त्यातील शिवछत्रपती पुरस्कार सोहळ्याचे वर्णन खूप नाट्यमय झाले आहे. हा लेख युवा पिढीला नक्कीच प्रेरणादायी ठरेल, यात काहीच शंका नाही.
ज्योती कुलकर्णी या साताऱ्यामध्ये गेल्या १५ वर्षांपासून शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. इतिहासातून एम.ए., डी.एड., डी.एस.एम., डिप्लोमा इन जर्नालिझम असे शिक्षण त्यांनी घेतले आहे. सातारा नगरपालिका शिक्षण मंडळाचा आदर्श शिक्षिका पुरस्कारदेखील त्यांना मिळाला आहे. त्यांना वाचनाची व पर्यटनाची विशेष आवड आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहुपुरी शाखेच्या त्या कार्यकारिणी सदस्य आहेत. आदर्श शिक्षिका असल्यामुळे त्यांनी आपल्या दोन्ही लेकींना अत्यंत उत्तम पद्धतीने घडविले आहे. सध्या त्यांची धैर्या कुलकर्णी ही लेक तिच्या गिर्यारोहणातील कामगिरीमुळे सातत्याने गाजते आहे. अत्यंत कमी वयात धैर्याने अनेक किल्ले पाहिले. एवढ्यावरच न थांबता एव्हरेस्ट बेस कॅम्पसह तिने दक्षिण आफ्रिकेतील सर्वोच्च असणारे किलीमांजारो व त्यानंतर युरोप खंडातील सर्वोच्च असणारे एल्ब्रुस या शिखरांवर यशस्वी चढाई केली आहे. किल्ल्यांपासून सुरू झालेला धैर्याचा हा प्रवास निश्चितच एव्हरेस्ट सर करेल, यात दुमत नाही. आपल्या गुणी लेकीच्या कर्तृत्वाचे नेमके चित्रण कुलकर्णी मॅडमने आपल्या लेखात केले आहे. अनेक मुलींना या लेखातून निश्चितच प्रेरणा मिळेल.
वरुण भामरे यांनी दिल्ली येथील स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर या नामांकित संस्थेतून जतन व संवर्धन या विषयात पदव्युत्तर पदवी मिळवली आहे. गेली काही वर्षे ते वारसा संवर्धन या क्षेत्रात कार्यरत आहेत. आतापर्यंत त्यांनी जैन व मराठाकालीन मंदिरे, वास्तू व दुर्गसंवर्धनात पुढाकार घेतला आहे. पुणे व जळगाव या विद्यापीठांमधील वास्तुशास्त्र महाविद्यालयांत ते व्हिजिटिंग फॅकल्टी या नात्याने अध्यापनाचे कार्य करतात. विशेष म्हणजे, गेल्या सात वर्षांपासून ते रायगड विकास प्राधिकरणामध्ये मुख्य वास्तुसंवर्धक म्हणून कार्यरत आहेत. युनेस्कोने जे १२ किल्ले वारसा यादीत समाविष्ट केले आहेत, त्यातील एक प्रमुख किल्ला म्हणजे अर्थातच शिवछत्रपतींची राजधानी असलेला रायगड होय. या रायगडाच्या वास्तुसंवर्धकाचा लेख या अनुषंगाने असणे योग्यच होते. भामरे यांनी वेगळ्या दृष्टिकोनातून युनेस्कोच्या प्रक्रियेबद्दलची माहिती, त्यातील युवराज छत्रपती संभाजीराजांच्या योगदानाविषयीची माहिती आपल्यासमोर मांडली आहे. अंकातील हा शेवटचा लेख अत्यंत महत्त्वाचा आहे. याच विषयावरील मुलाखतीने अंकाची सुरुवात झाली व शेवटही होत आहे.
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे गेल्या महिन्यात निधन झाले. माझा त्यांच्याशी १९९४पासून परिचय होता. त्यांचे शिवचरित्र हे अनेकांना प्रेरणादायी ठरले आहे. अनेक भाषांचे व लिपींचे जाणकार असलेल्या, युद्धशास्त्राचा व्यासंग असलेल्या या थोर इतिहास तपस्वी मेहंदळे सरांना या वर्षीचा ‘एव्हरेस्ट विशेषांक’ अर्पण केला आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
