मात्र खरंच मराठीची एवढी चिंता करणे आवश्यक आहे काय ? यावर मला वैयक्तिकरित्या एवढंच वाटतंय कि चिंता वाटणं हे आपल्या जिवंतपणाचं लक्षण आहे. पण एवढी चिंता करण्याची गरज नसून मराठीस सर्वसमावेशक कशी करता येईल, तिला व्यापक कशी करता येईल याचे चिंतन करण्याची खरी गरज आहे.
श्रीकांत धोटे
मोबाईल – 8087332593
काही दिवसापूर्वीच मराठी भाषा दिन साजरा केला. गेल्या दोनचार दिवसात आपण मराठीचा केलेला प्रचंड जागर अभिमानस्पद असून मराठीच्या उत्कर्षच्या दृष्टीने महत्वाचा आहे. जगात बोलल्या जाणाऱ्या एकूण भाषांमध्ये मराठी हि दहाव्या क्रमांकाची भाषा आहे हे मराठीचा एक शिलेदार म्हणून भूषणावह आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याकरिता शासन, प्रशासन, साहित्यिक संघटन, विविध संस्था, मराठीचे हितचिंतक हे प्रयत्न करीत आहेत आणि त्या प्रयत्नांना लवकरच यश मिळेल याचे संकेत मिळत आहेत. तो दिवस लवकरच उजाडावा ही आस आहे. हे सर्व सकारात्मक असले तरी काही प्रश्न, चिंता या सतत व्यक्त केल्या जात आहेत. त्या म्हणजे मराठीवर इंग्रजीचे आक्रमण, हिंदीचा शिरकाव, मराठी शाळा बंद पडणे, मराठी शाळांमध्ये कमी होत असलेली पटसंख्या, हे झालं तर मराठी कशी टिकेल, जगेल, मराठीचे भविष्य काय ?, ती कशी जगवावी ?, मराठीच्या संवर्धनाकरिता काय करावे ? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. मराठी प्रेमी म्हणून मराठीच्या प्रेमाखातीर ते केले जात आहे. ते प्रश्न निर्माण होणे म्हणजेच आपण आपल्या मायबोलीसाठी किती संवेदनशील आहो याचे द्योतक आहे.
मात्र खरंच मराठीची एवढी चिंता करणे आवश्यक आहे काय ? यावर मला वैयक्तिकरित्या एवढंच वाटतंय कि चिंता वाटणं हे आपल्या जिवंतपणाचं लक्षण आहे. पण एवढी चिंता करण्याची गरज नसून मराठीस सर्वसमावेशक कशी करता येईल, तिला व्यापक कशी करता येईल याचे चिंतन करण्याची खरी गरज आहे.
आपण वारंवार मराठी शाळांचा विषय काढतो पण वास्तव विचार केल्यास आज जे वातावरण समाजात आहे. जी शिक्षणपद्धती सर्वव्यापक होत आहे त्यात इंग्रजी शिक्षणाशिवाय आपला मुलगा या स्पर्धेत टिकू शकत नाही हि जनभावना आहे आणि तिला आधार आहे. त्यामुळे त्यावर जास्त चर्चा करण्यापेक्षा किंवा त्यासाठी आपली शक्ती खर्च करण्यापेक्षा सर्व माध्यमाच्या महाराष्ट्रात असणाऱ्या प्रत्येक शाळेत पूर्वप्राथमिक पासून ते उच्चमाध्यमिक पर्यंत एक मराठी हा विषय सक्तीचा असावा. मग तो विद्यार्थी कुणीही असो राज्यातला असो कि परदेशातला जर महाराष्ट्रात शिक्षण घ्यायचे असेल तर मराठी हा विषय शिकावाच लागेल. याप्रमाणे धोरण जर आखल्या गेले तर शिक्षणातून मराठी टिकेल ती व्यापक होईल. आणि मग मराठीतून विज्ञान, तंत्रज्ञान, वैद्यकीय शिक्षण शिकविता येईल पण त्यासाठी खूप तयारी करावी लागेल. विज्ञानातल्या सर्व इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द शोधावे लागतील त्यामुळे सर्व माध्यमाच्या शाळांमधून मराठी हा विषय सक्तीचा हे मला शक्य वाटते त्यानुसार नियोजन आणि आपला आग्रह असायला हवा.
दुसरा महत्वाचा म्हणजे मराठी भाषा हि प्रमाणभाषेचा नावाखाली बंदिस्त नसावी. नेमकी मराठी भाषा कोणती हा प्रश्न वारंवार कुणाच्याही मनात यायला नको. माझी भाषा मराठी नसून गावरान आहे हा न्यूनगंड निर्माण व्हायला नको तो करायला नको. शहरात गेलो तर माझ्या भाषेला कुणी हसतील, मला गावंढळ म्हणतील, हि भीती प्रत्येक मराठीजनांच्या मनातून निघायला हवी. कारण आज याबाबत प्रचंड भीती ग्रामीणांच्या, ग्रामीण विद्यार्थ्याच्या मनात दिसते आणि मग मी शहरात गेलो तर मला शहरासारखा बोलता आलं पाहिजे हा विचार मनात येतो. बोलता बोलता एखादी शब्द बोलीभाषेतील आला तर कसतरीच होते. आणि बहुसंख्य मग शहरात गेले कि शहरी मराठी शिकतात पण मग ते आपली बोली विसरून जातात. मला नाव आठवत नाही पण मी टीव्ही वर एका कार्यक्रमात एका जेष्ठ साहित्यिकांचे मत ऐकले आणि त्यांनी आपल्या संभाषणात बोलीभाषेमुळे आपली मराठी टिकून आहे असे एक विधान केले होते. ते खरे आहे. म्हणजे मला वैयक्तिकरित्या तरी पटले आहे. महाराष्ट्रात कुठेही जा दर दहा कोसाला म्हणजेच जवळपास २५ किमीला भाषा हि बदलत असते. आणि हे सर्वांना लागू आहे.
विदर्भ, मराठवाडा, कोकण, खान्देश यापुरते हे मर्यादित नाही तर एका जिल्ह्यात भाषेचे दोन तीन चार प्रकारे बदलताना ती तुम्हाला दिसू शकते. आणि ग्रामीण बोलीभाषेतील ते सर्व शब्द मराठीतच असतात ते त्यांच्या बोलीतल्या मराठीत असतात किंवा जर दुसरे भाषिक राज्य लागून असेल तर त्याचा प्रभाव असतो. जी मूळ प्रमाण मराठी आपण मानतो त्याशीच साम्य सांगणारे ते असतात फक्त जसेच्या तसे नसतात. आणि बोलीभाषेतही असे किती शब्द असतात तर फार कमी असतात बाकी शब्द हे प्रमाणभाषेतीलच असतात. जसा आपण मला हा शब्द प्रमाणभाषेत मूळ शब्द मानू या शब्दाला मले हा शब्द वऱ्हाडी, काही मराठवाड्यात, तर कोकणात माका हा शब्द वापरतात. जसा कोथिंबिरीला विदर्भात सांबार म्हणतात. विदर्भातल्या लोकांना सांबाराला कोथिंबीर म्हणतात हे माहीतच नाही.
रात्रौ हा शब्द प्रमाणभाषेत मूळ शब्द आहे. पण प्रमाणभाषा मानणारे सुद्धा हा शब्द रात्रौ असा ना उच्चराता रात्री असाच उच्चारतात संपूर्ण महाराष्ट्रात हा शब्द रात्री असाच उच्चारतात मात्र फक्त झाडीत हा शब्द रात्रौ असाच उच्चारतात. महाराष्ट्रातील आदिवासी बोलीभाषांवर सुद्धा मराठीचाच प्रभाव जाणवतो. कातकरी बोलीभाषेत कुठे ला कुसं, केव्हा ला कदवा, तुझी ला तुनी, केवढा ला कोडा असे मराठीशी साम्य दर्शविणारे शब्द वापरतात तर ठाकर या आदिवासी जमातीची बोली सुद्धा मराठीशीच साम्य साधणारी असून भाषेचा लहेजा वेगळा आहे. जसा प्रमाण मराठीत पांढरा या रंगासाठी धवल हा शब्द आहे. मात्र विदर्भात धवळा हा शब्द सर्रास वापरल्या जाते आणी तो बैलाकरीता जास्त् वापरला जातो. लालसर पिवळा बैलास लाखा हा शब्द वापरतात मात्र इतरत्र कुठेही हा शब्द वापरातच दिसत नाही किंवा कोणत्याही रंगाकरीता वापरतांना दिसत नाही. मग एका रंगाचे ते नाव म्हणुन आपण त्याला का स्विकारु नये.
कातकरी आणि ठाकूर या दोन्ही भाषेत पांढऱ्या रंगासाठी धवळा हाच शब्द वापरल्या जाते. त्यामुळे प्रमाणभाषेच्या जोखडातून बाहेर येऊन बोलीभाषेतील जे जे शब्द आहे त्याला प्रमाणभाषेचा दर्जा मिळणे आवश्यक आहे. कारण अनेक पिढ्यानपिढ्या हे शब्द बोलले जात आहे त्यात कुठलाही बडेजाव नाही. हे शब्द अस्सल आहे. आणि हे सर्व शब्द जर आपण स्वीकारले तर आपले शब्दभांडार समृद्ध होणार आहे. साहित्यिकांना लिहिण्याकरिता अनेक पर्यायी शब्द निर्माण होणार आहे. हे सर्वात महत्वाचे आहे. जसे
१. बावळट, बह्याड, बायताड, पागल, म्याड, म्याट
२. म्हटलं, मनलं, मतलं, बोललो
३. भाऊ, गडी, दादा, बंधू
याप्रमाणे एकाच अर्थाचे शब्द आहेत पण ते क्षेत्रानुसार बोलले जातात याचा अर्थ एखादा शब्द श्रेष्ठ, कनिष्ठ होतो असं नाही त्या त्या भागात बोलीभाषेत त्याला अधिष्ठान आहे ते अधिष्ठान आपण सर्वानी स्वीकारले पाहिजे तरच मराठी हि समृद्ध होणार आहे. म्हणून मराठीचे काळजीवाहू म्हणून बोलीभाषेस योग्य अधिष्ठान प्राप्त करून दिल्यास मराठीचा झेंडा निश्चितच उंच फडकणार आहे. तसेच मराठी साहित्यात ग्रामीण क्षेत्राचे योगदान हे अतिशय महत्वाचे आहे त्या ग्रामीण साहित्यिकांचा सन्मान त्यांना योग्य स्थान देणे आवश्यक आहे.
आज ग्रामीण महाराष्ट्रात अनेक सकस, दर्जेदार लेखन करणारे साहित्यिक आहे पण साहित्याच्या क्षितिजावर त्यांना कुठेही संधी नाही. त्या सर्व साहित्यिकांना योग्य संधी देणे, बोलीभाषेत आहे म्हणून ते नाकारणे बंद करावे लागतील. या महाराष्ट्रात प्रतिमाताई इंगोले संपूर्ण महाराष्ट्रातील बोलीभाषांची चळवळ चालवितात. हरिश्चंद्र बोरकरांसारखे साहित्यिक, कलावंत झाडीबोलीची चळवळ उभी करतात, दंडार या लोककलेस जिवंत करण्यासाठी धडपडतात, नितीन देशमुखांसारखा कवी ज्याचा लिहिलेला प्रत्येक शब्द काहीतरी शिकवूनच जातो. गंगाधर मुटेसारखा माणूस शेतकरी साहित्याकरिता शेतकरी साहित्य चळवळ चालवितो. त्याची संमेलने घेतो.
बंडोपंत बोडेकरांच्या ‘खंजडी ‘ तुन अस्सल झाडीबोलीचे दर्शन घडते. अविनाश पोईनकर हा युवा साहित्यिक वास्तवाची पेरणी करतो. का. रा. चव्हाण, नरेंद्र इंगळे, किशोर बळी, यासारखे साहित्यिक वऱ्हाडीच्या संवर्धनासाठी कवी लेखकांना लिहिते बोलते करतात, तर लक्ष्मण खोब्रागडे हा युवा साहित्यिक अस्सल झाडीबोलीचा खजिना ज्याला म्हणता येईल असा ‘मोरगाड’ सारखा कवितासंग्रह जेव्हा लोकांसमोर ठेवतो तेव्हा मराठी भाषेची चिंता असावी का असे खरंच वाटते. गेल्या ५० / ६० वर्षात भाषेच्या प्रचाराकरिता बोलीभाषेच्या प्रचाराकरिता जे काम झाले नसेल ते काम गेल्या दोनचार वर्षात युट्युब, फेसबुक, इंस्टाग्राम यासारख्या माध्यमाचा सकारात्मक वापर करून कराळे सर, अमरावतीची वायएफपी फिल्म, विजय खंदारे, सोलापुरी, कोल्हापुरी युट्युब चॅनेल, कोकणातील कोकण नाऊ, कोकणातील विनायक माळी यांचे चॅनल, खान्देशी बोलीभाषेकरीता असलेली चॅनेल यासारख्या माध्यमातून झालाय असा मी मानतो.
त्यामुळे मला वैयक्तिकरित्या भाषेची चिंता वाटत नाही मात्र तिला जगविण्याकरिता, समृद्ध करण्याकरिता आपल्याला व्यापक होणे आवश्यक आहे. बोलीभाषेचा स्वीकार करणे, बोलीभाषेत लिहिण्याबोलण्याकरिता प्रवृत्त् करणे आवश्यक आहे कारण बोलीभाषा हि अस्सल आहे त्यामुळे अस्सल बोलीभाषेतून जर संवाद झाला तर तो निश्चितच प्रभावी होत असतो. आणि त्या बोलीभाषेतून निर्माण होणारे साहित्य हे सुद्धा अस्सलच असणार आहे. आणि हि बोलीभाषा जागविण्याकरिता जे प्रयत्न करीत आहे त्यांचाही सन्मान व्हायला पाहिजे. काही इंग्रजीचे शब्द मराठीत येतील काळानुसार ते एकरूप होतील त्यांना पर्याय शोधण्याचा प्रयत्न करूया जर नाही झाले तर ते स्वीकारू. कारण बदल हा आपण स्वीकारणं आलोय. ज्ञानेश्वरीतील मराठी आणि आजची मराठी यात जो फरक आहे तोच फरक मराठीचे बाबतीत भविष्यातही राहणार आहे. पण त्याचं ओझं मानून घेण्यापेक्षा सकारात्मकता पेरणे व संवर्धनासाठी प्रयत्न करणे, जे करत आहे त्यांचा आदर सन्मान करणे जरी आपण करू शकलो तरी मराठीला कोणतीही चिंता नाही. मराठी जगेल आणि मानाने जगेल याबाबत माझ्या मनात तिळमात्र शंका नाही.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.